Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईतली 'व्यावसायिक' दहीहंडी

- नरेंद्र राठोड

मुंबईतली 'व्यावसायिक' दहीहंडी
WD
गोकुळाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस ! श्रीकृष्णाचा जन्म गोकुळाष्टमीच्या रात्री 12 वाजेच्या सुमारास कंस राजाच्या कोठडीत झाला. पण श्रीकृष्ण वाढला मात्र गोकुळात. नंद आणि यशोदेच्या प्रेमात आणि गोपिकांच्या सहवासात. गोकुळातच चोरून लोणी खाणे, गोपिकांची छेड काढणे अशा लीला त्याने केल्या. घराच्या छताला टांगलेली दह्याची हंडी श्रीकृष्ण फोडायचा. तीच प्रथा आता दहीहंडीच्या रूपाने पाळली जाते. पण, काळाच्या ओघात हा उत्सव इतका बदलला आहे की, त्या मागची मुळ संकल्पनाच नाहीशी झाली आहे.

''गोविंदा आला रे आला....मटकी संभाल ब्रिजबाला !'' असे म्हणणार्‍या गोविंदाला बाजूला सारत आधुनिक युगात पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात वावरणार्‍या महिलाही दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिसतात. मुंबईत चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी चाळीत गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जायची. त्याकाळी गोपाळकाला मोठा उत्सव मानला जायचा. तेव्हा मात्र आतासारखी व्यावसायिकता त्यात नव्हती. दोन चाळीमध्ये दोरखंडाच्या आधारे दहीहंडी बांधली जायची. आंब्याची पाने, फुले, फळे व रूपये त्या दोरीला बांधले जायचे. दहीहंडीच्या जवळ हंडी फोडण्यासाठी नारळ बांधले जायचे. हंडी फोडण्यासाठी दोन पथकांमध्ये जोरदार स्पर्धा चालायची.

पण आता हा सण राजकारण्यांच्या ताब्यात गेला आहे. त्यात अनेक गुडांनीही स्वतःला 'सोवळे' करून घेण्याची संधी साधली आहे. अनेक 'भाई' लोकांनी आपली स्वत:ची दहीहंडी, गणपती, नवदुर्गा मंडळे स्थापन करून त्या माध्यमातून लाखो रूपयांची देणगी उकळण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे सामाजिक उत्सवातून व्यावसायिकता डोकावताना दिसत आहे. त्यातून उद्‍भवणारे वादविवाद आणि त्याला होणारा राजकारणाचा स्पर्श यामुळे हा सणही त्यात माखला गेला आहे. राजकारणी लोक अशा सामजिक महोत्सवाला भल्या मोठ्या देणग्या देवून आपल्या पक्षाची व नावाची प्रसिध्दी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात.

गेल्या काही वर्षांपासून मुंबईल्या चाळींची जागा गगनचुंबी अपार्टमेंटने घेतल्याने उंचच उंच दहीहंडी बांधल्या जातात. त्यांच्यावर ठेवण्यात आलेली बक्षिसेही लाखोंच्या घरात जाणारी आहेत. मुंबईतच्या दहीहंडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिध्द मिळू लागली आहे. यंदाच्या वर्षी मुंबईत 10 पेक्षा जास्त दहीहंड्यांना 20 ते 25 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पुरूषांच्याच बरोबरीने महिलांची पथकेही सहभागी होणार आहेत. दंहीहंडी फोडण्याच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने यजमान मंडळाच्या वतीने गोविंदाचा विमा तसेच जागेवर प्राथमिक उपचाराच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. गोकुळाष्टमीच्या तीन महीने अगोदरच दहीहंडी फोडणार्‍या पथकांचा सराव सुरू होतो. सराव करतानाही काही जर जखमी होतात. मुंबईतील दहिहंडीकडे देशातीलच नाही तर विदेशातील मीडीयाचेही लक्ष लागलेले असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi