लेबनीजच्या राजधानीत हिजबुल्लाह सदस्यांशी संबंधित हजारो पेजर्सचा स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2700 हून अधिक हिजबुल्लाह सदस्य या स्फोटात जखमी झाले आहेत. तर हिजबुल्लाने पेजर स्फोटासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे.
इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत इराणचे लेबनॉनमधील राजदूत मोजतबा अमानी हेही जखमी झाले आहेत. हिजबुल्लाच्या एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, हा सर्वात मोठा सुरक्षेचा भंग आहे.
सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पेजर हे लेटेस्ट मॉडेल होते, ते हिजबुल्लाने आणले होते. या स्फोटांनंतर बेरूतच्या दक्षिण भागातील सर्व रुग्णालयांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. एका स्त्रोताच्या म्हणण्यानुसार, लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या किल्ल्यामध्ये, बेरूतच्या दक्षिणेस, आणि बेरूतच्या पूर्वेकडील बेका व्हॅलीमध्ये त्यांच्या पेजरमध्ये झालेल्या स्फोटांमुळे शेकडो हिजबुल्लाह सदस्य जखमी झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी हिजबुल्लाचा नेता हसन नसरुल्ला याने आपल्या सैनिकांना स्मार्टफोन न वापरण्याचे आवाहन केले होते, कारण इस्रायलकडे स्मार्टफोन हॅक करण्याचे किंवा त्यांच्याकडून माहिती काढण्याचे तंत्रज्ञान आहे. या कारणास्तव, हिजबुल्लाहने आपले संवादाचे माध्यम सुधारण्यासाठी स्मार्टफोनऐवजी पेजरचा अवलंब केला होता.