चीनच्या पूर्वेकडील जिआंगशी प्रांतातील एका प्राथमिक शाळेत सोमवारी एका महिलेने चाकूने वार केल्याची घटना घडली. या चाकू हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. या महिन्यात देशातील ही दुसरी घटना आहे. वृत्तानुसार, ही घटना गुईक्सी शहरात घडली असून संशयित, पॅन नावाच्या 45 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींवर उपचार करण्यात आले, त्यात सहा जणांचा समावेश आहे ज्यांना हल्ल्यातून वाचण्याचा प्रयत्न करताना किरकोळ दुखापत झाली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, 7 मे रोजी युन्नान प्रांतातील रुग्णालयात सामूहिक चाकूने हल्ला केल्याने दोन लोक ठार झाले होते आणि 21 जण जखमी झाले होते.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, युनानच्या निवासी जिल्ह्यात मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका व्यक्तीने लोकांवर चाकूने हल्ला केल्याने दोन लोक ठार झाले होते आणि सात जण जखमी झाले होते. त्याच वर्षी जुलैमध्ये, दक्षिण-पूर्व प्रांत ग्वांगडोंगमध्ये एका बालवाडीत चाकूच्या हल्ल्यात तीन मुलांसह सहा जण ठार झाले होते.