IPL 2024 च्या 40 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना झाला. गेल्या वेळी जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा दिल्लीने गुजरातचा सहा विकेट्सने पराभव केला होता. आजच्या सामन्यातही दिल्लीने बाजी मारली. मात्र, या दोघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली.
आयपीएल 2024 च्या 40 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा चार धावांनी पराभव केला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 4 गडी गमावून 224 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतने 43 चेंडूत नाबाद 88 तर अक्षर पटेलने 66 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघाला 20 षटकं संपल्यानंतर 8 बाद 220 धावाच करता आल्या. डेव्हिड मिलरने 23 चेंडूत 55 तर साई सुदर्शनने 39 चेंडूत 65 धावा केल्या. गुजरातचा दिल्लीविरुद्धचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी अहमदाबादमध्येही दिल्लीने गुजरातविरुद्ध सहा विकेट्सने विजय मिळवला होता.
या विजयासह दिल्लीचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आला आहे. त्यांनी नऊपैकी चार सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर गुजरातचा संघ सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरला आहे. त्यांनी नऊपैकी पाच सामने गमावले असून त्यांचे आठ गुण आहेत. मात्र, नेट रन रेटमध्ये गुजरातचा संघ दिल्लीच्या मागे आहे. दिल्लीचा पुढील सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध 27 एप्रिल रोजी दिल्लीत होणार आहे. त्याचवेळी गुजरातचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 28 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये आपला पुढील सामना खेळणार आहे.