अभिनेत्री माहिरा खाननं पाकिस्तानात महिलांवर होणाऱ्या हिंसाचारावर चिंता व्यक्त करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना लवकरात लवकर कौटुंबिक हिसाचार विरोधी कायदा लागू करण्याची विनंती केली आहे.
पाकिस्तानात गेल्या काही दिवसांत चर्चेत असलेल्या नूर मुकद्दम आणि अफगाणिस्तानच्या राजदुतांच्या मुलीला मारहाण प्रकरणी पंतप्रधान इम्रान खान यांनी, या प्रकरणावर वैयक्तिक लक्ष असल्याचं म्हटलं होतं. त्यावर माहिरा खाननं ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली.
"कायदा नसेल, तोपर्यंत महिलांना असंच छळलं जाईल. त्यासाठी जबाबदारी निश्चिच व्हायला हवी," असं त्या म्हणाल्या.
पाकिस्तानी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेल्या माहिरा खान यांनी बॉलीवूडमध्येही काम केलं आहे. त्यांनी शाहरूख खानबरोबर दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्या 'रईस' चित्रपटात काम केलं होतं.
पाकिस्तानात कौटुंबिक हिंसाचाराचा मुद्दा
पाकिस्तानात घरगुती हिंसाचार कायदा अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. काही धार्मिक संघटना घरगुती हिंसाचार अधिनियमाच्या काही तरतुदींना विरोध करत आहेत.
यावर्षी एप्रिल महिन्यात नॅशनल असेंबलीनं डोमेस्टिक व्हायलन्स (प्रीव्हेंशन अँड प्रोटेक्शन) विधेयक मंजूर केलं होतं. पण सीनेटमध्ये सादर केल्यानंतर विरोधी पक्षानं काही सुधारणांसाठी शिफारसी देण्यासाठी स्थायी समितीकडं ते पाठवण्याची गरज असल्याचं म्हटलं.
त्यानंतर हे विधेयक नॅशनल असेंबली आणि दोन्ही ठिकाणी मंजूर झालं. पण त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळण्याआधीच काऊंसिल फॉर इस्लामिक आइडियॉलॉजी (सीआईआई) नं या नियोजित कायद्याचा आढावा घेण्याची मागणी केली.
या कायद्यात कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या जास्त व्यापक असल्याचा दावा, सीआयआयनं केला होता.
इम्रान खान काय म्हणाले?
पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी विविध मुद्द्यावर मतं व्यक्त केली होती. "मी नूर मुकद्दमच्या केसवर पहिल्या दिवसापासून नजर ठेऊन आहे. त्याबाबत सर्वकाही मला माहिती आहे. मी पूर्ण माहिती घेतली आहे. हे एक अत्यंत भयावह असं प्रकरण आहे. त्याठिकाणी त्यांचे सगळे कर्मचारी काम करत होते. नोकर, सुरक्षारक्षक होते. त्या सर्वांसमोर दोन दिवस हा प्रकार सुरू होता. मी सर्व माहिती मिळवली आहे."
"लोक असं म्हणत आहेत की, मारेकरी बड्या कुटुंबातील आहे त्यामुळं तो यातून सुटू शकतो. पण कोणीही यातून सुटणार नाही, हे मी सांगू इच्छितो. जर कुणाकडं दुहेरी नागरिकत्व असेल, आणि अमेरिकेचं नागरिकत्व असल्याने ते वाचतील असं वाटत असेल, तर तसं काही होणार नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो."
"नूर बरोबर जे काही घडलं त्याचं दुःख सर्वांनाच असल्याचं मी म्हणेन. आपली मुलगी असती आणि तिच्याबरोबर असं घडलं असतं तर काय झालं असतं, असा विचार आपण करतो. सर्वानाच हा धक्का बसला आहे. सर्वांवर त्याचा परिणाम झाला आहे."
"यापूर्वी अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या मुलीबरोबर जे घडलं, त्या प्रकरणातही जणू माझ्या मुलीबरोबर ही घटना घडली असावी, अशा प्रकारे मी माहिती घेतली. अफगाणिस्तानी आपलेच लोक आहेत. आपण त्यांना बांधव समजतो. हे प्रकरणही मी तसंच हाताळलं आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मी पोलिसांचं कौतुक करतो."
नूर मुकद्दम प्रकरण
ही क्रूर हत्या प्रचंड हादरा देणारी अशी होती. नूर यांच्या हत्येनंतर त्यांचा गळा कापण्यात आला होता. त्यांच्या हत्येच्या संशयात त्यांचे बालमित्र झाहीर जफीर यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये जुने संबंध आहेत. झाहीर इस्लामाबादच्या एका मोठ्या रियल इस्टेट कंपनीच्या सीईओंचा मुलगा आहे.
पोलिस तपासानुसार 20 जुलैला इस्लामाबादच्या नूर मुकद्दमची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ज्या घरात नूरची हत्या झाली होती, त्याठिकाणी घटनेच्या वेळी अनेक लोक उपस्थित होते.
नूर मुकद्दमचे वडील आणि माजी राजदूत शौकत मुकद्दम यांनी एफआयआरमध्ये नूर यांचा मित्र झहिर जफीर यांचं नाव दिलं आहे. शौकत मुकद्दम दक्षिण कोरियात पाकिस्तानचे राजदूत होते.
आरोपीनं हत्येत सहभाग असल्याचं नाकारलं तरीही त्यांच्या विरोदात पुरेसे पुरावे असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. न्यायालयात केवळ पुराव्यांना महत्त्व असतं. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेलं शस्त्रही जप्त केल्याचा दावा केला आहे.
पोलिसांना घटनास्थळावरून सुरा आणि पिस्तूल मिळालं आहे. पण पिस्तुलाचा वापर झालाच नसल्याचं तपासात समोर आलं आहे. पिस्तुलात गोळी अडकली होती, असं पोलिसांनी सांगितलं.
अफगाणिस्तानच्या राजदुतांच्या मुलीच्या अपहरणाचं प्रकरण
पाकिस्तानात जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये राजधानी इस्लामाबादेत अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या अपहरणाचा प्रयत्न सशस्त्र हल्लेखोरांनी केला होता.
त्यानंतर अफगाणिस्तानचे राजदूत नजिबुल्लाह अलिखिल यांनी ट्वीट केलं होतं. ''इस्लामाबादमधून शनिवारी माझ्या मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि तिला मारहाण करण्यात आली. पण ईश्वराच्या कृपेनं तिथून पळून जाण्यात तिला यश आलं. आता ती ठीक आहे. पण हा अमानवी प्रकार आहे. या प्रकरणावर दोन्ही देशांच्या संबंधित अधिकाऱ्यांची नजर आहे,'' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
हल्लेखोराना यश आलं नाही, त्यांनी राजदूतांच्या मुलीला मारहाण केल्यानंतर पळ काढला, असं पोलिसांनी म्हटलं होतं.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेची दखल घेत गृह मंत्रालय, पोलिस आणि संबंधित संस्थांना घटनेच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते.