तब्बल 44 दिवस सुरू असलेल्या इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) ट्वेंटी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला पराभव स्विकारावा लागला असला तरी धोनीची प्रत्येक धाव 1.5 लाख रूपये किमतीची बनली आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रेंचाइजीने सहा कोटी देऊन खरेदी केलेल्या या कर्णधाराने आयपीएलमध्ये सर्वात जास्त पैसे कमाई केली आहे. त्याने 44 डावात 41.40 च्या सरासरीने संपूर्ण स्पर्धेत 414 धावांचा खेळ केला आहे. म्हणून त्याने काढलेली प्रत्येक धाव 1,44,927 रूपयाची बनली आहे.
आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा काढणार्या शॉन मार्शला देखील धोनीची बराबरी करता आली नाही. मार्शने 68 च्या सरासरीने 616 धावांचा खेळ केला. मात्र, धोनीशी तुलना केली असता त्याची प्रत्येक धाव केवळ 1,948 रूपये एवढ्या किमतीची बनली आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये कोणत्याच फ्रेंचाइजींने अधिक रस न दाखविल्यामुळे आयपीएलच्या नऊ दिवस अगोदर पंजाब किंग्ज इलेव्हन संघाचे प्रशिक्षक टॉम मुडींनी मार्शला आपल्या संघासाठी निवडले. या स्पर्धेतील कामगिरीमुळे त्याला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
दिल्ली डेयर डेविल्सच्या गौतम गंभीरनेही या स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना 41.07 च्या सरासरीने 534 धावा काढल्या. त्याने 2.9 कोटीची कमाई केली आहे.