अमेरिकेने शनिवारी रात्री उशिरा उत्तरेकडील प्रदेशात फिरणारा चिनी गुप्तहेर बलून पाडला. अमेरिकेने केवळ एक क्षेपणास्त्र डागून हा गुप्तचर फुगा अटलांटिक महासागरात सोडला. यासोबतच फुग्याचा संवेदनशील अवशेष शोधून ते ताब्यात घेण्यासाठी एक टीमही पाठवण्यात आली होती. आता या घटनेवर चीननेही प्रतिक्रिया दिली आहे. यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
चीनने म्हटले आहे की, "आम्ही या प्रकरणावर आमचा असंतोष व्यक्त करतो आणि मानवरहित नागरी हवाई जहाजावर अमेरिकेने केलेल्या जबरदस्ती कारवाईला आम्ही ठामपणे विरोध करतो." चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला धमकी देताना म्हटले आहे की, "स्पष्टपणे, अमेरिकेने गुप्तचर फुग्याला दिलेली प्रतिक्रिया अत्यंत टोकाची आणि आंतरराष्ट्रीय हितांचे उल्लंघन करणारी होती. आम्ही या प्रकरणी आवश्यक प्रतिक्रिया देण्याचा अधिकार देखील राखून ठेवतो."
पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून उत्तर अमेरिकेच्या आकाशात उडणारा एक गुप्तचर फुगा F-22 लढाऊ विमानाने डागलेल्या क्षेपणास्त्राने खाली आणला होता. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी सांगितले की, ही कारवाई देशाच्या अधिकारक्षेत्रात होती, चीनने स्वायत्ततेचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
वृत्तानुसार, चीनचा गुप्तचर बलून मोंटानाच्या क्षेपणास्त्र क्षेत्रावरून जात होता. अमेरिकेची काही महत्त्वाची शस्त्रेही या भागात ठेवण्यात आली आहेत. तथापि, अमेरिकेचे म्हणणे आहे की या प्रदेशातून गोळा केलेली माहिती चीनसाठी मर्यादित आहे. पण अशा प्रकारची घुसखोरी कोणत्याही देशाकडून खपवून घेतली जाऊ शकत नाही.