Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जॉन्सन अँड जॉन्सन टाल्कम पावडर आता कायमची हद्दपार होणार

जॉन्सन अँड जॉन्सन टाल्कम पावडर आता कायमची हद्दपार होणार
, शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (16:54 IST)
औषधनिर्माण क्षेत्रातील नामवंत अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन (J&J) पुढील वर्षापासून जगभरात टाल्कम बेबी पावडरची निर्मिती आणि विक्री बंद करणार आहे. कंपनीनं अमेरिकेतील उत्पादनांची विक्री थांबल्यानंतर 2 वर्षांनी ही घोषणा केली आहे.
 
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला महिलांनी दाखल केलेल्या हजारो खटल्यांचा सामना करावा लागला. या कंपनीच्या टाल्क उत्पादनांमुळे कॅन्सर होतो, असे दावे न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
 
यात कंपनीच्या टाल्कम पावडरमध्ये अॅसबेस्टॉस असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यामुळे अंडाशयाचा कर्करोग झाला, असाही आरोप महिलांना केला.
 
कंपनीने यावर वारंवार हेच स्पष्टीकरण दिलं की, "आमची उत्पादनं वापरण्यास सुरक्षित आहे, हे अनेक दशकांच्या स्वतंत्र संशोधनातून हे दिसून येतं."
 
"कंपनीच्या जगभरातील आर्थिक मूल्यांकनाचा भाग म्हणून आता कॉर्नस्टार्च बेबी पावडर बनवण्याचा व्यावसायिक निर्णय आम्ही घेतला आहे," असं कंपनीनं एका निवेदनात म्हटलं आहे.
 
कॉर्नस्टार्च बेबी पावडर जगभरातील देशांमध्ये आधीच विकली जाते, असंही कंपनीनं सांगितलं आहे.
 
त्याचवेळी कंपनीनं आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला की, कंपनीची बेबी पावडर वापरण्यास सुरक्षित आहे. आमच्या कॉस्मेटिक टॅल्कच्या सुरक्षिततेबद्दल आमची भूमिका कायम आहे.
 
"आम्ही जगभरातील वैद्यकीय तज्ञांनी अनेक दशकं केलेल्या स्वतंत्र वैज्ञानिक विश्लेषणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कंपनीची टाल्कम पाडर सुरक्षित आहे, असंच या संशोधनातून दिसतं. त्यात अॅसबेस्टॉस नाही आणि त्यामुळे कर्करोग होत नाही, हेही संशोधनातून स्पष्ट होतं."
 
अमेरिका आणि कॅनडामध्ये टाल्कम बेबी पावडरची विक्री थांबवण्यात येईल, असं 2020 मध्ये कंपनीनं सांगितलं होतं. कंपनीच्या उत्पादनाच्या सुरक्षिततेबद्दल चुकीची माहिती पसरवण्यात आली आणि अनेक कायदेशीर प्रकरणं सुरू झाल्यामुळे मागणी कमी झाली, असं कारण यामागे देण्यात आलं होतं.
 
पण त्याचबरोबर टाल्कम बेबी पावडरची यूके आणि उर्वरित जगामध्ये विक्री सुरुच राहील, असंही कंपनीनं स्पष्ट केलं होतं.
 
कंपनीच्या टाल्कम उत्पादनांमध्ये अॅसबेस्टॉसच्या समावेशामुळे कर्करोग झाला असा दावा करणाऱ्या याचिका ग्राहकांकडून आणि त्यातून वाचलेल्या लोकांकडून दाखल करण्यात आल्या होत्या. यामुळे कंपनीला अनेक कायदेशीर खटल्यांचा सामना करावा लागला.
 
टाल्कमचं पृथ्वीवरून उत्खनन केलं जातं आणि अॅसबेस्टॉसजवळील थरामध्ये ते आढळतं. अॅसबेस्टॉस कर्करोगास कारणीभूत ठरतं.
 
जॉन्सन अँड जॉन्सनच्या टाल्कम पावडरमध्ये गेली अनेक वर्षे अॅसबेस्टॉस वापरले जात असल्याचं कंपनीला माहिती होतं, असं रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या 2018 सालच्या संशोधनात समोर आलं.
 
जॉन्सन अँड जॉन्सनने कोर्टामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांची रॉयटर्सने छाननी केली. 1971 पासून 2000 पर्यंत कंपनीने केलेल्या अंतर्गत चाचण्यांमध्ये काही वेळेस कच्च्या टाल्कमध्ये आणि उत्पादनांमध्ये अल्प प्रमाणात अॅसबेस्टॉस सापडल्याचे कागदपत्रांतून दिसून आलं, असं रॉयटर्सनं म्हटलं.
 
टाल्कम पावडरमध्ये अॅसबेस्टॉसचा समावेश असल्याचे पुरावे कोर्ट रूम, मीडिया रिपोर्ट्स आणि यूएस खासदारांना सादर करण्यात आले. त्याला प्रत्युत्तर देताना कंपनीनं मात्र आरोप नाकारले.
 
जॉन्सन अँड जॉन्सननं ऑक्टोबरमध्ये LTL मॅनेजमेंट नावाची एक उपकंपनी तयार केली. टाल्क संबंधित सगळे दावे या कंपनीकडे सोपवण्यात आले. नंतर कंपनी दिवाळखोरीत गेली आणि मग प्रलंबित खटल्यांना पूर्णविराम मिळाला.
 
दिवाळखोरीत जाण्यापूर्वी कंपनीला निर्णय आणि सेटलमेंटमध्ये 3.5 बिलियन डॉलर इतका खर्च करावा लागला. यात 22 महिलांना 2 बिलियन डॉलरपेक्षा जास्तीची भरपाई द्यावी लागली.
 
जगभरात टाल्कम बेबी पावडरची विक्री बंद करण्याची मागणी करणारा भागधारकाचा एक प्रस्ताव एप्रिलमध्ये अयशस्वी ठरला.
 
जॉन्सन बेबी पावडर जवळजवळ 130 वर्षांपासून विकली जात आहे आणि कंपनीचं कुटुंबाप्रतीच्या प्रेमाचं ते प्रतीक झालं होतं.
 
जॉन्सनच्या बेबी पावडरचा वापर लहान बाळांसाठी तसंच सौंदर्यप्रसाधनासाठी केला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Water in Petrol : पेट्रोल मध्ये पाणी टाकून धुळ्यात पेट्रोलची विक्री