वाढीव पेन्शन आणि इतर लाभांच्या मागणीसाठी बांगलादेशमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप केला. त्यामुळे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. प्रवासी आणि मालगाड्या रद्द करण्यात आल्या. संपामुळे हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. स्थानकांवर प्रवासी बसची वाट पाहत होते. यासोबतच माल वाहतुकीवरही परिणाम झाला.
बांगलादेश रेल्वे रनिंग स्टाफ अँड एम्प्लॉईज युनियनचे कार्यवाहक अध्यक्ष सैदुर रहमान यांनी सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारसोबत मागण्यांबाबत बैठक झाली, परंतु मागण्यांवर एकमत होऊ शकले नाही. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे रहमान यांनी सांगितले.
ढाक्यातील मुख्य कमलापूर रेल्वे स्थानकावर शेकडो प्रवासी गाड्यांची वाट पाहत होते. कारण त्यांना संपाची माहिती नव्हती. कित्येक तास वाट पाहिल्यानंतर ते निराश होऊन परतले. अनेक प्रवाशांनी रेल्वे सल्लागाराकडे तक्रारही केली.