पाकिस्तानी संसदेत एका महिला खासदाराशी एका मंत्र्याने असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संसदेत सर्वांसमक्ष एका मंत्र्याने महिला खासदाराला असभ्य भाषेत त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला. या प्रकारामुळे व्यथीत झालेल्या पीडित खासदार महिलेने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. खासदार महिलेने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर संबंधित मंत्र्याने माफी मागून परिस्थिती सावरण्याचा केविलवाणी प्रयत्न केला. नुसरत सहर अब्बासी असे पीडितेचे नाव आहे. त्या सिंध प्रांताच्या खासदार आहेत. मंत्री इमदाद पिताफी यांनी शुक्रवारी संसदेमध्येच त्यांना आपल्या केबिनमध्ये येण्यास सांगून त्यांचा अपमान केला. इमदाद यांच्या या अपमानजनक प्रस्तावावर आक्षेप घेत संसदेतच त्यांना विरोध दर्शवला. मात्र, अध्यक्षांनी तक्रार करूनही संबंधित मंत्र्यावर कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला, असे नुसरत यांनी सांगितले. विशेष म्हणजे एक महिलाच या सभागृहाची अध्यक्ष आहे.