Taliban government ban on beauty parlor अफगाणिस्तानमधील तालिबानी दहशतवाद्यांच्या सरकारने महिलांच्या ब्युटी पार्लरवर बंदी घालताना त्यांना व्यवसाय बंद करण्यासाठी एका महिन्याची नोटीस दिली आहे. तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने मंगळवारी ही माहिती दिली. अफगाणिस्तानातील महिला आणि मुलींच्या अधिकारांवर आणि स्वातंत्र्यावर हे नवीन बंधन आहे. त्यांना यापूर्वी शिक्षण आणि बहुतांश नोकऱ्यांपासून बंदी घालण्यात आली होती.
तालिबानच्या वर्च्यू एंड वाइस मिनिस्ट्रीचे प्रवक्ते मोहम्मद सिद्दीक अकिफ महाजर यांनी या बंदीचा तपशील दिलेला नाही. त्यांनी केवळ सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या पत्रातील मजकूराची पुष्टी केली. 24 जून रोजी एक पत्र सामायिक करत मंत्रालयाने म्हटले आहे की ते सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांच्याकडून तोंडी आदेश पाठवत आहेत. राजधानी काबूल आणि सर्व प्रांतांमध्ये ही बंदी कायम राहणार आहे. यामध्ये देशभरातील सलूनना व्यवसाय बंद ठेवण्यासाठी एक महिन्याची नोटीस देण्यात आली आहे.
त्यानंतर ते बंद करून यासंदर्भात अहवाल सादर केला जाणार आहे. पत्रात बंदीची कारणे देण्यात आलेली नाहीत. अखुंदजादा यांनी यापूर्वी अफगाणिस्तानातील महिलांचे जीवन सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलली असल्याचा दावा केल्यानंतर हे पत्र जारी करण्यात आले आहे. तालिबानचा हा दावा सातत्याने पोकळ ठरत आहे. तालिबानच्या राजवटीनंतर अफगाण महिलांना तुरुंगसारखं जीवन जगावं लागतं. तालिबानी काळे कायदे सातत्याने वाढत आहेत त्यामुळे देशात आता रोजगाराचे संकट निर्माण होत आहे.