भारत सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने घातक असलेले चीनचे ५९ ऍप बॅन केले. या ५९ ऍप मध्ये प्रसिद्ध कोटयवधी युजर्स असलेले टिकटॉक हे ऍप देखील बंद करण्यात आले. त्यामुळे यावर विविध व्हिडिओ बनवून मनोरंजन करणारे तसेच प्रेक्षक असलेले वापरकर्ते दुसऱ्या पर्यायाच्या शोधात होते. याचाच फायदा घेत आता इंस्टाग्रामने भारतात नवीन शॉर्ट व्हिडिओ फीचर रील्स (Reels) लाँच केलं आहे. इंस्टाग्राम च्या या नव्या सर्व्हिसमध्ये टिकटॉकप्रमाणे अनेक फीचर्स मिळतील. याद्वारे युजर्स अॅपवर व्हिडिओ बनवू शकतात, क्रिएटिव्ह फिल्टर आणि म्युजिक अॅड करुन शेअर करु शकतात. यामध्ये टिकटॉकप्रमाणे लोकप्रिय गाणे, ट्रेंड किंवा चॅलेंजसह 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवता येतो.
इंस्टाग्रामच्या रील्स फीचरद्वारे युजर्स टिकटॉकप्रमाणे 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवू शकतात. यासाठी म्युजिक लाइब्रेरीमधून ऑडियो, स्पीड, इफेक्टस आणि टाइमरचे ऑप्शन उपलब्ध आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये बदल करु शकतात किंवा व्हिडिओचा स्पीडही कंट्रोल करता येतो. व्हिडिओ बनवल्यानंतर युजर्स आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर करु शकतात. इंस्टाग्रामचं हे फीचर अॅपमध्येच आहे, त्यामुळे यासाठी नवीन अॅप डाउनलोड करावं लागत नाही.
जगातील काही देशांमध्ये हे फीचर आधीपासूनच उपलब्ध होतं आता कंपनीने हे फीचर भारतीय युजर्ससाठीही आणलं आहे. टिकटॉक बॅन झाल्यानंतर अनेक अन्य अॅप्स लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे इंस्टाग्रामच्या रील्स फीचरलाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.