यजमान रायझिंग पुणे सुपरजायंट्सने दहाव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी शानदार विजयी सलामी दिली. यजमान टीमने अापल्या घरच्या मैदानावर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. पुणे टीमने ७ गड्यांनी विजय संपादन केला. नव्या कर्णधार स्मिथच्या नेतृत्वात पुणे टीमने आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली.
इम्रान ताहिरच्या (३/२८) धारदार गोलंदाजीपाठोपाठ अजिंक्य रहाणे (६०) आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथ (नाबाद ८४) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर यजमान रायझिंग पुणे सुपरजायंट्सने सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ८ बाद १८४ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात पुणे टीमने तीन गड्यांच्या मोबदल्यात १९.५ षटकांत लक्ष्य गाठले.
धावांचा पाठलाग करणाऱ्या पुण्याला सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि मयंक अग्रवालने दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी ३५ धावांच्या भागीदारीची सलामी दिली.