इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) अत्यंत व्यस्त कार्यक्रमाबद्दल राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार शेन वॉर्न याने नाराजी व्यक्त केली असून पुढील वर्षी यात सुधारणा व्हायला पाहिजे, असे त्याने स्पष्ट केले आहे.
सध्या राजस्थान रॉयल्स आयपीएलमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. दुसर्या क्रमाकांवर असलेल्या संघाना उपांत्य फेरीत प्रवेश मिळण्यासाठी त्याचा फायदा मिळू शकतो. प्रत्येकाला आपल्याच मैदानावर खेळण्याची संधी मिळाली नाही तर प्रथम क्रमांकावर असलो तरी उपांत्य फेरीत पोहचण्याचा काय फायदा? असा प्रश्नही वॉर्नने उपस्थित केला आहे.
आपल्या मैदानावर खेळण्याचा फायदा संघाला होतो आणि यजमानांना तेथील परिस्थितीची चांगली माहिती असते. तसेच, प्रेक्षकांचाही भरपूर प्रतिसाद मिळतो.
जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत एकही सामना गमाविला नाही. मुंबई उपांत्य फेरीत पोहचला तरी त्यांना आपल्याच मैदानावर खेळण्याचा फायदा होईल, असेही त्याने म्हटले आहे.
आयपीएलचे हे पहिले वर्ष असल्यामुळे या वर्षी झालेल्या अनेक चुकांत सुधारणा करावी लागेल. संघाचे मालक आणि खेळाडूंनाही पुढील वर्षी आपल्यात सुधारणा करावी लागणार आहे.