Publish Date: Sun, 14 Apr 2024 (11:20 IST)
Updated Date: Sun, 14 Apr 2024 (11:22 IST)
आयपीएल 2024 मध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपरजायंट्सचा सहा गडी राखून पराभव केला. दिल्लीने 168 धावांचे लक्ष्य 18.1 षटकात पूर्ण केले. दिल्लीसाठी नवोदित जेक फ्रेझर मॅकगर्कने 35 चेंडूत 55 धावा केल्या आणि कर्णधार ऋषभ पंतने 24 चेंडूत 41 धावा केल्या. यादरम्यान पंतने नऊ धावा करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. त्याने आयपीएलमध्ये तीन हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील 25 वा खेळाडू ठरला. यासह तो तीन हजार आयपीएल धावा पूर्ण करणारा तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
पंतने वयाच्या 26 वर्षे 191दिवसांत ही कामगिरी केली. जर त्याने सहा दिवस आधी म्हणजेच ७ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध ही कामगिरी केली असती तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या विराट कोहलीचा विक्रम त्याने मोडला असता. विराटने वयाच्या 26 वर्षे 186 दिवसांत तीन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. शुभमन गिल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने वयाच्या 24 वर्षे 215 दिवसांत आयपीएलमध्ये तीन हजार धावा पूर्ण केल्या.
पंतने या प्रकरणात संजू सॅमसन आणि सुरेश रैना यांना मागे टाकले. सॅमसनने वयाच्या २६ वर्षे 320 दिवसांत तीन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर रैनाने वयाच्या 27 वर्षे 161 दिवसांत ही कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये तीन हजार धावा पूर्ण करणाऱ्या 25 खेळाडूंमध्ये पंतचा स्ट्राईक रेट तिसरा सर्वोत्तम आहे. पंतचा आयपीएलमध्ये सध्याचा स्ट्राइक रेट 148.55 आहे. त्याच वेळी, केवळ एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल या बाबतीत त्याच्या पुढे आहेत.
दिल्लीचा सहा सामन्यांमधला हा दुसरा विजय ठरला. या विजयासह संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर लखनौचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. दिल्लीचा पुढील सामना 17 एप्रिलला गुजरात टायटन्सशी आहे, तर लखनऊचा संघ 14 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे.