ट्विटरच्या नव्या निर्णयाच्या नियमांनुसार कुठलाही ट्विटर यूजर एका दिवसांत ४०० हून अधिक नव्या हँडल्सला फॉलो करू शकणार नाही. स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ट्विटरने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यापूर्वी ही मर्यादा एक हजार एवढी होती. ट्विटरच्या सुरक्षा समूहाने यासंदर्भात ट्विट केले आहे. फॉलो करू शकणाऱ्या अकाऊंटची संख्या हजार वरून ४०० इतकी करण्यात आली आहे.
स्पॅम संदेशावर नियंत्रण आणल्यामुळे यूझर्सना कुठलाही त्रास होणार नसल्याचे ट्विटरने म्हटले आहे. बॉट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोगॅमद्वारे काही वेळा ट्विटर अकाऊंटस चालवली जातात. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात खऱ्या अकाऊंटना फॉलो केले जाते. त्यामुळे या बॉट अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्या वाढते. अशा अकाऊंटवरून ट्विट किंवा संदेशाच्या स्वरुपात अनेक लिंक किंवा मार्केटिंगचा मजकूर पाठवला जातो. असे स्पॅम रोखण्यासाठी ट्विटरने नियमांत हे नवे बदल केले आहेत.