उत्तर-पश्चिम युरोप सध्या युनिस चक्रीवादळाच्या तडाख्यात आहे. अशा स्थितीत शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, तर अनेकांना मार्गावर वळवण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडिया वर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एअर इंडियाचे पायलट लंडनमध्ये अतिशय कुशलतेने विमानाचे यशस्वी लँडिंग करतात. वादळ वाऱ्यातून विमान अगदी सहजतेने हवाई पट्टीवर उतरते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एअर इंडियाच्या पायलटचे खूप कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे पायलट कॅप्टन अंचित भारद्वाज आणि आदित्य राव होते, ज्यांनी शुक्रवारी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर बोइंग ड्रीमलायनर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात यश मिळवले.
विमानाचे यशस्वी आणि सुरक्षित लँडिंग बिग जेट टीव्ही या यूट्यूब चॅनलद्वारे थेट प्रवाहित करण्यात आले. हा भारतीय पायलट अतिशय कुशल असल्याचे या व्हिडिओचा निर्माता सांगत आहे. रिपोर्ट्सनुसार, दोन फ्लाइट्समध्ये, एक AI-147 हे हैदराबादचे होते, कॅप्टन अंचित भारद्वाज यांनी पायलट केले होते, तर दुसरे फ्लाइट AI-145 गोव्याचे होते, जे कॅप्टन आदित्य राव उडवत होते.
एअर इंडियाने आपल्या दोन्ही वैमानिकांचे जोरदार कौतुक केले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या कुशल वैमानिकांनी हिथ्रो विमानतळावर अशा वेळी लँडिंग केले, जेव्हा इतर विमान कंपन्यांनी धीर सोडले होते. वास्तविक, वादळामुळे विमानांचा तोल बिघडला असता आणि ते धावपट्टीवर घसरून मोठी दुर्घटना घडू शकली असती.