Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IPL 2023: महेंद्रसिंग धोनीला रोखणारा किमयागार संदीप शर्मा तुम्हाला माहितेय का?

sandeep sharma
, गुरूवार, 13 एप्रिल 2023 (07:21 IST)
शेवटचं षटक. 21 धावांचा बचाव करण्याची जबाबदारी पण समोर सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा. नाट्यमय घडामोडींनंतर समीकरण 1 चेंडू 5 धावा असं झालं. धोनी विरुद्ध संदीप अशा थेट मुकाबल्यात संदीपने बाजी मारली. बुंध्यात यॉर्कर टाकत संदीपने धोनीला केवळ एकच धाव घेऊ दिली आणि राजस्थानने 3 धावांनी दिमाखदार विजय मिळवला.
 
शेवटच्या षटकात चेन्नईला 21 धावांची आवश्यकता होती. शेवटचं षटक टाकण्यासाठी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनकडे दोन पर्याय होते- संदीप शर्मा आणि कुलदीप सेन. संजूने अनुभवी संदीपच्या हातात चेंडू सोपवला. दडपणाखाली संजूने दोन वाईड टाकले. संदीपने पहिला चेंडू निर्धाव टाकला. पण दुसऱ्या चेंडूवर धोनीने लेगस्टंपच्या दिशेने टाकलेल्या चेंडूवर षटकार लगावला.
 
तिसऱ्या चेंडूवर धोनीने स्क्वेअर लेगच्या दिशेने तडाखेबंद षटकार लगावला. चौथ्या चेंडू संदीपने राऊंड द विकेट टाकला. या चेंडूवर धोनीने जोरदार फटका लगावला पण केवळ एकच धाव निघाली. पाचव्या चेंडूवर जडेजाने चेंडू तटवून काढत एक धाव घेतली. अखेरच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी 5 धावा हव्या होत्या. षटकात आधी दोन यॉर्करवर धोनीने षटकार लगावले होते. मात्र शेवटचा चेंडू संदीपने यॉर्करच टाकला. धोनीने जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. चेंडू मिडविकेट क्षेत्रात गेला आणि चेन्नईला एकच धाव मिळाली.
 
संदीप शर्माने या सामन्यात 3 षटकात 30 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. संदीपने उत्तम फॉर्मात असलेल्या ऋतुराज गायकवाडला बाद केलं होतं.
 
संदीप शर्मा राजस्थानच्या मूळ संघात नव्हता. लिलावात तो अनसोल्ड गेला होता. प्रसिध कृष्णा दुखापतग्रस्त झाल्याने राजस्थानने संदीप शर्माला संघात समाविष्ट केलं. चेन्नईसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध चेन्नईत खेळताना संदीपने धोनी-जडेजा जोडीला रोखत टिच्चून गोलंदाजी केली. संदीप शर्माच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा.
 
आयपीएल स्पर्धेत कोहलीला तब्बल सातवेळा आऊट करणारा आणि याच स्पर्धेत बुमराहप्रमाणेच आकडेवारी असणारा संदीप शर्मा तुम्हाला माहितेय का?
 
तुम्ही अचूक वाचलंय- संदीपने आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीला सातवेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. दुसरीकडे आयपीएलच्या 90 मॅचेसनंतर संदीप आणि बुमराह यांच्या आकडेवारीत कमालीचं साम्य आहे. मात्र तरीही संदीप प्रसिद्धीपासून आणि टीम इंडियापासून दूर आहे.
 
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. टीम इंडियासाठी खेळताना तर कोहलीने विक्रमांची शिखरं गाठली आहेत. जागतिक क्रमवारीतही त्याचा प्रत्यय येतो.
 
आयपीएलचे सगळे हंगाम कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघासाठी खेळला आहे. दुसरीकडे आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करत टीम इंडियात स्थान पटकावणाऱ्या जसप्रीत बुमराहने आपल्या वैविध्यपूर्ण भेदक बॉलिंगने अल्पावधीत जागतिक क्रिकेटमध्ये नाव कमावलं आहे.
webdunia
फास्ट बॉलरची सर्वसाधारणपणे असती तशी उंची नाही. प्रतिस्पर्धी संघातील बॅट्समनला भीती बसेल अशी शरीरयष्टी नाही. बॅट्समनची भंबेरी उडेल असा वेग नाही. बॅट्समनची एकाग्रता भंग करण्यासाठी शेरेबाजी, शिवीगाळ, हावभाव, खाणाखुणा नाहीत. मात्र प्रतिस्पर्ध्यांचा सखोल अभ्यास, खेळपट्टीचा नूर ओळखून अचूक टप्प्यावरची स्विंग बॉलिंग, चौकार-षटकारांनी खचून न जाता सापळा रचून बॅट्समनला कोंडीत पकडणं यामध्ये संदीपची हुकूमत आहे.
 
मूळचा पंजाबच्या असलेल्या संदीपने पंजाबमधल्या पतियाळा इथं शाळेत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. संदीप तेव्हा बॅट्समन होता. कोच.. यांनी त्याला बॉलिंगवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. 2010 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या U19 वर्ल्डकप स्पर्धत संदीप भारतीय संघात होता. संदीपने 6 मॅचमध्ये 7 विकेट्स घेतल्या होत्या.
 
2012 मध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित U19 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदावर नाव कोरलं. संदीपने त्या स्पर्धेत 12 विकेट्स घेतल्या होत्या. फायनलमध्ये संदीपने चार विकेट्स घेत यजमान ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं होतं. युवा वर्ल्डकप स्पर्धेतली कामगिरी लक्षात घेऊन आयपीएल स्पर्धेतील किंग्ज इलेव्हन पंजाबने संदीपला ताफ्यात समाविष्ट केलं.
 
11 मे 2013 रोजी मोहाली इथं झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत संदीपने आयपीएल पदार्पण केलं. पर्दापणाच्या लढतीतच संदीपने तीन विकेट्स पटकावल्या. त्या हंगामात संदीपला अंतिम अकरात खेळण्याची संधी तीनदाच मिळाली मात्र त्याच्यातली गुणवत्ता प्रशिक्षकांनी हेरली.
 
म्हणूनच 2014 हंगामात संदीपने किंग्ज इलेव्हनसाठी 11 मॅचेसमध्ये 19.66 इकॉनॉमी रेटने 18 विकेट्स घेतल्या. त्या हंगामात पंजाबने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. त्या वाटचालीत संदीपचा वाटा मोलाचा होता. 2015 मध्येही चांगली कामगिरी कायम राखत संदीपने 14 13 विकेट्स घेतल्या.
 
भारतासाठी पदार्पण
2015 मध्ये भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यासाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. संदीपला त्यावेळी भारतीय संघात समाविष्ट करण्यात आलं होतं.
 
17 जुलै रोजी हरारे इथं झालेल्या ट्वेन्टी-20 सामन्यात संदीपने भारतासाठी पदार्पण केलं. संदीपच्या बरोबरीने मनीष पांडे, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल यांनी भारतासाठी ट्वेन्टी-20 पदार्पण केलं. त्या मॅचमध्ये संदीपला विकेट मिळवता आली नाही.
 
दोन दिवसांनंतर दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात संदीपने पहिली विकेट मिळवली. या दौऱ्यानंतर संदीपचा टीम इंडियासाठी विचार झालेला नाही.
 
पॉवरप्ले स्पेशालिस्ट
ट्वेन्टी-20 फॉरमॅटमध्ये पहिल्या सहा ओव्हर पॉवरप्लेच्या असतात. त्यावेळी 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर दोनच फिल्डर ठेवता येतात. या टप्प्यात बॉलिंग करणे अत्यंत आव्हानात्मक असतं. कारण टप्पा थोडा चुकला की कत्तल होणं साहजिक. बॅट्समनने मारलेला फटका रोखण्यासाठी पुरेशी माणसं बाऊंड्रीवर उभी करता येत नाहीत हाही मुद्दा असतो. त्यामुळे अनेक चांगले बॉलर पॉवरप्लेमध्ये मार खातात.
 
काही बॉलर पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करणं टाळतात. संदीप शर्मा याबाबतीत अपवाद आहे. आयपीएल स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो बॉलर आहे. बॉल स्विंग करून बॅट्समनला बुचकळ्यात टाकणारा बॉलर अशी संदीपची ओळख आहे.
 
हैदराबादकडून खेळताना संदीपने भात्यात नकलबॉलची भर घातली आहे. हा बॉल ओळखून खेळणं बॅट्समनला अवघड होतं.
 
मोठ्या बॅट्समनची शिकार
बॉलर किती विकेट घेतो याबरोबरीने तो कोणाला आऊट करतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. टेलएंडर्सना आऊट करणं तुलनेने सोपं असतं. समोरच्या संघातील मुख्य बॅट्समनला आऊट करणं हे खरं आव्हान असतं. संदीप शर्माची खासियत इथेच आहे.
 
विराट कोहली, ख्रिस गेल, रोहित शर्मा अशा मोठ्या प्लेयरला संदीप आऊट करतो. ख्रिस गेलला बॉलरचा कर्दनकाळ संबोधलं जातं. पण बॉल स्विंग होतो तेव्हा गेलला खेळताना अडचण होते. संदीप हे करण्यात माहीर आहे. बॅट्समनच्या डोळ्यासमोरून बॉल स्विंग होतो. काही बॅट्समन लवकर फटका खेळल्यामुळे तर काही बॅट्समन खूप उशीर केल्यामुळे संदीपच्या जाळ्यात अडकतात.
 
बुमराहशी शर्यत
संदीप आणि बुमराह यांनी साधारण समान मॅचेस खेळल्या आहेत. दोघांच्याही विकेट्सची संख्या सारखीच आहे. इकॉनॉमी रेटही जवळपास सारखा आहे. बुमराह मुंबई इंडियन्सचं प्रमुख अस्त्र आहे.
 
रन्स रोखणं आणि विकेट्स पटकावणं यासाठी कर्णधार त्याच्यावर विसंबून राहतो. बुमराहच्या भात्यात यॉर्कर, बाऊन्सर, स्लोअरवन, नकलबॉल अशी असंख्य अस्त्र आहेत. प्रत्येक मॅचगणिक बुमराह आपल्या बॉलिंगमध्ये सुधारणा करत राहतो.
 
मुंबई इंडियन्सन संघाने चारवेळा आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं आहे. या जेतेपदात बुमराहच्या बॉलिंगचा सिंहाचा वाटा आहे. पॉवरप्ले, मधल्या ओव्हर्स, हाणामारीच्या ओव्हर्स- बुमराह तितक्याच कौशल्याने बॉलिंग टाकतो. मैदान कुठलंही असो, प्रतिस्पर्धी कोणीही असो- बुमराहचा सामना करणं अवघडच असतं. बुमराहने वर्षानुवर्षे अचूकता आणि भेदकतेत कमालीचं सातत्य राखलं आहे.
 
संदीपची आकडेवारीही तितकीच चांगली आहे. मात्र अजूनही तो ज्या संघासाठी खेळतो त्यांच्या अंतिम अकरात असतोच असं नाही. बुमराहसारखं सातत्य संदीपला आणावं लागेल.
 
दुखापतींचं ग्रहण
2014 मध्ये संदीपला स्ट्रेस फ्रॅक्चर झालं. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून सावरण्यासाठी त्याला वर्षभराचा वेळ लागला. या काळात त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या. फास्ट बॉलरसाठी खांदा खूपच महत्त्वाचा असतो. खांद्यावरच शस्त्रक्रिया झाल्याने स्विंग बॉलर असणाऱ्या संदीपला अॅक्शनमध्ये काही बदल करावे लागले.
 
यंदाच्या आयपीएल हंगामात भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्याने संदीप शर्मावर अनुभवी फास्ट बॉलर म्हणून जबाबदारी वाढली आहे. याच हंगामात संदीपने आयपीएल स्पर्धेत संदीपने शंभरावी विकेट्स घेतली. हा विक्रम करणारा तो केवळ तेरावा बॉलर आहे.
 
27वर्षीय संदीपने आयपीएल तसंच डोमोस्टिक क्रिकेटमधल्या प्रदर्शनात सातत्य ठेवलं तर भविष्यात भारतासाठी पुन्हा ट्वेन्टी-20 आणि अन्य फॉरमॅटमध्येही खेळताना दिसू शकतो.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Corona Alert: पुढील 10 दिवस कोरोनाचे केसेस वाढतील