अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. यावेळी ही घटना सिनसिनाटी, ओहायो येथून समोर आली आहे. आठवडाभरात असे तिसरे प्रकरण उघडकीस आले आहे. मात्र, विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस रेड्डी असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो लिंडर स्कूल ऑफ बिझनेसमध्ये शिकत होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने गुरुवारी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले. या घटनेत कोणत्याही प्रकारचा संशय असण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. ओहायो येथील भारतीय वंशाचा विद्यार्थी श्रेयस रेड्डी बेनिगेरी याच्या दुर्दैवी निधनाने दु:ख झाल्याचे वाणिज्य दूतावासाने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
याघटनेबाबत अधिक माहिती न देता वाणिज्य दूतावासाने सांगितले की, आम्ही कुटुंबाच्या सतत संपर्कात आहोत आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करत आहोत. बेनिगेरी यांच्या भारतातील कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचे वडील लवकरच भारतातून अमेरिकेत येतील, अशी अपेक्षा आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला पर्ड्यू विद्यापीठाचे विद्यार्थी नील आचार्य सोमवारी मृतावस्थेत आढळले होते. आचार्य रविवारपासून बेपत्ता होते. काही तासांनंतर, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एक मृतदेह आढळून आला आणि त्याची ओळख आचार्य म्हणून झाली.
दुसऱ्या प्रकरणात, हरियाणातील पंचकुला येथील रहिवासी विवेक सैनी याला १६ जानेवारीला जॉर्जियातील लिथोनिया येथे एका बेघर माणसाने बेदम मारहाण केली. विवेक जॉर्जियाच्या लिथोनियामध्ये एमबीए करत होता.
यापूर्वी, अकुल धवन हा आणखी एक भारतीय विद्यार्थी जानेवारीत इलिनॉय अर्बाना-चॅम्पेन (UIUC) विद्यापीठाबाहेर मृतावस्थेत आढळला होता. 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टममध्ये त्याचा मृत्यू हायपोथर्मियामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.