IPL 2024 चा 45 वा सामना रविवारी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात विराट कोहली आणि विल जॅकच्या स्फोटक भागीदारीमुळे आरसीबीने गुजरातचा नऊ विकेट्सने पराभव केला. या विजयासह आरसीबीच्या खात्यात सहा गुण जमा झाले आहेत. मात्र तरीही संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर गुजरात आठ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या टॉप ऑर्डरने स्फोटक कामगिरी केली. सलामीला फलंदाजीला आलेल्या फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांच्यात ४० धावांची भागीदारी झाली. गुजरातसाठी साई किशोरने पहिली आणि एकमेव विकेट घेतली. या सामन्यात कर्णधार 24 धावा करू शकला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विल जॅकने गुजरातविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत संघाला विजयापर्यंत नेले.
आरसीबीचा दमदार फलंदाज विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने या मोसमातील चौथे अर्धशतक 32 चेंडूत पूर्ण केले. यादरम्यान त्याने 44 चेंडूत 70 धावांची नाबाद खेळी केली. गुजरातविरुद्ध किंग कोहलीने 159.09 च्या स्ट्राईक रेटने सहा चौकार आणि तीन षटकार मारले. यासह विराट कोहलीने आयपीएल 2024 मध्ये 500 धावा पूर्ण केल्या.विराट कोहलीनंतर विल जॅकनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने या मोसमातील दुसरे अर्धशतक अवघ्या 32 चेंडूत झळकावले.नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर गुजरात टायटन्सने 20 षटकांत तीन गडी गमावून 200 धावा केल्या.
सुदर्शनने मिलरसोबत चौथ्या विकेटसाठी 69 धावांची नाबाद भागीदारी केली. सुदर्शनने 49 चेंडूत 84 धावांची दमदार खेळी केली. यासह तो आयपीएल 2024 मध्ये 400 धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून आठ चौकार आणि चार षटकार आले. त्याचवेळी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेव्हिड मिलरने 19 चेंडूंचा सामना करत 26 धावा काढल्या. आरसीबीतर्फे स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.