Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काबूल विमानतळ स्फोट : '60 माणसं नव्हे, 60 कुटुंबांनी जीव गमावलाय'

काबूल विमानतळ स्फोट : '60 माणसं नव्हे, 60 कुटुंबांनी जीव गमावलाय'
, सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (10:00 IST)
  • मलिक मुदस्सर
काबूल विमानतळापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या माझ्या हॉटेलच्या छतावर मी उभा आहे. विमानतळावर झालेल्या बॉम्ब स्फोटात मृत पावणाऱ्यांच्या संख्येत क्षणाक्षणाला वाढ होत आहे.
 
मात्र देशाच्या आरोग्य मंत्रालयाने अद्याप या स्फोटात एकूण किती जणांचा मृत्यू झाला आहे, याचा अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही.
 
विमानतळाच्या अॅबी गेटबाहेर स्फोट झाला त्यावेळी मी खोलीमध्ये झोपलेलो होतो. या गेटला दक्षिण गेटही म्हटलं जातं.
 
बीबीसीमधील माझे सहकारी पत्रकार सिकंदर किरमानी त्यावेळी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला झोपेतून उठवलं. त्यांनीच मला या हल्ल्याची माहिती दिली होती.
 
आम्हाला काबूल विमानतळावरील हल्ल्याबाबत तालिबान, अमेरिकेचा गुप्तचर विभाग आणि आमच्या कार्यालयाकडूनही विविध पातळ्यांवर अलर्ट मिळत होते.
 
'विमानतळाबाहेर स्फोट झाला आहे'
हल्ल्याची बातमी येण्यापूर्वी तीन दिवसांपासून आम्हाला सलग विमानतळावर स्फोटाचा धोका असल्याचे इशारे मिळत होते. त्यानंतर अचानक एकेदिवशी हा धोका स्फोटाच्या रुपानं समोर आलाच.
अशा प्रकारे मिळणारे अलर्ट एवढे सटिक ठरण्याचे प्रकार फार कमी वेळा घडतात. तुम्हाला सर्वकाही आधीच माहिती असेल आणि एकदोन दिवसांत नेमकं तसंच घडलं, असं शक्यतो फार कमी वेळा होतं.
 
अफगाणिस्तानवर तालिबाननं पूर्ण ताबा मिळवल्याच्या 13 दिवसांमध्ये देशात झालेला हा पहिला मोठा स्फोट आहे.
पत्रकारांनी विमानतळावर जावं मात्र त्याठिकाणी थोडं अंतर राखूनच काम करावं अशी विनंती तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांनी केली आहे. पण लोकांची गर्दी पाहता त्याठिकाणी सुरक्षित ठिकाण शोधणं किंवा सुरक्षित अंतर राखणं हे आमच्यासाठी जवळपास अशक्यच आहे.
 
काबूल शहरावर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर या शहरावर जबीहुल्लाह मुजाहीद यांचाच ताबा असल्याचं सांगितलं जात आहे.
साधारणपणे एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा दुर्घटना झाली तर आपण आरोग्य मंत्रालयाशी संपर्क साधतो. पण काबूल विमानतळावर हल्ल्यानंतर आम्ही आरोग्य मंत्रालयाशी संपर्क केला त्यावेळी त्याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना कोणाशीही बोलण्याची परवानगी नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं.
 
मात्र सोशल मीडियावर जी दृश्य पाहायला मिळत होती त्यावरून त्याठिकाणी किती विध्वंस झाला असेल याचा अंदाज लावणं शक्य होत होतं. लोकांच्या त्या गर्दीत अनेकजण असे होते, ज्यांनी काही आप्तेष्टांना कायमचं गमावलं होतं.
 
15 ऑगस्टला काबूल विमानतळावर उतरलो त्यानंतर मी तीन वेळा बातमीसंदर्भात काबूल विमानतळावर गेलो आहे.
 
मी त्याठिकाणी पोहोचलो तो क्षण मला अजूनही लक्षात आहे.
 
त्याठिकाणी एक विचित्र शांतता होती. जणू कधीही काहीही होऊ शकतं अशी. मी त्याठिकाणाहून बाहेर निघालो तेव्हा जणू संपूर्ण शहरंच रस्त्यावर उतरलं की काय असं वाटत होतं. सगळे इकडे तिकडे पळा-पळ करत होते.
 
त्यादिवसापासून आतापर्यंत हजारो लोक इथं आले आहेत. जे लोक कालपर्यंत कोरोनाची लागण होण्याच्या आणि त्यामुळे मृत्यू होण्याच्या भीतीनं सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत होते, ते सगळे आज सोशल डिस्टन्सिंग विसरून तालिबानच्या हातून मृत्यू होण्याच्या भीतीनं पळत आहेत आणि जगण्यासाठी पर्याय शोधत आहेत.
 
त्यांच्याकडे बसायलाही अगदी थोडीच जागा आहे. पण तरीही कोणीतरी येईल आणि आपल्याला इथून दूर कुठंतरी घेऊन जाईल या आशेपोटी ते सगळे रात्रंदिवस याठिकाणी बसलेले आहेत.
 
आम्ही रिपोर्टींगसाठी शनिवारी सायंकाळी विमानतळाच्या एकाच गेटवर होतो. जलालाबाद रोडवर तुम्ही विमानतळाच्या मेन गेटपासून तीन किलोमीटर पूर्वेला गेले तर अॅबी गेट येतं.
हे गेट कायम अमेरिका आणि ब्रिटिश लष्कराच्या ताब्यात राहिलं आहे. याला मिलिट्री गेटही म्हटलं जातं. अजूनही गेटच्या आत अमेरिकेचं लष्कर आहे. पण बाहेर तालिबान आहे.
 
गेल्या पाच वर्षांमध्ये मी अनेकदा विविध देशांच्या लष्कराबरोबर गेटमधून आत गेलो आहे. पण आता तालिबाननं काबूलवर ताबा मिळवला असल्याने हे गेट केवळ लष्करासाठीच आरक्षित राहिलेलं नाही.
 
ब्रिटन आणि युरोपला जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना प्रवासाची माहिती मिळावी म्हणून ई-मेल पाठवले जातात. पण तसं असलं तरी विमानतळाच्या इतर गेटप्रमाणं इथंही लोक मोठ्या संख्येनं वाट पाहत बसलेलेच पाहायला मिळतात. यापैकी तर अनेक असेही असतात ज्यांच्याकडं आवश्यक कागदपत्रं आणि व्हिसादेखील नसतो.
 
वाट पाहणारे लोक विदेशी सैनिक किंवा पत्रकाराला पाहताच मदतीसाठी याचना करू लागतात. त्यांची कागदपत्रं हातानं हवेत हलवून-हलवून ते मदत मागत असतात.
 
गेल्या काही दिवसांत विमानतळाच्या बाहेरची काटेरी भिंत ओलांडून काही जणांनी आत प्रवेशाचा प्रयत्न केल्याची अनेक दृश्यं पाहायला मिळाली आहेत.
विमानतळाच्या या गेटवर एवढी गर्दी आहे की, सध्या आम्हाला याठिकाणाहून मेनगेटपर्यंत जाण्यासाठीही दुसरा मार्ग शोधावा लागतो. तो मार्ग आहे, काबूलहून जलालाबाद पर्यंतचा याका तूत हायवे.
 
त्याठिकाणी असं वाटतं की, सगळे कुठे तरी पळून जात आहेत. जणू सर्व काही नष्ट होण्याचा दिवस आला असून सगळे त्यामुळे धावत आहेत, असं चित्र दिसतं.
 
तो रस्ताही एका ठिकाणी बंद झालेला होता. त्यानंतर आम्हाला अडिच किलोमीटर पायी जावं लागलं. हा रस्ता शेतातून जातो. आम्ही शनिवारी त्याठिकाणी गेलो तेव्हा वृद्ध महिलांना सामान वाहून नेण्याच्या गाड्यांमधून नेलं जात असल्याचं पाहायला मिळालं.
 
त्या ठिकाणी तात्पुरत्या उभारलेल्या तंबूंमध्ये महिला आणि मुलं बसलेली होती. हे लोक शौचासाठी कुठं जात असतील, त्यांच्या खाण्या-पिण्याची काय व्यवस्था असेल, काहीही कळत नाही.
 
शनिावारी मी याठिकाणी एका महिलेला भेटलो होतो. तिला काबूलमध्येच असलेल्या तिच्या घरीही जायचं नाही.
 
गेल्या काही दिवसांत काबूल विमानतळावर अनेक हल्ले झालेत. त्यात मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ल्यांचा समावेश होता. पण जीवितहानीचा विचार करता नुकताच झालेला बॉम्ब हल्ला अधिक मोठा होता. याठिकाणी सैनिकांवर हल्ले झालेले आहेत, पण प्रथमच याठिकाणी विमानतळावर सामान्य नागरिक हल्ल्यात मारले गेले.
हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू झाला असं आपण म्हणत असलो तरी, ते केवळ 60 लोक नव्हते, तर ती 60 कुटुंब होती.
 
मी आज किंवा उद्यामध्येच इथून परत जाण्याचा विचार करत नाही. विमानतळावर झालेल्या या हल्ल्यानंतर आम्ही काबूल शहराच्या दृश्यांबद्दल रिपोर्टींग करत होतो. आता आम्ही स्फोटाबाबत सतत अपडेट देत आहोत.
 
मात्र माझ्या मनाच्या स्क्रीनवर अजूनही फ्लॅशबॅकच सुरू आहे. मी खूप प्रयत्न करूनही त्या गोष्टी आणि ती दृश्यं माझ्या मनातून दूर जात नाहीत. आप्तेष्टांना एका आत्मघातकी हल्ल्यात गमावल्याची ती दृश्यं आहेत.
 
खरं सांगायचं तर आपल्यासमोर असलेले मृतदेहच आपण मोजत असतो. पण जवळ्या लोकांना गमावलेले लोकदेखील चालते-फिरते मृतदेहच असतात. कारण घटनेपूर्वीसारखं जीवन ते नंतर कधीही जगूच शकत नाहीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अवनीची टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामिगरी!