Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष : रॉकेटला हवेतच नष्ट करणारं आयर्न डोम काय असतं?

इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष : रॉकेटला हवेतच नष्ट करणारं आयर्न डोम काय असतं?
, शनिवार, 15 मे 2021 (15:58 IST)
हमास आणि इतर पॅलेस्टाईन कट्टरवादी संघटनांनी इस्रायलच्या दिशेने 1500 पेक्षा अधिक क्षेपणास्त्र डागली असल्याचं इस्रायलच्या सैन्याने म्हटलंय.
 
पण यातली बहुतेक रॉकेट इस्राएलच्या सुरक्षा कवचामुळे जमिनीवर पोहोचण्याच्या आधीच हवेतच नष्ट करण्यात आली. या सुरक्षा यंत्रणेला आयर्न डोम अँटी मिसाइल म्हणतात.
 
ही यंत्रणा 90 टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरत असल्याचे इस्रायलच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हल्ला करण्यात आलेलं रॉकेट नागरी भागांमध्ये पडण्यापासून ही यंत्रणा रोखते आणि हे रॉकेट हवेतच नष्ट करण्यात येतं.
 
आयर्न डोम सिस्टीम काम कसं करते?
 
लाखो डॉलर्स खर्च करून इस्रायलने उभारलेली ही यंत्रणा ही एका मोठ्या बचावात्मक यंत्रणेचा एक भाग आहे.
 
डागण्यात आलेलं रॉकेट किंवा क्षेपणास्त्र हे रहिवासी भागांवर पडेल किंवा नाही याचा अंदाज ही सिस्टीम लावते किंवा कोणतं रॉकेट आपल्या लक्ष्यापासून दूर जाण्याचा अंदाज असल्याचंही ही सिस्टीम ठरवते.
जी रॉकेट रहिवासी भागांवर पडण्याची शक्यता असते, अशा रॉकेटस ना ही सिस्टीम हवेमध्ये नष्ट करते.
 
या वैशिष्ट्यामुळे ही बचावात्मक यंत्रणा अतिशय परिणामकारक ठरते आहे.
 
या प्रत्येक इंटरसेप्टरची किंमत सुमारे दीड लाख डॉलर्स असल्याचं टाइम्स ऑफ इस्रायलने म्हटलंय.
2006 साली हिजबुल्ला या इस्लामी गटाशी युद्ध झाल्यानंतर इस्रायलने या यंत्रणेवर काम करायला सुरुवात केली होती.
 
2006 सालच्या युद्धादरम्यान हिजबुल्लाने इस्रायलच्या दिशेने हजारो रॉकेटस लॉन्च केली आणि यामध्ये अनेक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्रायलने ही बचावात्मक यंत्रणा विकसित करायला घेतली.
 
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आपण देशासाठी एक मिसाईल शिल्ड म्हणजेच क्षेपणास्त्रापासून बचाव करणारं कवच तयार करणार असल्याचं इस्रायलची सरकारी कंपनी रफार डिफेन्सने म्हटलं होतं.
ही यंत्रणा तयार करण्यासाठी अमेरिकेने इस्रायलला वीस कोटी डॉलर्सची मदत केली.
 
अनेक वर्षांच्या संशोधनानंतर 2011साली या यंत्रणेची चाचणी करण्यात आली. या चाचणी दरम्यान इस्रायलच्या दक्षिणेला असणाऱ्या बीरसेबा शहरातून क्षेपणास्त्र डागण्यात आली आणि या यंत्रणेने ही रॉकेट्स यशस्वीरित्या पाडली.
 
या यंत्रणेत त्रुटी आहेत का?
गाझापट्टीमधून डागण्यात आलेल्या रॉकेट्समुळे आत्तापर्यंत इस्रायलमध्ये सात जणांचा जीव गेला असल्याचं इस्रायलच्या वैद्यकीय पथकांनी म्हटलं आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. आयर्न डोम सिस्टीमने प्रभावीपणे काम केलं नसतं तर या रॉकेट हल्ल्यांमध्ये मरणाऱ्यांची संख्या कित्येक पटींनी जास्त असती, असं या पथकांचं म्हणणं आहे.
 
पण याचा अर्थ ही यंत्रणा अगदी बिनचूक आहे असा होत नाही.
 
अशकलोन नावाच्या एका शहराचं संरक्षण करणाऱ्या या सिस्टीमची एक बॅटरी गेल्या इस्रायल-गाझा युद्धात खराब झाली होती, पण हे एकमेव असं प्रकरण होतं, असं बीबीसीचे माजी संरक्षण आणि धोरणात्मक विषयांचे प्रतिनिधी आणि परराष्ट्र प्रकरणांचे जाणकार जोनाथन मार्कस सांगतात.
तर इतर काही जाणकारांच्या मते सध्या ही यंत्रणा गाझाकडून येणारी रॉकेट्स प्रभावीपणे नष्ट करत असली तरी भविष्यात ती इतर दुसऱ्या कोणत्या शत्रूच्या विरुद्ध इतकी प्रभावी सिद्ध होईलच याची खात्री नाही.
 
जेरुसलेम पोस्टचे संपादक योना जेरेमी बॉब यांच्यामते, कमी वेळात भरपूर रॉकेट डागण्याची हिजबुल्लाची क्षमता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही यंत्रणा इतक्या प्रभावीपणे काम करू न शकण्याची शक्यता आहे.
 
पण गेली काही वर्ष सतत संघर्षाला सामोरे जाणारे इस्रायली नागरिक या यंत्रणेचे आभार मानतात, कारण या सुरक्षा यंत्रणेमुळे त्यांचा जीव वाचतोय.
 
पण इस्रायलने फक्त या यंत्रणेच्या भरवशावर राहून चालणार नाही, आणि दीर्घकालीन इतर उपाय शोधणं गरजेचं असल्याचं तेल अवीव विद्यापीठातले राजकीय संशोधक डॉक्टर योआव फ्रोमर सांगतात.
 
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, " हा विरोधाभास म्हणायला हवा की आयर्न डोम यशस्वी झाल्याने काही परराष्ट्र धोरणे अयशस्वी झाली. यामुळे हिंसा वाढली… अनेक वर्ष उलटूनही कधीही न संपणाऱ्या हिंसाचाराच्या चक्रात आम्ही अडकलेलो आहोत."
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जम्बो कोविड सेंटर मधून पैसे व महत्वाची कागदपत्रे चोरीला, गुन्हा दाखल