Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बांगलादेशातील पोलीस ठाणे रिकामे, पोलीस ‘फरार’, कारण काय?

बांगलादेशातील पोलीस ठाणे रिकामे, पोलीस ‘फरार’, कारण काय?
, शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (14:41 IST)
जळून खाक झालेल्या या इमारतीला पाहून ही मीरपूर पोलीस ठाण्याची इमारत असल्याचे वाटणारही नाही, या इमारतीच्या भिंती आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून काळ्याकुट्ट झाल्या असून आता फक्त भग्नावशेष राहिलेत.
गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास ढाका येथील मीरपूर मॉडेल ठाण्यातही असेच काहीसे चित्र होते. या पोलीस ठाण्यात अन्सार (निमलष्करी दल)चे आठ कर्मचारी कर्तव्यावर आहेत.

मीरपूर ठाण्यातील ही जळून खाक झालेली इमारत पाहताना जाणवतं की सामान्यजनांत पोलिसांविरुद्ध कशाप्रकारे नाराजी होती. मीरपूर पोलीस ठाण्याची ही भस्मसात झालेली इमारत पोलिसांप्रती सर्वसामान्य नागरिकांच्या संतापाची साक्षीदार आहे.

एका कार्यालयात काम करणारे कमाल हुसेन हे पोलीस ठाण्यासमोर उभे राहून परिस्थितीची पाहणी करत होते.
त्यांनी बीबीसी बांगलाशी बोलताना सांगितलं, “पोलिसांची अशी स्थिती होईल याची मी कल्पनाही केली नव्हती.
मीरपूरच नाही तर बांगलादेशातील एकाही पोलीस ठाण्यात गेल्या सोमवारी दुपारपासून एकही पोलीस कर्मचारी दिसलेला नाही.
विविध पोलीस ठाण्यातून सर्व पोलीस एकाचवेळी फरार झाल्याची घटना यापूर्वी बांगलादेशात कधीच घडली नव्हती.
वर्तमान व माजी अधिकारी याबाबत बोलताना म्हणाले, जगातील इतर देशांमध्ये अशाप्रकारच्या घटना फार कमी घडतात. अनेकदा अशा घटना युद्धकाळात पाहायला मिळतात, असंही ते म्हणाले. मात्र, पोलिसांसमोर अशी परिस्थिती का निर्माण झाली, हा सर्वात मोठा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.
 
‘बेछुट गोळीबार’
ढाक्याच्या भटारा पोलीस ठाण्याचीही स्थिती मीरपूर पोलीस ठाण्यासारखीच आहे. जाळपोळीच्या घटनेनंतर आता फक्त पोलीस ठाण्याचा सर्वत्र विखुरलेला मलबा उरला आहे.
 
अन्सारचे अनेक सदस्य पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांच्या एका टीमचीही भेट झाली. त्यांनी सांगितले की, ते पोलीस ठाण्याबाहेर पसरलेले ढिगारे साफ करण्यासाठी येथे आले आहेत.
 
पोलिसांचा उल्लेख करताच त्यांच्या आवाजातील नाराजी दिसून येते. मात्र पोलिसांबाबत सर्वसामान्यांमध्ये असलेली नाराजी दूर करून परिस्थिती सामान्य कशी होणार?
याबाबत बोलताना एका खासगी विद्यापीठातील विद्यार्थी अब्दुर रज्जाक बीबीसी बांगलाशी बोलताना म्हणाला, “सामान्य लोकांशी एकमताने जुळवून आणि नरमाईने वागल्यानंतर येथील परिस्थिती सामान्य होऊ शकते. ”
ढाका येथील न्यू मॉडेल कॉलेजचा विद्यार्थी शाहजलाल पटवारी म्हणतो, “मला पोलिसांशी बोलायला भीती वाटत होती. पोलिसांची वागणूक खूपच वाईट होती. पोलिसांनी विद्यार्थी आणि सर्वसामान्यांवर क्रूर हल्ले केले, त्यांच्यावर अनियंत्रितपणे गोळ्या झाडल्या.”
 
पोलिसांच्या विरोधात लोकांच्या मनात निर्माण झालेल्या रोषाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती आहे.
 
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी बांगलाला सांगितले की, ‘जेव्हा पोलिसांनी 2012 मध्ये मोठ्या प्रमाणावर बळाचा वापर करण्यास सुरुवात केली, तेव्हापासूनच लोकांच्या मनात त्यांच्याप्रती प्रचंड अविश्वास निर्माण झाला.’ पोलिसांना कामावर परतण्यास सांगण्यात आले आहे, असंही त्यांनी सांगतिलतं.
 
पोलीस जितक्या लवकर कामावर परतून कायदा आणि सुव्यवस्था सामान्य राखण्यासाठीचे प्रयत्न करतील, तितक्या लवकर लोकांचा त्यांच्यावरील विश्वास पुन्हा निर्माण होईल.
 
पोलिसांच्या या वृत्तीमुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असल्याचे या अधिकाऱ्याने मान्य केले. मात्र, आता हा राग एकदम उफाळून आला आहे. सध्याची परिस्थिती पोलिसांसाठी अतिशय गुंतागुंतीची आहे, यात शंका नाही.
सर्वच पोलीस ठाण्यांतून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा लुटून नेण्यात आला आहे. अनेक पोलिसांकडे गणवेश नाही. अनेक पोलीस ठाण्यांमध्ये आता बसण्यासाठीची व्यवस्थाही नाही.
 
गुरुवारी ढाक्यातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या असता तेथील काही सिटी कॉर्पोरेशनचे कर्मचारी पसरलेला ढिगारा हटविण्याचे काम करत असल्याचे दिसून आले.
 
ढाक्यातील पल्लवी पोलीस ठाण्यासमोरील गटारीसमोर काही स्थानिक लोक उभे होते. त्यात ढाका नॉर्थ सिटी कॉर्पोरेशनच्या वॉर्ड क्रमांक 2 चे नगरसेवक सज्जाद हुसेन यांचाही समावेश होता.
 
सज्जादने बीबीसी बांगलाशी बोलताना सांगितलं, “पोलिसांना ठाण्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी येत असून स्थानिक लोकांना सहकार्याचे आवाहन केले जात आहे. आता कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांची गरज भासणार आहे. पोलीस आमच्याशी संपर्क साधत आहेत.”
 
पोलिसांची उपस्थिती दिसायला हवी
सध्या साध्या गणवेशातील पोलीस विविध पोलीस ठाण्यांना भेट देऊन नुकसानीचा अंदाज घेत आहेत.
 
अशाच एका पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अब्दुल लतीफ यांनी बीबीसी बांगलाला सांगितलं की ते मीरपूर भागातील सर्व पोलीस ठाण्यांना भेट देऊन नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत.
 
“पोलीस ठाण्यांमध्ये एकही पोलीस वाहन शिल्लक राहिलेले नाही. ते सर्व जळून खाक झाले आहेत.” असं त्यांनी सांगितलं.
 
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी पोलिसांना मैदानात उतरावेच लागेल. त्यांना कुठूनतरी सुरुवात करावी लागेल, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
 
माजी पोलीस प्रमुख नुरुल हुदा बीबीसी बांगलाशी बोलताना म्हणाले, “पोलिसांना त्यांची उपस्थिती दर्शवावी लागेल. ते विविध संस्थांमध्ये जाऊन लोकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करू शकतात. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. तरच सर्वसामान्यांचा पोलिसांवर असलेला विश्वास परत येईल. ”
 
लोकांच्या मनातील पोलिसांविषयी नाराजी दूर करण्यासाठी पोलीस सुधारणा आवश्यक आहेत. पण अशा प्रकारच्या सुधारणा लवकर करणे शक्य होणार नाही, असं नूरुल हुदा यांचं मत आहे.
पोलिसांच्या सद्यस्थितीला राजकीय नेतृत्वच जबाबदार असून दीर्घकाळापासून पोलिसांचा होत असलेला राजकीय वापर हे यामागचे कारण असल्याचंही हुदा यांचं म्हणणं आहे.
 
दुसरीकडे पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल निश्चित असल्याचे संकेत उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने बीबीसी बांगलाशी बोलताना सांगितलं, “सर्व पोलीस ठाण्यांचे ओसी आणि प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांबाबत चर्चा सुरू आहेत.”
 
विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान ज्या भागात पोलिसांनी सर्वाधिक बळाचा वापर केला होता त्या भागात प्रथम बदल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसांना अतिरिक्त बळ वापरण्याची सूचना केली होती त्यांच्यावर यापूर्वीही मानवाधिकार उल्लंघनाचे गंभीर आरोप आहेत. जोपर्यंत अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही किंवा त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत पोलिसांवरील सर्वसामान्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होणे कठीण होईल. पण हे सर्व एकत्र करणे शक्य नाही, असंही ते म्हणाले.
 
पोलिसांच्या मागण्या
देशातील पोलीस ठाण्यांचे ओसी आणि उपनिरीक्षकांनी स्थापन केलेल्या पोलीस संघटनेचे म्हणणे आहे की पोलिसांवरील सामान्य लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण पावलं उचलावी लागतील.
 
ढाका येथे बुधवारी झालेल्या असोसिएशनच्या बैठकीतही काही मागण्या मांडण्यात आल्या.
पोलीस उपनिरीक्षक जाहिदुल इस्लाम यांनी त्या बैठकीत सांगितलं की, ‘पोलिसांचा राजकीय वापर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी आदेशामुळे पोलिसांसमोर ही परिस्थिती निर्माण झाली आहे.’
 
आम्हाला असे नेतृत्व हवं आहे जे सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन काम करेल आणि त्याच उद्देशातून आम्हाला सूचना करेल. पण, राजकीय पक्षाची दलाली करून त्यांनी आम्हाला जनतेच्या विरोधात उभं करू नये.’
 
इस्लाम म्हणाले की, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना हवे तसे पोलीस अधिकारी विभागात उपस्थित आहेत. पण ते लोक पुढे येऊ शकत नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “अशा अधिकाऱ्यांची ओळख करून त्यांना जबाबदारी द्यावी लागेल जेणेकरून ते विभाग व्यवस्थित चालवू शकतील.”
 
पोलीस संघटनेची मागणी
पोलीस संघटनेच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत-
 
पोलिसांनी राजकीय प्रभावापासून मुक्त राहावे.
सर्व पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात यावी. झाहिदुल इस्लाम म्हणाले, “पोलीस, विद्यार्थी आणि सामान्य लोकांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या भ्रष्ट आणि दलाल पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर बांगलादेशच्या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.”
अशा अधिकाऱ्यांची सर्व बेकायदेशीर मालमत्ता जप्त करून बांगलादेश पोलिसांच्या कल्याणासाठी वापरली जावी.
हिंसाचारात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना भरपाई देण्यात यावी.
ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी शस्त्रांचा वापर केला आहे, त्यांच्यावर विभागीय कारवाई करू नये.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोलकाता येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या, एकाला अटक