Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेपाळ विमान अपघात : पायलटने आयत्या वेळी निर्णय बदलला अन

नेपाळ विमान अपघात : पायलटने आयत्या वेळी निर्णय बदलला अन
, सोमवार, 16 जानेवारी 2023 (13:04 IST)
नेपाळमध्ये रविवारी झालेल्या विमान अपघाताचं मुख्य कारणं वैमानिकानं ऐनवेळी बदलेला लँडिंग पॅड आहे का?
नेपाळच्या अधिकाऱ्यांनी एअरपोर्टवर लँड होण्याच्या काही क्षण आधीच अपघातग्रस्त झालेल्या विमान अपघातात कमीत कमी 68 लोकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
या विमानात केबिन क्रूसह 72 लोक होते. या प्रवाशांमध्ये 5 भारतीय नागरिकही होते.
नेपाळ सरकारने या अपघाताच्या चौकशीसाठी पाच सदस्यांच्या समितीची स्थापना केली आहे.
बीबीसी नेपाळी सेवेच्या रिपोर्टनुसार प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली त्यानुसार लँडिंगसाठी धावपट्टी ऐनवेळी बदलण्यावरून प्रश्न विचारले जात आहेत.
विमानतळावरच्या एका अधिकाऱ्यानुसार पोखरात अपघातग्रस्त झालेल्या यती एअरलाईन्सचं विमान धावपट्टीपासून 24.5 किलोमीटरवर आल्यानंतर त्यांनी आपली लँडिंगची जागा बदलली.
अधिकाऱ्यांच्या मते कॅप्टन कमाल केसी यांच्या नेतृत्वाखाली प्रवास करणाऱ्या या विमानाला उतरण्याची परवानगी दिली होती. तोवर या विमानात कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती.
 
मग अचानक विमान पायलटने एअर ट्राफिक कंट्रोलला म्हटलं की, “मी माझा निर्णय बदलतोय.”
अधिकाऱ्यांच्या मते पायलटला रनवे 30 वर उतरण्याची परवानगी दिली होती पण त्यांनी रनवे 12 वर उतरण्याची परवानगी मागितली.
 
‘आणि विमान खाली कोसळलं’
लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतर विमान ‘व्हिजिबलिटी स्पेस’ मध्ये आलं होतं. म्हणजे ते विमान कंट्रोल टॉवरमधून दिसत होतं. यानुसार एअर ट्राफिक कंट्रोलचा अंदाज होता की विमान 10 ते 20 सेकंदात रनवेवर उतरेल.
आपलं नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एअरपोर्टच्या एका ट्राफिक कंट्रोलरने म्हटलं की, “वळताना जेव्हा विमानाने लँडिंग गिअर उघडला तेव्हा विमान ‘स्टॉल’ झालं आणि खाली जायला लागलं.”
एव्हिएशनच्या क्षेत्रात स्टॉल होणं म्हणजे विमान आपली विशिष्ट उंची न राखू शकणं.
या अधिकाऱ्याच्या मते विमान कंट्रोल टॉवरवरून स्पष्ट दिसत होतं.
पोखरा विमानतळाचे प्रवक्ता विष्णु अधिकारी यांनीही सांगितलं की अपघात झाला त्या दिवशी इथलं वातावरण स्वच्छ होतं आणि सगळी उड्डाणं वेळेत होत होती.
 
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
बीबीसी नेपाळीशी बोलताना काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की लँडिंगच्या आधी वळताना विमानाचं नियंत्रण सुटलं.
बीबीसी या अपघाताबदद्ल माहिती घेण्यासाठी अनेक प्रत्यक्षदर्शींशी बोललं. त्यांनी सांगितली की ही घटना इतकी अचानक घडली की कोणाला काहीच समजलं नाही.
43 वर्षांच्या कमला सुरुंग यांनी म्हटलं की, “मी माझ्या डोळ्यादेखत विमान जळताना पाहिलं.”
कमला गुरुंग घरीपाटन भागात राहाणाऱ्या आहेत. इथल्याच एका घराच्या अंगणात विमान कोसळून पडलं. तिथे अजूनही विमानाच्या खिडक्यांचे तुकडे, चहाचे कप आणि जळालेलं सामान पडलं आहे.
 
‘बॉम्बसारखं विमान फुटलं’
कमला सांगतात की हा अपघात पाहून लहान मुलं घाबरून घरात पळाली.
त्या पुढे म्हणतात, “सकाळी 11.30 वाजेपर्यंत सगळं काही ठीक होतं. मी रोजसारखी मुलांना घेऊन उन्हात बसले होते. विमानांचा आवाज घरात येणं फारच सामान्य बाब आहे. पण रविवारी घरावरून जाणाऱ्या विमानाचा वेगळाच आवाज आला आणि मी काय घडतंय हे पहाणार तोवर विमान कोसळलं होतं.”
कमल म्हणतात असा भयानक अपघात त्यांनी आधी कधी पाहिला नव्हता.
त्या म्हणतात, “जेव्हा विमान कोसळलं तेव्हा खूप मोठा आवाज झाला. काही क्षणात धुराचे लोट उठताना दिसले आणि पाहता पाहता आगीच्या ज्वाळा भडकल्या.”
अपघातस्थळापासून फक्त 200 मीटर अंतरावर काही घरं आहेत. इथले स्थानिक बाल बहादुर गुरुंग यांनी म्हटलं की ‘लोकांचं नशीब चांगलं की या घरांवर विमान कोसळलं नाही.’
 
बहादुर गुरुंग पुढे म्हणतात, “विमान खूप खाली आलं होतं. रनवेकडे जाताना अचानक बॉम्बसारखं फुटलं. आसपासच्या जंगलातही या स्फोटामुळे आग लागली.”
 
लँडिंगच्या काही क्षण आधी अपघात
पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ 1 जानेवारीपासून सुरू झालं आहे. इथे पूर्व आणि पश्चिम दिशांनी विमानं येतात.
पूर्वेकडून येणारी विमानं रनवे– 30 वर उतरतात तर पश्चिमेकडून येणारी विमानं रनवे-12 वर उतरतात.
 
या विमानतळाच्या अधिकाऱ्यांच्या मते अपघातग्रस्त विमान  ‘व्हिज्युअल फ्लाईट रूल्स’ (VRF) या तंत्राचा वापर करून लँड करण्याच्या प्रयत्नात होतं.
जेव्हा हवा स्वच्छ असेल तेव्हा पायलट टेकऑफ आणि लँडिंगसाठी VRF हे तंत्र वापरतात.
अधिकाऱ्यांनी सांगितल, विमान जेव्हा पहिल्यांदा संपर्कात आलं तेव्हा त्याने एटीसीकडे रनवे-30 वर उतरण्याची परवानगी मागितली. विमानाला परवानगी दिली गेली. पण 24.5 किलोमीटर अंतरावर आल्यावर विमानाने रनवे -12 वर उतरण्याची परवानगी मागितली.
 
विमानाच्या पायलटने एअर ट्राफिक कंट्रोलला म्हटलं, “मी माझा निर्णय बदलतोय आणि मी पश्चिमेकडून लँड करेन.”
नव्या विमानतळावर काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे तर हा अपघात झाला नाही ना असं विचारलं असतं विमानतळाचे प्रवक्ते विष्णु अधिकारी म्हणाले की, “सध्या असं काही ठोस सांगणं अवघड आहे. अपघाताचं कारण सविस्तर चौकशीअंती कळेल.”
पोखरात झालेल्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी सरकारने पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
तसंच हवाई अपघात रोखण्यासाठी सर्व स्थानिक एअरलाईन्सच्या विमानांची उड्डाणाआधी तांत्रिक तपासणी करण्याचे आदेशही दिले आहे.
या अपघातानंतर नेपाळमधल्या भारतीय दूतावासाने हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत.
काठमांडू – दिवाकर शर्मा : +977- 9851107021
पोखरा – लेफ्टनंट कर्नल शशांक त्रिपाठी : +977- 9856037699

Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंडोनेशिया भूकंपाने हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 6.1