US Shooting News: अमेरिकेतील लेविस्टन शहरात एका व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 22 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तर 50 ते 60 जण जखमी झाले आहेत. या गोळीबारात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सक्रिय शूटरने बुधवारी रात्री हा गोळीबार केला. अँड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयाने संशयिताचे दोन फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.
लेविस्टन पोलिसांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की ते लेविस्टनमध्ये सक्रिय शूटिंगच्या संदर्भात काळ्या रंगाचे फ्रंट बंपर असलेल्या वाहनाचा शोध घेत आहेत. मेन स्टेट पोलिसांनी सीएनएनला पुष्टी केली की फोटो संशयिताच्या कारचा आहे. केंद्राने सांगितले की ते रुग्णांना दाखल करण्यासाठी प्रादेशिक रुग्णालयांशी समन्वय साधत आहेत.
पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो प्रसिद्ध केला असून लोकांकडून मदत मागितली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये लांब बाहींचा शर्ट आणि जीन्स घातलेला एक दाढीवाला माणूस फायरिंग रायफल हातात धरलेला दिसत आहे. लेविस्टनमधील सेंट्रल मेन मेडिकल सेंटरने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की या सामूहिक गोळीबारात लोक जखमी झाले आहेत. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लेविस्टन हे एंड्रोस्कोगिन काउंटीचा भाग आहे आणि मेनच्या सर्वात मोठ्या शहर, पोर्टलँडच्या उत्तरेस 35 मैलांवर आहे. अँड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि सर्व व्यवसायांना त्यांचे आस्थापना बंद करण्याचे आवाहन करत आहोत.' मेन डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीच्या प्रवक्त्याने लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय घरांचे दरवाजे बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.