Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तालिबानचं बायडन यांना प्रत्युत्तर - 'आम्ही मनात आणलं तर 15 दिवसांत अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवू'

तालिबानचं बायडन यांना प्रत्युत्तर - 'आम्ही मनात आणलं तर 15 दिवसांत अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवू'
, रविवार, 11 जुलै 2021 (12:43 IST)
तालिबाननं ठरवलं तर केवळ 2 आठवड्यांत अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवू शकतो, असं मॉस्कोच्या दौऱ्यावर असलेल्या तालिबानच्या प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख शहाबुद्दीन दिलावर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रत्युत्तर देताना म्हटलंय.
 
3 लाख अफगाण सुरक्षा रक्षकांवर आपला विश्वास असल्याचं अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या प्रभावाविषयी बोलताना जो बायडन यांनी गुरुवारी (8 जुलै) म्हटलं होतं.
 
अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं कब्जा मिळवला ही शक्यता फेटाळून लावत, हे शक्य नसल्याचं जो बायडन यांनी म्हटलं होतं.
"तालिबानकडे जवळपास 75 हजार योद्धे आहेत आणि ते अफगाणिस्तानाच्या सुरक्षा यंत्रणांच्या 3 लाख जवानांच्या तुल्यबळ नाहीत," असंही ते पुढे म्हणाले.
 
तालिबाननं काय म्हटलं?
हे जो बायडन यांचं वैयक्तिक मत आहे आणि आम्ही मनात आणलं तर दोन आठवड्यात अफगाणिस्तानवर कब्जा मिळवू , असं तालिबानच्या शहाबुद्दीन दिलावर यांनी म्हटलं.
 
विदेशी सैन्याला शांततेत अफगाणिस्तान सोडून जाण्याची संधी मिळाली आहे, असंही दिलावर म्हटले.
दिलावर यांच्या नेतृत्तात तालिबानचं एक प्रतिनिधी मंडळ गुरुवारी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये पोहोचलं. रशिया सरकारच्या निमंत्रणानुसार हा दौरा असल्याचं तालिबाननं म्हटलं आहे.
 
काही दिवसांपूर्वी ईराणच्या सरकारनं निमंत्रित केल्यानंतर तालिबानचं एक प्रतिनिधी मंडळ एका संमेलनात भाग घेण्यासाठी तेहरानला गेलं होतं.
 
बायडन यांनी काय म्हटलं होतं?
व्हाईट हाऊसमधील आपल्या भाषणात जो बायडन यांनी म्हटलं होतं, "अफगाणिस्तानात आणखी वर्षभर लढत राहिल्याने काही निष्पन्न होणार नाही. उलट ही लढाई अनंत काळापर्यंत सुरू ठेवण्याचं हे एक कारण बनेल."
अफगाणिस्तानच्या सरकारवर तालिबाननं कब्जा केला आहे, ही बाबही त्यांनी फेटाळून लावली. 3 लाख अफगाण सुरक्षा रक्षकांसमोर तालिबानचे 75 हजार योद्धे टिकाव धरू शकत नाहीत, असं ते म्हणाले.
 
अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य पूर्णपणे परत आल्यानंतर तिथं अजून 650 ते 1000 जवान तैनात असतील असं म्हटलं जात आहे.
 
अफगाणिस्तानात अमेरिकेचा दूतावास, काबूल विमानतळ आणि इतर प्रमुख सरकारी प्रतिष्ठानांच्या सुरक्षेसाठी हे सैन्य तैनात केलं जाणार आहे.
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या काही सर्वेक्षणांमध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य वापस बोलवण्याविषयी व्यापक पाठिंबा मिळाला होता.
 
असं असलं तरी सैन्य परत बोलावण्याच्या मुद्द्यावरून रिपब्लिकन मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे.
 
अफगाणिस्तानात अमेरिका सैन्यासाठी काम करणारे दुभाषी आणि इतर अफगाणी लोकांना देशातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या लोकांना अमेरिकेत आणण्यासाठी 2500 स्पेशल मायग्रेट व्हिसा जारी करण्यात आले आहेत. यातले अर्धेजण आतापर्यंत परतल्याचं बायडन यांनी सांगितलं.
 
चीनला तालिबानचं आवाहन
अफगाणिस्तानच्या हदाख्शान प्रांतावर तालिबाननं नियंत्रण मिळवल्यानंतर या प्रदेशाची सीमा चीनच्या शिनजियांग प्रातांच्या सीमेपर्यंत पोहोचली आहे.
 
अमेरिकी वर्तमानपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, भूतकाळात अल्-कायदाशी जोडल्या गेलेल्या चीनच्या विगर-विद्रोही गटांसोबत तालिबानचे फार पूर्वीपासून संबंध राहिले आहेत आणि हीच बाब चीनसाठी अडचण ठरत आली आहे.
 
पण, आता चित्र बदलत आहे. आता तालिबान चीनची काळजी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तालिबानी सरकारला चीनची मान्यता मिळावी, हा त्यांचा प्रयत्न आहे.
 
चीनचं सरकारी वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहिन यांनी म्हटलं आहे की, त्यांची संघटना ही चीनला एका मित्राच्या रुपात पाहते. आम्हाला आशा आहे की, पुनर्निमाणाच्या कार्यात चीनच्या गुंतवणुकीविषयीच्या मुद्द्यावर लवकरात लवकर आमची चर्चा होईल.
 
देशातल्या 85% भागावर आपण नियंत्रण मिळवलं असून चीनचे गुंतवणूकदार आणि कामगारांना आम्ही सुरक्षेची हमी देण्यात येईल असा दावा तालिबानच्या प्रवक्त्यांनी केला आहे.
 
त्यांनी पुढे असंही म्हटलं, "आम्ही त्यांचं स्वागत करतो. जर ते गुंतवणूक करणार असतील तर आम्ही त्यांची निश्चितपणे सुरक्षा करणार. त्यांची सुरक्षा आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुरुष Google वर या 5 गोष्टी सर्वाधिक शोधतात, हे संशोधन आश्चर्यचकित करेल