डोनॉल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित “मेक्सिको वॉल’योजनेसाठी एक अब्ज डॉलर्स मंजूर करण्यात आले आहे. अमेरिकेचे संरक्षण कार्यालय पेंटॅगॉनने सोमवारी मेक्सिको सीमेवर संरक्षक भिंत बांधण्यासाठी 1 अब्ज डॉलर्स मंजूर केले आहेत. अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी केलेल्या “मेक्सिका वॉल’च्या मागणीसाठी ही रक्कम मंजूर केल्याची माहिती पेंटॅगॉनचे प्रभारी प्रमुख पॅट्रिक शॅनहान यांनी दिली आहे.
होमलॅंड सुरक्षा विभागाने पेंटॅगॉनला मेक्सिको सीमेवर 92 किमीपर्यंत 5.5 मीटर्स उंच भिंत बांधणे, रस्त्यांत सुधारणा करणे आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यास सांगितलेले आहे.
होमलॅंड सुरक्षा आणि सीमाशुल्क त्याचप्रमाणे सीमा गस्त विभागाच्या मदतीसाठी अमेरिकन एसीई (आर्मी कोअर ऑफ इंजीनियर्स)ला एक अब्ज डॉलर्सपर्यंत रक्कम खर्चाची योजना सुरू करण्याचे आदेश शॅनहान यांनी दिल्याची माहिती पॅंटॅगॉनने एका निवेदनात दिली आहे. मादक पदार्थ, मानवी तस्करी आणि गुन्हेगारांचा धोका टाऴण्यासाठी मेक्सिको सीमेवर संरक्षक भिंत बांधणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको वॉलवरून अमेरिकेत विक्रमी शटडाऊन आणि गेल्या महिन्यात आणीबाणी लागू केली होती