ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत 96 हजार 917 इतक्या मोठ्या संख्येने भारतीयांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करताना पकडलं गेलंय.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीत ही बाब समोर आलेय.
विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत सातत्यानं वाढ होतेय.
2020-21 मध्ये हा आकडा 30,662 होता तर 2021-22 मध्ये हा आकडा 63,927 होता.
या 97 हजार भारतीयांपैकी बहुतांश गुजरात आणि पंजाबमधील असल्याचंही समोर आलंय.
पकडलेल्यांपैकी 30,000 हून अधिक लोक कॅनडाची आणि 41,000 लोक मेक्सिकन सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुटुंबासह किशोरवयीन, अविवाहित तरुण-तरूणी आणि कुणाच्याही सोबतीशिवाय आलेल्या लहान मुलांचा समावेश आहे.
सर्वाधिक संख्या एकट्याने आलेल्या प्रौढांची होती आणि 730 अल्पवयीन मुला-मुलींचाही पडकलेल्यांमध्ये समावेश होता.
अमेरिकन खासदार काय म्हणाले?
अमेरिकेच्या सिनेटमध्येही या विषयावर चर्चा झाली.
सिनेटर जेम्स लँकफोर्ड यांनी 2 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या सेनेटमध्ये सांगितलं की, "अटक करण्यात आलेल्या या लोकांनी प्रत्येकी चार विमानं बदलून अमेरिकेची सीमा गाठलेली आहे. काही लोक मेक्सिकोला जाण्यासाठी फ्रान्समार्गेही आलेले. तिथून ते जवळच्या विमानतळावर पोहोचले आणि नंतर सीमारेषा गाठण्यासाठी बसगाड्या भाड्याने घेतल्या."
"2023 सालीच भारतातील 45,000 हून अधिक लोकांना दक्षिण सीमेवरून अमेरिकेत प्रवेश करताना पकडलं गेलंय,” असंही ते पुढे म्हणाले.
अमेरिकेत घुसखोरी करण्याचा 'थ्री लेअर फॉर्म्युला'
गुजरात पोलिसांनी अलिकडेच 'थ्री-लेअर नेटवर्क' (त्रिस्तरीय सूत्र) शोधून काढलं आणि गुजरातमधून अनेक लोकांना अमेरिकेत पाठवणाऱ्या टोळीचा कथित सूत्रधार भारत पटेल उर्फ बॉबी पटेल नावाच्या व्यक्तीला अटक केली.
या अटकेमुळे हे त्रिस्तरीय सूत्र उघड झालंय.
पहिला स्तर - गुजरात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात स्तरावर बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने आरोपी बॉबीच्या माणसांशी संपर्क साधल्यास त्याची सर्व कागदपत्र तयार केली जातात.
एखाद्या व्यक्तीकडे पासपोर्ट असल्यास, त्याच्या आधारे दुसरी कागदपत्र तयार केली जातात. आणि पासपोर्ट नसेल तर अशा व्यक्तीसाठी पासपोर्टचीही व्यवस्था केली जाते.
या स्तरावर, कथितरित्या एखाद्या व्यक्तीच्या युरोप किंवा कॅनडाच्या व्हिसासाठी सर्व तयारी केली जाते. ज्यामध्ये बँक खात्यापासून ते आयटी रिटर्न किंवा काही बनावट कंपन्यांपर्यंतच्या बनावट कागदपत्रांसह कागदपत्र तयार केली जातात.
कथितरित्या, जेव्हा एखादी व्यक्ती बॉबी किंवा त्याच्या माणसांना भेटते तेव्हा प्रथम कोणत्या देशात व्हिजिटर व्हिसा मिळण्याची शक्यता आहे याची पडताळणी पाहून कागदपत्र तयार केली जातात.
दुसरा स्तर - दिल्ली
कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर, परदेशी व्हिजिटर व्हिसा मिळविण्यासाठी सदर व्यक्तीला दिल्लीतील त्या देशाच्या दूतावासात मुलाखतीसाठी जावं लागतं.
कथितरित्या या व्यवस्थेमध्ये दिल्ली आणि त्यानंतरच्या पुढील प्रवासाची संपूर्ण जबाबदारी दिल्लीतील व्यक्तीवर असते.
तिसरा स्तर - मेक्सिको
कथितरित्या शेंजेन (युरोपियन युनियनच्या 22 देशांसाठी सूट) व्हिसा मिळाल्यानंतर, अशा प्रकारे युरोपियन देशांमध्ये पोहोचलेली व्यक्ती मुक्तपणे प्रवास करू शकते.
व्हिसा उपलब्ध नसल्यास व्हिसा-ऑन-अरायव्हल पद्धतीद्वारे मेक्सिकोमध्ये देखील प्रवेश केला जाऊ शकतो.
म्हणजेच युरोपियन व्हिसा मिळवून अमेरिकेच्या सीमेवर सहज पोहोचता येतं. उदाहरणार्थ, ऑस्ट्रिया, हंगेरी, स्पेन, स्वित्झर्लंड इत्यादी देशात व्हिजिटर व्हिसा मिळवल्यानंतर काही दिवस तिथे राहिल्यानंतर, गुजरातमधून अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवास करणारे लोकं व्हिसा ऑन अरायव्हलच्या मदतीने मेक्सिकोमध्ये प्रवेश करतात.
अमेरिकेच्या सीमा ओलांडून गुजरातमधून मेक्सिकोमध्ये लोकांना नेण्यासाठी हा तिसरा स्तर जबाबदार आहे.
'कबुतरबाजी'मुळे अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश कसा होतो?
कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेत प्रवेश करण्याचे प्रयत्न अनेक दशकांपासून सुरू आहेत, परंतु 9/11 नंतर अमेरिकेने पर्यटन व्हिसा, वर्किंग व्हिसा आणि नागरिकत्व याबाबतचे कायदे कडक केलेत.
याशिवाय बेकायदेशील स्थलांतरितांच्या समस्येवरही लक्ष केंद्रित केलंय.
अमेरिकेत स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या पंजाबी आणि हरियाणवी लोकांमध्ये एक लोकप्रिय मार्ग म्हणजे कबुतरबाजी (बेकायदेशीरपणे अमेरिकेत पाठवण्याच्या प्रक्रियेला कबुतरबाजी म्हणतात.)
दळणवळणाच्या कारणांसाठी शतकानुशतकं भारतात कबुतरांची पैदास केली जातेय. एक कुशल कबूतर पालनकर्ता 'शांती दूत' पाळतो, त्याला वाढवतो आणि प्रशिक्षण देतो.
हा शब्द तेव्हापासून लोकप्रिय झाला. क्रीडा स्पर्धा, संगीत दौरा किंवा भक्ती संगीताच्या नावाखाली खेळ, पंजाबी संगीत उद्योग किंवा भजनं अमेरिकेत नेली जातात.
कायदेशीररित्या अमेरिकेत पोहोचल्यानंतर ते त्यांचे मूळ पासपोर्ट नष्ट करतात आणि अमेरिकेत स्थायिक होतात.
त्यानंतर आयोजक स्थानिक यंत्रणेला याबद्दल औपचारिक माहिती देतात.
अनेकदा आयोजकांना 'कबुतरांबद्दल माहिती असते, तरीही ते त्याकडे कानाडोळा करतात.
जेव्हा एखादा भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्यात यशस्वी होतो, तेव्हा तो त्याच्या राज्यातील, समुदायातील (किंवा जातीतील) किंवा गावातील कायदेशीररीत्या राहणाऱ्या लोकांशी संपर्क साधतो, जे त्याची राहण्याची, कामाची आणि खाण्याची व्यवस्था करण्यास मदत करतात.
गुजराती लोकांपेक्षा पंजाब आणि हरियाणातील लोकांमध्ये 'कबुतरबाजी अधिक प्रचलित असल्याचं या व्यवसायाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे.
अलीकडेच पंजाबी गायक दलेर मेहंदीला जवळपास 19 वर्षे जुन्या प्रकरणात अटक करण्यात आलेली. ते प्रकरणही कबुतरबाजीचं होतं.
अमेरिकेत प्रवेश करण्याचा 'गाढव मार्ग'
'डाँकी फ्लाइट हा शब्द आता एका दशकापेक्षा अधिक काळ प्रचलित आहे, जो आता मार्गां संदर्भातही वापरला जातो.
पंजाबमधील पत्रकार दलीप सिंग यांच्या मते, "खेचरं त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी रस्त्यावरून भटकतात, त्यामुळे परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी 'गाढव' हा शब्द स्थानिकांमध्ये लोकप्रिय झाला, जो नंतर प्रसारमाध्यमांमध्येही वापरला जाऊ लागला."
एकेकाळी प्रादेशिक किंवा राष्ट्रीय वृत्तपत्रांपुरता मर्यादित असलेला हा शब्द, वॉशिंग्टन डीसी येथील मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूट (डॉंकी फ्लाइट्स, फेब्रु-2014, पृष्ठ क्रमांक 2) द्वारे वापरला गेल्यानंत हा शब्द आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झालाय.
अहवालात असं म्हटलंय की इंग्लंमध्ये प्रवास करू इच्छिणारे स्थलांतरित बेकायदेशीरपणे शेंजेन देशातून पर्यटक व्हिसावर परदेशात आले, तिथून त्यांनी इंग्लंडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे इंग्लंड त्यावेळी युरोपीयन युनियनचा भाग होता आहे आणि त्यामुळे इतर शेंजेन देशांमध्ये तुलनेने मुक्तपणे जाता येऊ शकत होतं. संपूर्ण बंद असलेल्या ट्रकमध्ये लपून किंवा लहान बोटींमधून समुद्रमार्गे युरोपियन देशांमधून इंग्लंडला जाण्याचा प्रयत्न केला जायचा.
अमेरिकेत प्रवेश करण्याचे अनेक मार्ग
इमिग्रेशन व्यवसायातील एका दलालाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "अमेरिकेत जाण्यासाठी कोणता आणि काय मार्ग निवडायचा हे एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर अवलंबून असतं. त्याचं वय, लिंग, शैक्षणिक पात्रता, खर्च करण्याची क्षमता, जोखीम घेण्याची क्षमता, शारीरिक तंदुरुस्ती इ. क्षमतेनुसार त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्यायाची निवड केली जाते.
"काही अर्जदारांना अमेरिकेत उच्च शिक्षण घ्यायचं आहे आणि तिथे काम करायचंय, तर काहींना शिकत असताना कमवायचंय. शंभर टक्के उपस्थितीच्या कडक नियमांमुळे अशा लोकांना अंधा-या आणि कुठल्यातरी काना-कोप-यात असलेली महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये जाण्यासाठी तयार केलं जातं. याशिवाय कॅनेडियन आणि मेक्सिकनच्या सीमादेखील बेकायदेशीर प्रवेशासाठी प्रचलित आहेत."
"जर एखाद्यानं 'डाँकी फ्लाइटचा पर्याय निवडला, तर लॅटिन किंवा दक्षिण अमेरिकेतील लांब आणि धोकादायक प्रवासाची तयारी करावी लागते. त्यांना पाठवण्यासाठी दिल्ली आणि आंतरराष्ट्रीय दलालांना सहभागी करून घ्यावं लागतं. त्यांच्या कमिशनमुळे (दलाली) खर्चही वाढतो. तरीही यश मिळेल याची कोणतीही हमी नसते.”
ज्यांची प्रोफाइल खूपच कमकुवत आहे, परंतु शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर आहेत त्यांनी हा मार्ग निवडावा. अमेरिकेत पोहोचल्यानंतरही त्यांनी कठोर परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे.
अमेरिकेला जाण्यासाठी 20 ते 75 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. याशिवाय अमली पदार्थांची तस्करी करणारे गट, वाटेतल्या देशांचे भ्रष्ट अधिकारी आणि प्रवासादरम्यान येणा-या इतर अनपेक्षित खर्चासाठी पैसे तयार ठेवावे लागतात.