Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डोनाल्ड ट्रंप यांचं आत्मसमर्पण, तुरुंगातला फोटो झाला प्रसिद्ध

डोनाल्ड ट्रंप यांचं आत्मसमर्पण, तुरुंगातला फोटो झाला प्रसिद्ध
, शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (07:59 IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जॉर्जियाच्या फुल्टन काऊंटी तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे.
2020च्या निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर निवडणुकीत हस्तक्षेप करणं, हे निकाल फिरवण्याचा प्रयत्न करणं, अशा स्वरुपाचे आरोप असलेल्या प्रकरणात डोनाल्ड ट्रंप यांच्यावर ही कारवाई सुरू आहे.
 
या प्रकरणी डोनाल्ड ट्रंप हे जॉर्जियाच्या फुल्टन काऊंटी तुरुंगात काल (24 ऑगस्ट) स्वतः हजर झाले. यानंतर ट्रंप यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर ट्रंप यांचा एक मगशॉट (आरोपीच्या चेहऱ्याचा फोटो घेण्याची प्रक्रिया) घेण्यात आला.
 
या निमित्ताने पहिल्यांदाच एखाद्या प्रकरणात डोनाल्ड ट्रंप यांचा मगशॉट घेण्यात आला आहे. येथील नियमांनुसार ट्रंप यांचा हा मगशॉट सार्वजनिकही करण्यात आला आहे.
 
अटकेनंतर डोनाल्ड ट्रंप यांना तत्काळ जामीन देण्यात येणार असून जात मुचलक्यासाठीची रक्कम तब्बल दोन लाख डॉलर इतकी निश्चित करण्यात आली आहे.
 
या महिन्याच्या सुरुवातीला एका तक्रारदाराने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यामध्ये जो बायडन यांच्याविरुद्ध पराभूत झाल्यानंतर हा निकाल फिरवण्याचा प्रयत्न करणे, या आरोपासह इतर अनेक आरोपांचा समावेश होता.
 
या प्रकरणी डोनाल्ड ट्रंप यांना जॉर्जियामध्ये हजर होऊन आत्मसमर्पण करावं लागलं. गेल्या एका वर्षांत कोर्ट किंवा प्रशासनाकडे ट्रंप यांनी आत्मसमर्पण करण्याची ही चौथी वेळ आहे.
 
फुल्टन काऊंटीमध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर तुरुंगाच्या नोंदवहीत त्यांच्या नावाची एन्ट्री करण्यात आली. तसंच त्यामध्ये त्यांच्याविरोधातील 13 विविध आरोप आणि इतर तपशीलही नोंदवण्यात आला आहे.
 
दुसरीकडे, डोनाल्ड ट्रंप यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ट्रंप म्हणाले, “निवडणुकीला आव्हान देण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. मला वाटतं की त्या निवडणुकीत गोंधळ झाला होता. मी काहीही चुकीचं केलेलं नाही. सर्वांनाच हे माहीत आहे. निवडणुकीत खोटेपणा झाल्याचं वाटत असल्यास त्याला आव्हान देण्याचे अधिकारही माझ्याकडे आहेत.”
 
ट्रंप यांच्यावर नक्की काय कारवाई झाली आहे?
या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यातील फिर्यादीने ट्रंप यांच्यावर अनेक आरोप लावले. 2020च्या निवडणुकीत जो बायडन यांची मतं चोरण्याच्या कटात सहभागी असल्याचा आणि या राज्यात होत असलेल्या निसटत्या पराभवातून स्वतःला वाचवण्याचा हेतू त्यांचा होता असा आरोप ट्रंप यांच्यावर आहे.
 
ट्रंप यांच्यावर 13 आरोप असल्याचा उल्लेख या लेखी आरोपपत्रात आहे. हे त्यांच्याविरोधातले या वर्षातले चौथे लेखी आरोपपत्र आहे. गुरुवारी त्यांनी जॉर्जियातल्या अधिकाऱ्यांसमोर समर्पण केले आणि त्यांच्यावर हे आरोप ठेवण्यात आले.
 
इनडायक्टमेंट म्हणजे काय?
इनडायक्टमेंट म्हणजे जेव्हा आरोपीवर एखाद्या गुन्ह्यासाठी अधिकृतरित्या आरोप करण्यात येतात तेव्हा त्या व्यक्तीला स्वतः कोर्टात उपस्थित व्हावं लागतं.
 
या आधी ट्रंप तीनवेळा वेगवेगळ्या आरोपांसाठी कोर्टात हजर झाले असून त्यांनी ते आरोप तेव्हा नाकारलेही होते.
 
ट्रंप अजूनही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात का?
हो, अनेक प्रकारचे आरोप असले तरी त्यांना निवडणूक प्रचारापासून रोखता येईल अशी मेरिकेच्या राज्यघटनेत कोणतीही तरतूद नाही.
 
अर्थात त्यात काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. त्यांच्यावरील खटला अनेक आठवडे चालू शकतो. तसेच त्यांना स्वतःही हजर राहावे लागू शकते. त्यामुळे त्यांचा वेळ, ऊर्जा आणि पैसा यामध्ये जाऊन मतदारांना भेटण्याचा, प्रचारमोहिमेचा वेळ यात जाऊ शकतो.
 
रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवार होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच असून पुढच्यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत जो बायडेन यांच्याविरोधात उभे ठाकण्याचा त्यांचा मानस आहेच.
 










Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'इंडिया'च्या लोगोमध्ये दिसणार तिरंग्याचे तीनही रंग