मुंबई इंडियन्ससमोर 'चेन्नई'चे आव्हान
ख्रिस गेलने वादळी फलंदाजी केली, तरी विजयाची संधी हातची गमावलेल्या मुंबई इंडियन्ससमोर उद्या (शनिवारी) चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असेल. गतवर्षी विजेतेपदाची हॅट्ट्रिक हुकलेला महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई संघ यंदा विजयाने आपली मोहीम सुरू करण्यास उत्सुक असताना मुंबई इंडियन्सला कामगिरी उंचावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. गतवर्षी विजेतेपदाची हॅट्ट्रिक हुकणाऱ्या चेन्नई संघाची ताकद मजबूत आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचविणारे आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा चेन्नई संघात आहेत. त्यामुळे अश्विन आणि जडेजा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना बेजार करू शकतील. चेन्नईच्या फलंदाजीचा विचार करता फॉर्मात असलेला मुरली विजय, महेंद्रसिंह धोनी यांच्या जोडीला झटपट क्रिकेटचा "स्पेशालिस्ट' सुरेश रैना आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला माईक हसीमधील आक्रमकपणा अजूनही संपलेला नसेल. कालच्या सामन्यात एकटा गेल मुंबई इंडियन्सला भारी पडला होता. उद्या किमान तीन-चार फलंदाज मुंबई इंडियन्सला भारी पडू शकतात.