नवी दिल्ली. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने लागोपाठ दोन चेंडूत 2 विकेट घेतल्याने पंजाब किंग्जने एका रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा 13 धावांनी पराभव करून आयपीएल 2023 मध्ये चौथा विजय नोंदवला. पंजाबने दिलेल्या 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनच्या अर्धशतकांच्या जोरावर विजय मिळवता आला नाही आणि 6 गड्यांच्या मोबदल्यात 201 धावाच करता आल्या. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 16 धावांची गरज होती. सामन्याच्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर अर्शदीपने एक धाव दिली. यानंतर दुसऱ्या चेंडूवर एकही धाव झाली नाही, तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्मा आणि चौथ्या चेंडूवर नेहल वढेरा बाद झाला. पाचव्या चेंडूवर एकही धाव झाली नाही तर शेवटच्या चेंडूवर जोफ्रा आर्चरने एकही धाव घेतली.
मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने 67, सूर्यकुमार यादवने 57 धावा केल्या तर कर्णधार रोहित शर्मा 44 धावा करून बाद झाला. टीम डेव्हिड 13 चेंडूत 25 धावा करून नाबाद परतला. अर्शदीप सिंगने 4 षटकात 29 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले.
पंजाबने 8 बाद 214 धावा केल्या
तत्पूर्वी, कार्यवाहक कर्णधार सॅम कॅरेनची झटपट अर्धशतकी खेळी आणि हरप्रीत भाटियासह पाचव्या विकेटसाठी 50 चेंडूत 92 धावांची भागीदारी यांच्या जोरावर पंजाब किंग्जने 8 बाद 214 धावांची मोठी धावसंख्या उभारली. कॅरेनने 29 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 55 धावा केल्या तर भाटियाने 28 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकार मारले. जितेश शर्माने सात चेंडूंत चार षटकार मारत २५ धावा फटकावल्यामुळे पंजाबने शेवटच्या पाच षटकांत 96 धावा केल्या.