रिलायन्स जिओच्या आगमनानंतर आयडिया सेल्युलर कंपनीला 2016-17 च्या चौथ्या तिमाहीत तब्बल 328 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. 2016-2017 या आर्थिक वर्षात आयडिया सेल्युलरला एकूण 400 कोटींच्या नुकासनाला सामोरं जावं लागलं आहे. 2015-16 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आयडिया सेल्युलरने 452 कोटींच्या नफ्याची नोंद केली होती. शिवाय, गेल्या आर्थिक वर्षात आयडिया सेल्युलरचा नफा 2 हजार 728 कोटी होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अहवालानुसार, 2016-17 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 14.3 टक्क्यांची घट झाली असून, चौथा तिमाहीत 8 हजार 126 कोटींच्या महसुलाची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत 9 हजार 478 कोटींच्या महसुलाची नोंद झाली होती. 2016-17 मध्ये आयडिया सेल्युलरचा महसूल 35 हजार 576 कोटी असून, 2015-16 मध्ये 35 हजार 949 कोटी इतका महसूल होता.