भारत-चीन दोन्ही देशांकडून सीमा रेषेवर ३-३हजार जवान तैनात करण्यात आल्याचे समोर आले आहे. सिक्कीममधील डोंगलांग भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाला भारताने आक्षेप घेतला होता. यावरुन दोन्ही देशांमध्ये वादाची ठिणगी पडली. सिक्कीममध्ये भारत-चीन व भूतान यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथे भारताचे काही जुने बंकर होते. हे बंकर बुलडोझरचा वापर करून चिनी सैनिकांनी उध्वस्त केले होते. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी गंगटोकमधील १७ माऊंटन डिव्हिजन आणि कलिमपोंगमधील २७ माऊंटन डिव्हिजनचा दौरा केला. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली.