क्वेट्टा- पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दोन दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 60 जण ठार झाले आहेत.
सरकारी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन बंदूकधारी दहशतवाद्यांनी शहराजवळच असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला. सुरूवातीला दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. त्यानंतर स्वत:ला उडवून दिले. यावेळी प्रशिक्षण केंद्रात सुमारे 250 जण उपस्थित होते. हल्ल्यानंतर अनेकजण आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होते. छतावरून उडी मारल्याने अनेकजण जखमी झाले आहेत.
क्वेट्टा शहरापासून 20 कि.मी. अंतरावर हे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी सुरवातीला वॉच टॉवरवरील सुरक्षा अधिकार्यांनी ठार मारले आणि त्यानंतर हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिकजण जखमी आहेत.