Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहबाज शरीफ : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ कोण आहेत?

Shahbaz Sharif
, मंगळवार, 12 एप्रिल 2022 (08:47 IST)
-अभिनव गोयल
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून पाकिस्तानच्या नॅशनल अॅसेंब्लीने शाहबाज शरीफ यांची निवड केली आहे. त्यांना 174 मतं पडली आहेत.
 
''आप सारे फूलों को काट सकते हैं, लेकिन आप बहार को आने से नहीं रोक सकते,''असा इशारा पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीत विरोधी पक्षाचे नेते शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांना अशावेळी दिला जेव्हा ते सर्वाधिक मोठ्या राजकीय संकटाचा सामना करत होते.
 
इम्रान यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलं होतं. आपलं सरकार वाचवण्यासाठी त्यांना विश्वास प्रस्ताव सिद्ध करायचा होता पण ते अपयशी ठरले. आता विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान बनू शकतात.
 
'फूल आणि बहार' याबद्दल ते कदाचित याच आशेने बोलले असावेत. शाहबाज शरीफ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू आहेत. नवाज शरीफ यांच्यावर सध्या परदेशात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नवाज शरीफ यांच्या सरकारचा पराभव करूनच इम्रान खान यांचं सरकार सत्तेत आलं होतं.
 
शाहबाज शरीफ यांच्यासमोर यापूर्वी अनेकदा पाकिस्तानची सत्ता सांभाळण्याची संधी आली पण आपले बंधू नवाज शरीफ यांची सोबत असल्याने त्यांनी आपला मार्ग बदलला नाही. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री ते नॅशनल असेम्ब्लित विरोधी पक्षनेते निवडीपर्यंतचा शाहबाज शरीफ यांचा प्रवास रंजक आहे.
 
शाहबाज शरीफ अनेकदा आपल्या भाषणांमध्ये आणि रॅलीमध्ये क्रांतिकारी कविता म्हणतात. सार्वजनिक ठिकाणी बोलताना ते जुल्फिकार अली भुट्टो यांच्याप्रमाणे माईक पडल्याची नक्कल करतात. यामुळे पाकिस्तान टेलिव्हिजन चॅनेल्सवर अनेकदा त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.
 
व्यावसायिक कुटुंबात जन्म
शाहबाज शरीफ यांचा जन्म पाकिस्तानच्या एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबात झाला. डेली टाईम्स वेबसाईटनुसार, ते मूळचे काश्मिरी पंजाबी आहेत. ते जम्मू-काश्मीरच्या मियां जातीशी संबंधित आहेत.
 
शाहबाज शरीफ अनेकदा आपल्या भाषणांमध्ये आणि रॅलीमध्ये क्रांतिकारी कविता म्हणतात. सार्वजनिक ठिकाणी बोलताना ते जुल्फिकार अली भुट्टो यांच्याप्रमाणे माईक पडल्याची नक्कल करतात. यामुळे पाकिस्तान टेलिव्हिजन चॅनेल्सवर अनेकदा त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.
 
व्यावसायिक कुटुंबात जन्म
शाहबाज शरीफ यांचा जन्म पाकिस्तानच्या एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबात झाला. डेली टाईम्स वेबसाईटनुसार, ते मूळचे काश्मिरी पंजाबी आहेत. ते जम्मू-काश्मीरच्या मियां जातीशी संबंधित आहेत.
 
लष्कराच्या वाढत्या दबावामुळे 1993 साली नवाज शरीफ यांना पंतप्रधान पद सोडावं लागलं. याचवर्षी शाहबाज शरीफ पंजाब विधानसभेत परतले आणि 1996 पर्यंत ते विरोधी पक्षनेते राहिले. 1997 साली ते तिसऱ्यांदा पंजाब विधानसभेवर निवडून आले आणि मुख्यमंत्री बनले.
 
लष्करी उठावाच्या वेळी अटक
शाहबाज शरीफ पंजाबचे मुख्यमंत्री बनल्यानंतर दोन वर्षांतच पाकिस्तानात लष्करी उठाव झाला. 12 ऑक्टोबर 1999 या दिवशी संध्याकाळी जनरल परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानमधील सरकार पाडलं आणि शाहबाज शरीफ यांनाही अटक केली.
 
एप्रिल 2020 मध्ये शाहबाज शरीफ यांचे मोठे बंधू नवाज शरीफ यांना अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. जनरल मुशर्रफ यांच्या विमानाचे अपहरण आणि दहशतवादाच्या आरोपाखाली त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. जवळपास आठ महिन्यांनंतर पाकिस्तानच्या लष्करी सरकारने नवाज शरीफ यांना माफी दिली आणि कथित कराराअंतर्गत कुटुंबातील 40 सदस्यांसह त्यांना सौदी अरबला पाठवण्यात आलं. या 40 लोकांमध्ये नवाज शरीफ यांचे धाकटे भाऊ शाहबाज शरीफ सुद्धा होते.
 
रॉयटर्स वृत्त संस्थेनुसार, पाकिस्तानमध्ये अटक होण्याचा धोका असूनही 2004 मध्ये अबू धाबी येथून फ्लाईटने ते लाहोरला पोहचले होते. काही तासांतच त्यांना सौदी परत पाठवण्यात आलं.
 
पाकिस्तानात पुनरागमन
पाकिस्तानच्या जियो न्यूजनुसार, 23 ऑगस्ट 2007 रोजी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शाहबाज शरीफ आणि नवाज शरीफ पाकिस्तानात येऊ शकतात आणि राजकारणात सक्रिय होऊ शकतात असा ऐतिहासिक निकाल दिला.
 
नोव्हेंबर 2007 मध्ये नवाज शरीफ यांच्यासोबत शाहबाज शरीफ सुद्धा पाकिस्तानात परतले. 2008 मध्ये नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (PML-N)) यांनी चांगली कामगिरी केली परंतु ते सरकार स्थानप करू शकले नाहीत.
 
दुसरीकडे 2008 मध्ये शाहबाज शरीफ चौथ्यांदा पंजाब विधानसभेत निवडून आले आणि पुढचे पाच वर्षे ते मुख्यमंत्री राहिले.
 
2013 मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) पंजाबमध्ये प्रचंड मोठ्या बहुमताने सत्तेत आला. शाहबाज शरीफ पंजाबचे मुख्यमंत्री बनले. तर नवाज शरीफ यांनी पंतप्रधान पदाची कमान सांभाळली. शाहबाज शरीफ यांना स्वत:ला मुख्यमंत्री ऐवजी पंजाबचे खादम-ए-आला म्हणजे मुख्य सेवक म्हणवून घेणं पसंत होतं.
 
लाहोरचं चित्र बदललं
शाहबाज शरीफ हे एक चांगले व्यवस्थापक आहेत असं पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक सुहेल वरैच यांना वाटतं. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "शाहबाज शरीफ यांनी केवळ लाहोर नव्हे तर संपूर्ण पंजाबचं चित्र बदलण्याचा प्रयत्न केला आहे. ते पंजाबमध्ये त्यांच्या विकासकामांमुळे ओळखले जातात. मेट्रो बस आणि ऑरेंज ट्रेनचे श्रेय त्यांनाच जाते."
 
शाहबाज शरीफ यांनी सुरू केलेल्या 'स्वस्त पोळी' आणि 'लॅपटॉप योजना' यावर तीव्र टीका झाली, तर दुसऱ्याबाजूला 'आशियाना हाऊसिंग स्किम'साठी त्यांचं कौतुकही झाले.
 
नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा पक्षाचे अध्यक्ष म्हणून अघोषित ठरवलं होतं त्यावेळी शाहबाज शरीफ यांची पक्षाने अंतरिम अध्यक्ष म्हणून निवड केली होती.
 
अनेक महिने तुरुंगात घालवले
पाकिस्तानमध्ये 2018 साली सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पीएमएल-एनने शाहबाज शरीफ यांना आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं होतं. या निवडणुकीत तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) हा पक्षा सर्वात मोठा ठरला आणि इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली.
 
पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनच्या वेबसाईटनुसार, 2020 मध्ये शाहबाज शरीफ यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक झाली. जवळपास 7 महिने ते लाहोरच्या कोट लखपत सेंट्रल जेलमध्ये होते आणि त्यानंतर ते बाहेर आले.
 
त्यावेळी इम्रान खान यांचे सल्लागार शाहदार अकबर यांनी त्यांचे पुत्र हमजा आणि सलमान यांच्यावरही बनावटी खात्यांच्या माध्यमातून मनी लाँडरिंग केल्याचा आरोप केला होता. अटक होण्यापूर्वी शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावर कटकारस्थान करून अटक केल्याचा आरोप केला होता.
 
विरोधी पक्ष एकवटले
24 मे 2021 रोजी शाहबाज शरीफ यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. ही भेट इस्लमाबादला झाली होती. यावेळी शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्या नेतृत्त्वात असलेल्या सरकारला हटवण्यासाठी सर्वांनी एका व्यासपीठावर येण्याचं आवाहन केलं.
 
यानंतरही वेळोवेळी विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. गेल्या काही काळात तर पाकिस्तानच्या राजकारणात सर्व डावपेच खेळण्यात आले. एकामागोमागएक सत्ताधारी तहरीक-ए-इंसाफ पक्षाच्या सरकारमधून सहकाऱ्यांनी समर्थन मागे घेण्यास सुरूवात केली आणि इम्रान खान सरकार कोसळलं.
 
विरोधी पक्षाच्या अविश्वास ठरावाला 342 खासदारांच्या नॅशनल असेम्ब्लिमध्ये 172 खासदारांच्या समर्थनाची आवश्यकता होती. याच संख्याबळाच्या जोरावर विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्या सरकारला सत्तेतून बाहेर केलं.
 
शाहबाज शरीफ यांचे लष्कराशी असलेले संबंध याविषयी बीबीसीशी बोलताना सुहैल वरैच सांगतात, "नवाज शरीफ यांच्या तुलनेत शाहबाज शरीफ यांचे पाकिस्तान लष्कराशी चांगले संबंध आहेत. त्यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव आहे. ते चांगले राज्यपाल राहिले आहेत. नियंत्रणात आणण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. "
 
मुलाचे वडिलांच्या पाऊलावर पाऊल
शाहबाज शरीफ यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलताना राजकीय विश्लेषक सुहैल वरैच म्हणाले, "2003 साली शाहबाज शरीफ यांनी तहमीना दुर्रानी यांच्यासोबत विवाह केला. हा त्यांचा तिसरा विवाह होता. या पत्नीपासून त्यांना मूल नाही. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुलं आहेत आणि दुसऱ्या पत्नीपासून त्यांना दोन मुली आहेत. ते बहुतांश वेळ आपल्या पहिल्या पत्नीसोबत घालवतात."
 
शाहबाज शरीफ यांचे पुत्र हमजा शरीफ यांचा जन्म 6 सप्टेंबर 1974 साली लाहोर येथे झाला. त्यांनी लाहोरच्या सरकारी महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर लंडन येथून स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून एलएलबीची पदवी प्राप्त केली.
 
हमजा शरीफ 2008 ते 2013 आणि 2013-18 दरम्यान सलग दोन वेळा पाकिस्तानचे खासदार राहिले आहेत. आता ते पंजाब प्रांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते स्पोर्ट्स बोर्ड पंजाबचे अध्यक्ष राहिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक जिल्ह्यात वन्य प्राण्यांचे हल्ले सुरूच; 2 विविध घटनांत सुमारे 16 जण जखमी