PBKS vs CSK IPL 2022 : IPL 2022 च्या 38 व्या सामन्यात मयंक अग्रवालच्या पंजाब किंग्जने रवींद्र जडेजाच्या चेन्नई सुपर किंग्जचा 11 धावांनी पराभव केला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर चेन्नईसमोर 188 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येसमोर CSK 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावाच करू शकले. चेन्नईकडून अंबाती रायडूने 39 चेंडूत सर्वाधिक 79 धावांची खेळी खेळली. पंजाबकडून ऋषी धवन आणि कागिसो रबाडाने प्रत्येकी दोन बळी घेतले. या विजयासह पंजाबचे 8 गुण झाले आहेत. पंजाबने गुणतालिकेत सहावे स्थान गाठले आहे.
धवनने 88 धावांच्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. धवनशिवाय राजपक्षेने 42 धावांची खेळी खेळली. धवन आणि राजपक्षे यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. पंजाबसाठी या मोसमातील ही पहिली शतकी भागीदारी आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून ब्राव्होने सर्वाधिक दोन बळी घेतले.