Israel-Hamas Conflict: गाझा सीमा इस्रायली सैनिकांनी सुरक्षित केल्या असून, गाझा पट्टीतील हमासच्या केंद्रांवर एअरस्ट्राईक सुरूच असल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण दलानं दिलीय.
कालच्या (9-10 ऑक्टोबर) रात्रीत इस्रायलच्या नौदलानं हमासच्या 200 केंद्रांवर हल्ला चढवला, अशीही माहिती इस्रायलच्या संरक्षण दलानं दिली.
तर दुसरीकडे, लढाई पूर्ण झाल्याशिवाय आम्ही ओलीस ठेवलेल्या लोकांबाबत कुठलीही तडजोड करणार नाही, असं हमासनं स्पष्ट केलंय.
हमासच्या राजकीय संघटनेचे प्रमुख इस्माईल हनियेह म्हणाले की, "शत्रूंच्या कैंद्यांबाबत आमच्याशी ज्यांनी ज्यांनी संपर्क साधला, त्या प्रत्येकाला आम्ही हेच सांगितलंय की, लढाई पूर्ण झाल्याशिवाय त्यांच्याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही."
हमासला परिणाम भोगावे लागतील - नेत्यान्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी हमासवर हल्ल्यानंतर त्यांचं प्रत्युत्तर ही केवळ सुरुवात असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या देशाकडे असलेल्या प्रचंड ताकदीचा वापर करून ते हमासचा पराभव करतील, असं त्यांनी म्हटलं.
AFP या वृत्तसंस्थेच्या मते दक्षिण इस्रायलच्या अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान ते म्हणाले, “हमासला याचे परिणाम भोगावे लागतील.”
ते म्हणाले, “ही फक्त सुरुवात आहे. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आमच्या ताकदीच्या बळावर आम्ही त्यांना हरवू. आम्ही मध्य-पूर्व आशियाची परिस्थिती बदलून टाकू.”
ओलीस नागरिकांना सोडवण्यासाठी इस्रायल आणि हमासमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न करत असल्याचं करत असल्याचं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे.
गाझाची नाकेबंदी
इस्रायलच्या सैन्याने काल (9 ऑक्टोबर) हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढवली. लष्कराने सांगितलं की, हमासच्या 500 पेक्षा अधिक ठिकाणांवर हल्ला केला आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री योओव गँलेट यांनी गाझाची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचा आदेश दिला आहे. ते म्हणाले की, गाझामध्ये खाणं पिणं आणि वीजेचा पुरवठा खंडित केला आहे. इस्रायलच्या मते गाझा पट्टीतून कोणी बाहेर येऊ शकणार नाही किंवा जाऊ शकणार नाही.
संयुक्त राष्ट्रांच्या मते गाझामध्ये 1 लाख 20 हजार पेक्षा अधिक लोक विस्थापित झाले आहेत. त्यापैका बहुतांश लोकांनी एका शाळेत आश्रय घेतला आहे.
अमेरिकेने पाठवल्या युद्धनौका
या संघर्षात भारतासोबतच अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि कॅनडासह पाश्चात्य देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे.
तर अमेरिकेने मध्य पूर्व समुद्रात युद्धनौका पाठवल्या आहेत.
रशिया आणि चीनने या हिंसाचाराचा निषेध केला आहे, पण पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 18 थाई नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
सोमवारी (9 ऑक्टोबर) 12 थाई नागरिकांचा मृत्यू झाला आणि 11 जणांचं अपहरण झाल्याची बातमी आली होती.
तसंच इस्रायलमध्ये राहणाऱ्या नेपाळमधील 10 विद्यार्थ्यांचाही या संघर्षात मृत्यू झाला आहे.
Published By- Priya Dixit