राष्ट्राध्यक्ष गोटाभया राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत आज नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड होणार आहे.
राष्ट्राध्यक्षपदासाठी तीन नावं शर्यतीत आहेत. पंतप्रधान आणि काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष रनिल विक्रमासिंघे, दलस अलापेरुमा आणि डाव्या विचारसरणीच्या नॅशनल पीपुल्स पॉवर पार्टीचे अनुरा कुमार दिसानायके हे तिघे रिंगणात आहेत.
सत्तारुढ एसएलपीपीने पंतप्रधान रनिल विक्रमासिंघे यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्यांच्या नावाला वाढता प्रतिसाद आहे. पण आंदोलकांना असं वाटतं की गोटाभया यांच्याप्रमाणे रनिल यांनीही आपलं पद सोडून निघून जावं.
रनिल यांना कडवी टक्कर देणारे सत्तारूढ पक्षाचेच असंतुष्ट उमेदवार दलस अलापेरुमा आहेत. विरोधी पक्षाने त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.
नव्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 2024 मध्ये संपणार आहे. नवे राष्ट्राध्यक्ष गोटाभया यांचा उर्वरित कालावधी पूर्ण करेल.
आज श्रीलंकेच्या संसदेत होणाऱ्या मतदानात 225 खासदार मतदान करतील. कोणत्याही उमेदवाराला राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्यासाठी निम्म्याहून अधिक मतांची आवश्यकता आहे.
दरम्यान श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी ईमेलच्या माध्यमातून श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आपला राजीनामा ईमेलमार्फत संसदेच्या अध्यक्षांकडे पाठवून दिला होता.
पण, संसदेच्या अध्यक्षांनी सार्वजनिकरित्या याची घोषणा केलेली नाही.
श्रीलंकेच्या संविधानानुसार, राष्ट्राध्यक्षांनी राजीनाम्यावर हस्ताक्षर केल्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. त्यामुळे राजपक्षे यांनी राजीनामा पाठवून दिला असला तरी अद्याप रनिल विक्रमसिंघे अंतरिम राष्ट्राध्यक्ष बनू शकणार नाहीत.
शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे संसदेचं अनुमोदन मिळवण्यासाठी 30 दिवसांची मुदत असेल. संसदेने त्यांना अनुमोदन दिलं नाही तर खासदार नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड करू शकतात.
गोटाबाया राजपक्षे सिंगापूरमध्ये
आर्थिक अडचणींतून निर्माण झालेल्या संकटांमुळे श्रीलंकेत अराजकासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा द्यावी ही मागणी तीव्र झाली आहे. आंदोलकांनी घेतलेल्या पावित्र्यामुळे राजपक्षे हे काही दिवस अज्ञातवासात होते, नंतर ते मालदीवला पोहोचले आणि आता ते सिंगापूरला पोहोचल्याचे समोर आले आहे.
आंदोलकांच्या वाढत्या दबावामुळे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे देश सोडून पळून गेले होते. मंगळवारी म्हणजे 12 जुलै रोजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे सैन्याच्या मदतीने श्रीलंकेतून पळाले आणि मालदीवला पोहोचले. तिथून ते सिंगापूरला पोहोचले आहेत.
त्यांनी सिंगापूर येथे आश्रय घेतला, अशी देखील चर्चा सुरू होती. त्यावर सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे खासगी दौऱ्यावर आहेत. त्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी राजकीय आश्रय घेतलेला नाही. सिंगापूर कुणाला राजकीय आश्रय देत नाही.
त्यांनी अद्याप आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही.
श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान सैन्याच्या ताब्यात, आंदोलकांना बाहेर काढलं
श्रीलंकेतील कोलंबोस्थित राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानातून आंदोलकांना बाहेर काढण्यात आलंय. राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान आता श्रीलंकेच्या सैन्यानं आपल्या नियंत्रणात घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवासस्थानात आंदोलक होते.
राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी आता केवळ सैनिक आणि पत्रकार उपस्थित आहेत.
वाढती महागाई, इंधनाची कपात आणि बेरोजगारी यामुळे मार्च महिन्यापासून श्रीलंकेतील लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. लोक मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरून आंदोलनं करत आहेत.
श्रीलंकेत आणीबाणी घोषित करण्यात आलीय. या आणीबाणीनंतर पोलीस आणि लष्कर सक्रीय झालं आहे.
हिंसक आंदोलनात एकाचा मृत्यू, 84 जखमी, तणाव कायम
श्रीलंकेत सुरू असलेल्या आंदोलनात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी फोडलेल्या आश्रुधुराच्या नळकांड्यांमुळे एका तरुणाला श्वास घेण्यास त्रास झाला. त्यानंतर या 26 वर्षांच्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
या आंदोलनामध्ये एका जवानासह 84 जण जखमी झाले आहेत.
आता श्रीलंकेतला कर्फ्यु मागे घेण्यात आला आहे. पण, आणीबाणी मात्र कायम ठेवण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं आहे.
मंगळवारी (13 जुलै) गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पळ काढला. सध्या ते मालदिवमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. पळाल्यानंतर 13 जुलैला ते राजीनामा देतील असं त्यांनी घोषित केलं होतं. पण 14 जुलै उजाडल्यानंतरसुद्धा त्यांनी राजीनामा दिलेला नाही.
गोटाबाया यांच्या पलायनानंतर पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांना कार्यकारी राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हातात घेताच विक्रमसिंघे यांनी पोलीस आणि लष्कराला देशातली स्थिती पूर्वपदावर आणण्याचे आदेश दिले आहेत.
बुधवारी (14 जुलै) रात्री रनिल विक्रमसिंघे यांन टीव्हीवर राष्ट्राला उद्देशून एक भाषण केलं. त्यात त्यांनी लोकांना राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या कार्यालयावरचा कब्जा सोडण्याचं आवाहन केलं आहे.
बुधवारी आंदोलकांनी पंतप्रधानांचं कार्यालय ताब्यात घेतलं आहे. तर त्याआधीच लोकांनी राष्ट्रपतींचं निवासस्थानसुद्धा ताब्यात घेतलं आहे.
गोटाबाया राजपक्षेंनी देश सोडल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे, तसंच कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे.
विरोधीपक्ष नेते साजिथ प्रेमदासा यांनी मात्र विक्रमसिंघेच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.
"संसदेत फक्त एक सदस्य असलेल्या पक्षाच्या नेत्याला आधी पंतप्रधान करण्यात आलं आणि आता राष्ट्राध्यक्ष ही लोकशाहीची मोठी थट्टा आहे," असं प्रेमदासा यांनी म्हटलंय.
श्रीलंकेतल्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा बीबीसीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांनी घेतला.
जून महिन्यात काय होती परिस्थिती?
जूनच्या पहिल्या आठवड्यात आम्ही इथं आलो होतो तेव्हा महिंदा राजपक्षे यांच्या टेंपल ट्री नावाच्या घरावर जमावाने हल्ला केला होता. त्यानंतर राजपक्षे यांनी राजीनामा दिला. पुढे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी लोकांचा विद्रोह शांत केलाय असं वाटत होतं.
त्यांनी रानिल विक्रमसिंघे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करून असा काही मास्टरप्लॅन बनवला की लोकांचा रोष ही शांत होईल आणि ते स्वतःही राष्ट्रतीपदावर राहतील.
पण असं काहीच झालं नाही. आज सहा आठवडे उलटून गेले पण आंदोलकांचा जमाव काही शांत झाला नाही. गोटाबाया ऐकत नाहीत असं दिसू लागल्यावर मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. लोकांनी गाड्या भरून कोलंबोत यायला सुरुवात केली.
पेट्रोलच्या किंमती वाढल्या असताना देखील लोक थांबले नाहीत. लोक कोलंबोत येतच राहिले आणि पुढं काय झालं ते आपण मागच्या काही दिवसांत पाहिलंच आहे.
लष्कर, पोलीस यांच्याकडून बळाचा वापर होताना दिसत नाहीत
बुधवारी (13 जुलै) सकाळी कर्फ्यू लागू असतानाही हजारो लोक लाइनमध्ये उभे राहून राष्ट्रपती भवनात दाखल होत आहेत.
गेल्या महिनाभरात आणखीन एक दिसणारा मोठा बदल म्हणजे इथे लष्कर आणि पोलिसांची संख्या फारच नगण्य आहे. मागच्या वेळी सर्वत्र बॅरिकेड होते, ओळखपत्र तपासली जायची, परिसरात सगळीकडे गार्ड असायचे. पण आता हे काहीच दिसत नाही.
बुधवारी लोकांनी पंतप्रधानांच्या घरात घुसण्याच्या प्रयत्नात बुलेट प्रूफ गेट तोडलं. तिथंच असणाऱ्या सिक्युरिटीने सुरुवातीला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या पण बळाचा वापर काही केला नाही.
लोक अजूनही नाराज आहेत
लोकांच्या रोषानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे बुधवारी सकाळी देश सोडून मालदीवमध्ये गेले, रानिल विक्रमसिंघे यांना काळजीवाहू राष्ट्रपती बनवण्यात आलं, पण लोकांना अजूनतरी आशेचा किरण दिसलेला नाही.
म्हणजेच सुरू असलेला विरोध संपण्याची काही चिन्हं दिसत नाही. अजुनही लोक कोलंबोत येतचं आहेत. पोलीस आणि लष्कर बळाचा वापर करण्यासाठी कचरतायत.
अडचणी संपता संपेनात
त्यातच लोकांच्या अडचणीही वाढताना दिसतायत. पूर्वी पेट्रोलसाठी 10 तास रांगेत उभे राहावे लागायचं, आता तेच 24 तास रांगेत उभं राहावं लागतं. त्यात आणि एका व्यक्तीला 12 लिटरपेक्षा जास्त पेट्रोल किंवा डिझेल मिळत नाही. लोक पायी नाहीतर मग सायकलने प्रवास करताना दिसतायत.
औषधांचा मोठा तुटवडा आहे. कॅन्सर, टीबी सारख्या आजारांवरील औषधांचाही मोठा तुटवडा आहे, अन्नपदार्थांचा तुटवडा निर्माण होण्याची भीतीही आहे.
लोकांना त्यांच्या समस्येवर तोडगा हवाय, पण तो तोडगा कोणाकडे आहे असं तरी दिसत नाहीये. इथं लक्षात घेतलं पाहिजे की, सर्वच समस्यांच निरसन होईल अशी कोणतीही जादूची कांडी अजूनतरी बनलेली नाही.