Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उमेदवारी मागे घेण्यासाठी बायडन यांच्यावर वाढता दबाव, डेमोक्रॅट्स चिंतेत, कोण असणार उमेदवार?

उमेदवारी मागे घेण्यासाठी बायडन यांच्यावर वाढता दबाव, डेमोक्रॅट्स चिंतेत, कोण असणार उमेदवार?
, शनिवार, 20 जुलै 2024 (09:26 IST)
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचार मोहिम चालवत असलेल्या जो बायडन यांच्यावरील दबावात गुरुवारी आणखी भर पडली.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चिंता व्यक्त करण्यात आल्याच्या बातम्या, डेमोक्रॅटिक पक्षात वाढत असलेले निराशेचे सावट आणि निवडणूक प्रचारात डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याचे जनमत चाचणीतून समोर येणं या सर्व कारणांमुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचार करणाऱ्या जो बायडन यांच्यावरील दबाव वाढला आहे.
 
डेमोक्रॅटिक पक्षातील काहीजणांना परिस्थिती गंभीर असल्याचं वाटतं. पक्षातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की जो बायडन यांना पद सोडावं लागणार ही बाब 'अपरिहार्य' असल्याचं अनेकांना वाटत होतं.
बीबीसीचे अमेरिकेतील सहकारी माध्यम असलेल्या सीबीएस न्यूजवर गुरुवारी झालेल्या जनमत चाचणीत जो बायडन, ट्रम्प यांच्यापेक्षा पाच पॉईंटने मागे असल्याचं दिसलं. या निवडणुकीतील प्रचार मोहिमेतील दोन्ही उमेदवारांमधील हा आतापर्यतचा सर्वात जास्त फरक आहे.
 
मात्र जो बायडन यांची प्रचार मोहीम चालवणाऱ्या टीमनं डेमोक्रॅटिक पक्षात त्यांच्या उमेदवारीबद्दल खूप चिंता असल्याच्या बातम्या "निराधार" असल्याचं सांगत, तेच राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असतील असं ठामपणे सांगितलं आहे.
 
जो बायडन यांची राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी खासगीत म्हटल्याचं वृत्त वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रानं दिलं होतं. मात्र बराक ओबामा यांच्या प्रवक्त्यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
सभागृहाच्या माजी सभापती नॅन्सी पेलोसी यांच्यासह हकीम जेफ्रीज आणि चक शूमर या अमेरिकन काँग्रेसमधील दोन सर्वात ज्येष्ठ डेमोक्रॅटिक नेत्यांनी जो बायडन यांना पक्षहितासाठी स्वत:च्या उमेदवारीचा फेरविचार करण्याचा सल्ला दिला असल्याच्या अनेक वृत्तानंतर ओबामा संदर्भातील वृत्त आलं आहे. मात्र सर्वांनी या बातम्या फेटाळल्या आहेत.
 
डेमोक्रॅटिक पक्षातच बायडन यांच्याबाबत नाराजी?
डेमोक्रॅटिक पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं बीबीसीला सांगितलं की डेमोक्रॅटिक पक्षात चिंतेचं वातावरण आहे. "आम्ही सर्व त्या अपरिहार्य निर्णयाची वाट पाहत आहोत."
 
वॉशिंग्टन राज्याचे संसदेतील प्रतिनिधी असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अॅडम स्मिथ यांनीदेखील याच प्रकारची गंभीर परिस्थिती असल्याचं सांगितलं. बायडन यांच्या उमेदवारीबाबत पक्ष अंतिम निर्णय घेणार आहे का? असा प्रश्न स्मिथ यांना 'बीबीसी रेडिओ 4' वरील 'द वर्ल्ड टूनाईट' या कार्यक्रमात विचारण्यात आला असता त्यांनी उत्तर दिलं की, "मला असं वाटतं."
 
"म्हणजे मला सांगायचं आहे की मला माहित नाही. मात्र आता गोष्ट त्याच दिशेनं चालली आहे, याविषयी मला शंका वाटत नाही."
मागील महिन्याच्या अखेरीस झालेल्या पहिल्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये सुमार कामगिरी केल्यानंतर, जो बायडन यांना मागील काही आठवड्यांपासून कठोर टीकेला सामोरं जावं लागलं आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे सध्या त्यांच्यावर डेलवेअर इथं उपचार सुरू असून ते बरे होत आहेत. सध्या त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलेलं आहे.
 
डोनाल्ड ट्रम्प यांची परिस्थिती जो बायडन यांच्या उलट आहे. मिलवॉकी इथं गुरुवारी संध्याकाळी झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात डोनाल्ड ट्रम्प यांना पक्षाचा राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आलं आहे.
 
प्रचारसभेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेत डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले होते. त्यानंतरच्या आपल्या पहिल्याच भाषणात बोलताना त्यांचा आत्मविश्वास दिसून येत होता. अधिवेशनातील पक्षाचे प्रतिनिधी आणि समर्थक आठवडाभर जोशात होते. त्यांचं मनोधैर्य उंचावलेलं होतं.
 
राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीतून माघार घेण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षातून जो बायडन यांच्यावर दबाव येतो आहे. मात्र आतापर्यत तरी बायडन यांनी त्यासंदर्भात विरोधाचा पवित्रा घेतलेला आहे. अनेक राजकारणाऱ्यांकडून त्यांना उघडपणे पाठिंबा मिळतो आहे. यात शक्तीशाली अशा 'काँग्रेसशनल ब्लॅक कॉकस'मधील सदस्यांचादेखील समावेश आहे.
 
(काँग्रेसशनल ब्लॅक कॉकस ही आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीयांची संघटना किंवा राजकीय पक्षातील सत्ताधारी गट आहे. कृष्णवर्णीय अमेरिकन आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या हिताच्या रक्षणासाठी तो स्थापन करण्यात आला आहे. यात अमेरिकेच्या संसद आणि सिनेटमधील सदस्य असतात.)
 
सिनेटमधील नेते असलेले शुमर आणि अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) वरिष्ठ डेमोक्रॅटिक नेते जेफ्रीज यांनी जो बायडन यांना मागील आठवड्यात आपल्या सहकाऱ्यांचं मत सांगितल्याचं वृत्त होतं. त्यांनी बायडन यांना सांगितलं होतं की संसदेतील आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या (बायडन) समोर असलेल्या अडचणींमुळे त्यांची राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी होईल याची चिंता वाटते आहे.
 
शुमर म्हणाले या बातम्या "निव्वळ अनुमान" आहेत. तर जेफ्रीज म्हणाले की "त्यांनी केलेलं संभाषण हे खासगी स्वरुपाचं होतं आणि ते खासगीच राहील."
 
दरम्यान सीएनएननं वृत्त दिलं आहे की श्रीमती पेलोसी यांनी जो बायडन यांना सांगितलं होतं की जनमत चाचण्यांमधून दिसतं आहे की ते जिंकणार नाहीत.
 
नंतर पेलोसी यांनी हे वृत्त नाकारताना, हे वृत्त म्हणजे उन्माद वाढवण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्याचबरोबर त्यांचं जो बायडन यांच्याशी संभाषण झाल्याचं देखील पेलोसी यांनी नाकारलं नव्हतं.
 
मेरिलँड येथील प्रतिनिधी असलेल्या जॅमी रास्किन यांनी जो बायडन यांना पत्र लिहिलं होतं. त्यात जॅमी यांनी बायडन यांची तुलना निवृत्तीच्या जवळ आलेल्या बेसबॉल खेळाडूशी केली होती. त्यांनी लिहिलं होतं, "तुमचा हात थकलेला असताना लोकांकडून भरभरुन कौतुक होत, निवृत्त होण्यात 'कोणतीही लाज' आली नसती."
 
टी जे डक्लो, बायडन यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे वरिष्ठ सल्लागार आहेत. बायडन यांच्याबद्दल व्यक्त करण्यात येत असलेल्या प्रचंड चिंतेबद्दलच्या वृत्तांची डक्लो यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, हे "निनावी स्त्रोतांकडून करण्यात आलेले निराधार अनुमान" आहेत.
 
"जो बायडन हे त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत. ते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लढवत आहेत." असं डक्लो यांनी एक्स (ट्विटर) वरील पोस्टमध्ये लिहिलं.
बायडन यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे उपव्यवस्थापक क्वेंटिन फोक्स म्हणाले, "बायडन कशामुळेही डगमगलेले नाहीत. राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. मला उद्धटपणे सांगायचं नाही, मात्र आणखी किती वेळा या मुद्द्यावर आम्ही उत्तर द्यायचं."
 
बायडन यांना कोरोनाच्या संसर्गामुळे नाक आणि घशाशी संबंधित सौम्य लक्षणं आहेत.मात्र त्यांना ताप नाही, असं बायडन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर केविन ओ'कोनर यांनी गुरुवारी सांगितलं.
 
व्हाईट हाऊसनं सांगितलं होतं की इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू बुधवारी अमेरिकेत आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडन त्यांची भेट घेणार आहेत.
 
उमेदवारी मागे घेण्यास बायडन यांना भाग पाडलं जाऊ शकतं का?
जर जो बायडन यांना राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मागे घ्यायची नसेल तर मात्र ही सर्व प्रक्रिया खूप क्लिष्ट होणार आहे.
 
अलीकडच्या काळात अमेरिकेच्या राजकारणात, एका प्रमुख राष्ट्रीय पक्षानं उमेदवाराची मागे हटण्याची इच्छा नसताना जबरदस्तीनं उमेदवार बदललेला नाही.
 
मात्र डीएनसीच्या (डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी) नियमांमध्ये सैद्धांतिकदृष्ट्या काही त्रुटी आहेत. त्यांच्या आधारे बायडन यांना उमेदवारी मागे घ्यायला लावणं शक्य आहे.
 
या नियमांमुळे प्रतिनिधी, "ज्यांनी त्यांना निवडून दिले त्यांच्या भावनांचे प्रतिबिंब उमटेल अशा विवेकबुद्धीनं" घेतलेल्या निर्णयाद्वारे दुसऱ्या कोणाची तरी उमेदवार म्हणून निवड करू शकतात.
 
"ही नक्कीच एक फारच किळसवाणी परिस्थिती ठरेल," असं राईट रिगुअर म्हणाल्या
तज्ज्ञांनी बीबीसीला सांगितलं की पक्षाच्या प्रतिनिधींमध्ये बंडखोरी होईल अशी त्यांना शंका वाटते.
 
मात्र डीएनसी कोणत्याही क्षणी पक्षाचे नियम बदलू शकते.
 
राईट रिगुअर यांनी यासंदर्भात 1968 सालाकडे लक्ष वेधलं. त्यावर्षी राष्ट्राध्यक्ष लिंडन बी जॉन्सन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा न लढवण्याचा निर्णय घेतला होता.
 
त्यानंतर पक्ष एका खुल्या अधिवेशन प्रक्रियेतून एका बंधनकारक प्रक्रियेकडे वळला. खुल्या प्रक्रियेत प्रतिनिधी आपलं मत त्यांनी निवडलेल्या कोणालाही देऊ शकतात. तर बंदिस्त प्रक्रियेत प्रतिनिधी प्राथमिक निकालांच्या आधारे निवडण्यात आलेल्या उमेदवाराशी जोडले जातात.
 
बायडन जरी अचानक राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाजूला झाले तरी पक्षातील प्रतिगामी गट डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या नव्या उमेदवाराच्या कायदेशीर पात्रतेला आव्हान देणारे खटले दाखल करणार हे निश्चित आहे.
 
बायडन यांच्याऐवजी कमला हॅरिस उमेदवार होतील का?
जर बायडन त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातच पदावरून बाजूला झाले तर उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आपोआपच त्यांची जागा घेतील.
 
मात्र नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जर जो बायडन यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली तर मात्र तेच नियम लागू होणार नाहीत. शिवाय अशा परिस्थितीत पक्षाच्या खुल्या अधिवेशनात उपराष्ट्राध्यक्षांना उमेदवारीच्या शर्यतीत वरचढ चढता येईल अशी कोणतीही व्यवस्था नाही.
 
किंबहुना अशा वेळी अधिवेशनात कमला हॅरिस यांना इतर उमेदवारांप्रमाणेच मैदानात उतरावं लागेल आणि प्रतिनिधींकडून बहुमताचा पाठिंबा मिळवावा लागेल.
 
यात आणखी एक शक्यता अशी की बायडन यांनी जर स्वत:ची राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेतली तर ते आपल्या जागी उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांची निवड व्हावी यासाठी त्यांना पाठिंबा देऊ शकतील.
 
डेमोक्रॅटिक पक्षाच्याच उमेदवार असल्यामुळे मग कमला हॅरिस यांना सध्या राष्ट्राध्यक्षांना निवडणूक प्रचार मोहिमेसाठी उपलब्ध असलेला निधी मिळू शकेल. त्या पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यादेखील आहेत.
 
मात्र अमेरिकन जनतेमध्ये कमला हॅरिस तुलनेने कमी लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तितका फायदा मिळणार नाही.
Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हार्दिक पांड्या: कर्णधारपद दुरावलं, नंतर घटस्फोटही झाला, चढ-उतारानंतर आता नवी आव्हानं