श्रीकृष्ण कथामृत - पहिला सर्ग
सर्गस्थित्यन्तकर्तारौ भक्तिगम्यावगोचरौ
उमामहेश्वरौ वन्दे सत्कृपासरिदर्णवौ ॥१॥
विद्यानिधी वरद संकटराशिनाशी
बुद्धि प्रकाशत असे स्मरतां जयासी
ज्याच्या कृपें सकल इच्छित पूर्ण होय
त्या श्रीगणेशचरणीं प्रणती मदीय ॥२॥
विलास तव शारदे म्हणति काव्य ज्यातें जन
महाकविहृदीं तुझें असत सर्वदा आसन ॥
न येत रस वाङ्मयाप्रति तुझ्या प्रसादाविना
सरस्वति तुला असो मम पुनः पुन्हां वंदना ॥३॥
जगदीशा हरि हे सुखकंदा
भीमा - तटवासिया मुकुंदा
जय परमेशा जय अविनाशा
तव चरणांची मजसी आशा ॥४॥
लभ्य न जें पद यतीतपींतें
मन्मन त्याची इच्छा करितें
वेडेपन हें कळतें मजसी
संतवचन परि दे धीरासी ॥५॥
ना योगानें ना तप करितां
भक्ति - बळेंच तुम्ही वश होतां
सत्यवचन तें संशय नाहीं
पंढरिमाजी अनुभव येई ॥६॥
पाय ठेवण्या पुरलें नाहीं
तुला वामना सर्व विश्वही
पुंडलिकाच्या एक विटेवर
तोच विठोबा तूं होशी स्थिर ॥७॥
अनंतरूपा मग हृदयीं मम निवास दुःशक नाहीं
हृदयहि माझें कठिण विटेसम आळ पुरवि इतुकी ही ॥८॥
तव पद देवा नसतां हृदयीं
कृष्णकथेची शुभ गंगा ही
स्रवेल कोठुन सांगा सांगा
मला कोरडा ठेवुं नका गा ॥९॥
वयास ज्याच्या वर्ष पांचवें
शब्द बोबदे जयें वदावे
करितो स्तवनायथार्थ तो ध्रुव
अशी योग्यता शंखांतहि तव ॥१०॥
अशा ऐकिल्या कथा कितीतरि
विश्वासें मी म्हणुन पदा धरि
अतां उपेक्षूं नको विठाई
दीन - वत्सले माझे आई ॥११॥
ज्ञान - भास्करा श्री ज्ञानेश्वर
भवत्पदांवर ठेवितसे शिर
जाणे केवळ ज्या गोविंद
तो गीतार्थहि केला विशद ॥१२॥
अभंगवाणी प्रसिद्ध ज्यांची
भंग करित जी भीति भवाची
तुकाराम, जे वरिष्ठ संतीं,
चरणीं त्यांचे एक विनंती ॥१३॥
महाराज जन अडव्यारानीं भरले होते त्यांसी
योग आजिला उद्धाराला झाडुन संतपथासी ॥१४॥
तितुक्यानें ना परी भागतें
कृपया अमुच्या धरा करांतें
तरिच भक्तिच्या जाऊं गांवा
हरिदर्शन आम्हांसी घडवा ॥१५॥
रामदास गुरूराज दयाघन
किती किती करूं तुम्हांस वंदन
तुमच्या शब्दांच्या सामर्थें
अधःपतितसें राष्ट्र वरी ये ॥१६॥
स्मशानभूचें आनंदभूवन
झालें, प्रसाद तव त्या कारण,
शरण आदरें भवत्पदाला
असो शिरावर हस्त आपुला ॥१७॥
भक्ति - रसाचे पाट जयांनीं
वाहवुनी उद्धरिली अवनी
सांवरिलें पडत्या धर्मातें
नमन तयां सकलहि संतांतें ॥१८॥
शिर घेउन तळहातीं लढले धर्मास्तव जे वीर
देशास्तव तनु झिजली ज्यांची नमन तयां बहुवार ॥१९॥
साई, पंडित गुरो वामना,
शिरसा वंदन तुमचे चरणा
कृपादृष्टिनें अवलोकावें
श्रीमंता मज सहाय्य व्हावें ॥२०॥
दास दीन हा सद्गुरूराया
गणुन आपुला धरिला हृदया
महा-कृपेची पांखर घालुन
राजसुतासम केलें लालन ॥२१॥
अपुल्या महतीचे चांगावे
दुबळ्या वाचें किति मी गावे
नमनस्नानें तव पदगंगा
मतिमल माझा नेवो भंगा ॥२२॥
विनतीचरणी जवळ असावें
कृष्णकथामृत हें वदवावें
नुसतें दावुनि अन्न न भागे
बालकास भरवावें लागे ॥२३॥
कृष्ण चरित हें मुळांत मोठें अधिकचि विचार करितां
क्षितिज जसें कां वाढत जातें उंच चढोनी बघतां ॥२४॥
मत्स्य नरहरी वामन भार्गव
अथवा रावणहंता राघव
अंशभाग असुनी विष्णूचे
अपार आहे चरित्र त्यांचें ॥२५॥
श्रीकृष्णाचें पूर्णांशाचें
चरित कसें मग गावें वाचे
कुणा देखवे प्रखर असा रवि
अंशहि ज्याचा डोळे दिपवी ॥२६॥
कुंठित होती थोर थोर कवि
कृष्णकथा ती मी कां गावी
शेष धरी कष्टें भूगोला
इच्छित त्या उचलण्या विरोळा ॥२७॥
कृष्णचरित्राची महती ती
आणिक माझी कवित्व - शक्ति
परस्परांची करितां तुलना
खंडीलाही पुरी रती ना ॥२८॥
असून याची पुरती जाणिव हाव कथेची धरिली
तें नच अभिमानें हो मजसी भाग गोष्ट ही झाली ॥२९॥
श्री नारायणराव भूपती
पटवर्धन - वंशीय सन्मती
हृदयरत्न जें सती उमेचें
शासन करि जो मिरजपुरीचें ॥३०॥
आग्रह मज तो करी नरपती
चौपाईच्या चालीवरती
कृष्णचरित्रा करणें गायन
श्री तुलसी जेवीं रामायण ॥३१॥
नाहीं म्हणनें शक्य न मजसी
कृतघ्न व्हावें कसें तयासी
या राज्याच्या अन्नावरतीं
पूर्वज माझे जगले असती ॥३२॥
त्यांतुन आणिक पुनः असें ना,
पीतां करि जें तृप्त तत्क्षणा
अमृत प्यावया सुमदुर असलें
पराग्रहाचें कारण कसलें ॥३३॥
“ वत्सा म्हणुनी ” वदती गुरुवर, “ घे मम कार्य शिरीं हें ”
आज्ञा कैसी मोडूं यास्तव धजलों मद हा नोहे ॥३४॥
पावन करि जें नुसतें स्मरतां
यत्स्पर्शे ये मोक्षचि हातां
अशा जाह्नवी - जलीम नाहणें
कुणास असतें नको मनानें ॥३५॥
तसेंच या श्रीकृष्णकथेसी
अवगाहन ये मम भाग्यासी
इच्छित तेंची चालुन आलें
पूर्वपुण्य जणुं मूर्त उदेलें ॥३६॥
कृष्णकथेचे असंख्यात गुण
एकच त्यांतिल करितों वर्णन
दुर्लभ जी शांती इतरांतें
ती या योगें खचित लाभते ॥३७॥
ब्रह्मनिष्ठ बुद्धीचा सागर
ज्ञान - नभींचा जणुं कां दिनकर
व्यास महर्षी रचुनी भारत
धर्मादी - पुरुषार्थ विवेचित ॥३८॥
लिहिलीं नाना - परी पुराणें
नवरसमंडित विस्तारानें
चार भाग केले वेदांचे
सार काढिलें उपनिषदांचे ॥३९॥
तर्क - बुद्धि - निकषावर केली जिज्ञासा ब्रह्माची
सतत चिंतिलें तत्त्व परी ना शान्ती होत मनाची ॥४०॥
अंतीं त्यासी कथिती नारद
शुष्क खलें नास थिर हो पारद
दिव्य औशधी त्या स्थिर करिती
तसेंच चित्ता कृष्णकथा ती ॥४१॥
विदुषी झाली शिकुन बहू जरि
उपवर कन्याकृतार्थ ना तरि
व्यासा तेवीं तुमची वृत्ती
जों न अर्पिता भगवंता - प्रति ॥४२॥
व्यासें रचिलें म्हणुन भागवत
जेथ उसळतें कृष्ण - कथामृत
प्रसन्नता ये मग हृदयातें
शरदानें जणुं जलाशयातें ॥४३॥
याच कथेच्या श्रवणरसाप्रत
लोलुप झाला भूष परीक्षित
मृत्यु उभा असतांही पुढती
कथा परिसतां लव ना खंती ॥४४॥
ती गोडी या कृष्णकथेची
आजवरीही नित्य नवीची
आद्यकवीची जणुं का प्रतिभा
रम्य उषा प्रतिदिनीं वा नभा ॥४५॥
व्यास वर्णिता कथा म्हणुन हे सज्जन गातचि आले
मिरा कवि जयदेव रंगले सुरदासादिक भुलले ॥४६॥
याच कथेच्या रस - लोभानें
प्रवृत्त मीही येथ नयानें
गरुडभरारी ज्या आकाशीं
तेथ जशीका उडते माशीं ॥४७॥
परी तुमचिया आधारावर
महाराज मी होइन पार
तुम्हां विनविलें याच कारणें
मज दीनाचें सहाय्य करणें ॥४८॥
अज्ञ काढितो सुरेख अक्षर
शिक्षक त्याचा हात धरीं जर
उंच फळहि ये बाळा हातीं
वडिल तया जरि उचलुन घेतीं ॥४९॥
शीड सुकाणूं भवत्कृपेंचें
होडीला मम मिळतां साचें
काठिण्याचा तरेन सागर
विघ्न - वीचि उसळती जरी वर ॥५०॥
प्रसाद तुमचा हाच वसंत
मम बुद्धीच्या शून्य वनांत
फुलविल सुमनें पानोंपानीं
सुरभित जीं कां कृष्णकथांनीं ॥५१॥
पुरे कशाला शिणवूं वाचा
जननी जाणे हेत शिशूचा
कुमुदवनासी विकसित करणें
सुधाकरातें नको सांगणें ॥५२॥
अहो संतजन पुनः एकदां
वंदुन तुमच्या पदारविंदा
कृपाजलानें होउन सिंचित
आरंभित मी कृष्ण - कथामृत ॥५३॥
मुनिसह दानव पीडित भूमी गोरूपें विष्णूसी
विनवी माझा भार हरावा जन्मुन मानव - वंशीं ॥५४॥
भूचें करुणा - भाषण परिसुन
तिज आश्चासन दे करुणाघन
घेइन तुजसाठीं अवतार
करीन गे दुर्जन - संहार ॥५५॥
केवळ या आशिर्वचनानें
गमे हायसें मही - कारणें
तीरवायुही नुसता जेवीं
ग्रीष्म - तप्त पथिकास शांतवी ॥५६॥
परतुनि येतां ऋषिवर्यानीं
नारदास कथिलें हर्षानीं
अतां जन्म घेणार रमावर
करण्यासी दुर्जन - संहार ॥५७॥
आनंदित नच नारद झाले शून्यमनें म्हणती ते
यांत काय तरि विशेष ज्याचा हर्ष होत तुम्हांतें ॥५८॥
प्रखर वज्र वेगें कोसळलें
शेणाचे नी गोळे फुटले
गजराजानें पायाखालीं
अहो म्हणे ढेकणें चिरडलीं ॥५९॥
श्रीसूर्यानें प्रखर मयूखीं
काय सुकविणें नुसतीं डवकीं
शंकर उघडी तिसरा डोळा
तयें म्हणे जळला पाचोळा ॥६०॥
तसेंच हास्यास्पद हें तुमचें
आश्वासन मज वाटत साचें
कर्तुमकर्तुं शक्ति तयानें
क्षुद्र दुष्ट वधण्यांत वेचणें ॥६१॥
जन्म सातदां यानें धरिलें
आणिक नुसते दुर्जन वधिले
तेंच जरी करणार पुनः तो
म्हणेन जन्मा उगीच येतो ॥६२॥
कथितों त्यासी जाउन आतां कशास हे श्रम करिसी
शस्त्र - वैद्य कां थोर पाहिजे साधारण काट्यासी ? ॥६३॥
असें ऐकतां नारद - भाषण
बघतचि बसले नुसते मुनिजन
पारख थोरांच्या हेतूची
सामान्यांतें होइल कैची ॥६४॥
यज्ञयाग निर्विघ्नपणानें
पार पडोनी त्याच बळानें
सुख मिळवावें स्वर्लोकींचें
परम साध्य तें हेंच जयांचें ॥६५॥
सकाम - कर्मांमधेंच रमती
सदा वासना वसते चित्तीं
असे लोक कोठून जाणिती
निरिच्छशी निरूपाधिक भक्ती ॥६६॥
वात्सल्याची काम - विहीना
शिशूस यावी कशी कल्पना
आईची कीं गरज भासते
स्तनपानापुरतीच जयातें ॥६७॥
हिमधरसुंदर गौरकलेवर नारद अरुणांबरधारी
छेडित सुस्वर विद्युत्भास्वर वीणा श्रीवर - भजन करी
ज्याचें अंतर करुणानिर्भर उद्धरण्या नर भूवरचे
क्षीर - सागरा जाई सत्वर मंदिर जें श्रीविष्णूचें ॥६८॥
क्षीरार्णव तो अतिशय सुंदर
सुवर्णकणवालुका तटावर
नसे अंत ना पार तदीय
संस्कृत भाषेचें जणुं वाङ्मय ॥६९॥
कुंद मोगरा जुइ वा जाई
शुभ्र वर्ण त्या कमलाचाही
परी क्षीर - सागरीं पसरला
असे धवलिमा कांहिं निराळा ॥७०॥
शील - संपदा पतिव्रतेची
उज्ज्वल कीर्ती आद्यकवीची
आणि शिवाचें हास्य मनोहर
चंद्रकरांनीं वितळविलें जर ॥७१॥
मोत्याच्या पात्रांत घेउनी
मंथन करितां हंसपिसांनीं
येइल जें नवनीत तयावर
क्षीरार्णव हा तसाच सुंदर ॥७२॥
अमृतकौस्तुभादिक जीं रत्नें
याच निर्मिलीं क्षीराब्धीनें
संपत्तीची होय देवता
लक्ष्मीचा त्या हाची जनिता ॥७३॥
हिरे माणकें मोतीं हेची शंख शिंपले येथें
पुरवितात जे सकल मनोरथ वृक्ष असे तीरातें ॥७४॥
अशा मनोहर दुग्धसागरीं
श्रीमंतांची रमली स्वारी
शेषतनूचें मृदुल शुभासन
नीलमण्या जणुं सुवर्ण कोंदण ॥७५॥
नाभी - कमलीं बसुन विधाता
पठण करितसे वेद - संहिता
गरूड उभा कर जोडुन पुढती
ठेउन दृष्टी चरणांवरतीं ॥७६॥
सेवाया हरि - चरण - सरोज
घेत इंदिरा अंकावर निज
परि करवेना तिज संवाहन
पद कोमल ते करकमलाहुन ॥७७॥
स्तवन हरीचें करीत तुंबर
त्या भजनाचे मंजुलसे स्वर
मंदवायुच्यासवें पसरती
तीरवृक्ष जणुं तयेंच डुलती ॥७८॥
भजनाच्या त्या आलापांनीं नारद रंगुन जाती
आगमनाचा हेत विसरले स्वयें साथही देती ॥७९॥
श्रीनारायण जय नारायण
करुणाघन हरि पंकजलोचन
दीनजनोद्धर भक्तप्रियकर
विश्वंभर मां पाहि रमावर ॥८०॥
देहभान हरपलें तयांचें
नाम स्मरतां भगवंताचें
कंथ दाटुनी गहिवरला स्वर
ओघळती अश्रू गालांवर ॥८१॥
उभे सर्व रोमांच तनूवर
भक्तीसी जणुं फुटले अंकुर
एकच घुमतो चहूंकडे स्वन
“ श्रीनारायण जय नारायण ” ॥८२॥
ध्वनिलहरींनीं त्या भजनाचे
डोलविलें हृत्कमल हरीचें
शब्दभृंग उमटले तेथुनी
परिपूरित जे प्रेममधूनीं ॥८३॥
“ सुस्वागत तव असो नारदा अससि कुशल ना सांगे
हृदयवनाचा वसंत मज तूं भेटलास कीं अंगें ” ॥८४॥
स्निग्धवचन तें घनगंभीर
ऐकुन नारद ये भानावर
जवळी येउन नम्रपणानीं
मस्तक ठेवियलें श्रीचरणीं ॥८५॥
चहुहातें त्या दे आलिंगन
प्रेमभरानें श्रीनारायण
पुरुषार्थांनीं जणों चारही
भक्तिभाव हा धरिला हृदयीं ॥८६॥
“ भक्तवरा वद काय कारणें
तुवां मजकडे केलें येणें ”
वदत नारदा पंकजलोचन
“ सहज नसे हें तुझें आगमन ” ॥८७॥
नारद सस्मित मुखें म्हणाले
“ उपकारांचे डोंगर झाले
देवा तव, आमुच्या शिरावर
याच कारणें आलों इथवर ॥८८॥
उपकारांचें झालें तरि ते ओझें हलकें नसतें
पुनः जन्म घेऊन महीवर भर कां घालिशि त्यातें ॥८९॥
नाश व्हावयाचा होणार
उपकारांचा भार पुनः वर
कोण करिल हा बुडाता धंदा
घ्यावा ना अवतार मुकुंदा ” ॥९०॥
विस्मित होउन देव म्हणाले
“ भाषण तव नच मला कळालें
अवतारांचा हेतू तुजसी
विदित असोनी कां हें वदसीं ” ॥९१॥
“ वा वा देवा मलाच म्हणतां
वेड बळानें कां पांघरितां
सोपें निद्रित नर जागविणें
जागृत केवीं जागा करणें ॥९२॥
सूज्ञ तुला सर्वज्ञ मानिती
तरी न कळली काय परिस्थिति
वैकुंठासी टाळें बसले
नगर यमाचें गजबजलेलें ॥९३॥
तुम्ही सात अवतार घेतले किती तारिले सांगा
मत्स्य कूर्म वा वराह तिसरा जन्म फुका श्रीरंगा ॥९४॥
चवथ्या अवताराचे ठायीं
कितीतरी आडंबर होई
थोर गर्जना मही तडाडे
तरलें एकच पोर बापुडें ॥९५॥
पुधें बोलण्या सोयची नाहीं
तुम्हीच केली भिक्षा देही ”
नांव कशाला उद्धाराचें
अधःपतन केलेंत बलीचें ॥९६॥
ज्यानें वधिली अपुली आई
इच्छावें त्याकडुनी कायी
उद्धराच्या कामासी या
रागिट माणुस अगदीं वाया ॥९७॥
पांच सहा पुढच्या अवतारीं
तारियले, नल, अंगद, शबरी,
पवनात्मज, सुग्रीव, बिभीषण,
येथ संपलें तव रामायण ॥९८॥
असा तुझा परिवार चिमुकला काय असावा देवा
आम्रतरूसी शोभतात कां चार आठ पानें वा ॥९९॥
वैकुंठांतिल शून्य - मंदिरें
काय तुला रुचतात मुरारे
लोक न नरकामधें मावती
नित्य नवनव्या पेठा वसती ॥१००॥
प्रथम प्रतिज्ञा तव हृषिकेशी
उद्धरीन मी संतजनांसी
तिचें दिसत झालें विस्मरण
करितांना दुसरीचें पालन ॥१०१॥
अतां आठव्या वेळेसी तरि
महत्त्व दे पहिलीस मुरारी
तुझ्या हातुनीं हें न घडे जर
नको अम्हांसीं तव अवतार ॥१०२॥
तुझें जनन होऊन महीवर
अनुभविती जर नरकासी नर
तरी अधिक ना खचित तयाहुन
दुर्जन अमुचें करिती पीडन ॥१०३॥
इहलोकीं अथवा परलोकीं नरकच भालीं असला
तुमच्यास्तव मी दुर्जन वधिले हा बडिवार कशाला ॥१०४॥
असें ऐकतां नारदभाषण
लक्ष्मी ये पतिसाह्या धावुन
“ संतचि आतां कोठें उरले
थोडे होते ते उद्धरिले ॥१०५॥
यांत नसे अपराध हरीचा
दोष असे हा तुम्हां नरांचा
संत व्हावया सिद्ध न कोणी
लाभतसे फल जशी पेरणी ” ॥१०६॥
नारद यावर म्हणे उसळुनी
“ हाही दोष हरीचा, जननी
हा न कुणासी संत होउं दे
भुलवित त्यासी छंदें ॥१०७॥
आभिष दावि कुणा स्वर्गाचें
कुआण धनाचें, कुणा यशाचें,
कंठीं बांधित कुणा कामिने
क्रोध मत्सरा वाढवी मनीं ॥१०८॥
स्वतःच मोहा कारण होउन मोहितास दंडावें
अनार्यनीती ही त्यापरि कां ईशेंही वागावें ॥१०९॥
त्यांतुन देवी पुनः असें बघ
पाप्यासीची अवश्य तारक
पत्यानें जे नित्य राहती
कशास त्यांनां वैद्य लागती ॥११०॥
अघमलहर पावनी गौतमे
मलिनांच्याची येते कामीं
काय अर्थ जरि करिल पयोधर
शेत सोडुनी वर्ष तळ्यावर ॥१११॥
शुद्ध शांत ज्यांचें आचरण
मुक्तचि ते त्या कशास तार्ण
रत्न न देवी पर-प्रकाशित
चंदन कोणा गंध न मागत ॥११२॥
“ पुरें, नारदा, सांग मला तूं काय मनीं तव आस
पूर्ण करिन, मी वदे रमावर आहे ना विश्वास ॥११३॥
“ पुरा भरंवसा तुझा असे मज
म्हणुन येथवर आलों आज
सर्व लोक, देवा, उद्धरणें
याहुन दुसरें नसे मागणें ॥११४॥
चुगलखोर वा चोर असो तो
परदारेसह अथवा रमतो
शरण पदां तव येतां भावें
मागिल दोष तुम्हीं न बघावे ॥११५॥
अधराशीही असुन तरावा
जो जो तुमचा म्हणविल देवा
गोदेला ये मिळण्या मोरी
घाण म्हणोनी ती न अव्हेरी ॥११६॥
मर्त्य जन्म तो मर्त्य - शिक्षणा
ऐसें कथिलें असे पुराणां
सांग परी मजसी हृषिकेशी
काय तुवां शिकविलें जनांसी ॥११७॥
प्रसंग येती घडोघडीला
गांठ खलाशी प्रतिक्षणाला
धर्मांधर्मीं भ्रमित अंतरें
तदा कुठें शोधणें तुला रे ॥११८॥
उदात्त - चरिताचा आदर्श
व्यवहारीं नित ना कामास
चलन म्हणोनी काय चाललें
मूल्यवान जरि रत्न जाहलें ॥११९॥
उन्नत तव चारित्र्य असावें प्रतिदिन परि संसारीं
बोध तुझा पथदर्शक होवो देवा या अवतारीं ॥१२०॥
सात जन्म तव अपूर्ण देवा
अतां पूर्ण अवतार धरावा
लोकांनीं हा सदा रहावा
आठवीत तव जन्म आठवा ॥१२१॥
प्रत्येकाच्या हृदयामध्यें
तव भक्तीचा उदय होउं दे
श्री नारायण जय नारायण
दुजें न कानीं येवो याविण ॥१२२॥
सर्वांच्या पायांचा भार
घेतों मी माझ्या डोक्यावर
नको मला सुख नको मोक्षही
शतदां भोगिन गर्भवासही ॥१२३॥
पापांचा मज सर्व दंड दे
सुख अर्तांचें परी बघूं दे
अशक्य जरि हें असेल सगळें
मिटवी देवा माझे डोळे ॥१२४॥
पुढें न वदवें नारदास हरिचरण घट्ट मग धरिले
पूर लोटला नयनाश्रूंचा प्रभुहृदयहि गहिंवरलें ॥१२५॥
“ धन्य नारदा ही तव वृत्ती
कोण परासाठीं कळवळती
उगीच तुम्ही नच संतजनांनीं
मला बांधिलें भावबळांनीं ॥१२६॥
घे हें देतो तुज आश्वासन
पतितोद्धारासाठीं येईन
यादववंशीं धरीन जन्म
आदि - पुरुष ज्या वंशा सोम ॥१२७॥
ऐकतां अशा वचास हर्ष फार नारदा
बोलला रमावरास शीर्ष ठेवुनी पदां
माय बाप तूं खरा अमाप ताप वारिले
शांतशा रसें मदीय अंतरंग रंगलें ॥१२८॥
लोकांसी कथितों अतां सकल हें जाऊनियां भूवरीं
आनंदून करा महोत्सव तुम्हां तारावया ये हरी
पापी ही असला कुणी परि जरि सेवील भावें पदां
होवोनी परिहार मागिल पुढें येईल ना आपदा ॥१२९॥
अवतार पीठिका नांवाचा पहिला सर्व समाप्त
लेखनकाल :-
वैशाख, शके १८६७
श्रीकृष्ण कथामृत - दुसरा सर्ग
( श्रीवसुदेव - बंधन )
सृष्ट्वाऽखिलं विश्वमिदं विचित्रं
स्थूलञ्च सूक्ष्मञ्च चराचरञ्च
तथापि नित्यं निरूपाधिको यः
तस्मै महेशाय नमोऽस्तु शश्वत् ॥१॥
अचिंत्य परतत्त्व दे करून वासनेचा क्षय
प्रसाद तव सद्गुरो निवटितो भवाचें भय
म्हणून तुमच्या पुढें दिसत दीन चिंतामणी
तुम्हां शरण मी भवच्चरण मस्तकीं घेउनी ॥२॥
परम सुंदरा मथुरा नगरी
वसली होती यमुना - तीरीं
श्यामलशा ललनेच्या जणुं कां
बसे कडेवर मुग्ध बालिका ॥३॥
निळ्या नभीं चमकती विशेष
तेथ गृहांचे सुवर्ण - कळस
सूचविती जणुं विलास - केली
संपत्ती कळसास पोचली
मधु - दैत्यासह त्याचें मधुवन ॥४॥
दाशरथी शत्रुघ्नें मर्दुन
त्या स्थानीं ही पुराणकालीं
अभिनव ऐशी पुरी वसविली ॥५॥
पापी मधुवन नष्ट जहालें
पापबीज परि नसें जळालें
होतें जणुं तें दडुनी भूगत
अनुकूला कालास अपेक्षित ॥६॥
भोजकुलींचा कंस दुर्मती कालें होता राजा
दुष्कृति - फल - युत - वृक्ष उगवले कोंब फुटुन त्या बीजा ॥७॥
दिसावया इतरांहुन सुंदर
गांजाचें जरि पीक खरोखर
उत्पन्नहि ये विपुल तयांतुन
परि आदरिती तया न सज्जन ॥८॥
तसेंच मथुरा - नगर सुशोभित
विलास - संपत्तीनें मंडित
सोडून गेले दूर संतजन
निज - धर्माचें करण्या रक्षण ॥९॥
कारण तेथें शील सतींचें
यज्ञ मुनींचे धन दुबळ्यांचें
एक क्षणही नसे सुरक्षित
पटकीच्या साथींतिल जीवित ॥१०॥
भूप कंस धनरूप बळानें
युक्त तसाची चातुर्यानें
वर्णूं कां परि सर्पगुणांतें
विसरुनि त्याच्या भयद विषाते ॥११॥
श्वशुराचें घेऊन सहाय्य द्रोह करुन जनकासी
नृप झाला, त्या नको पुरावा अधमाधम म्हणण्यासी ॥१२॥
होती भगिनी या कंसासी
नांव देवकीं असें जियेसी
सरळ - हृदय ही कुटिल तदंतर
लक्ष्मीसी जणु शंख सहोदर ॥१३॥
चारुहास्य सुंदर मुखमंडल
मनोज्ञ कान्ती वाणी मंजुळ
सुंदरता शुचिता सात्विकता
घेउन तिज जणुं रचित विधाता ॥१४॥
सागर भरला असें जलानें
ही स्वाभाविक वात्सल्यानें
कारुण्यानें सदैव पूर्ण
हृदय तिचे जेवीं रामायण ॥१५॥
मयूर शुक सारिका गृहींचे
क्रीडापाडस वा हरिणींचें
व्याकुळ तिज वाटतां बंधनीं
सवेंच त्यांना देत सोडुनी ॥१६॥
सुम खडितां ये रस, बघतां तें
वाटे अश्रू लता ढाळिते
अहा तिचें प्रिय अपत्य हरिलें
जननीचें ना हृदय जाणिलें ॥१७॥
म्हणुन विहरतां उद्यानांतुन तिनें सुमा चुंबावें
कुरवाळावें वत्सल परि कर तोडाया न धजावे ॥१८॥
देवकिच्या हळव्या हृदयाची
कंस करी नित थट्टा साची
तिच्या पुढें टोची पक्ष्यातें
हसत वसे चीची करितां ते ॥१९॥
कळ्या उमलत्या चुरगाळाव्या
निष्ठुर हंसुनी वर उधळाव्या
वदन झाकुनी रडे देवकी
दुजें काय तरि करिल वराकी ॥२०॥
दुष्ट नरांचे सहजहि वर्तन
उपजविते कीं व्यथा विलक्षण
निवडुंगाची लव ही जेवीं
स्पर्शे केवळ बहुपरि शिणवी ॥२१॥
उपवर झाली जयीं देवकी विकसित कलिका जैशीं
वृष्णि - कुलींच्या वसुदेवातें नेमियलें वर तिजसी ॥२२॥
विवाह झाला बहु थाटानें
कंस लक्ष घाली जातीनें
उणें तेथ मग पडें कशाचें
प्रगटे वैभव सर्व कलांचें ॥२३॥
वरातिच्या वर शुभ समयासी
पूरच आला संपत्तीसी
भव्य मनोहर हेमरथावर
आरोहण करिती ते वधुवर ॥२४॥
मिळवुन बहुविध पुष्पें रत्नें
शोभविलें त्या रथास यत्नें
फुलें चमकती रत्न सुगंधित
झालें जनुं कां गुण संक्रामित ॥२५॥
अश्व दहा सुंदर तेजाळ
सुलक्षणी वर्णानें धवल
सजवुनि त्या जोडिले रथांतें
दशग्रंथ जणुं वेदार्थातें ॥२६॥
स्वयें कंस होऊन सारथी प्रग्रह घेई हातीं
अविवेकाधिन झाल्या जणुं कां दशेंद्रियांच्या वृत्ती ॥२७॥
मिरवणूक चालली पथानें
रचिली ज्यावर रम्य तोरणें
सोनसळी रेशमी पटासी
पसरुनिया झांकिलें जयासी ॥२८॥
गर्जे सर्वापुढें धडधडा
हत्तीवरती थोर चौघडा
मागुन वाजे मंजुल सनई
सती पतिस जणुं उत्तर देई ॥२९॥
मृदंग झांजा शिंग तुतारी
प्रगटविती आपुली चातुरी
बंदी करिती जयजयकारा
भेदितसें तो गर्ज अंबरा ॥३०॥
दासी त्या मागून चालल्या
विविध भूषणांनीं ज्या नटल्या
आंदण वस्तू शिरीं घेउनी
स्तबक फुलांचे जसे लतांनीं ॥३१॥
गणिकांच्या गानास साथ दे नूपुर झंकारुनियां
हाव भाव मधु कटाक्ष खुलवी नृत्याच्या सौंदर्या ॥३२॥
दोहीं कडुनी होई साचा
दांपत्यावर वर्ष सुमांचा
फुलें न हीं शब्द कीं स्तुतीचे
कुतुकें जे निघती जन - वनाचें ॥३३॥
रत्नदीप घेउन निज हातीं
सुवासिनी रथ अनुसरताती
त्यामागें कुलललना - मेळा
वस्त्रांभरणांनीं नटलेला ॥३४॥
मध्येच कोणी चढुन रथातें
वधुच्या मुंडवळ्या सांवरितें
उभयांच्या शेल्यांची ग्रंथी
आहे कां सुटली तें बघती ॥३५॥
रथास मार्गी हिसका बसतां
अंग तयें अंगास लागतां
लज्जारुण मुख होत वधूचें
स्मित ओठावर येत वराचे ॥३६॥
दलांतुनी कमलांचे केसर सुमसंभारीं तेवीं
प्रपद पतीचे दिसे, विलोकी तेच शालिनी देवी ॥३७॥
सर्व नगर पाहतें कौतुकीं
रथावरीं वसुदेव - देवकी
चंद्रासह रोहिणी शोभली
नभीं जशीं नक्षत्र - मंडळीं ॥३८॥
शांत रसासह अथवा कविता
उत्प्रेक्षा - रूपकें मंडिता
विराग उज्वल भक्तीश वा
मुनि - हृदयीं शोभून दिसावा ॥३९॥
कुठें वाद्य वाजतां पथानें
काय त्यजुन धावती त्वरेनें
अशा स्त्रिया ही वरात मोहक
बघावयासी कशा न उत्सुक ॥४०॥
त्वरितगती गांठुन वातायन
रमणी बघती शोभा निरखुन
कोणी वानित वधूवरांतें
वाजंत्रीच्या कुणी सुरांतें ॥४१॥
एक वदे ही परस्परांसीं
योग्य किती गे मधुरूपासीं
अज राजासी इंदुमती ती
निषधपतीनें जणुं दमयंती ॥४२॥
खरेंच तव जन्मलीं जणूं हीं परस्परास्तव तेवीं
परी न बाई ईशकृपें यां तशीं संकटें यावीं ॥४३॥
अवलोकी कुणि वेश - भूषणां
स्वतः सवें करितां तत्तुलना
दिपुन वैभवें कंसा स्तविती
किति ही भगिनी वरती प्रीती ॥४४॥
वरवर बघणारास गमावें
प्रेम देवकीवरी असावें
प्रयत्न कंसाचे परि होते
वैभव अपुलें मिरवायां तें ॥४५॥
वरात ऐशी आनंदानें
मिरवत होती राजपथानें
तों आकाशीं शब्द उमटले
हर्ष - गिरीवर वज्र कोसळें ॥४६॥
पति - सदना ज्या देवकीस तूं मिरवित कंसा नेसी
तिचा आठवा गर्भ पुढें तुज नेइल यमलोकासीं ॥४७॥
पिकें बहरलेल्या शेतावर
अवचित पडलें कीं हिंव दुर्धर
मोहर दरवळला अंब्याचा
वर्षें वर पाउस गारांचा ॥४८॥
शिखर मंदिरीं जव चढलें न
तोंच आदळे वीज कडाडुन
तसेंच केलें नभोगिरेनें
क्षणांत सारें उदासवाणें ॥४९॥
भगिनीवर कंसाची प्रीती
भोळ्या लोकां वाटत होती
क्रूर हृदय परि अजुन तयाचें
पुरतें नव्हतें दिसलें साचें ॥५०॥
प्रकाश असतां मंद काननीं
रत्न तेवढें येत दिसोनी
तों तळपावी वीज अंबरी
प्रकटे काळा नाग विषारी ॥५१॥
लांबुन वाघाच्या डोळ्यासी
भ्रमें दिवा मानिती प्रवासी
परी कळोनी येत शेवटीं
गृहदीप न मृत्यूची दिवटी ॥५२॥
घोर शब्द ऐकतां नभाचे
रूप खरें प्रगटे कंसाचें
स्वतःवरी बेततां येउनी
प्रेम खलांचें टिके कोठुनी ॥५३॥
क्रूर भयंकर मुद्रा झाली खदिरांगार जणुं डोळे
रुधिर येई तों अधर चाविले करकर खाउन दांत खलें
खङ्ग उपसुनी रक्त पिपासू रथाखालतीं घेत उडी
प्रगटत मूर्त कृतांत जणूं का प्रलयाची येतांच घडी ॥५४॥
ससाण्यापरी घालुन झेप
धरि भगिनीचा केशकलाप
ओदुन पाडी तिजसी क्रूर
लोकांच्या अश्रूसह भूवर ॥५५॥
फुटलें कंकण तुटल्या माळा
धूळ माखली सर्वांगाला
भावि सुखाच्या सर्व कल्पना
विसकटल्या सह वस्त्र भूषणां ॥५६॥
आनंदामधिं रमली होती
नवपरिणत ती मुग्धा युवती
क्षणांत परि सारें पालटलें
अमृत इच्छितां गरळ उसळलें ॥५७॥
पळभर तिज कांहींच कळेना बधिर इंद्रियें सारीं
निमिषार्धें मग होत घाबरी मरण बघून समोरी ॥५८॥
घाम सुटे थरथरे देवकी
कोमल हृदयीं भरली धडकी
विवर्ण झाली शब्द फुटेना
जल तरळें भय - चंचल नयनां ॥५९॥
किति तरि जमले जन मिरवाया
धजे न एकहि पुढती व्हायां
पुतळे जणुं सारे दगडांचे
घोर संकटीं कोण कुणाचें ॥६०॥
शांत न बसवे वसुदेवाला
तो धैर्यानें पुढती झाला
संकटभीता साह्य करावें
थोरासी सहज हें स्वभावें ॥६१॥
ती तर त्यांत नवोढा पत्नी
भाग रक्षिणें नाना यत्नीं
अग्निसाक्ष तद्भार शिरावर
घ्यावी केवीं मग माघार ॥६२॥
धीर दिला तिज वसुदेवानें बघुनी प्रेमळ नयनें
बोलत कंसा मंजुलवाचा कर धरुनी धैर्यानें ॥६३॥
“ कंसा थोर तुझें महिमान
भोज कुला तूं शिरो भूषण
शूर रणीं ना कुणी तुझ्या सम
कां करिशी मग अनुचित कर्म ॥६४॥
आपण फलवेली लावावी
कालें ती पुष्पोन्मुख व्हावी
किडकें एखादें येइल फळ
गृहित धरुन कुणि छेदी वेल ? ॥६५॥
वरातिची ही मंगल वेला
थाट येथिंच तुवांच केला
नववधु या समयीं अधिदेवी
तिलाच कां पायीं तुडवावी ॥६६॥
स्त्री हत्या मोठीं सर्वांहुन
भगिनी ही धाकुटी तयांतुन
कन्येसम लाडकी असावी
तिलाच कांरे वध्य गणावी ॥६७॥
धरुनी जो तूं हेतु मनासी
हिला वधाया उद्यत होसी
मारुन हिजसी साधे तो कां
कोण अमर वद या भूलोकां ॥६८॥
बली धनी विद्वान असेना मरण न चुकलें कवणा
म्हणुन यशासी डाग न लागों हेंच धरावें स्वमना ॥६९॥
शक्य असुनही इच्छापूर्ती
संत न दुष्कर्मे आचरिती
प्रयत्नेंहि जें अशक्य घडणें
यास्तव कां मग पापाचरणें ॥७०॥
सूज्ञा, म्हणुनी विनवित तूंतें
जीवदान दे मम भार्येतें
दीनपणें तुजकडे बघे कीं
प्रिय भगिनी ही तुझी देवकी ” ॥७१॥
भाषण परि तें सर्वहि विफल
घड्यावरी पालथ्या जसें जल
बीं पडलें जाउन खडकावर
कसे फुटावें तयास अंकुर ॥७२॥
वाळवंट कां सुपीक झालें
कितिही जरि त्यासी नांगरिलें
सुसरीच्या पाठीसी मार्दव
ये कां भिजुनी जलें सदैव ॥७३॥
दुष्ट - वर्तनीं पालट तेवीं
सौम्य भाषणें पडेल केवीं
नवल हेंच ऐकून घेतलें
इतुका वेळ तयानें सगळें ॥७४॥
दूर ढकलुनी वसुदेवातें क्रोधें शस्त्र उगारी
बघवेल न तें म्हणुनी झांकी डोळे नगरी सारी ॥७५॥
देवकिची अंतिम किंकाळी
परि नच कोणा ऐकूं आली
ध्वनी नवाची सुखवी कर्ण
“ श्रीनारायण जय नारायण ” ॥७६॥
नारदास बगतांच पुढारीं
क्रोधासह असि कंस आवरी
शांतवी न हृदयास कुणाचे
पवित्र दर्शन सत्पुरूषांचें ॥७७॥
श्रीकृष्णाची भावी माता
देवकीस त्या कंसें वधितां
विलंब घडतां भगवज्जन्मा
म्हणुन नारदें घेतले श्रमा ॥७८॥
स्वीकारून सर्वंचें वंदन
करिती कंसासी स्मितभाषण
“ मांडिलेंस हें काय भूपते ?
शस्त्र तुझें ना व्यर्थ कोपतें ” ॥७९॥
कंस वदे “ आठवा गर्भ मज वधिल हिचा नभ सांगे
म्हणुन हिला मारून विषपादपमूळच छेदित वेगें ॥८०॥
“ छे छे, कंसा हिला वधोनी
मुनिवर म्हणती तुझीच हानी
पुनः कुठें ही येइल जन्मा
ठाव तुला लागेल कसा मा ॥८१॥
युक्ती तुजसी कथितो यास्तव
हिला बंधनीं पतिसह ठेव
अपत्य जेंजें होइल यांतें
टाक तत्क्षणीं चिरडुन त्यातें ॥८२॥
सवेच पटलें तें कंसाला
मूर्ख भाळतो भुलावणीला
वदे दुष्ट तो वसुदेवाप्रत
“ काय संधि हा तुम्हांस संमत ” ॥८३॥
वसुदेवहि गांगरला क्षणभर
परि संमती देई नंतर
पुरुष करी दूरचा विचार
स्त्रीस न बहुधा इतुका धीर ॥८४॥
“ होईल वा नच मूल अम्हांसी, ” “ म्हणत कुणीं सांगावें,
जगेल होतां, निश्चय नाहीं, कां पुढचें टाकावें ” ॥८५॥
परी देवकी वदें स्फुंदुनी
“ सुखें टाक मम कंठ चिरोनी, ”
अपत्य - वघ कल्पनेमधेंही
स्त्री हृदयासी साहत नाहीं ॥८६॥
बंधन त्या करण्या आज्ञापुन
कंस चालता झाला तेथुन
घट्ट धरोनी नारदचरण
रडे देवकी आक्रदून ॥८७॥
माते, न धरी मम पायांतें
वंदनीय गे तूंच अम्हांतें
पूर्णब्रह्म परेश परात्पर
उदरीं तुझिया अवतरणार ॥८८॥
प्रसंगाकडे पाहुन निष्ठुर
वदलों त्याची मला क्षमा कर
असें कसें तरि लव शांतवुनी
अंतर्हितं झाले नारदमुनि ॥८९॥
कंसाज्ञेनें दंपतीस त्या नेलें कारागारीं
भयाण भिंती जेथ रक्षिती निज - वैभव अंधारीं ॥९०॥
आकाशासह पृथ्वी जेवीं
गाढ तमीं दर्शे बुडवावी
आनंदासह अथवा आशा
दुर्दैवानें करणें विवशा ॥९१॥
सत्यासह वा सरला वाणी
स्वार्थे जणुं ठेवणें कोंडुनी
वसुदेवासह तशी देवकी
बंदी केली कंस सेवकीं ॥९२॥
ज्यांनीं उपभोगणें विशेष
राजमंदिरांतले विलास
उदास जीवित जगती तेची
विचित्र - करणी कीं दैवाची ॥९३॥
धीराचे ते परि दोघेही
त्रासिक कोणी झाले नाहीं
मधुर - वर्तनें परस्परांना
सुखवित करिती कालक्रमणा ॥९४॥
जाती दिवसामागुन राती मासहि कांहीं सरले
गर्भवती जाहली देवकी वासुदेवें पाहियलें ॥९५॥
फिकटपण ये वदना किंचित
शोभे जणुं कां कमल - रजोहत
मंदगती जाहली मंदतर
अलस लोचनीं दिसे मनोहर ॥९६॥
प्रिय पत्नी ती प्रथम - गर्भिणी
आनंदे नच कोण पाहुनी
वसुदेवाच्या परि हृदयांत
वचन दिलेलें सलत सदोदित ॥९७॥
पुरे दिवस भरतां गर्भासी
शुभानना दे जन्म सुतासी
कीर्तिमंत हें नांव तयाचें
लोकीं विश्रुत झालें साचें ॥९८॥
जन्मा आधीं प्राण देउनी
ज्यानें रक्षियली निज जननी
प्रसिद्ध होण्या त्याचें नाम
नाम - करण - विधिचें ना काम ॥९९॥
पाहुन मूर्ती मृदुल चिमुकली भान विसरली देवी
अपत्य - जन्मापरी स्त्रियांतें दुजें न कांहीं भुलवी ॥१००॥
चिंती परि वसुदेव मनातें
अतां उचलणें अवश्य यातें
सुतासवें जों अधिक रमेल
वियोग तों दुःसह होईल ॥१०१॥
दाबुन कष्टें व्यथा हृदांतिल
थोपवून अश्रूंचे ओघळ
निज भार्येच्या अंगावरुनी
मूल तयें घेतलें उचलुनी ॥१०२॥
पतिमुख दिसतां उदासवाणें
सर्वहि मग जाणिलें तियेनें
हंबरडा फोडून भूतळीं
नवप्रसूता ती कोसळली ॥१०३॥
बांध फुटे वसुदेव - हृदाचा
पूर आवरेना अश्रूंचा
परी प्रसंगीं वज्राहुनही
सज्जन होती कठोर हृदयीं ॥१०४॥
जड पद टाकी पुढें मूर्च्छिता भार्या ओलांडुन ती
कंसासन्मुख नीट येउनी बालक ठेवी पुढतीं ॥१०५॥
शून्यरवें वसुदेव बोलला
“ बालक हा नव जात आणिला
याचें वाटेल तें करावें,
शब्द पाळिला निज, वसुदेवें ” ॥१०६॥
बालक तें पाहतां निरागस
हात चिमुकले मुद्रा लोभस
मूठ आपुली चोखित पडलें
कंस - मनीं वात्सल्य उपजलें ॥१०७॥
वसुदेवासी देई उत्तर
“ मी न समजतां तितुका निष्ठुर
हा न्या इतरहि सुखें वाढवा
आणुन द्या मज परी आठवा ” ॥१०८॥
चुंबुन कंसें मृदुल कपोला
बालक दिधला वसुदेवाला
परि हा खलहृदयांतिल गंहिवर
जल टिकतें कां तत्प शिलेवर ? ॥१०९॥
कंस विचारा करी मानसीं
“ सोडुन देणें उचित न यासी
गांठ असे ही शठ देवांतें
उलटे सुलटे मोजितील ते ” ॥११०॥
वेगें धाडुन निज दूतासी
ओढित आणी वसुदेवासी
आपटिले तें मूल शिलेवर
कोमल काया केली चूर ॥१११॥
शोकाकुल वसुदेव कसा तरि झाला परतुन येता
कंस करांतुन सुटेल सुत हा विश्वासचि त्या नव्हता ॥११२॥
अशींच कांहीं वर्षे गेली
सहा मुलें वसुदेवा झालीं
परि उपजत तद्विनाश होय
व्यसनी पुरुषाचे जणुं निश्चय ॥११३॥
दुःखाचे हे कठोर घाले
उभयांनीं त्या कसे साहिले
ठाउक सगळें त्यांचें त्यांना
काय कल्पना सामान्यांना ॥११४॥
इकडे शेषा म्हणे रमावर
घेणें अतां मज अवतार
तूं तर माझा बंधू सखया
येशिल ना मम साह्य कराया ॥११५॥
शेष करी यावरी उत्तरा
“ पुरे तुझी संगती श्रीधरा
गेल्या वेळीं तुजसह आलों
कनिष्ठ म्हणुनी सदा कष्टलों ॥११६॥
एक अटीवर येतों बंधू वडिल तुझा मी व्हावें
आज्ञेनें मम वागावें तूं, ” केलें स्मित तइं देवें ॥११७॥
मान्य तुझें हें म्हणणें मजसी
जा ये देवकिच्या उदरासी
उपजतांच कीं मरण तिथें ” तर
शेष म्हणें, “ माझें रक्षण कर ” ॥११८॥
कंसापुन त्या लपवायातें
सातव्याच महिन्यांत तयातें
देवकिच्या गर्भांतुन नेलें
उदरीं रोहिणिच्या स्थापियलें ॥११९॥
हीही वसुदेवाची पत्नी
आश्रयार्थ नंदाच्या सदनीं
झालें गर्भाचें आकर्षण
म्हणुन सुता म्हणती संकर्षण ॥१२०॥
कंस म्हणे, “ मम दर्प किती हा जिरती गर्भ भयानें
अतां मात्र राहिलें पाहिजे अतिशय सावधतेनें ” ॥१२१॥
अडसर घालुन कारागारा
वर बसवी जागता पहारा
करीत होतां सुचेल तें तें
परी स्वस्थता नये मनातें ॥१२२॥
सुचें किमपि ना तसें मधुरही रुचे भोजन
उरांत धडकी भरे हृदय पावतें स्पंदन
उगीच बहु ओरडा करून सेवकां कांपवी
न झोप लव ये तया सतत आठवा आठवी ॥१२३॥
वसुदेव - बंधन नांवाचा दुसरा सर्व समाप्त
लेखनकाल :-
वैशाख, शके १८६७
श्रीकृष्ण कथामृत - तिसरा सर्ग
( भगवज्जनन )
मौलौ यो बिभृते शुभां सुरधुनीं भाले कलामैन्दवीम्
नेत्रे मन्मथदाहकानलशिखां कण्ठे विषं भीषणम्
वामाङ्के गिरिजां वपुष्युपचितं भस्म स्मशानोद्भवम्
तं वन्दे शिरसा भुजङ्गरशनं सर्वैरलिप्तं शिवम् ॥१॥
पूर्णब्रह्मा सच्चिदानंद - रूपा
मेघश्यामा माधवा मायबापा
हे गोविंदा विठ्ठला चक्रपाणे
त्वत्पादाब्जा वन्दितों आदरानें ॥२॥
तत्त्व करीं ये वसुदेवाचे
यदुवंशाचें सुदैव नाचे
देवकिच्या गर्भीं ये ईश
गवसेना जो श्रुतिस्मृतीस ॥३॥
प्रवेशतां उदरीं विश्वंभर
कमलाच्या कोषीं जणुं रविकर
शुभा देवकी प्रफुल्ल झाली
जशी वनश्री वसंत - कालीं ॥४॥
दुःख भयादिक सर्व विकार
त्या कल्याणीपासुन दूर
गुहे मधें वनराज रिघाले
उरतिल कां मग तेथें कोल्हे ॥५॥
गर्भाच्या त्या उदात्त तेजें
ती मंगल देवता विराजे
दिसे सर्वदा प्रशांत मूर्ती
ध्यानरता जणुं कीं मुनिवृत्ती ॥६॥
शुचि स्मितानें तिच्या पुण्यकर उजळे कारागार
पवित्र होई वस्तुजात कीं तत्सहवासें थोर ॥७॥
तिचें घडे ज्या मंगल दर्शन
दृष्ट भाव मावळे हृदांतुन
नभीं प्रभा फाकतां उषेची
किरकिर लोपे रातकिड्यांची ॥८॥
निष्ठुर रक्षक नम्र - वचांनीं
वदती दोन्ही जोडुन पाणी
उद्धटही नमवी निज माना
कंसाज्ञा पालन करवे ना ॥९॥
स्वयें कंस ये छळण्या तीतें
तिज बघतां परि धैर्य न होतें
डौल आपुला मिरवी कां तरि
गरुडासन्मुख सर्प विषारी ॥१०॥
वसुदेवाच्या आनंदासी
पार न उरला त्या वेळेसी
गमे तया ती सर्वदेवता
तिला मनानें होय वंदिता ॥११॥
देवकिच्या गर्भी सर्वेश्वर आला ऐसें कळतां
सर्व देव पातले ऋषींसह ईशवंदना करितां ॥१२॥
इंद्र वरुण विधि पिनाकपाणी
सावित्री शारदा मृडानी
अत्री गौतम मैत्रावरुणी
स्तविती गर्भा नमस्कारुनी ॥१३॥
वसंतास आदरिती कोकिल
रव्युदयीं खग करिती किलबिल
भ्रमर गुंजती कमला भंवतीं
भाट जणू वा वीरा स्तविती ॥१४॥
जय विश्वाद्या त्रिगुणातीता
सद्रूपा हे जय भगवंता
भवभय - नाशन भो करुणाकर
नमन तुम्हांसी हे वरचेवर ॥१५॥
अचिंत्य - रूपा अनंतशक्ते
कोण तुम्हां संपूर्ण जाणते
नेति नेति हे निगमहि म्हणती
शास्त्रांचे गण मागे सरती ॥१६॥
निर्गुण निरूपाधिक निर्वासन निराकार हे देवा
सर्वव्यापक रूप निरंजन गोचर परि सद्भावा ॥१७॥
हा विश्वाचा भव्य पसारा
तव मायेनें ये आकारा
तीच करी लय त्याचा अंतीं
स्वप्ना गिळिते जशी जागृती ॥१८॥
भवत्कृपा होतसे जयावर
तोच तरे हा माया सागर
त्या भक्तासाठींच दयाळा
युगीं युगीं अवतार घेतला ॥१९॥
पुनः पुनः हें सादर वंदन
तव चरणासी असो दयाघन
सदा अम्हांवर कृपा असावी
अन्य कोणती आस न जीवीं ॥२०॥
धन्य धन्य हे सती देवकी
पूर्वपुण्य तव फळास ये कीं
माते या सर्वहि जगतावर
असंख्यात केले उपकार ॥२१॥
तपस्विनी पृश्नी अससी तूं भगवति गतजन्मासी
मागितलेंसी श्रीविष्णूसी ये माझ्या उदरासी ॥२२॥
वचन तुला ईशानें दिधलें
आज पहा तें खरें जाहलें
ब्रह्माण्डांतहि जो न मावला
तोच तुझ्या गर्भांत राहिला ॥२३॥
वेद जयाचें यश गुण गाती
जपी तपी ज्या शोधित फिरती
जो सार्या विश्वाची जननी
त्याची ही तूं जन्मदायिनी ॥२४॥
भय - नाशन तव उदरीं असतां
कोणाचें भय तुला न आतां
वंद्य सेव्य तूं सर्वांसीही
अम्हांविषीं हो वत्सल हृदयीं ॥२५॥
वदुन यापरी सकल देव ते सती देवकीचरणीं
प्रेमें मस्तक ठेवुन गेले परतुनियां स्वस्थानीं ॥२६॥
देवकीस जो मास आठवा
लागला न लागला असे वा
ईश म्हणे तों घ्यावें जनन
सामान्या नियमाचें बंधन ॥२७॥
ईशाचें होणार आगमन
गेले सगळे आनंदून
परमेशाचें करण्या स्वागत
काल निजगुणासह हो उद्यत ॥२८॥
उत्सव करण्या त्या समयासी
धजे न कोणीही पुरवासी
मनीं वाहुनी राजभयातें
निसर्ग कां परि मोजिल यातें ॥२९॥
सहा ऋतू बाराही मास
पक्ष तिथी नी रजनी दिवस
प्रगट जाहली पांचहि भूतें
निज - वैभव अर्पण्या प्रभूतें ॥३०॥
प्रत्येकाला वाटे सेवा घडो प्रभूची मजसी
एकाहुन एकानें रचिली शोभा त्या समयासी ॥३१॥
प्रसन्न झाल्या दिशा दहाही
चारुतेस त्या तुलना नाहीं
लखलख करिती अनंत तारे
नभीं जणूं उजळलीं झुंबरें ॥३२॥
पुष्पराजा मिसळुनि भूवरतीं
जलधारा जणुं सडा शिंपिती
मृदंग कीं वाजवी पयोधर
मोर नाचती त्या तालावर ॥३३॥
पार न चंद्राच्या हर्षासी
ईश जन्म घेई तद्वंशीं
आज अष्टमी भान न उरलें
निजधन त्यानें सर्व उधळिलें ॥३४॥
हेव्यानें रविराज लपवि मुख
परि त्यासहि झालासे हरिख
कमल - बंधना करुन मोकळे
त्यानें बंदी भ्रमर सोडिले ॥३५॥
लता बहरल्या रम्या फुलांनीं
सुगंध भरला पानोंपानीं
वायूसंगें तोच धाडिला
अर्पण करण्या भगवंताला ॥३६॥
वृक्षानींही तसेंच केलें
सरोवरानें शैत्य अर्पिलें
त्याचें इतकें ओझें झालें
कीं तो वायु हळूं हळुं चाले ॥३७॥
फलभारें लवलेल्या वृक्षीं किलबिलती मधु पक्षी
लक्ष्मीचीं मंदिरें विकसलीं सरोवरांच्या कुक्षीं ॥३८॥
आम्र - तरूसी मोहर आला
मंजुळ गाती वरी कोकिळा
गुंजारव करिताती मधुकर
वनदेवीचे जणुं का नूपुर ॥३९॥
नद्यां नद्यांना पूर लोटला
होत्या परि सर्वही निर्मला
कुल - कन्येचें संपदेंतही
शुचित्व विलयासी नच जाई ॥४०॥
मांगल्यानें न्हाली अवनी
चंदन - चर्चित दिसे यामिनी
नवीच शोभा स्थला स्थला ये
प्रसन्न झालीं सज्जन - हृदयें ॥४१॥
कुंडांतिल विप्रांचे अग्नी
प्रदीप्त झाले शांत - पणानीं
स्वर्गीं दजदण झडे नगारा
देव वर्षिती सुमसंभारा ॥४२॥
गंधर्वांचें सुस्वर गायन नृत्य अप्सरा करिती
पावित्र्यासह आनंदानें वातावरणें भरती ॥४३॥
सत्य सत्य तो बहुशुभकाल
जें मांगल्याचेंही मंगल
सौंदर्यांचें रूप मनोहर
होतें आतां अवतरणार ॥४४॥
प्रगटणार वेदांचें हृद्गत
अथवा उपनिषदांचा अर्थ
सकलहि शास्त्रांचें प्रतिपाद्य
ध्येय पुराणांचें निरवद्य ॥४५॥
विशुद्धभक्तीचा आधार
सौख्य - संपदेचें भांडार
कला - कलापांचें सौंदर्य
काव्यरसांतिल वा माधुर्य ॥४६॥
जगत्त्रयाचें मूलकारण
संतसज्जनांचें वा जीवन
योगांचें सामर्थ्य महत्तर
तत्त्वज्ञानांचें वा सार ॥४७॥
सात्विकशा प्रेमाचा निर्झर
वा सद्धर्माचा ध्वज उज्वल
साहित्याचें विशाल हृदय
श्रेयाचें वा मूर्त प्रेय ॥४८॥
समाधान तीक्ष्णा बुद्धीचें
निधान जणुं वा कल्याणांचें
सुदैव सार्या सोमकुलांचें
पूर्वपुण्य कीं वसुदेवाचें ॥४९॥
वद्यपक्ष अष्टमी श्रावणीं
मध्यरात्र नक्षत्र रोहिणी
बुध दिन असतां ग्रह उच्चीचे
जनन होत भूवरी प्रभूचें ॥५०॥
ज्याच्या वंशीं जन्मा येणें
तत्प्रिय पत्नी जननी करणें
ना तरि ये वनवास वादुनी
यास्तव निवडी ऋक्ष रोहिणी ॥५१॥
कुंदरदन अरविंदवन शतचंद्रमदनसम चारुतरा
पीतांबरधृत कंबरमाला अंबरकांती मुकुटधारा
चतुर्भुजा भास्वरा गोजिरी प्रियंकरा जी भक्तांची
अशी देवकीचिया समोरी प्रगटे मूर्ती श्रीहरिची ॥५२॥
परमेशाचें होतां दर्शन
वसुदेवानें केलें वंदन
भाव परि कोणते उमटले
देवकीच्या हृदयांत ना कळे ॥५३॥
चार करांचें बालरूप तें
बघतांना पापणी न लवते
सर्वांगीं रोमांच ठाकती
स्तब्ध जाहल्या इंद्रियवृत्ति ॥५४॥
सतेज काळे वत्सल डोळे
बघबघतां ओघळूं लागले
नेत्र मिटे ओठहि थरथरती
भाग्यशालिनी मूक रडे ती ॥५५॥
झाला होतां बहु जरि हरिख
त्याचें तिज भोगतां नये सुख
काय म्हणावें स्त्री - हृदयांतें
जें आनंदानें ही रडतें ॥५६॥
बालरूप वदलें स्मितवदनें
ढाळिति अश्रू कां तव नयने
रडूं नको तूं माझी माता
भय कोणाचें नाहीं आतां ” ॥५७॥
वसुदेवासी म्हणे परात्पर
“ येथ न ठेवा मजसी पळभर
नंदघरीं नेऊन पोचवा
जें वात्सल्या मूर्त विसावा ॥५८॥
बारा वर्षें तेथें राहुन येइन मग सोडाया
तुम्ही विचारी उभयहि तोंवर धीर धरावा हृदया ॥५९॥
ऐकत होती सर्व देवकी
वज्रपात जणुं तिच्या मस्तकीं
“ आठ बालकें येऊन पोटीं
तशींच उरलें मी वांझोटी ॥६०॥
अपत्यसुख नच माझ्या भाळीं
मग कां बाळें दैवें दिधलीं
आशा दावुन मूळ छेदिलें
दुःखांचे डोंगर वाढविलें ” ॥६१॥
वसुदेवासी म्हणते त्रासुन
“ तुम्हीच मम दुःखासी कारण
कां मज वांचविलें त्या समया
पुनः पुनः मरणें भोगाया ॥६२॥
आस केवढी होती धरिली
हृदयीं माझ्या मी यावेळीं
येतो परमात्मा उदरासी
भय कोणाचें नाहीं त्यासी ॥६३॥
वाढवीन मी त्या प्रेमानें
न्हाऊं घालिन वात्सल्यानें
निरखिन वदना अंकीं घेउन
चुंबित कुरवाळिन शिर हुंगिन ॥६४॥
कुशींत घेउन धरिन हृदासीं
गाइन अंगाई गीतासी
निवविन डोळे लीला बघुनी
शब्द बोबडे ऐकिन कानीं ॥६५॥
हाय हाय परि एकवेळ ही इच्छा नच हो पुरती
कंसा हातें अंतरलीं तीं हा जाई या रीतीं ॥६६॥
साक्षात् ईशाचेंही हांतुन
होत नसे माझें शांतवन
मीच करंटी जन्मा आलें
तेथ कुणाचा उपाय चाले ? ॥६७॥
तुज कनवाळू म्हणती देवा
एक वेळ तरि अनुभव यावा
रूप तुझें हें नको चतुर्भुज
घेऊम दे मम अंगावर तुज ॥६८॥
ओठ हांसते हात चिमुकले
लोभस डोळे कुंतल कुरळे
तांबुस कोमल पाय नाचते
डोळे भरुनी बघुं दे मातें ॥६९॥
पदराखालीं तुजसी घेउन
वात्सल्या तव मुखांत देइन
कवळ्या ओठीं तूं चेपावे
स्पर्शे त्या मी पुलकित व्हावें ॥७०॥
अनेक वेळां उरीं दाटला
पान्हा परि तो विफल जाहला
सार्थक त्याचें एकवार तरि
करणें, इच्छा नाहीं दुसरी ॥७१॥
अभागिनीची या गोविंदा
आस एवढी पुरवी एकदां
माता झालें मी ऐसें मज
क्षणभर तरि वाटुं दे अधोक्षज ॥७२॥
अशी विनवणी करुण ऐकतां परमात्मा द्रवला तो
कल्पतरूपासून कधीं कां याचक विन्मुख येतो ॥७३॥
मूल उपजलेलें हरि झाला
सान लालसर देह कोंवळा
लुकलुकताती इवले डोळे
गर्भजलानें जावळ ओलें ॥७४॥
उचलुन त्यातें घेउन अंगीं
निजहृदया लावीत देवकी
करपाशीं त्या करिते गोळा
अधिर्या ओंठीं चुंबी गाला ॥७५॥
स्पर्श सुखद तो नाना - रीतीं
आससुनी अनुभवीत होती
बालकास परि कुरवाळोनी
तृप्त कधीं कां झाली जननी ॥७६॥
सांगुन तिजसी गोष्टी चार
शांतवून लव कष्टी अंतर
टोपल्यांत घेऊन मुलाला
नंदघरा वसुदेव निघाला ॥७७॥
यास आठवा होता म्हणुनी सावध कुणी नव्हते
मध्यरात्र अंधारी त्यांतुन जागल कुढुनी असते ॥७८॥
निखळुन उघडीं झालीं दारें
ओलांडुन निद्रिस्त पहारे
दबकत चाले चाहुल येत
भय सत्कृत्या खल - राज्यांत ॥७९॥
पथीं आडवी होती यमुना
जलोद्धता उसळती भीषणा
खळाळ बहु भंवरे करितात
ओघ वाहतो तीरा कापित ॥८०॥
गर्जतसे लाटांचें तांडव
आंत विहरती मगरी कासव
फोफावत ती वाहे यमुना
द्विग्विजया जणुं निघते सेना ॥८१॥
निर्भय परि वासुदेव तशा कीं
नदींत शिरला वीर अनीकीं
दुष्कर सांगा कृत्य कोणतें
पुत्र - प्रेमापुढें पित्यातें ॥८२॥
घेउनियां टोपलें शिरावर पाणी कापित जाई
देव मस्तकीं धरिल्यावर कां अशक्य उरतें कांहीं ॥८३॥
विस्मित होउन बाहुबलानें
वाट जणूं दिधली यमुनेनें
प्रवाह उतरुन ये तीरावर
पथीं चालतां करी विचार ॥८४॥
“ स्नेही जिवलग नंद जरी मम
करील कां परि तो हें काम
वाहुन चित्तीं कंसाचें भय
नाहीं म्हणतां करूं मी काय ? ॥८५॥
काय कथावें, कसें करावें
पोर कसें हें संरक्षावें ? ”
चिंतित असतां असें मनासी
येउन पोंचे नंद - घरासी ॥८६॥
कुडावरून शिरतांच अंगणीं
तेथें मूर्च्छित नंद - कामिनी
नवजातार्भक मृतवत जवळी
बघुन कल्पना मनीं उदेली ॥८७॥
“ मूल दिसत हें उपजत मेलें
हिला परी कांहीं न कळालें
असह्यवेणा होउन मूर्च्छित
झालीसे ही गमते येथ ॥८८॥
हिचे जवळ मम बाळा ठेउन म्रुतशिशु घेउन जाऊं
गुप्तताच उचिता या वेळीं नंदा हें नच कळवूं ॥८९॥
आपलेंच समजुन मम बाळ
वाढवील कीं तो स्नेहाळ
कंसाचीही समजुत करितां
येइल मजसी परतुन जातां ” ॥९०॥
अशा विचारें अलटापालट
करुन परतची धरली वाट
येताती जसजसे प्रसंग
तसें वागणें पडतें भाग ॥९१॥
प्रभातीस होता अवसर लव
तों स्वस्थानीं ये वसुदेव
“ वदे देवकीतें घे शिशु हें
नंदाचें जें मृत गे आहे ” ॥९२॥
ऊब परी लागतां गृहांतिल अर्भक सावध झालें
रुदन करी नाचवी पदांतें निरखी सभोंवताले ॥९३॥
बघुनी तान्ही पोर अशी ती
वात्सल्यासी आली भरती
हृदयासी लावून तियेतं
रोषें वदली वसुदेवातें ॥९४॥
अशी कशी तरि बुद्धि फिरली
कां कन्या नंदाची अणिली
वांचविण्यासी अपुला बाळ
कसे जाहलां हिज़सी काळ ॥९५॥
तुमच्यास्तव मित्र - प्रेमानें
दिधली कन्या निज नंदानें
थोरपणा हा शोभे त्यासी
विचार होता हवा तुम्हांसी ॥९६॥
दुसर्याचें तोडोनी काळिज
हृत्पीडा का शांतविणें निज ?
आणित असतां धर्माधर्मा
यशास कां लाविला काळिमा ॥९७॥
निष्ठुर कंसें वधितां हिज कां दुःख उणें मज होई
मातेच्या हृदया न जाणिलें केली म्हणुन कृती ही ॥९८॥
सहा मुलांच्या हत्त्येहुनही
दुःख अधिकची मज देइल ही
उठा उठा, जा परत पोंचवा
दुःखाग्नींतुन मला वांचवा ” ॥९९॥
दोष जरी दे वासुदेवासी
परी न आला राग तयासी
दिसे कस्तुरी करुनी काळी
घृणा म्हणुन कां कुणास आली ॥१००॥
तेजास्तव आवडे हिरकणी
कठिणता न घे ध्यानीं कोणी
स्वरमाला ऐकुन सुख होय
कोण बघे मुद्रेचा अभिनय ॥१०१॥
खळाळ सिंधूच्या लाटांचा
मोत्यांसाठीं सह्यचि साचा
वीजेच्या चंद्राची कोर
असुन वांकडी सुखवी अंतर ॥१०२॥
तसें उताविळ रागाखालीं
वत्सलता हृदयींची दिसली
स्निग्धवचानें वसुदेवें मग
वृत्त निवेदन केलें सांग ॥१०३॥
रडणें ऐकुन कन्येचें तों रक्षक सावध झाले
कंसासी कळवाया कांहीं त्वरा करोनी गेले ॥१०४॥
धांवत तेथें आला कंस
पिंजारुन वर उडती केस
ठेंचा लागुन रक्त निघालें
भान परि ना त्यासी उरलें ॥१०५॥
उभ्या राहिल्या शिरा कपाळीं
धुंद लोचनां चढली लाली
क्रौर्याचें मुद्रेवर नर्तन
हृदय परी धडधडतें आंतुन ॥१०६॥
दणदण पद आपटी भूवरीं
वरचेवर निज गदा सांवरी
घट्ट धरियले ओठ आंवळुन
श्वासाच्या वाफा नाकांतुन ॥१०७॥
मृत्यूसम देवकी समोरी येउन निष्ठुर वाचा
म्हणे, “ कुठें तें तुझें कारटें घेतों घोट गळ्याचा ॥१०८॥
येण्यासाठीं माझ्यापुढती
कृतांतासही नाहीं छाती
तेथ कथा कां या पोराची
सिंहासन्मुख घुंगुरड्याची ” ॥१०९॥
अबलेवर ऐसें गुरकावत
घेण्या बालक पसरी हात
तों तिज पदराखालीं झांकी
मागे सरकुन वदे देवकी ॥११०॥
“ दादा, थांब असे मुलगी ही
ही कांहीं तुज घातक नाहीं
ठेव एवढी तरी अम्हांसी
देइन हिजसी तव पुत्रासी ” ॥१११॥
गर्जे कंस तिला झिडकारित
“ मी नच मुलगा मुलगी जाणित
गर्भ तुझा, जाणितों एवढें ”
हिसकुन घे तें पोर बापुडें ॥११२॥
स्त्री म्हणुनी करितांच उपेक्षा
बहुतां झाली मागें शिक्षा
मी न तसा भोळा महिषासुर
करिन रिपूंचा ठेंचुनियां चुर ॥११३॥
प्रयत्नसंपादित यश न्यावें हिरावुनी दुर्दैवें
झंझावातें फलसंभारा पाडुन नष्ट करावें ॥११४॥
तसें मूल तें धरुनी हातीं
फिरवी गरगर डोक्याभंवतीं
बघत शिळेवर जों अपटाया
तोंछ निसटुनी गेली माया ॥११५॥
उसळे तेजाचा वर झोत
बाण जसा अग्निक्रीडेंत
वदली प्रगटुन देवी रुष्टा
“ मला काय मारितो दुष्टा ॥११६॥
तुज वधणारा माझ्या आधीं
जन्मा आला ज्या त्या शोधी
घडा, तुझ्या भरला पापांचा
नाश न आतां टळावयाचा ॥११७॥
माझ्या सह तव जीवज्योति
समज आजची जात लयाप्रति
खालीं उरलें प्रेत जिवंत
पडेल तें थोड्या दिवसांत ” ॥११८॥
असें वदुन ती गुप्त जाहली घाव बसे कंसाला
ताठा गेला दर्पहि गेला विस्तव जणुं विझलेला ॥११९॥
क्रौर्य मगाचें झालें दुबळें
देहावरतीं दैन्य पसरलें
व्याकुळ करिती अश्रू नयनां
स्वरांतली लोपली गर्जना ॥१२०॥
खालीं घालुन मान परतला
साप जसा मुकतां दंताला
करी कसें तरि मार्गक्रमण
पंख छेदितां जेंवीं श्येन ॥१२१॥
संतापानें अंतःकरण
जळत सारखें होतें आंतुन
दुष्टांची दुष्टता कधींही
मेल्यावांचुन शमणें नाहीं ॥१२२॥
निंद्य पाशवी साध्य खलांचे
हृदयें जणुं कीं कुंभ विषाचे
साधन सोज्वल असेल केवीं
कशी सर्पगति सरळ असावी ॥१२३॥
सभा तयें भरविली तांतडी
सोडविण्या मरणाची कोडी
जमली क्रूर पशूंची सेना
अघ, बक, केशी, द्विविद, पूतना ॥१२४॥
जनहित नाहीं ठावुक कोणा
गर्वे ताठर असती माना
अन्या - जवळी घेण्याजोगें
असेल कांहीं हे नच वागे ॥१२५॥
सत्तेची बहु हांव जयासी
असे सभासद राजसभेसी
टिको आपुलें पद, हो कांहीं
भलें बुरें हा निषेध नाहीं ॥१२६॥
सभेंत मग तेधवां त्वरित घेतला निर्णय
नृपावरिल वारण्या परम संकटाचें भय
मुलें चिरुन टाकणें सकल एक वर्षांतलीं
घरोघर फिरावया कुशल नेमणें मंडळी ॥१२७॥
रक्षावें जनतेप्रती नृपतिनें स्व - प्राणही वेंचुनी
आहे दंडक यापरी परि तया कोणी न आणी मनीं
कृत्यें घोर करावया न दचके स्वार्थे झुगारी नया
त्याचें आज नसे उद्यां फल परी लागेच भोगावया ॥१२८॥
भगवज्जनन नांवाचा तिसरा सर्व समाप्त
लेखनकाल :-
श्रावण, शके १८६७
श्रीकृष्ण कथामृत - चवथा सर्ग
( गोकुलानंद )
सत्यं नश्वरमस्तु वा जगदिदं जीवः शिवो वेतरः
शून्यं वा परमाणुरस्तु जगतो हेतुः प्रधानं च वा
योगो ज्ञानमथास्तु कर्म नितरां निःश्रेयसे साधनं
जानीमो गिरिशैतदेव भगवन् त्वं नः शरण्यः प्रभुः ॥१॥
मी इच्छितों हरिचरित्र रचावयासी
घालावया गवासणीच जणू नभासी
जें शक्य ना, घडत तें अपुल्या प्रसादें
माझ्या शिरीं वरदहस्त गुरो असूं दे ॥२॥
ॐ काराचा उदय जाहला
हिरण्यगर्भापुन ज्या वेळा
मंगलता ती त्या समयाची
आज येथ जणुं धरिते प्राची ॥३॥
सकाळ ती श्रावणी म्हणून
कुंद असावें वातावरण
चरण परी श्रीहरिचे जेथें
उरेल केवीं दुर्दिन तेथें ॥४॥
अरुणोदय होतसे मनोहर
नभीं प्रभा फांकली लालसर
मेघखंड रंगले त्यामुळें
जणों गुलालें रंजित कमळें ॥५॥
पूर्व दिशेला आज काय हें
तेज उसळतें तरि कसलें हें
इंद्राच्या कां शततमयज्ञीं
वसुधारेनें प्रदीप्त अग्नी ॥६॥
सुधा - कुंभ कांगरुड करांतुन
हरुनी नेतां पडला निसटुन
भूवरतीं आदळतां त्यांतिल
अमृत काय हें उसळें उज्वल ॥७॥
छे, न तसें, सूर्यराज भूमी पावन करण्या येती
सुवर्णरज उधळीत चालले तत्पर सेवक पुढतीं ॥८॥
उगवे आतं प्रभात मंगल
नाचत येती किरणे कोमल
विहंगमांची किलबिल कानीं
प्रसन्नतेचीं घुमवीं गाणीं ॥९॥
सोनेरी उन्ह घराघरांवर
तलपे वृक्षांच्या शेंड्यांवर
मंद वायुनें डुलती वेली
फुलें सुंगधी ज्यांवर फुललीं ॥१०॥
थेंब पावसाचे सुकुमार
दुर्वांच्या हिरव्या पात्यावर
वरुणानें जणुं आज गोकुळीं
असंख्यांत रत्नेंच उधळिलीं ॥११॥
वा ही पृथ्वी न्हाली नटली
नंद - घरीं उत्सवा निघाली
तिच्या हरित शालूस शोभती
पदरासी हे गुंफित मोती ॥१२॥
शिरीं घेउनी मृण्मय घागर
स्त्रिया निघाल्या पाणोठ्यावर
तेजानें निज पावित्र्याचें
उजळ करित मुख दिशादिशांचें ॥१३॥
नंदाच्या दाराहुन जातां गडबड कांहीं दिसली
विशेष दिसल्यावर कोणी कां स्त्री ते वगळुनि गेली ॥१४॥
नंदाच्या अंगणाभीतरीं
दोन चार कीं असती नारी
मधें यशोदा मूर्च्छित अबला
नंद दूरसा गोंधळलेला ॥१५॥
यशोदेस जागवी रोहिणी
मुखावरी लव शिंपुन पाणी
वारा घाली कुणी पदरानें
निरखी वदना आतुरतेनें ॥१६॥
सतेज बालक गोजिरवाणें
गुंडाळी दुसरी वस्त्रानें
तोंच यशोदा ये भानावर
परतवीत नंदाचा धीर ॥१७॥
गोळा होउन तिच्यासभोंती
स्त्रिया अधीरा वृत्ता पुसती
प्रथम बालका अंगीं घेउन
सांगतसे त्याचें मुख चुंबुन ॥१८॥
“ काल निशीं वासरूं मोकळें
बांधण्यास ओढाया गेलें
असह्य कळ तो पोटीं आली
प्रसूत झालें शुद्धी गेली ॥१९॥
परी सुरक्षित बाळ खरोखर देवाचीच कृपा ही
जोडी कर गहिवरुनी, नंदा स्वर्ग ठेगणा होई ॥२०॥
यशोदेस मग घरांत नेलें
उचित असे उपचारहि केले
फार दिसांनीं पुत्र जन्मला
तुला अतां कां त्या हर्षाला ॥२१॥
नंदगृहीं हरि जन्मा आला
घरोघरीं आनंद उसळला
कमळ विकसतें कुठें तळ्यांत
सुगंध पसरे सर्व वनांत ॥२२॥
वाजे सनई गर्जे ढक्का
डुलती गगनीं गुढ्या पताका
तोरण दारासी पुष्पांचें
कुठें नारळासह अंब्याचें ॥२३॥
सर्व घरीं शर्करा वांटिती
नंदाचा पुत्रोत्सव कथिती
प्रतिदिवशीं हें चालूं होतें
अधिकाधिक ये हर्षा भरतें ॥२४॥
नांव ठेवण्याच्या दिवशीं तर थाटा सीमा नुरली
नारींची बहु धांदल झाली गमती झुलत्या केळी ॥२५॥
मंगल न्हाउन करुनी भूषा
नंदगृहासी निघती योषा
पथीं दिसे समुदाय तयांचा
गुच्छ रम्यसा जसा कळ्यांचा ॥२६॥
प्रत्येकीच्या ताट करांत
झांकुन जाळीच्या वस्त्रांत
आंत गहूं, नारळ, खण उंची
कुठें रेशमी झवलें, कुंची ॥२७॥
मंडप घातियला नंदानें
दिली आंतुनी चित्र - वितानें
पान - फुलांनीं शोभा आली
उभ्या स्वागता दारीं केळी ॥२८॥
मधें पाळणा लटके सुंदर रत्नें बाजुस चारी
रंगित पोपट मोर झालरी, निजला आंत मुरारी ॥२९॥
पुढें यशोदा पाटावरती
काजळ - कुंकुम ल्याली होती
देहा थोडी आली कृशता
कांतीसी परि नसे म्लानता ॥३०॥
हा हा म्हणतां मंडप सगळा
गोपवधूंनीं भरुनी गेला
जणों कवीच्या विशाल चित्तीं
रम्य कल्पना दाटी करिती ॥३१॥
कृष्णाच्या मातेच्या भंवतीं
ओटी भरण्या जमल्या युवती
तदा यशोदा दिसे जणूं कां
खुले पाकळ्यांमध्यें कर्णिका ॥३२॥
गोपींनीं घेतला उचलुनी
बाळकृष्ण पाळण्यामधूनी
ओठ फिरविती हसत्या गाला
जावळ मोहवितें दृष्टीला ॥३३॥
हिच्या करांतुन तिच्या करासी कृष्ण सारखा नाचे
नीलकमल जणुं तरंगतें हें जल लहरीवर साचें ॥३४॥
अन्य करीं आपुल्या करांतुन
देतां व्याकुळ अंतःकरण
कृष्णाला नच सोडूं वाटे
प्रेम सर्व शरिरांतुन उमटें ॥३५॥
दुसरी परि तितकीच अधीरा
घेण्या त्या सुकुमार कुमारा
वात्सल्याची ओढाताण
सहन करी स्मितवदनें कृष्ण ॥३६॥
वृद्धा परि त्या भरल्या रागें
“ हाल मुलाचें कां करितां गे
चला, पुरे, त्या इकडे आणा
नांव ठेवण्या वेळ होत ना ” ॥३७॥
नांव घेउनी गोविंदाचें
नाम करण होतें इतरांचें
वदल्या असतील कायी आतां
येथ कृष्ण ठेवितां उचलितां ॥३८॥
तें कथण्यासी कुणास कां मुख जें वेदांस न ठावें
बुद्धीचा हा विषय न, हृदयें भक्ताच्या जाणावें ॥३९॥
कृष्ण कुणी अच्युत, गोविंद
श्रीहरि, तेवीं श्याम मुकुंद
एक नाम कां असेल साचें
अनंतरूपीं भगवंतचें ॥४०॥
समाप्त झाला समारंभ तो
परी कुणाचा पाय न निघतो
घुटमळती पाळण्या भोंवतीं
कारण कांहीं काढुन युवती ॥४१॥
वदनीं घालुन मूठ आपुली
चोखित होती मूर्त सावळी
गोपींचीं जणुं मनेंच कवळुन
मुखांत घाली नंदनंदन ॥४२॥
गोपींचीं परतलीं शरीरें कशी तरी निजसदनीं
परी चैन नच जणुं राहिलें कांहितरीं विसरूनी ॥४३॥
धान्य निवडितां दही घुसळितां
मुलास वा आपुल्या भरवितां
पेटण वा घालून चुलीसी
मधेंच येती नंदगृहासी ॥४४॥
येउन कोणी मागे विरजण
कुणा हवी सपिटाची चाळण
पदार्थ अमका करणें केवीं
रीत पुसाया कोणी यावी ॥४५॥
उगीच कांहीं वस्तू नाया
नेली नसतां परत कराया
निमित्त करुनी नाना रीती
कृष्णा बघण्या गोपी येती ॥४६॥
आणिक मग त्या श्रीकृष्णासी
खेळविती घेउन उरासी
कुणी तयासी तेल माखितें
एक म्हणे “ मी न्हाउं घालितें ” ॥४७॥
कुणी लोचनीं काजळ घाली
दुजी तिटेची लावी टिकली
थोपटुनी कोणी निजवावें
आंदोलित वा गीत म्हणावें ॥४८॥
भुंगा गंऽ बसलेला । पाटलीच्या फुलावरी ॥
कृष्णाच्या गालावरी ॥ गालबोट ॥४९॥
चांदणं या खोलीमाजीं । कोठून तरी आलं ॥
माझं बाळ गंऽहासलं ॥ गालामधें ॥५०॥
चांदोबा उगवला । कमळ झोंपीं गेलें
का उघडे राहीले ॥ डोळे तूझे ॥५१॥
कोणी रडवा उगा करावा
हसराही कोणी रडवावा
परी त्यांतही कौतुक होतें
खेळणेंच तें जणों स्त्रियांतें ॥५२॥
अशी स्थिती होती इतरांची
असेल केवीं यशोमतीची
तिजसी सुख जें श्रीकृष्णाचें
नसेच तें भाग्यांत कुणाचे ॥५३॥
अंकीं घेउन श्रीकृष्णातें
कुरळें जावळ कुरवाळीते
कवळ्या ओठांच्या हास्यें तर
वेड तिला लाविलें खरोखर ॥५४॥
प्यावयास फिरता मुख हृदयीं
उरत न तिजसी देहभान ही
हर्ष उमटतो प्रतिरोमांतुन
मृदुसुख त्या स्पर्शाचें पावुन ॥५५॥
नंद असाची होई मोहित
धरी कवळुनी हृदयीं निजसुत
प्रसादगुण काव्याचा जेवीं
क्षणाक्षणा रसिकांसं मोहवी ॥५६॥
गोकुळ इकडे होतें पोहत
आनंदाच्या सरोवरांत
तिकडे होता कंस घाबरा
गचक्या खाउन भीति - सागरा ॥५७॥
मरण आपुलें टाळायासी त्या पापे भूपालें
मुलें प्रजेचीं मारायासी अधिकारी नेमियलें ॥५८॥
कामा या मधुवेश धरोनी
फिरे पूतना बाल - घातिनी
आपुलकीची भाषा मंजुल
मधु वदनीं, हृदयीं हालाहाल ॥५९॥
लाव भरी ती विष वक्षोजीं
घेउन जवळीं शिशु त्या पाजी
अपथ्य जेवीं प्रियरूपानें
मोहुन, नाशीं सहजपणानें ॥६०॥
तडफडुनी शिशु मरतां हांसे
“ वधिशी मेल्या, कंसा कैसें ”
शठता परि ही कशी टिकावी
हरि जो लीला - नट मायावी ॥६१॥
शोषण घे हरि विष स्तनींचें
हरिलें जणुं कीं पाप तियेचें
पाठविलें स्वर्गांत तियेसी
प्रभुचा द्वेषहि फलद विशेषी ॥६२॥
तृणावर्त शकटासुर गेला याच गतीला अंतीं
वारुळांत जणुं धजले मूषक कोल्हे सिंह विघाती ॥६३॥
खर्या मृगमदापुढें कसा वा
लसुणीचा दुर्गंध टिकावा
तत्त्वज्ञाना सन्मुख सांगा
शोक मोह कां करिती दंगा ! ॥६४॥
हेत्वाभासा लाभे ठाय
तर्क - पंडिता समोर काय !
तसे दैत्य हे कृष्णापुढतीं
मशकें हीं, तो अनंतशक्ति ॥६५॥
कुबेर - सुत कृष्णें उद्धरिलें
नारद - शापें तरु झालेले
असामान्य हीं कृत्त्यें ऐशीं
बघतां धाले गोकुलवासी ॥६६॥
तेज रवीचें पूर्वाह्णीं वा मुनि - हृदयींचें वैराग्य
कमलांचें सौंदर्य सकाळीं गोकुळचें अथवा भाग्य
यशोमतीचें मूर्त सौख्य वा नंदाचें वात्सल्य जसें
हळुं हळुं तेवीं आनंदासह बाळकृष्ण तो वाढतसे ॥६७॥
फिरे ओसरी भिंत धरोनी
पांगुळ - गाडा कधीं घेउनी
निज जननीच्या धरुन अंबरा
महत्प्रयासें चढे उंबरा ॥६८॥
वस्त्र सोडुनी ठेवयलेलें
त्यांत जाउनी हा घोटाळे
खालीं राही चुकुन करंडा
सांडुन कुंकू माखी तोंडा ॥६९॥
करी यशोदा तुलसी - पूजन
कृष्ण उभा पाठीसी येउन
उदकाडीचा धरण्या धूर
बघे पसरुनी इवलासा कर ॥७०॥
घुसळण करितां कधीं एकदां
मधेंच गेली आतं यशोदा
बाळकृष्ण ये डेर्यापाशीं
कांठ धरून उंचवी पदासी ॥७१॥
पाही आंतिल लोणी घ्याया
परी होतसे खटपट वाया
रागें मग उलथिलें दुधाणें
धांव ये जननी तच्छ्रवणें ॥७२॥
इकडे ही मूर्ती तें ठाईं
दोदो हातीं लोणी खाई
मुख, पद, पोटहि लडबडलेलें
ताक दूरवर वाहत गेलें ॥७३॥
हात पकडुनी श्रीकृष्णाचे
( प्रयत्न हे रागे भरण्याचे )
करी तयावर मोठे डोळे
परी कौतुकें हसूंच आलें ॥७४॥
नंदा पुढतीं तसेंच नेलें
विचित्रसें तें ध्यान सांवळे
हसें दावुनी वदे यशोदा
यास मार मारिजे एकदां ॥७५॥
नंदें चुंबियलें प्रेमानें रडव्या कृष्ण - मुखासी
शिक्षा याहुन दुजी असे कां असल्या अपराधासी ॥७६॥
लीलांनीं या सुकुमाराचे
वेडें केलें मन सकलांचें
नाच नाच रे बाबा घननीळा
गोपींना हा एकच चाळा ॥७७॥
नंदपाटलाकडे प्रत्यहीं
कामासाठीं गौळी कांहीं
येती ते आणिती खेळणीं
श्रीहरि जवळीं यावा म्हणुनी ॥७८॥
अंग धुळीनें सर्व माखलें
तसेंच मुख जरि मळकट असलें
करपाशीं तरि कृष्णा घेउन
विशंक घेती त्याचें चुंबन ॥७९॥
सुंदर हंसरा श्याम खोडकर
वदुन बोबडे सुखवी अंतर
वृद्ध तरुण वा मूल असो कां
श्रीहरि सर्वांचाच लाडका ॥८०॥
कुणी कसाही असो उदास
चिंता वा लागली मनास
श्रीकृष्णाच्या मधुर दर्शनें
कळी खुलावी प्रसन्नतेनें ॥८१॥
परिसुनि भाषण कधीं हरीचें
विस्मित व्हावें मन सूज्ञांचें
बुद्धीची कीं चमक विलक्षण
बालवयींही दिपवी लोचन ॥८२॥
श्याम परी तो महालाघवी
विसरवीत आपुली थोरवी
मधुर खेळकर साधें वर्तन
यांतच मोठ्यांचें मोठेपण ॥८३॥
अतां हरीसी वर्ष पांचवें मग त्याच्या खेळासी
पुरेल केवीं सदन, मनूचा कमंडलू मत्स्यासी ॥८४॥
गोपांच्या समवयी बालकां
जमवुन खेळे पथीं सारखा
कधीं पळापळ कधीं हुतूतू
कधीं भोंवर्यावरतीं हेतू ॥८५॥
पाट्यांचा कधीं खेळ मांडितां
गुंतुन जाई सगळा रस्ता
वाट नुरावी जाणारातें
परी न कोणी ये रागातें ॥८६॥
खेळ पाहण्या उलट तयांनीं
उभे रहावें काम सोडुनी
टाळ्या कोणी पिटती कोडें
दुजा भांडणीं करी निवाडे ॥८७॥
हरी खेळतां विटिदांडूनें
आल्या जरि गोपिका पथानें
शिरीं घेउनी चुंबळ त्यावर
ठेवुनियां भरलेली घागर ॥८८॥
अचुक मारुनी विटिचा टोला
खट्याळ हा फोडीत घटाला
पाणी सांडुन चिंब भिजे ती
आणिक दुसर्या हांसहांसती ॥८९॥
हिनें कोपुने धरण्या यावें
चपळ सावळा दे हुलकावे
निराश होउन दमुन म्हणे ते
“ थांब, तुझ्या आईस सांगतें ” ॥९०॥
“ सुखें सांग जा. ” म्हणे लाघवी
मान वेळवी जीभ दाखवी
दुसरीचे पाठीसी राहुन
हिला हसूं ये झणिं तें पाहुन ॥९१॥
अशी सर्वही वेळ हरीनें खेळण्यांत दवडावी
भोजनास दे हांक यशोदा ती न परी ऐकावी ॥९२॥
किती खेळ खेळला तरीही
थकवा श्रीकृष्णासी नाही
दुबळी परि तीं इतर बालकें
धीर तयाचा इतुका न टिके ॥९३॥
वदती सगळे मग, “ ए कृष्णा. ”
दमलों आम्ही अता पुरे ना ! ”
कृष्णें त्यांसीं हसुन म्हणावें
“ दूध तूप रे कसें पचावें ” ॥९४॥
“ दूध असे बा कुणा प्यावया
पचण्याची मग गोष्ट कासया
तुला दूध नवनीत सांपडे
तुकडे आम्हाप्रती कोरडे ॥९५॥
तुम्हां घरीं आहे ना गोधन
कृष्ण विचारी विस्मित होउन
दुधतें त्यांचें कोठें जातें
उत्तर ये मथुराशिबिराते ॥९६॥
काय मुलें ठेऊन उपाशी
पुसे मुरारी सरोष त्यासी
भाव चांगला तेथे मिळतो
कोण आमुचा विचार करितो ॥९७॥
दूध दही लोणी घृत तेही जात विकाया सर्व
पेंद्या म्हणतो खरवड मिळते हेंच आमुचें दैव ॥९८॥
तशी बालकें कांहीं वदतीं
किती कथूं तुज घरच्या गमती
ताकहि लाभत ना प्रति दिवशीं
सकाळींच पाजिती म्हशीसी ॥९९॥
अपुली नाहीं स्थिती अशी बा
प्रेमळ माझे फार अजोबा
वदे सिदामा म्हणुनी मजसी
तोटा नाहीं घरीं कशासी ॥१००॥
घरांत अमुची परी म्हातारी
मेद ओघळे जिच्या शरीरीं
यथासांग तिज सर्व लागते
इतराना वाकडे बोलते ॥१०१॥
खाउं न देई घांस सुखाचा
स्वभाव असला असे तियेचा
म्हणुनी नसतां उणीव कसली
हाडें माझी कधीं न बुजलीं ॥१०२॥
वदे हरी यावरी गड्यांनों हें नाहीं कामाचें
गोरस खाउन बल मिळवावें असलें वय हें अमुचें ॥१०३॥
अविचारें जो छळी प्रजेसी
त्या कंसाच्या पशु सेनेसी
पोसताति हे धन लोभानें
घरीं पोर कळवळे भुकेनें ॥१०४॥
गोकुळांतले गोरस साचे
आहे गोकुळवासि जनांचें
अम्हा पुरोनी उरल्यावरते
सुखें विकाया मग जावे ते ॥१०५॥
सत्य तुझें हें भाषण सगळें
कोण परी मानील आपुलें
वदे वाकड्या कधीं अम्हास
सरळपणानें मिळे न गोरस ॥१०६॥
उगीच चिंता कशास त्याची
उणीव येथें ना युक्तीची
कृष्ण म्हणे घेऊन चर्हाटें
या मज जवळी उद्यां पहाटें ॥१०७॥
पहांटले अजुनी नव्हते तों गोपवधू मथुरेसी
निघती घेउन कुंभ शिरावर दूध तूप विकण्यासी ॥१०८॥
रेंगळती तारे आकाशीं
अजुन अशा सांवळ्या प्रकाशीं
अंधुक मूर्ती दिसती त्यांच्या
स्मृती पुसट जणुं बालवयींच्या ॥१०९॥
एकी मागुन एक चालती
दूध दह्याची घागर वरतीं
कुणी मधुरसें पद सांगावें
इतरांनीं तें सुस्वर गावें ॥११०॥
प्रतिदिवशींची ही परिपाटी
आजच कसली शंका पोटीं
परी तयांना काय कल्पना
सर्व वेळ सारखी असेना ॥१११॥
ताणुन दोर्या रस्त्यावरतीं
मुलें दों-कडे लपलीं होतीं
शीळ हरीची येतां कानीं
दोर्या धरिल्या उचलुनि त्यांनीं ॥११२॥
शीळ कशाची म्हणती तोची अडखळुनी दोरीला
पडल्या भूवर गोप कामिनी तोल नसे सांवरला ॥११३॥
दूधतुपाची घट्ट दह्याची
तशीच मडकीं नवनीताचीं
कोसळली कीं सवेंच खालीं
आणि मुलांची चंगळ झाली ॥११४॥
एक ताव दे नवनीतावर
दुजा दुधाची उचली घागर
मुखीं घालिती सांफडले तें
मूर्त सांवळी दूर हासते ॥११५॥
व्याकुळल्या गोपिका बापुड्या
दुधातुपानें भिजल्या साड्या
दांत दुखावे कोपर फुटलें
पाउल कोणाचें मुरगळलें ॥११६॥
सांवरुनी जों गोपी उठतीं
तों हीं पोरें पसार होती
लागतसे ना कृष्णहि हातीं
वायूची दुसरी मूर्ती ती ॥११७॥
यशोदेस येउनी तयांनीं वृत्त हरीचें कथिलें
परि जननीच्या न्याय - मंदिरीं शिक्षेचें भय कसले ॥११८॥
खरें न वाटे तिला कदापी
जरि शपथेनें कथिती गोपी
सांगे परि ती वत्सल आई
करीन मी तुमची भरपाई ॥११९॥
मेघनीळ तो दुसर्या वेळे
प्रकार कांहीं करी निराळे
लोणी चोरून पळतां वाटें
पसरुन ठेवी खूप सराटे ॥१२०॥
जरी घातिले टाळे दारा
ते न थांबवी गोरसचोरा
शिडी सारखी रचुनी पोरें
धाड्या मधुनी घरांत उतरे ॥१२१॥
उंच बांधिली शिंकी असती
काठी घाली हा त्या वरती
केले असती उपाय नाना
कृष्णा पुढती एक टिकेना ॥१२२॥
मुलें जाहलीं पुष्ट शरीरी
गोपवधू त्रासल्या अंतरीं
म्हणती हरि हा घरांत असतां
लाभूं दे नच अम्हां शांतता ॥१२३॥
त्रास होत हें खरें, त्यामुळें द्वेष चीड परि नाहीं
उलट कुठें तरि खोल, हवेसें खट्याळपण तें होई ॥१२४॥
आवडत्यांच्या वागणुकींतिल
विचित्रतेचें वोचत जरि सल
सुखकरता तरि त्यांतहि घेई
प्रेमाची कीं ही नवलाई ॥१२५॥
परी हरीच्या या खोड्यासी
नवीच भरती ये प्रतिदिवशीं
वदती गोपी हरीप्रती या
लाडावुन नच ठेवा वाया ॥१२६॥
गोरस चोरी फोडी रांजण
धान्य उधळितो करितां कांडण
लुगडे दिसतां तें टरकावी
घेउन चिमटे मुलास रडवी ॥१२७॥
खोडीविणें हा न बसे जराही
शिक्षा परी या करवे न कांहीं
या लागव्याते बघतांच बाई
चित्तांतला राग विरोनि जाई ॥१२८॥
उपाय कथितों अम्ही म्हणुनिया यशोदे तुला
सरे वरिस आठवें नच लहान हा राहिला
वनांत इतरासवें नित वळावयासी गुरें
हरीस तव पाठवी सकल लाड झाले पुरे ॥१२९॥
गोकुलानंद नांवाचा चवथा सर्ग समाप्त
लेखनकाल :-
कार्तिक, शके १८६७
श्रीकृष्ण कथामृत - पांचवा सर्ग
( विधिमोहनाश )
रत्नौघे सति मंगलाय जगतो हालाहलं भीषणम्
स्वर्गादीन्यतिसुंदराणि भुवनान्युज्झित्य चित्यास्थलम्
पौलस्त्ये च निधाय येन विभवं भिक्षाटनं स्वीकृतम्
तं वन्दे विगतस्पृहं शिवकरं मृत्युंजयं सादरम् ॥१॥
ज्यांनीं मथोनि जणुंभारत सागरातें
गीतामृतास दिधलें अमुच्या करातें
रत्नें तशींच बहु जेवि सनत्सुजात
व्यासास त्या नित अनंत नती असोत ॥२॥
नमन करोनी कुलदेवासी
नंदा तेवीं निज जननीसी
सवें घेउनी बलरामाला
कृष्ण जावया निघे वनाला ॥३॥
कटीस पावा करांत काठी
खांद्यावर टाकुन कांबळा
कृष्ण जावया निघे वनाला ॥४॥
दारीं जमलीं गोपबालकें
गुरें उताविळ घेतीं हिसके
यशोमतीचा उर गहिंवरला
कृष्ण जावया निघे वनाला ॥५॥
गोविन्दासी धरुनी पोटीं
ओंठ टेकुनी हंसर्या ओठीं
मुख कुरवाळित वदे यशोदा
“ जपुन रहा हां, वनीं मुकुंदा ॥६॥
गेहीं परतुन येई लवकर
माझा अवघा जीव तुझ्यावर ”
वळुनी सांगे ती गोपाळा
“ हूड असे हा या सांभाळा ” ॥७॥
अवघड बहु जाहलें तियेला तुडुंबलें जल नयनीं
समजावी हरि, “ काय जात मी फार दिसांस्तव जननी ? ” ॥८॥
श्याम जातसे गुरें घेउनी
आल्या हें कळतांच गौळणी
म्हणती सार्या करुन अचंबा
“ आजच होता कां खोळंबा ॥९॥
अम्हीं बोललों सहज आपुलें
ते कां गे तूं खरेंच धरिलें
तसा अजुन हा असे लहान
निघेल कां या भूक तहान ॥१०॥
दिनभर हा राहील वनासी
सुनेंसुनें होईल आम्हांसी
म्हणुन यशोदे तुला विनवणीं
अतांच या धाडी न काननीं ॥११॥
पथीं वोंचतिल खडे सराटे
खरडतील झुडुपांचे कांटे
उन्ह वार्यानें सुकेल ना हा
असे कोवळा अमुचा कान्हा ” ॥१२॥
नंद उत्तरे हंसुनी, “ हा का राजपुत्र सुकुमार
कसाहि झाला तरी असे कीं गवळ्याचाच कुमार ॥१३॥
मुलें इतर याच्याच वयाचीं
नच जाती कां रानीं साचीं
शुभ दिन हा जाउं द्या वनातें
सवयीनें सारेंच सोसतें ॥१४॥
वेळ होतसे, चला, निघा, रे
नीट बघा निज गुरें वांसरें
त्यांस उन्हाचें न्या पाण्यावर
शिरा न झाडीमधें दूरवर ” ॥१५॥
बरें म्हणोनि पुनः एकदां
प्रेमें नमुनी नंद - यशोदा
हांकित धेनूंच्या कळपाला
कृष्ण जावया निघे वनाला ॥१६॥
तांबुस बांड्या कपिला गाई
ढवळ्या पवळ्या हरण्या कांहीं
कास घटासम मोठी ज्यांची
जातां पोळी डुले गळ्याची ॥१७॥
तशीच त्यांचीं पुष्ट वासरें
बागडतीं धांवतीं चौखुरें
मान आपुली पुढें घुसविती
घागर - माळा रुणझुणताती ॥१८॥
कृष्ण नेतसे आज तयांना वनांत चारायातें
मुके जीवहि हर्षित झाले नाचविती पुच्छांतें ॥१९॥
कृष्णासह आनंदहि गेला
गोपीचा जणुं तदा वनाला
घरकामासी हात गुंतले
होत असे परि चुकलें चुकलें ॥२०॥
एक गोपिका करिते घुसळण
खळवळतें डेर्यासी विरजण
रवी फिरतसे उजवी डावी
श्याम शोधण्या दृष्टी जेवीं ॥२१॥
रवी होतसे लव वरखालीं
स्थिती मनाची तशीच झाली
येउन आतां म्हणेल कोणी
रवी धरुन कां मज दे लोणी ॥२२॥
जेवायासी जेव्हां बसती
घांस न उतरे घशाखालतीं
असतां हरि तरि पडुनी पाठीं
ओढवितां मुख घासासाठीं ॥२३॥
उठतां बसतां श्याम आठवे
अश्रू नयनीं उभे राहवे
आणिक म्हणती घडोघडीळा
“ उगाच त्या रानांत धाडिला ॥२४॥
रांगोळी ना पुसते साची
तशीच वाटी नैवेद्याची
धका न पाण्याच्या भांड्याला
उगाच त्या रानांत धाडिला ” ॥२५॥
मन रमवाया कृष्णावर मग मंजुळ गातीं गाणीं,
श्याम मुकुंदा सांज जाहली लवकर ये परतोनी ॥२६॥
यशोदेस तर लव करमेना
मनास शांती क्षणहि असेना
तिजा प्रहर नव्हताच संपला
तोंच म्हणे, “ कां अजुनि न आला ? ” ॥२७॥
कुठें कशाचा ध्वनि ऐकियला
भासे तिजसी कृष्णाचि आला
मार्गीं येउन बघे दूरवर
झाल्या खेपा सहज दहांवर ॥२८॥
कोण उन्हाचे परि दिसणार
नभीं एकटी फिरते घार
मग जननीच्या वत्सलहृदयीं
शंकालागी उणीव कायी ॥२९॥
“ गुरें काय नसतीं आवरलीं
आडवनीं कां वाटचि चुकली
कां हा अवखळ कोठें पडला
धाडूं तरि कवणा बघण्याला ” ॥३०॥
धीर देत रोहिणी तियेसी, “ येतिल बाळें आतां
वेळ जाहली नसे अजूनी, कशास चिंता करितां ? ” ॥३१॥
सांज जाहली उन्हें निवालीं
परत यावया गुरें निघालीं
नभीं उडाली धूळ पथाची
जशी पताका गोमचमूची ॥३२॥
पथें गुराखी मुलें चालती
कळप गुरांचा घालुन पुढतीं
हरिसंगें तइं दिसती धेनू
प्रणवासह त्या वेदऋचा जणुं ॥३३॥
वत्सासाठीं उत्सुक होउन
धांवत धांवत येई गोधन
माना उंचवुनी हंबरती
वात्सल्यानें ओट्या स्रवती ॥३४॥
शिरती गाई अचुक घरांसी
वळवावें लागे न तयांसी
सहज वसे शब्दांत कल्पना
श्रम ना पडती महाकवींना ॥३५॥
अजुनी गाई नव्हत्या आल्या
सोडि यशोदा तों वत्साला
कोण ओळखी गाईंचें मन
अपत्यवत्सल आईवांचुन ॥३६॥
वत्सा चाटित हंबरती कीं धेनू आनंदानीं
जणूं तूंहि हो अशीच हर्षित आशिर्वचिलें त्यांनीं ॥३७॥
हांसत दारीं उभा सांवळा
धुरळ्यानें जो धूसर झाला
मोरपिसें मस्तकीं डोलती
रानफुलें छातीवर रुळती ॥३८॥
असें गोजिरें ध्यान पाहतां
हृदयीं मावे ना वत्सलता
कृष्णें धांवत पुढतीं येउन
दिधलें मातेला आलिंगन ॥३९॥
कवळुन घेई मुके माउली
ओठीं गालीं स्कंधीं भालीं
कोठें ठेवूं तरी श्रीहरी
यशोदेस जाहलें यापरी ॥४०॥
तुकडा घेउन येत रोहिणी
ओवाळाया मुलांवरूनी
उतरुन टाकी दूर नेउनी
मग पायावर ओती पाणी ॥४१॥
वात्सल्याचें कवन ज्यावरी त्यास दृष्ट बाधे कां ?
परि वरचे उपचारच गमती खरे भाबड्या लोकां ॥४२॥
प्रभात समयीं दुसरे दिवशीं
यशोमती जागवी हरीसी
“ ऊठ मुकुंदा खगगण उठले
सरोवरानें नेत्र उघडिले ॥४३॥
अंघुळलीं बघ फुलें दंवानें
अतां चांगलें नसें झोपणें
प्रातर्विधि उरकणें, ऊठ, चल
तेवढ्यांत तव मित्रहि जमतिल ॥४४॥
बलरामाचें स्नानहि झालें
तुझेंच आहे सर्व राहिलें ”
असें म्हणुन उठविलें हरीला
कुरकुरतां मग तोही उठला ॥४५॥
उष्णजलानें अंघुळ घालुन
स्तोत्र म्हणवुनी करवी वंदन
देत यशोदा मग हातावर
नैवेद्याची लोणी - साखर ॥४६॥
धारोष्णाचीं फेनिल पात्रें पिउनी दोघे निघतां
प्रेमभरानें चुंबुन देती निरोप दारीं माता ॥४७॥
असें प्रतिदिनीं प्रातःकालीं
गुरें वळायासी वनमाळी
जात काननीं यमुना - तीरीं
सवें गोप घेऊन शिदोरी ॥४८॥
अतां घरीं कुणि ना कुरकुरती
असेल तें पाथेय बांधिती
कृष्ण पुढें जाईल निघोनी
त्वरा असे सर्वांस म्हणोनी ॥४९॥
कधीं भक्ष्य वेळेस नसावें
परी कुणीही ना थांबावें
भूक खरी त्या नच अन्नाची
असे हरीच्या सहवासाची ॥५०॥
चरणें सोडुन कितीक वेळां
गाईंनीं चाटणें हरीला
श्याम वाजवी मंजुळ वेणू
तृप्त तयेंची होती धेनू ॥५१॥
नाचवीत निज पुच्छचामरें श्रीकृष्णाचे भंवतीं
बागडतीं वांसरें जणूं नव पल्लव आम्रावरतीं ॥५२॥
भोजन - समयीं एके दिवशीं
वदे यशोदा श्री नंदासी
“ होइल कां मम एक ऐकणें
अतां पुरे गोकुळीं राहणें ॥५३॥
नवेंच संकट नित्य कोसळें
चार दिवसही नीट न गेले
काय तरी केलें नच जाणें
या मेल्यांचें मम बाळानें ॥५४॥
काल म्हणे यमुना - तीरावर
बक कोणी धांवला हरीवर
परवां वत्सच ये माराया
निश्चित ही असुरांची माया ॥५५॥
जगदंबेची कृपा म्हणोनी
हरी वांचला विघ्नांतूनी
अतां परीक्षा नको विषाची
दूर इथुन जाउं या सदाची ” ॥५६॥
नंदाच्याही मनांत होतें गोकुळ सोडावेंसें
कारण आतां नुरलें तेथें गवत गुरांस पुरेसें ॥५७॥
पत्नीसी परि कसें कथावें
याच विचारीं तयें असावें
मांडियला संसार मोडणें
रुचे न कधिंही स्त्रियांकारणें ॥५८॥
आज तीच होऊन सांगते
सहज मानिलें नंदानें तें
इतरांची तों होती वृत्ती
नंद म्हणे जी पूर्वदिशा ती ॥५९॥
सामानानें गाडे भरिले
पेट्या, भांडीं, फडे, टोपलें
संसारांतिल क्षुद्रहि वस्तू
गृहिणींचा त्यावरतीं हेतु ॥६०॥
वृंदावन नामें सुमनोहर
स्थान असे यमुनातीरावर
सर्व सोय पाहतां त्या स्थलीं
गोपांनीं निजगृहें वसविलीं ॥६१॥
यमुनातीरीं अर्धवतुलें शोभे घोष तयांचा
आकाशांतिल गंगेजवळी चंद्र जसा षष्ठीचा ॥६२॥
तरु - शाखे पोवळें मधाचें
दृध्य मनोरम तसें व्रजाचें
वा पुष्पांचा एकच झुबका
वनवेलींवर खुले जणूं कां ॥६३॥
शाद्वल भूमी असे भोंवतीं
हरित कोवळीं गवतें डुलती
मधें दिसे व्रज बेट ज्यापरी
लाटांच्या नृत्यांत सागरीं ॥६४॥
फलवृक्षांनीं वनें बहरलीं
आम्र, जांभळी, चिंचा, बकुळी,
ताड, माड, खर्जूर, पोफळी,
विविध फुलांसी सीमा नुरली ॥६५॥
वृक्षराज भांडीर तेथिंचा
क्रीडामंडप जणूं वनींचा
विस्तरलासे शतखोडांनीं
आच्छादित वर घनपर्णांनीं ॥६६॥
पारंब्यांचे झुलती झोके
गोंड्यांसम ज्यां पिंवळीं टोकें
शुकादिकांचें कल संगीत
तलाश्रितांचें मन रमवीत ॥६७॥
पहिल्यापेक्षां वनस्थली ही आवडली गोपांतें
बालपणाहुन तारुण्याची दशा जशी सर्वांतें ॥६८॥
गाई सोडुन चरण्यासाठीं
जमती वल्लव यमुनाकांठीं
आज खेळणें कवण्या रीती
प्रश्नावर या रणें माजती ॥६९॥
राम म्हणे खेळूं या झोंब्या
हरीस रुचती सुरपारंब्या
पेंद्या बोले बरी लंगडी
आहे कें तव तशी तंगडी ॥७०॥
प्रेमळ थट्टा अशी करावी
कधीं मनोहर गीतें गावीं
श्रम हरुनी उत्साह देत जणुं
श्रीकृष्णाची मंजुळ वेणू ॥७१॥
कधीं दुपारीं नदींत त्यांनीं
हुदडावें सबकावित पाणी
कुणी तयानें होत घाबरा
हास्याचा मग उडे फवारा ॥७२॥
परी वदे बलराम, “ राम ना पोहण्यांत या कांहीं
उणीव येथें हीच एवढी अथांगसें जल नाहीं ” ॥७३॥
“ डोह येथही आहे रामा
खूप खोल परि येत न कामा ”
“ काय कारणें, ” हरी विचारी
“ तेथ कालिया नाग विषारी ॥७४॥
गरल तयाचें फार भयंकर ”
कथी सिदामा, “ म्हणती वनचर
खग जे डोहावरुनी उडती
दाहक वाफेनें कोसळती ॥७५॥
शक्य नसे नुसतें जल शिवणें
दूरच राहो पिणें पोहणें
जीव चुकुन जे तेथें गेले
पुनः कधींही परत न आले ॥७६॥
गायरान संपन्न तेथलें
तरु-वेलींनीं शोभविलेलें
वर्ज्य जाहलें अम्हां सदोदित
सदन जसें कां पिशाच्चपीडित ” ॥७७॥
म्हणत हरी, “ मग कोठुन शांती व्रजामधें नांदेल
आग भडकती उशास असतां झोंप काय येईल ॥७८॥
कशी खुलावीं तळ्यांत कमळें
वचनागाचें असतां जाळें
जेथें घरटें करुन ससाणा
सुखद काय तो वृक्ष शुकांना ॥७९॥
त्या दुष्टासी निर्दाळावें
वा हें स्थळ सोडून पळावें
ना तरि माझें अपाप गोधन
निर्भय सांगा होईल कोठुन ॥८०॥
त्यजणें निजसुख खलभीतीनें
हीं तों भ्याडांचींच लक्षणें
उचित गमे मज दुष्टांचा वध
जयें नांदती सुखामधें बुध ॥८१॥
दादा, चल रे, चला सर्वजण
त्या सर्पाचें करितो शासन ”
“ नको, जाउं दे ” हें म्हणण्याही
गोपां अवसर उरला नाहीं ॥८२॥
कृष्णामागुन बलरामादिक कांहीं धांवत गेले
इतरीं होउन मनीं भयाकुल वृत्त गोकुळा नेलें ॥८३॥
अग्निवर्ष जाहला गोकुळीं
व्यथित जाहली हृदयीं सगळी
काम करांतिल तसेंच टाकुन
यमुनेवर धांवती गोपजन ॥८४॥
भान - रहित कीं होय यशोदा
हांका मारी, कृष्ण, मुकुंदा
पिटी हृदय बडवी कर भाळीं
विव्हल नयनें अश्रू ढाळी ॥८५॥
ठेंच लागली पद मुरगळलें
गुंतुन झुडुपा वस्त्र फाटलें
पडली, उठली, पुनः धांवते
भान कशाचें तिजला नव्हतें ॥८६॥
सांवरती गौळणी तियेसी
दुःख उणें जरि नसे तयांसी
व्यथा जरी दोन्हीहि करांसी
गोंजारी कीं एक दुजासी ॥८७॥
हरी ऽ थांब अविचार करी न हा लोक धांवता वदले
तोंच हरीनें चदुन कदंवा उडी घेतली खाले ॥८८॥
कृष्णा, बाळा, आक्रंदून
घेत यशोदा भूवर लोळण
धाय मोकलुन रडे बापुडी
केंस आपुले ओदुन तोडी ॥८९॥
गोंधळलेल्या व्यथित मनानें
बघती सारे सजल लोचनें
धांव घेत कालिया हरीवर
फुंफाटत निज फणा भयंकर ॥९०॥
इंगळ तेवीं जळते डोळे
लाल शरीरा हे वेटोळे
जिभा उग्र शतमुखी लोळती
ज्वाळा जणुं गिरिकुहरीं उठती ॥९१॥
घालुन विळखे श्रीकृष्णासी
घट्ट आवळी सर्वांगासी
डंख करावया बघे शिरावर
हरी परी ना देई अवसर ॥९२॥
श्रीकृष्णाची स्थिती पाहुनी गोपवधू उर पिटति
सती यशोदा मूर्च्छित झाली, कासाविस जन होती ॥९३॥
निष्ठुर कां झालास दयाघन
घेशी अमुचा प्राण हिरावुन
कृष्णावांचुन गोकुळ सारे
प्रेताहुनहि प्रेत असे रे ॥९४॥
संकट तेथें ये वरचेवर
म्हणुनी केलें व्रजें स्थलांतर
तीच दुर्दशा परी येथही
करंट्यास सुख कुठेंच नाहीं ॥९५॥
कशास व्हावें जीवित असलें
उडीं घालण्या सर्वहि सजले
डोहामाजीं, रामानें परि
आडविलें विनवून कसें तरि ॥९६॥
मुकुंद इकडे करीत कौतुक
निजांग फुगवी करुनी कुंभक
मजके झाले ढिले तनूचे
प्रतान कोमल जसे लतेचे ॥९७॥
चदुनीं मग त्या सर्पफनेवर
तांडव आरंभी योगेश्वर
पदविन्यासें गोविंदाचे
व्याकुळ झाले प्राण खलाचे ॥९८॥
धापा टाकित शरण येत तो, “ रक्षी देवा मातें ”
भार्या त्याच्या पदां विनविती, “ दे प्रभु सौभाग्यातें ” ॥९९॥
द्रवला चित्तीं श्रीकरुणाघन
“ शरण येत त्या भय तें कोठुन
रमणकास जा निघा येथुनी ”
आज्ञा ती मानिली तयांनीं ॥१००॥
श्री हरि परतुन येतां कांठीं
यशोमतीनें धरिला पोटीं
नयनाश्रूंनीं केला सत्वर
विजयाचा अभिषेक हरीवर ॥१०१॥
निज - नेत्रांच्या शुभ - दीपांनीं
औक्षण केलें गोपवधूंनीं
जयजयकारें गोप गर्जले
व्योम तयानें कंपित झालें ॥१०२॥
बघुन हरीचा विक्रम अद्भुत
“ हा नाहीं सामान्य गोप - सुत
ईश जन्म होता घेणार
तोच असावा हा अवतार, ” ॥१०३॥
निश्चय होता असा जनांचा श्रीकृष्णाचे विषयीं
प्रीती हृदयीं होती तीतें रुप आगळें येई ॥१०४॥
विवाहिता कुलकन्या जेवीं
साध्वीच्या पदवीस चढावी
उद्यानांतिल सुरभी कलिका
ईशपूजनें प्रसाद जणुं कां ॥१०५॥
स्वच्छ सुशीतल असे मेघजल
तीर्थतेस ये गंगोत्रीवर
तेवी हरिविषयींची प्रीती
भक्तीची घे पावनता ती ॥१०६॥
गोपांच्या संसार वासना
उदात्त वा परमार्थ भावना
एकरूप जाहल्या हरीसी
रजनीदिन ते जसे उषेसी ॥१०७॥
सागरसीमा अंबररेषा
एकरूप वा क्षितिजीं जैशा
हरीस अर्पुन हृदय आपुलें
व्रज हरि - भजनीं वेडे झाले ॥१०८॥
कृष्णाच्या ईशत्वाविषयीं ब्रह्मदेव परि हृदयीं
शंकित झाली ज्ञात्यालाही मोह पडावा कायी ? ॥१०९॥
ग्रहण लागतें श्रीसूर्यातें
गदुळ गौतमीजलही होतें
रत्नाकर हें नाम साजलें
आंत तरीही शंख - शिंपलें ॥११०॥
तुरटपणा लव वसे मधूसी
मुखीं न वंदावे गाईसी
काय नवल मग तरी जाहलें
ज्ञानीं जर अज्ञान राहिले ॥१११॥
एके दिवशी यमुनातीरीं
गोपांनीं सोडिली शिदोरी
परी वांसरें वनीं रिघाली
मुलें त्यामुळें अधीर झालीं ॥११२॥
वदत हरी चालुं द्या तुम्ही रे
आणिन मी वळवून वांसरें
तशीच हातीं भाकरलोणी
श्याम जात वांसरांमागुनी ॥११३॥
कृष्ण लोपतां वनांत इकडे मायामुग्ध विधाता
गुप्त करी झणि गाई गोपां म्हणे पाहुं या आतां ॥११४॥
वाजवीत निज वेणू मंगल
वत्सासह परते घननीळ
ठाव नसे गाई गोपांचा
हांसत गालीं धनी जगाचा ॥११५॥
करुन आपुल्यापरी चातुरी
बाळ जसा भाबड्या विचारीं
चिंचोके लपवीत मुठीसी
ते न कळे कां परी पित्यासी ॥११६॥
श्रीकृष्णानें असें जाणिलें
धात्याचें तें लाघव सगळें
स्वतःच नटला अनंतरूपें
परमात्म्यासी काय न सोपें ॥११७॥
प्रकाश एकच जसा रवीचा
वर्ण रंगवी इंद्रधनूचा
अथवा प्रतिभा सत्काव्यासी
विविध रसानें नटते जैसी ॥११८॥
तसेंच झाला हरी सर्वही गोप आणखी गाई
कंबल, पावा, काठी, शिंगें, उणें न उरलें कांहीं ॥११९॥
एक वर्ष हें असें चाललें
कुणास ना कांहींहि उमगलें
गोप - बाळ परि निज जननींतें
पूर्वींहुन झाले आवडते ॥१२०॥
सुरधेनू जणुं झाल्या गाई
कधींच दुग्धा उणीव नाहीं
स्रवती ओट्या पिउन वांसरें
नवल करी गोकूळ विचारें ॥१२१॥
पाहुन असली अगाध सत्ता
लज्जित झाला मनीं विधाता
अहंकार हृदयींचा टाकुन
श्रीचरणावर घेई लोळण ॥१२२॥
चार शिरें जणुं चारहि मुक्ती
भक्तीपुढतीं विनम्र होती
हात जोडुनी विनवी देवा
“ प्रमाद माझा क्षमा करावा ॥१२३॥
अंकावर घेतल्या शिशूचा पाय लागला म्हणुनी
काय होतसे रुष्ट कधीं तरि वत्सल - हृदयी जननी ॥१२४॥
“ ब्रह्माण्डाचा तूं उत्पादक
आम्ही सारे अजाण बालक
गोविंदा, माधवा, उदारा
क्षणोक्षणीं आम्हास सांवरा ॥१२५॥
ज्ञेय म्हणोनी जे जे कांहीं
तूच एक त्या सर्वाठायीं
ज्ञाता ही उरतो न निराळा
ज्ञान तेंहि तव रूप दयाळा ॥१२६॥
असे असुनही जनहित - तत्पर
संत लुब्ध तव सगुणतनूवर
स्वेच्छामय ही मूर्ति मनोहर
असे खरोखर पराहुनी पर ॥१२७॥
नोळखितां तव श्यामल रूप
ज्ञानमत्त जे करिती जप तप
जवळ तयानें खचितचि केली
कल्पतरू सोडून बाभळी ॥१२८॥
गळ्यांत सुम - मालिका कटितटीस पीतांबर
घुमे मधुर बासरी मयुरपिच्छ डोईवर
पदा मृदुल चाटती अशन सोडुनी वांसरें
मदीय हृदयीं वसो सतत रूप हें गोजिरें ” ॥१२९॥
गमन करीत विधाता स्तवुन असा गोपकाय मायावी
श्रवतां सादर चरिता या त्यासी गोप काय माया वी ॥१३०॥
वि्धिमोहनाश नांवाचा पाचवा सर्ग समाप्त
श्रीकृष्ण कथामृत - सहावा सर्ग
( इंद्रगर्व परिहार )
वेदैश्च सर्वैः स्मृतिभिः पुराणैः
शास्त्रैश्च तैस्तैर्मुनिभिः प्रणीतैः
ज्ञातं न सम्यक् खलु यस्य रूपं
भक्तप्रियं तं गिरिशं नमामि ॥१॥
ज्यांची रामकथा उदारचरिता वर्षे सहस्रावधि
अश्रूंचा करुणाभिषेक करिते या हिन्दुभूच्या हृदीं
पुण्या भारतसंस्कृतीवर जिची कोरीयलीम अक्षरें
ते वाल्मीकिमुनी कवींत पहिले मी वंदितों आदरें ॥२॥
मोह विधीचा ऐसा निरसुन
गोपगणीं परते मनमोहन
मुलें पुढें घेऊन शिदोरी
तशींच होतीं यमुनातीरीं ॥३॥
श्रीकृष्णाची विचित्र माव
कुणा न कांहीं कळला ठाव
विशंक म्हणती गोपकुमा
“ कृष्णा, चल ना किती उशीर ” ॥४॥
हरी समोरी अर्ध वर्तुलें
गोपबाळ ते वसले सगळे
करीं घेउनी भाकरकांदा
प्रेमें म्हणती, “ घे, गोविंदा ” ॥५॥
एक उसळ दे दुसरा भाजी
कुणी म्हणत, घे चटणी माझी
पेंद्यांचें तें ताक शिळें कीं
श्रीहरि मिटक्या मारित भुरकी ॥६॥
घांस कुणाच्या मुखांत, ओढी
आणि म्हणे, यामधिं बहु गोडी
कुणी स्वतास्तव कांहीं लपवी
श्याम तयाचें सर्वच पळवी ॥७॥
भात, भाकरी, ताक, दही तें असुनी साधी भाजी
अमृत सांडुनी सेवण्यास हें, देवहि होती राजी ॥८॥
गोड आजचा फारच काला
असे लागला गोप - जनाला
हृदयीं भरलें प्रेम हरीचें
गोडीसी मग उणें कशाचें ॥९॥
गोविंदावर भाविक गीतें
गात आदरें गोप - बाल ते
परत निघाले निजा घराला
वेश जयांचा साधा भोळा ॥१०॥
खांद्यावर घोंगडी, शिरावर
गोंड्याची ती टोपी सुंदर
गोपीचंदन टिळा ललाटीं
पदीं वाहणा करांत काठी ॥११॥
फिरवी कर निज गाईपाठीं
एक वाजवी पावा ओठिं
गमती कोणी वदती हांसुन
हात हरीच्या गळ्यांत घालुन ॥१२॥
यतीं - मुनींना स्वप्नांतहि जें भाग्य कधीं गवसेना
तेंच करितसे खेळींमेळीं गोपाळांच्या सदना ॥१३॥
नंद - गृहासी एके दिवशीं
जमले कांहीं गोकुलवासी
विचारविनिमय कीं करण्यास्तव
कारण जवळीं आला उत्सव ॥१४॥
गोकुळांत होती परिपाटी
याग करावा इंद्रासाठीं
श्रावण मासीं प्रतिवर्षाला
आलीसे ती समीप वेळां ॥१५॥
चर्चा करिती सर्व गोपजन
मधें नंद लोडासी टेकुन
सिद्ध पुढें साहित्य विड्याचें
वृद्धास्तव खल तसे रूप्याचे ॥१६॥
यज्ञासाठीं विप्र कोणते
बोलविणें विद्वान जाणते
मंडप भव्य कुठें उभवावे
कार्य कोणतें कुणीं करावें ॥१७॥
प्रयोजनाची वा यज्ञाची सामग्री अन्नादि
वदती सारे, मी करितों, मी प्रथम मला द्या संधी ॥१८॥
“ सर्वच कामें करीन मी मी
हें केवीं हो येइल कामीं ”
नंद वदे हांसुनी तयांना
“ श्रम विभाग कार्यांत हवा ना ॥१९॥
मोठ्या कार्यीं लहान मोठें
कृत्य न माना कधींहि कोठें
जें जें भागा येइल वांटुन
तेंच करावें अंगा झाडुन ॥२०॥
एक कुणाचें कार्य नसें हें
स्थान येथ सर्वांना आहे
काम करावें प्रेमें सादर
सुख देइल सर्वदा पुरंदर ॥२१॥
तोंच तेथ ये कृष्ण मुरारी
गळा पडुन नंदास विचारी,
“ जमला कां हा येथें मेळा
बाबा कसला विचार केला ॥२२॥
सांगाना मज, तात, ठरविलें काय तुम्हीं सर्वांनीं
हर्ष कशाचा सांगा सारे दिसती प्रसन्न वदनीं ” ॥२३॥
“ लग्न तुझं ठरविलें असें रे, ”
विडा कुटित कुणि वृद्ध उत्तरे
एकच पिकलें हसूं यामुळें
रुसली हरिची कपोलकमळें ॥२४॥
हिंदळीत नंदाच्या अंगा
“ असे काय हो, बाबा, सांगा, ”
वदे हरी दे नंद उत्तरा
“ इंद्रयाग ठरविला, सुंदरा ” ॥२५॥
“ कवण निमित्तें असतीं याची ”
बाळ ! रीत ही प्रतिवर्षांची
इंद्र असे पर्जन्यदेवता
सौख्य आपुलें त्याचे हातां ॥२६॥
पिकते शेती, गवत उगवतें,
फळांफुलांनीं तरुवन डुलतें
सहजच त्यानें गोधनवृद्धि
धनधान्याची होत समृद्धि ॥२७॥
जलास यास्तव जीवन्म्हणती इंद्र - कृपें लाभे तें
यज्ञ होत पर्जन्या कारण, ऐसें शास्त्रहि म्हणतें ॥२८॥
प्रसन्न नसता पती सुरांचा
सर्व नाश होईल आमुचा
तोषविण्या म्हणुनी पुरहूता
याग अम्ही हा करितों आतां ” ॥२९॥
चिंती हरि, “ हा याक कामनिक
भक्तिसुखासी असे विघातक
वाढवील हा चित्तमलातें
खंडिलेंच पाहिजे मला तें ” ॥३०॥
वदे प्रगट सर्वांस सांवळा
“ याग उचित ना वाटत मजला
सर्व जगाचा प्रभू तरात्पर
रागावेल तयें अपणांवर ॥३१॥
ईशें हें जग रक्षायासी
लोकपाल नेमिलें दिशांसीं
इंद्र, वरुण, मारुत, वैश्वानर
तद्भीतीनें कार्या तत्पर ॥३२॥
जगत् लेंकरूं परमेशाचें हे ते सेवक त्याचे
कृपा कोठली या इंद्राची देणें जगदीशाचें ॥३३॥
इंद्रयाग जरि केला येथें
लांच दिलेसें होइल कीं तें
रुचेल कैसें तें देवाला
तन्नियमाचा विघात झाला ॥३४॥
त्यापेक्षा हा गिरि गोवर्धन
नामा ऐसें ज्याचें वर्तन
उत्तम करणें उत्सव याचा
हा सुखदाता असे ब्रजाचा ॥३५॥
स्वतः झिजुन करि सुपीक भूमी
रोधित मेघा वर्षाकामीं
दिव्य औषधी देई वत्सल
भजतां यातें यथार्थ होईल ॥३६॥
चारा पुरवी हा गाईंसी
हाच रक्षितां असे व्रजासी
खेळगडी हा गोपाळांचा
चला करूं या उत्सव त्याचा ॥३७॥
भजन, समर्चन, यजन असावें प्रेमपूर्ण हृदयाचें
बाळगुनी भय करितां तेची होत विडंबन साचें ॥३८॥
पटलेसें तें बहुतेकांना
कांहीं थोडे वदले ना, ना,
नंदासी कृष्णप्रेमानें
ना म्हणवेना ठामपणानें ॥३९॥
खटपट नीरस यज्ञांतिल ती
स्त्रियांस कधिंही रूचली नव्हती
हर्ष जाहला फार तयांना
प्रिय असतो उत्सव सर्वांना ॥४०॥
श्रीकृष्णाची जशी सूचना
तशी जाहली सिद्ध साधना
कामा झटती व्रज - नारीनर
प्रिय व्यक्तीचा न हो अनादर ॥४१॥
पाक - कुशल त्या स्त्रीवर्गानें कृष्णाज्ञा मानियली
नानापरिची रुचकर हितकर पक्वान्नें निर्मियली ॥४२॥
दुध गहूं साखर यांपासुन
मिष्टान्नें निर्मीत वधूजन
विविध पसारा विश्वाचा या
त्रिगुणांतुन जणुं निर्मी माया ॥४३॥
फेण्या, मांडे, बेसन, बुंदी
पुरी, चिरोटे, नी बासुंदी
चिवडा, चकली, शेव, डाळही
पात्रें सजलीं विविध वड्यांही ॥४४॥
कुर्ड्या, पापड, रुचिर, मुरंबे,
कैरी, भोकर, भरलीं लिंबें,
परोपरीचीं फळें तशीं तीं
थाटा कांहीं सीमा नव्हती ॥४५॥
गोपाळांनीं फुलें आणिलीं
निळीं, ला, सित, हिरवीं पिवळीं
कुणी गुंफिल्या माळा सुंदर
गजरे, जाळ्या, गुच्छ मनोहर ॥४६॥
अष्टगंध, अर्गजाहि, अनुपम
गुलाल, बुक्का, चंदन कुंकुम
धूपदीप, कापूर, सर्वही
न्यून कशाचें उरलें नाहीं ॥४७॥
मंगल दिवशीं प्रातःकाळीं गोवर्धन शैलासी
गाई गोपीं गोपाळांसह येत सखा हृषिकेशी ॥४८॥
वाजुं लागलीं मंगल वाद्यें
गोपी गाती सुस्वर पद्यें
झुली मनोहर गाई - पाठीं
घागरमाळा नदती कंठीं ॥४९॥
फेर कुणी धरिले टिपर्यांचे
गोपाळांची लेजिम वाजे
जयजय घोषें भरलें अंबर
असा वृंद तो ये शैलावर ॥५०॥
श्याम सखा जो भक्तजनांसी
ये पूजाया शैलवरासी
स्वयें भव्य तनु केली धारण
घेत आपुली पूजा आपण ॥५१॥
नंद यशोदादि व्रजवासी
धाले पाहुन त्या रूपासी
पूजियलें प्रेमें सर्वांनीं
आनंदाश्रु आले नयनी ॥५२॥
गुलाल बुक्का फुलें उधळुनी षोडशोपचारानें
पूजन केलें गोप - जनांनीं हृदय भरे हर्षानें ॥५३॥
ईशार्पित - सत्पुष्प - मालिका
धारण करिती गोप - गोपिका
सुम - मंडित ते दिसती अभिनव
लतावृक्षसे झाले मानव ॥५४॥
भोजनास मग बसल्या पंक्ती
सर्वां वाढी करुणामूर्ती
उच्चनीच हा प्रपंच कांहीं
सर्वात्म्यानें केला नाहीं ॥५५॥
ज्याचें दुर्लभ दर्शन नुसतें
ब्रह्म सगुण तें इथें वाढतें
आग्रह करिती परस्परांना
घास बळेंची भरवी कान्हा ॥५६॥
उत्सव तो जाहला समाप्त
भव्यरूप तें झालें गुप्त
दिधला सर्वा मंगल आशी
“ रक्षिन मी संकटीं तुम्हांसी ” ॥५७॥
शिगोशीग भरलीं आनंदें मनें तदा सर्वांचीं
विशेष गोडी मानवहृदया असते नाविन्याची ॥५८॥
इंद्र परी संतप्त जाहला
ओळखिलें नाहीं कृष्णाला
प्रलय - घनांतें आज्ञा केली
तयें वर्षण्याप्रती गोकुळीं ॥५९॥
सुटे प्रभंजन घोर तांतडी
गमे महीची होत वावडी
मेघखंड कीं प्रचंड पर्वत
अंधेरासह आले धांवत ॥६०॥
गडगडाट कांपवी अजस्रें
जशीं गर्जतीं सिंहसहस्रें
मध्येंच चमके भीषण चपला
पिशाच्च जणुं विचकी दंताला ॥६१॥
मुसळधार वर्षे जलधारा
तशांत मारा करिती गारा
शिलाही फुटती त्या घातानें
शूर - हृदय जणुं पराभवानें ॥६२॥
कोसळताती घरें धडाडा वृक्ष टाकिती अंगा
दुर्बल हृदयीं सर्व मनोरथ जसे पावती भंगा ॥६३॥
कूप नदी, ओढा, सर, सागर,
हा न भेद राहिला महीवर
पाणी पसरे प्रलयघडीसम
पंच महापातक्या न तर - तम ॥६४॥
जीव बापुडे सैरावैरा
पळती शोधायास निवारा
सूर काढिती केविलवाणे
धांव धांव हे रथांगपाणें ॥६५॥
वृद्ध बोलती “ हरिचें ऐकुन
घेतियलें हे संकट ओढुन
बालिशता कारण नाशासी
त्राता आता कोण अम्हांसी ” ॥६६॥
भक्तवत्सले तों गोवर्धन
करांगुलीवर धरिला उचलून
“ यारे यारे येथें सगळे
छत्र पहा हें गिरिनें धरिलें ” ॥६७॥
भयविव्हल, असहाय जीव ते गोप गोपिका गाई
येती तेथें मनुनौकेसी जेवीं ऋषिगण जाई ॥६८॥
मीनशृंगसी संरक्षक ती
करांगुली कृष्णाची होती
अपूर्व विक्रम ऐसा बघतां
सर्व नमविती चरणीं माथा ॥६९॥
“ अवघडेल ना हात हरी तव
टेका देतों काठ्यांनीं लव ”
वदुनी बल्लव करितां तेवीं
हळुंच हासे गालांत लाघवी ॥७०॥
सात दिवस नभ जरी कोसळे
गोकुळचें कांहीं न बिघडलें
निज जननीच्या पंखाखाले
पिलें तसे जन निर्भय झाले ॥७१॥
दुर्दिन सरले जल ओसरलें
अंधाराचें ठाणें उठलें
रवि उघडी जेवीं नारायण
योग शयन सरतां निज लोचन ॥७२॥
चकितलोचनें बघती व्रजजन तशींच होतीं सदनें
वनराजी ही प्रसन्न बघतां कृष्णा करिती नमनें ॥७३॥
वदती देवा सद्गदवाचें
“ तूंच सर्व राखिले व्रजाचें
संशयबाधा अतां न होवो
हेत तुझ्या चरणावर राहो ” ॥७४॥
नंदयशोदां हृदयीं धरिलीं
मधुर हांसरी मूर्त सांवळी
गोपवधू कुरवाळुन त्यातें
म्हणती ओवाळूं प्राणांतें ॥७५॥
जयजयकारें गोप गर्जती
घेउन कृष्णा खांद्यावरती
नाचतात कीं प्रेमभरानीं
फुलें उधळिलीं दिवौकसांनीं ॥७६॥
कशी मोडली खोड म्हणोनी
इंद्र बघे गोकुळा वरोनी
व्रज पूर्वींपरि सुखांत लोळे
उघडी झांकी सहस्र डोळे ॥७७॥
येत कळोनी श्रीकृष्णाची महती देवेंद्राला
“ हा न मनुज परमेश परात्पर भक्तांस्तव अवतरला ॥७८॥
मी सेवक हा अमुचा स्वामी
शिरीं धरावें पदरज आम्हीं
क्षुद्र गणोनी छळिलें त्याला
किती घोर हा प्रमाद केला ॥७९॥
कोण आज मज दुसरा वाली
दार्द्र आहे हा वनमाळी
विनम्र होतां चरणावरतीं
क्षमा करिल हा करुणामूर्ति ” ॥८०॥
पुरंदरानें देह आपुला
श्रीकृष्णाच्या पदीं घातिला
दिसूं लागले सहस्र डोळे
वाहियलीं श्रीचरणीं कमळें ॥८१॥
“ नमो महात्मन् नमो नमस्ते
विशुद्धसत्वा नमो नमस्ते
शांत तपस्वी स्वयंप्रकाशी
क्षमा करी भो या दासासी ॥८२॥
राग लोभ मत्सरादि तुजसी स्पर्शती न हृषिकेशी
दंड परी धरिसी खलदमना रक्षण्यास धर्मासी ॥८३॥
दुर्धर माया त्रिगुणात्मकही
स्पर्श तियेचा तुजसी नाहीं
परी नाचवी ती आम्हांसी
वश होतो या मदमोहासी ॥८४॥
तूंच दिलेल्या ऐश्वर्यानें
मत्त जाहलों मी अज्ञानें
मूर्खपणें उलटलों धन्यावर
क्षमा करावी मज करुणाकर ॥८५॥
मिठी मारूनी श्रीचरणासी
लोटांगण घेई भूमीसी
स्पर्शुन हांसत वदे दयामय
“ ऊठ, ऊठ हो इंद्रा, निर्भय ” ॥८६॥
इंद्रादेशें सुरधेनूनें
न्हाणियला गोवळा दुधानें
दिसे तदा तो श्याम लाघवी
नीलमणी चांदण्यांत जेवीं ॥८७॥
अखंड धारा स्रवति पयाच्या चार हरीच्या वरती
चहुवाणींतुन भक्तिरसाचे जणुं कां पाझर फुटती ॥८८॥
दिव्य अर्पिंलीं वस्त्राभरणें
सम्राटासी मांडलिकानें
कल्पवृक्ष - सुमनांची माळा
समर्पिली प्रेमें घननीळा ॥८९॥
पुनः पुनः वंदुन ईशासी
परते वासव निजस्थलासी
गोपबाळ पुसतात हरीला
“ कोण बुवा हा होता आला ॥९०॥
सर्वांगावर त्याच्या कसले
माशासम रे होते खवले ”
“ वेड्यांनों, ते डोळे त्याचे
राज्य करी हा स्वर्लोकाचें ॥९१॥
“ चल पाहू या गांव तयांचें ”
“ मेल्याविण तें दिसत न साचें ”
“ जिवंत तो जर तेथें आला
अडचण मग कोणती अम्हांला ” ॥९२॥
आग्रह पाहुन गोपाळांचा स्वर्ग तया दाखविला
भक्ताला कां अशक्य कांहीं मोक्षहि सुलभ जयाला ॥९३॥
सुखभोगांचें जें कां आगर
जेथ सुधेचे भरले सागर
सुरांगनांचा होत तनाना
रुचले नच तें स्थल गोपांना ॥९४॥
क्षुधा न म्हणुनी गोड सुधा ना
डोळ्याची पापणी लवेना
देवाचे अप्सरा - विलास
ग्राम्य वाटले गोप गणांस ॥९५॥
प्रथम वासना निज वाढविणें
तृप्तिस्तव मग नित धडपडणें
बहु जेवाया विजया खावी
तेवी कृति ती निंद्य दिसावी ॥९६॥
प्रेमादर या चुकला वाटे
समाधान सात्त्विक नच कोठें
घेइल कोणी सुख हरुनी मम
या भीतीनें सकलांसी श्रम ॥९७॥
“ चल, खालीं हें पुरें, श्रीपती
श्रेष्ठ आपुलें व्रज यावरती
स्वर, सुख, एकच एकच चवही
तव काल्याची सर या नाहीं ” ॥९८॥
एके दिवशीं हरी वनाला
गोपाळांसह लवकर आला
नसे पुरेशी जवळ शिदोरी
भूक फार लागली दुपारीं ॥९९॥
वदे श्याम, “ जा जवळ चालला यज्ञ असे कीं मोठा
मागुन आणा अन्न हवें तें तिथें न कांहीं तोटा ” ॥१००॥
त्यापरि पेंद्या कांहीं गोपां
घेउन आला यज्ञमंडपा
नम्रपणें विनवी विप्रांना
“ असे भुकेला अमुचा कान्हा ॥१०१॥
वेदशास्त्र, इतिहास, पुराणें
अवगत सारीं शब्दार्थानें
उदार आपण सर्वहि धार्मिक
याचकांस ना लावा विन्मुख ॥१०२॥
तपोधना ज्या यज्ञा आपण
उद्यत करण्या जनकल्याण
त्या यज्ञाचा प्रसाद द्यावा
आम्हांसीही. हे भूदेवा ” ॥१०३॥
तें न मानिलें विप्रगणानें
दृष्टी ज्यांची मंद धुरानें
इंद्र - याग ज्यानें बुडवियलें
काय तयाचें अम्ही बांधिलें ॥१०४॥
यजन करावे ज्यास्तव तो हा हविर्हरी गोविंद
प्रसन्न होतां स्वयें, तयासी अवगणिती हे अंध ॥१०५॥
निघतां तेथुन वदे सिदामा
“ जाऊं आतां अंतर्धामा
स्त्रीहृदयीं हो दया नि भक्ति
पुरुषांपेक्षां उत्कट असती ” ॥१०६॥
पाक - गृहासी येउन विनवी
“ आई अमुची दया करावी
श्याम उपाशी आहे रानीं
कळवळलों आम्हीहि भुकेनी ॥१०७॥
धकी आम्हां दिले द्विजांनीं
तुम्ही तरी द्या अन्न निदानीं ”
हरीस भोजन हवें, ऐकतां
सती बोलल्या हर्षुन चित्ता ॥१०८॥
“ भाग्य केवढें आज उदेलें
पुण्य आमुचें शिगास गेलें
दुर्लभ जो कीं व्रतनियमांसी
प्रसन्न तो झाला आम्हांसी ॥१०९॥
सेवा ज्याची घडो म्हणोनी झुरते सुरधेनूही
तो परमात्मा आज चाकरी अमुची स्वेच्छे घेई ॥११०॥
गोप गणांनों, तुम्ही खरोखर
कृपा किती केलीत अम्हांवर
हरिसखयांनों पुढती व्हा रे
आणूं आम्ही पदार्थ सारे ” ॥१११॥
एक वदे हळुं, “ अजुनी कांहीं
नैवेद्यासी ठिकाण नाहीं, ”
वदे दुजी, “ गे, नसो, नसे तर
स्वयें आज वोळगे परात्पर ” ॥११२॥
विविधान्नाचीं पात्रें सुंदर
यज्ञवधू घेऊन शिरावर
हरिगुण गातां पथें शोभती
जणुं अवलंबुन नवरस भक्ती ॥११३॥
सर्व निघाल्या एक राहिली
तों तत्पतिनें तिला पाहिली
हात ओढिला हिसडुन नष्टें
“ सांग, कुठें चाललीस दुष्टें ॥११४॥
तो गवळ्याचा पोर चोरटा कुलटे, तूं त्यासाठीं
नेशी जेवण आज्ञाविरहित लाज नसे कां पोटीं ” ॥११५॥
“ नाथ, वदा ना भलतें कांहीं, ”
वदत सती काकुळती येई
“ गवळी ना, तें ब्रह्म गोजिरें
तेथ मला जाउं द्या आदरें ॥११६॥
आडविण्याचे घेतां कां श्रम
मन नुरलें स्वाधीन अतां मम ”
“ बघतों हो जातीस कसें तें ”
खांबासी बांधिलें तियेतें ॥११७॥
“ हे गोविंदा, सख्या कन्हय्या
मोकलिसी कां दासीला या
देह जयाचा तयें रोधिला
प्राण परी कां तुजसी मुकला ॥११८॥
भगिनी माझ्या तुज गोपाळा
कवळ देत असतिल यावेळां
अन्न वाढितां गोपालागीं
उरलें मागें मीच अभागी ॥११९॥
दूर ठेवितो तुजपुन ऐसा देह नको हा मजला
नंदनंदना, सख्या, ” वदोनी प्राण तिनें सोडियला ॥१२०॥
यज्ञसती जों घेउन अन्ना
हरिसंनिध येतात कानना
तो तेथें ही सहर्ष नाचे
गात कृष्ण हरि, मुकुंद वाचे ॥१२१॥
भरवी कृष्णा दे आलिंगन
प्रेमें घेई चरणीं लोळण
इतक्या लवकर येथ कशी ही
नवल कुणा उलगडलें नाहीं ॥१२२॥
नंदसुतांचें मग सर्वांनीं
पूजन केलें प्रेमभरानीं
गोपाळांसह गोविंदाचें
भोजन झालें आनंदाचें ॥१२३॥
देत हरी तृप्तीची ढेकर
वदे, “ यज्ञफल तुम्हां पुरेपुर
अतां सुखानें ज सदनांप्रत
होतील सारे सफल मनोरथ ॥१२४॥
तुमची आतां मात्र सखी ही
भिन्न मजहुनी होणें नाहीं
नाश वृत्तिचा होतां जेवीं
ज्ञान भक्ति भिन्नता नुरावी ” ॥१२५॥
येतां सती परतुनी कळलें तयांसी
टाकून देह मिळली जगदीश्वरासी
हा धन्य धन्यपद मेळविलें सखीनें
आम्हांस कां न तरि बांधियलें पतीनें ॥१२६॥
इंद्रगर्व परिहार नांवाचा चवथा सर्ग समाप्त
श्रीकृष्ण कथामृत - सातवा सर्ग
( भक्तिविलास )
यद्विद्यते क्षितितलेऽस्तु शुभाशुभं तत्
विद्युत्कणेन घटितं त्विति दृश्यतेऽन्ते
एव वरावरमतानि लसन्तु कामं
ध्येयं त्वमेव शशिशेखर मानवानाम् ॥१॥
आज्ञा गुरो जाहलि आपुली मला
म्हणोनि हा भार सहर्ष घेतला
आतां जरी द्याल न सत्कृपाबल
तरी न मातें उचलेन पाउल ॥२॥
भगवंतानें एक्या रातीं
श्रीयमुनेच्या तीरावरतीं
येतां मंजुल वेणू अपुली
अमृतयुक्तशा अधरीं धरिली ॥३॥
मुळींच होती रम्य वेळ ती
चंद्रवैभवा आली भरती
निर्मल होती सरिता - गगनें
बुद्धि - हृदय जणुं गुरुबोधानें ॥४॥
कुमुदें भरलीं पूर्ण मरंदें
वायु सुमांच्या मंद सुगंधें
सुधाधवल वरसते चंद्रिका
पाखडला कापूर जसा कां ॥५॥
रातराणिचा सुगंध मादक
दरवळुनी करि मन पर्युत्सुक
मालकंस रागीं स्वर वीची
किरणें जणुं निर्मिती शशीचीं ॥६॥
सदनें कीं बनलीं स्फटिकाचीं
पानीं झाली जडण हिर्यांची
भुवन सर्वही त्या शुभ वेळें
प्रशांत मंगल उज्ज्वल झालें ॥७॥
मनमोहन तो तशांत मुरली मंजुल नादें भरवी
अपूर्व कांहीं असे मधुरता शब्दां अवसर नुरवी ॥८॥
योगामाजीं सकलहि सिद्धी
घरीं उषेच्या वर्ण - समृद्धी
हिमालयीं सौंदर्य महीचें
मिळे तसें वेणूंत ध्वनीचें ॥९॥
विसें सखीसह खातां अभिनव
राजहंस जो करिती कलरव
आम्र मोहरें येतां डवरुन
कोमलसें जें कोकिल - कूजन ॥१०॥
अरुण जईं विंझणा पालवी
मर्मरता जी तईं मोहवी
कर जेव्हां ओढिती शशीचे
भणित रम्य जें जललहरींचें ॥११॥
मेघनिनादीं गभीरता जी
वर्षे कूजत जे वनराजी
प्रभातसंध्याराग - मोहिता
भ्रमरांची जी गोड आर्तता ॥१२॥
या सर्वहि मधुशब्दगणांची एकवटे मृदु गोडी
परी हरीच्या वेणुरवासी तुलना करितां थोडी ॥१३॥
जरी महोत्सव संगीताचा
रत्नभूवरी होइल साचा
जेथ कुशलते सुधाचंदनीं
सडा शिंपिला सुरांगनांनीं ॥१४॥
चंद्रकराच्या तारा केल्या
कमलाच्या कोषास जोडिल्या
कल्पतरूंच्या सुम - नालाचे
वीणेला या पडदे साचे ॥१५॥
इंद्रधनूचा दंड मनोहर
वाद्य असे हें मदन रची जर
वाजवील हें शारदा जरी
लक्ष्मी गातां पद्य सुस्वरीं ॥१६॥
पारिजात - सुमनीं पडलेलें
दंव ते घेउन नूपूर घडले
रती नाचतां झुमकाविल ते
ताल धरिल जर साम - ऋचाते ॥१७॥
अशा दिव्य संगीत - भोजनें श्रवण तृप्त जर असला
भाग्यें कोणी तरी कल्पना लव येईल तयाला ॥१८॥
मुरलीच्या मधुमधुर निनादें
कुंजकुंज डुलती आनंदें
कालिंदीचें उचंबळे जल
तटास येतां प्रभुपद कोमल ॥१९॥
कुंजवनांतिल फुलें विकसलीं
श्रवणोत्सुक जणुं झाल्या वेली
शांततेंत संगीत मिळालें
जडही तेणें चेतन झालें ॥२०॥
निज - सदनीं गोपीं त्या समयीं
निमग्न होत्या अपुल्या कार्यीं
वाढित कोणी, निजवी बाळा
एक सारवी पाकगृहाला ॥२१॥
दुजी शांतवी मन सासूचें
कुणी पाय चेपीत पतीचे
अन्य गुरांची सोय लाविती
कुणी सखीसह खेळत होती ॥२२॥
वनमालीची मुरली मोहक तोंच येतसे कानीं
काम करांतुन अपाप सुटलें तटस्थ झाल्या रमणी ॥२३॥
सकल इंद्रियांची जी शक्ती
कानांमाजीं एकवटे ती
देहावरती रोम ठाकले
भान कशाचें चित्ता नुरलें ॥२४॥
चंद्रकरानें सागर - लहरी
कमलाच्या मृदुगंधें भ्रमरी
कुंजवना त्यापरी गोपिका
कर्षित झाल्या मृगी जशा कां ॥२५॥
आप्तांनीं बहु विरोध केला
कोण परी मोजील तयाला
चित एकदां जडल्यावरते
त्यास रोधणें अशक्य असतें ॥२६॥
भानरहित धांवती कामिनी
केश लोळती स्वैर सुटोनी
विसर जया पडला देहाचा
बघे कोण मग पदर नि ओचा ॥२७॥
चित्त जयाचें संसारांतुन ईश्वर - चरणीं जडलें
नित्य शुद्ध तो, भल्याबुर्याचें काम तयासी सरलें ॥२८॥
विषयाचें सुख नित भोगावें
लोकांनीं मज भले म्हणावें
अशी असतसे ज्या आसक्ती
तेच चालरीती बघताती ॥२९॥
उत्कट होतां परी भावना
बंध तया एकही उरेना
तुडुंबलें जल जरी तळ्यातें
ढासळुनी तट मुक्त पळे तें ॥३०॥
पृथ्वीचें भडकतांच अंतर
सहज बापुडे होती भूधर
प्रबल भावना असल्यावांचुन
उत्कट सुख भोगतांच येत न ॥३१॥
निज हृदयाचें निधान शोधित
गोपी आल्या कुंजवनाप्रत
भिरभिर बघती चहूं दिशांसी
चित्तचोर सांवळ्या हरिसी ॥३२॥
कदंब वृक्षातळीं शेवटीं आढळला वनमाळी
मुरलीच्या वादनीं जयाची मूर्ती तन्मय झाली ॥३३॥
वेड मनाला लावी साची
अशी मनोहर मूर्त हरीची
चरण - कमल शोभती देहुडे
प्रभा नखांची पडे चहुंकडे ॥३४॥
सोन्याचे पदिं घुंगुरवाळे
वर पीताम्बर जरी झळाळे
रत्नखचित माजेस मेखळा
मेघावर जणुं चमके चपला ॥३५॥
खूण उरावर वत्सपदाची
गळ्यांत माळा रानफुलांची
प्राजक्तीच्या मृदुलफुलांचे
देठ तसे ते ओठ हरीचे ॥३६॥
कर्णीं मकराकार कुंडलें
किरण तयांचे गालीं खुलले
कुटिल केस भालीं भुरभुरती
मोरपिसें वर सुरेख डुलतीं ॥३७॥
सुंदरपण ये सौंदर्यासी मधुर होत लावण्य
मोहकताची मोहित झाली उपमा नुरली अन्य ॥३८॥
मुकुंद देहासवें तुला जी
असें न कांहीं विश्वामाजीं
उपमानें जीं होतीं कांहीं
दूषविली तीं स्मर - कवितांही ॥३९॥
कुरूप ठरुं कीं या भीतीनें
देह आपुला त्यजिला मदनें
सौंदर्याची जी अधिदेवी
लाजुन तीही पदीं वसावी ॥४०॥
चिन्ह कस्तुरी असे कपाळीं
कमलनयन तो हांसत गालीं
लबाडनेत्रीं पाही तिकडे
सौंदर्याची खाणी उघडे ॥४१॥
फिरती वेणूवरी अंगुली
नादांचीं मधु वलयें रवलीं
कमल - पाकळ्या होतां चंचल
जललहरी जणुं उठती कोमल ॥४२॥
दृष्टी पडतां श्याम रूप तें गोकुलवासी रमणी
मेघ - दर्शनें नीपलतासम फुलल्या आनंदानी ॥४३॥
सुखें रंगले कान नि डोळे
इतर परी कां विषण्ण झाले
गोपवधूंना सुचे न कांहीं
निश्चल झाल्या भानच नाहीं ॥४४॥
अशी विवशता पाहुन त्यांची
हंसे मधुर ती मूर्त हरीची
वदे बांसरी कटीस खोंचित
“ स्वस्ति असो गे तुमचें स्वागत ॥४५॥
प्रिय तुमचें मी काय करावें
गुज हृदयींचें सकल कथावें
गोपींनों, या अपरात्रीला
कांगे सगळ्या येथें आलां ॥४६॥
कथा कशानें तुमची वृत्ती
भांबावुन गेली या रीतीं
असे कुशल ना सर्व व्रजाचें ”
वदे लाघवी मंजुल वाचें ॥४७॥
“ कां त्यजिली गे पतिची सेवा घरचीं कामें तेवीं
निशेस फिरणें स्त्रियांस अनुचित रीत नसे कां ठावी ॥४८॥
निबिड घोर हें येथिल कानन
वेळ कधीं कां येते सांगुन
फार न झाली रात्र जोंवरी
तोंच परत जा निजा - मंदिरीं ॥४९॥
पुत्र, पती, बंधूम मातादिक
असतिल कीं सदनीं विरहोत्सुक
चिंता पडली असेल त्यांसी
साध्वींनों, जा निज सदनासी ” ॥५०॥
असें ऐकतां वचन वाकडें
दुःखित झालें चित्त बापुडें
रुसल्या कांहीं रडूं लागती
रागानें कोणी थरथरती ॥५१॥
“ शठा, निष्ठुरा, मेघश्यामा,
कारण कां पुसतोसी आम्हां
कृती आपुली आठव ना तूं
तीच असे या सकला हेतू ॥५२॥
निज कृत्याच्या परिणामांचे दोष लाविती अन्या
कसें म्हणावें सुज्ञ तयासी सांग तूंच बुधमन्या ॥५३॥
पुरुष हिंडतो रानोमाळा
ज्यास असे कीं चकवा झाला
मृगमद - मोहित मृगी धांवती
यांत काय त्या दोषी असती ॥५४॥
नाचति सूत्राधीन बाहुल्या
कधीं काय त्या स्वतंत्र झाल्या
तसें मोहना, अमुचें वर्तन
मुळींच नव्हतें अमुच्या स्वाधिन ॥५५॥
तुझी बासरी येतां कानीं
काम करांतुन पडे गळोनी
प्राण तुजकडे सख्या, ओढले
शरीर त्यांचेमागुन आलें ॥५६॥
तूंच आणिलें खेंचुन येथें
अतां बोलसी, जा गेहातें
काय दयेचा असे उन्हाळा
तुझिया हृदयीं हे गोपाळा ॥५७॥
चित्तासी तुजवांचुन देवा, ओढ कशाची नुरली
तूंच लोटितां दूर जिवाची आस समूळहि सरली ॥५८॥
जीवन रक्षित चार कुडांतिल
नकोच आम्हां, रुचतें वादळ
असे असो सुख निवांत गेहीं
वेड लावितें निबिडा राई ॥५९॥
वर्षे मधु पीयूष कधीं विष
घेउन संगमविरहाचें मिष
मोहक, मादक उत्कटता ही
आगळेंच सुख हृदया देई ॥६०॥
सदाचार वा रीतीभाती
स्त्रीपुरुषां जे धर्म धरीती
भेट तुझी होतांच तयांचें
काय उरतसें कारण साचें ॥६१॥
नदी न वाहे मिळतां सागर
कडबा होतें पीक खळ्यावर
यान निरथक गांवीं येतां
रीतीभाती तशाच आतां ॥६२॥
घालितोस तूं भय आम्हांसी
नवल काय याहून महीसी
पानझडीचा धाक वसंते
लक्ष्मी सांगे दरिद्र येतें ॥६३॥
भूत झपाटिल वदती शंकर
हेमगर्भ कां फिरवी घरघर
जवळीं असतां तूं भय - नाशन
काय करिल रे आम्हां कानन ॥६४॥
तव चरणांच्या पुढें सांवळ्या मरणहि थरथर कांपे
चंद्राच्या सुखशीतल किरणीं देह कधीं कां तापे ॥६५॥
तव भेटी ना होत जोंवरीं
तोंवर रमते मन संसारीं
श्रीखंडानें भरतां वाटी
कुणी झुरे कां पिठल्यासाठीं ॥६६॥
सखे सोयरे यांची चिंता
कशास आतां अमुचे चित्ता
पद्म न जों पूजी चरणांतें
तों शैवल चिखलासह नातें ॥६७॥
अतां कुणाच्या अम्ही नव्हेती
दंव जैसें ना लागत हातीं
पिता, पुत्र, मात,अ पति, बंधू
शुष्क जाहला मृगजलसिंधू ॥६८॥
मणी जसे सूत्रांत ओवले
तुझ्यात तेवी सर्व मावले
तुज टाकुन मग कां घननीळा
पृथक्पणें भजणें इतराला ॥६९॥
देउनियां अवतणें जेवणा बोलावुनी आणावें
एक घांसही गिळण्या आधीं क्षुधिता कां उठवावें ॥७०॥
सोडुनिया सर्वहि धर्मासी
आलों शरण तुझ्या चरणांसी
अतां हरी ना करी उपेक्षा
घाल एवढी सखया, भिक्षा ॥७१॥
जे जे कोणी अनन्य चित्तीं
नित्य तुझीया स्मरणा करिती
म्हणति सर्वदा सुलभ तयां तूं
अम्हां टाळिसी कवण्या हेतूं ॥७२॥
पान, फुल वा पाणी नुसतें
तुला अर्पिता प्रसन्न करितें
पदीं वाहिलें निज देहाही
तरी कसा द्रव त्जशीं नाहीं ॥७३॥
सजलघनासम छवी तुझी ही
नयनें मुख निर्मित कमलांहीं
कर हे कोमल जणूं बिसांचे
हृदय तेवढें काय शिलेचें ! ॥७४॥
या विषयी का असेल शंका खराच निष्ठुर हृदयीं
हाडवैर अबलांसह याचें; छळण्या जन्मा येईं ॥७५॥
असो कुणी ती पत्नी माता
बघे न मागें करण्या घाता
कुलटा साध्वी भेद न पाहे
द्वेष स्त्रियांचा भरला हृदयीं ॥७६॥
श्रुती आदरें गाती महती
संन्यासीही भावें नमिती
पूजनीय ती जननी यानें
ठार मारिली निज परशूनें ॥७७॥
राजसुखासी लोटुन पाठीं
वनी कष्टली जी यासाठीं
अग्निदिव्यही केलें असतां
मातिस मिळवी पत्नी सीता ॥७८॥
आहे कां गे वृन्दा ठावी
असे बापुडी सुशील साध्वी
लेशहि नव्हतां अपराधाचा
छळुन घेतला जीव तियेचा ॥७९॥
शुर्पणखा, ताटका, पूतन, किती करावी गणती
कींव आमुची येइल कोठुन याच्या निर्दय चित्तीं ॥८०॥
हिंस्र पशू जीवांना छळती
तळमळतां ते हर्षित होती
चवथ्या अवतारींची वृत्ति
आज प्नः बघ उसळे वरतीं ॥८१॥
केलीं नाना व्रतें तुझ्यास्तव
तरी कशी नाहीं तुज कींव
जलावेगळी जणुं मासोळी
तशी जिवाची तडफड झाली ॥८२॥
प्राण विसाव्या, हे यदुनाथा
अंत नको रे पाहूं आता. ”
शब्दच सरले गहिंवरला उर
लोळण घेती प्रभुचरणांवर ॥८३॥
वर्ष पदांवर होई साचा
प्रेमळ निर्मळ नयनाश्रूंचा
पवित्र म्हणुनी पदजा गंगा
समर्था झाली भवभयगंगा ॥८४॥
प्रभुवरणावर लोळण घेतां शोकाकुल त्या व्रजरमणी
निशिगंधाच्या कळाय़ कोवळ्या दिसती पडल्या जणुं गळुनी
जोगीमधल्या करूणरासाच्या व्याकुळ ताना वा गमती
भासतात कीं वियोगिनीच्या विलापती विव्हल पंक्ती ॥८५॥
पाहुन त्यांची अनन्यवृत्ती
मेघनीळ तो द्रवला चित्तीं
मधुपणानें हंसला कान्हा
जीवन लाभे गोपवधूंना ॥८६॥
वदे लाघवी, “ उठा, चला, गे
मन तुमचें कळलें या रागें
चला खेळुं या रास मनोहर
रोष नका गे करूं अम्हांवर ” ॥८७॥
एकेकीच्या करा धरोनी
बळेंच उठवी रथांगपाणी
नृत्य मांडिलें अभिनव तेथें
व्रज - ललनांसह त्या व्रजनाथें ॥८८॥
वाजवीत मधु वेणू आपली
उभा देहुडा श्रीवनमाळी
स्त्रिया नाचती हरिभंवतालीं
छंदाभंवतीं जणुं बहु चाली ॥८९॥
प्रसन्नताही हर्षित ऐसें झालें गोपवधूंसी
मनासारिखें घडल्यावर कां सीमा आनंदासी ॥९०॥
हरी ठेवुनी मग मुरलीला
करी तयासह बहुविधलीला
कधीं हुंबरी कधीं हमामा
खुलवी झुलवी गाउन रामा ॥९१॥
टिपर्यातरत्याकिमपिनिराळ्या
झिम्मा खेळे पिटुनी टाळ्या
पिंगा, करकोपर, रणघोडा
जीव वधूंचा झाला वेडा ॥९२॥
कुणा कटीसी लपेटुनी कर
आलिंगन दे प्रेमें निर्भर
टिपित कुणाचें स्मितनिजओठीं
भासवीत जणुं करि गुजगोष्टि ॥९३॥
पदर कुणाचा ओढुन कान्हा
गुंतवुनी दे तरुशाखांना
खट्याळ हांसे अडखळताती
कुणा नाचवी घेउन हातीं ॥९४॥
गुंफुन बाहुंत कोमल बाहू गुंजत गुज कुजासी
मंजुल वाचें रमवी अंतर उधळी सुमपुंजासी ॥९५॥
प्रेमळतेच्या वर्षामाजीं
गोपी न्हाल्या जणुं वनराजी
भक्तिरसाच्या सुधा सागरीं
व्रजांगना त्या झाल्या शफरी ॥९६॥
हाय ! परी ही छाया कसली
धवल चांदण्यामधें उदेली
गोपवधूंची प्रसन्न उज्ज्वल
दृष्टि कशानें झाली चंचल ॥९७॥
तनु कापत कां हरि - सहवासीं
सांवरिती अचलहि पदरासी
कां नत होती बघतां नयनें
चाप रोखिले त्यावर मदनें ॥९८॥
गढुळ जाहलें कामें मानस
जसें मिठानें नासें पायस
कसें हरीसी अतां रुचावें
मलिन, नासलें, कुणास भावें ॥९९॥
धरुन राधिकासंग जाहला गुप्त तदा श्रीरंग
भंग करुन रंगांत इतर त्या असतां रासीं दंग ॥१००॥
हाय परंतू राधाहृदयीं
मद कामांची होत चढाई
शुनें बनविलें जयें मुनींना
काम जिंकिला जाई कवणां ॥१०१॥
तिला वाटलें मम रूपासी
लोलुप हा सोडी इतरांसी
नमविन आतां हवा तसा मी
बैल वेसणी म्हणजे कामी ॥१०२॥
वदे, “ श्याम मी थकलें कोमल
उचलेना बघ एकहि पाउल
उचलुन घे रे खांद्यावरती
तरिच खरी मजवरची प्रीती ॥१०३॥
वश होइल तो कसा स्त्रियांतें
इंद्रिय ज्या चाळवूं न शकतें
बरें, वदे हांसुन हृषिकेशी
उंचावर चढवीत तियेसी ॥१०४॥
स्कंधीं तेथुन बसूं पाहते तोंच लपे गोविं
व्हावें लागे फजित जरी कां कामें झाला अंध ॥१०५॥
कृष्ण लोपतां सावध गोपी
विरह तयांच्या चित्ता कापी
व्याकुळ पुसती परस्परांना
“ तुवां पाहिला का गे कान्हा ” ॥१०६॥
कुंजलतांसी यमुनातीरीं
शोधित फिरती कृष्णमुरारी
चिह्नें पाहुन हरिचरणांसह
“ भाग्यवतीची कोण तरी अह ॥१०७॥
दिसत न राधा, तीच असावी ”
वदती सर्वहि, “ धन्य म्हणावी
अम्हीं दवडिलें भाग्य, अरेरे
दूषवुनी मन काम - विकारें ॥१०८॥
मन राधेचें पवित्र उज्ज्वल
शिवूं न धजले तया प्रती मल
प्रेम तिचें निष्काम राहिलें
म्हणुन हरीनें हृदयीं धरिलें ॥१०९॥
क्षणिक सुखासी लंपट होउन घात आपुला केला
हाय हाय, हे नंदा नंदना, धांव अतां हांकेला ” ॥११०॥
रुदन परी राधेचें ऐकुन
नवल करी चित्तीं गोपीजन
“ काय अगे फसविलें तुलाही ? ”
“ दोष तयाचा अल्पहि नाहीं ॥१११॥
मीच मातलें. ” वदे राधिका
“ ओळखिलें ना जगन्नायका
मलिन कुटिल लव होतां अंतर
दूर होतसे मग परमेश्वर ॥११२॥
हरीस निर्मळ हृदयें रुचती
वश होईं तो शुद्धप्रीतीं
भक्ति हवी त्या अव्यभिचारी
हें न परी कुणि घेत विचारीं ॥११३॥
दीनोद्धारा, हे सुकुमारा,
पदनतपावन, खलसंहारा,
अघमलनाशक, कुंजविहारी,
शोक - सागरामधुनी तारी ॥११४॥
धाय मोकलुन रडती गोपी, माधव, हरि, गोविंदा
वृक्षलता कवटाळुनि वदती, “ दावा गे सुखकंदा ॥११५॥
बलानुजा स्मरतां तुज चित्तीं
महापातकी उद्धरताती
त्याहुन अमुचें पाप भयंकर
गणुन दया कां येत न तिळभर ॥११६॥
बहुत संकटें आलीं गेलीं
कुशल अम्ही तव छत्राखालीं
वाचविलें यापरि माराया
समयीं त्या कां वद यदुराया ॥११७॥
नंद पिता तव म्हणुन तयासी
पाताळांतुन सोडविलेसी
दुजेपणानें लोटुन देसी
मरणाच्या खाईंत अम्हांसी ॥११८॥
भाजुन काढी हा विरहानल
दावानल तो कितितरि शीतल ॥
कालियविष एकदांच नाशी
हें नव मरणें प्रतिक्षणासी ॥११९॥
क्षमा करी रे कुंजविहारी, अंत न अमुचा पाही
चुकलों त्याचा दंड पावलों, आतां पदरीं घेई ॥१२०॥
लक्ष्मीमोहुन करिते साची
ज्यावर कुरवंडी प्राणांची
मनमोहन तें स्मित तव दावी
आस एवढी तरि पुरवावी ॥१२१॥
तव वचनांतुन सुधेस पाझर
खुळेशशांका म्हणति सुधाकर
प्रभा तयाची दाहक होते
चक्रवाह हा प्रमाण यातें ॥१२२॥
मृदु कमलाहुन तव पद कोमल
जिथुन उगम पावे गंगाजल
हृदयीं या अंगार लागला
पद ठेउन त्या निवव दयाळा ॥१२३॥
कृष्ण कृष्ण म्हणतां व्रजगोपी
समरस झाल्या हरिस्वरूपीं
कुणी कृष्ण मानुनी स्वताला
तशाच करिती बहुविध लीला ॥१२४॥
कुणी जाहल्या नंद - यशोदा
रोधि एक गिरि बनुन पयोदा
गोप, वांसरेम, असुर, सर्प, बक
होउन करिती लीला - नाटक ॥१२५॥
प्रेमरसीं यापरी तयांची वृत्ती तन्मय झाली
श्यामल यमुना नयनीं बघतां पुन्हां स्मरे वनमाली ॥१२६॥
“ अजुन निर्दया येत न कींव
नकोच आतां असला जीव
कृपा तूं तरी कर गे यमुने
भावापाशीं अम्हां झणी ने ॥१२७॥
जगच्चालका, हे परमेशा,
पुरो आमुची अंतिम आशा
विहार करि जेथें व्रजनंदन
चरणतळींचे कर धूलीकण ” ॥१२८॥
धुळींत पडल्या दीन गोपिका
देठ तुटोनी जणुं सुम कलिका
करुण - रवें रडती व्रजनारी
दावानलहत जेवी कुररी ॥१२९॥
शोक - विह्वला गोपी जाणुन
निर्मल - नीलशरीर दयाघन
मधें प्रगटला गोपवधूंचे
कुमुदवनीं जणुं बिंब शशीचे ॥१३०॥
स्मित हास्यानें श्रीकृष्णाचे सचेत झाल्या गोपी
सिंधु उसळला आनंदाचा तुलना त्या न कदापी ॥१३१॥
पाउस पडुनी जातां जेवीं
उन्हें कोवळ्या सृष्टि हंसावी
हास्य तसें तें श्रीकृष्णाचें
मानस खुलवी व्रजललनांचें ॥१३२॥
गोपींचें स्फुरलें प्रेमानें
अंग अंग तंव चैतन्यानें
तनु - पुष्पें वाहिलीं पदांवर
खिळले डोळे मुख - कमलावर ॥१३३॥
हरि - चरणांचें चुंबन घेती
कुणि ते धरिती हृदयावरती
रानफूल उधळून हरीवर
झाल्या कोणी भजनीं तत्पर ॥१३४॥
रुसवा दावुन कोणी म्हणती
“ श्याम, किती तव निष्ठुर वृत्ती ”
वदत हांसुनी मग वनमाळी
“ इथेंच होतों तुमच्या जवळी ॥१३५॥
तुम्हीं टाकिलें मज बघण्याचें
पटल घेउनी कुवासनेचें
दिसलों नच केवळ या हेतू
धुक्यांत जैशा लपती वस्तू ॥१३६॥
शुद्धबिंब हें प्रेम - रवीचें धुकें वितळवी सारे
सुदैव तुमचा विकलों आहे विकल्प ना घ्या दुसरें ” ॥१३७॥
सुधा - मधुर हें ऐकुन भाषण
देहभान विसरे गोपी - गण
समावली नच जाई चित्तीं
कामविहीना प्रेमळ भक्ती ॥१३८॥
विश्व सकलही हरिमय झालें
आपणही उरलों न निराळे
अशी जाहली स्थिती तयांची
धन्य योग्यता सद्भक्तीची ॥१३९॥
भेद न उरला द्वैताद्वैतीं
एकच झाली भक्ति अभक्ति
गिळिली वृत्ति स्वरूपतेंने
ऐक्य वितळिलें प्रेममुशीनें ॥१४०॥
जननी, भगिनी, पत्नी, कन्या
वहिनी, वा ललिता सखि अन्या
विशेष यांच्या प्रेमामधला
अनन्यतेसह जरी मिळाला ॥१४१॥
वरी दिव्यता तपस्विनीची
चढली उत्सुकता विरहाची
तरीच गोपींच्या प्रेमासी
येइल तुलना करावयासी ॥१४२॥
हेंहि खरें नच सत्य पाहतां प्रेम असें गोपींचें
गोपीप्रेमासमची बुधहो, वर्णवे न तें वाचें ॥१४३॥
प्रेमरसाच्या महासागरीं
कृष्णचंद्र जणु खुलवी लहरी
रास महा तो सर्वां भुलवी
कालहि विसरे गति स्वभावी ॥१४४॥
नभांत तारा खिळल्या ठायीं
मृग चंद्राचे मोहित तेही
सहस्रनेत्रीं बघती साची
रासक्रीडा भगवंताची ॥१४५॥
ज्याचें दर्शनहि प्रयास करुनी लाभे न योग्यांप्रती
झाले कुंठित वेद, सांख्य चिडले, मीमांसका ना गती,
वेदान्ती भ्रमले, कणाद दमले, ऐसें परब्रह्म तें
उल्हासे यमुनातटावर इथें गोपीसवें खेळतें ॥१४६॥
श्रीकृष्णकथामृत महाकाव्यांतील भक्तिविलास नांवाचा सातवा सर्ग समाप्त
श्रीकृष्ण कथामृत - आठवा सर्ग
( कंसोद्धार )
हे पार्वतीश करुणाघन शूलपाणे
द्वेष्यः प्रियो न तव कोऽपि समानबुद्धेः
अंगीकरोषि भगवन् गरलेन्दुसर्पान्
किं निष्ठुरोसि वद केवलमस्मदर्थे ॥१॥
टीका भागवती यदीय धरिली डोक्यावरी पंडितीं
भक्तीनें वश तो भरीत सदनीं पाणी सखा श्रापती
श्रीज्ञानेश जणो पुनः क्षितितलीं आले जनोद्धारणीं
त्या श्रीसद्गुरुएकनाथ - चरणीं मी येत लोटांगणीं ॥२॥
गगन भासतें उदासवाणें
जरी उजळिलें दिशांस अरुणें
प्रसन्नता झाकीत निजमुखा
अभ्रांचा कीं घेउन बुरखा ॥३॥
फुलें न फुलतीं तरू न डुलती
पक्षी कोणी नच किलबिलती
वारा घालित नव्हता विंझण
भ्रमर शांत जणुं गळले पैंजण ॥४॥
पान्हवती ना दुधाळ गाई
वत्सांही उत्सुकता नाहीं
स्मित उमटे ना शिशुवद नावर
आवडतेंही गमे न रुचकर ॥५॥
खिन्न मानसीं गोकुलवासी
असे होत कां नुमगे त्यांसी
श्याम आमुचा कुशल असेना
हीच एक शंका सकलांना ॥६॥
शोध घ्यावया व्याकुल कांहीं नंदगृहासी आले
तो परका रथ दारीं दिसतां हृदयीं शंकित झाले ॥७॥
कळलें कोणी कंसाकडुनी
कालच आला होता रजनीं
रामकृष्ण न्याया मथुरेसी
वार्ता नहीं परी पुरेसी ॥८॥
ऐकुनिया हें हृदय हिसकलें
जात, असें गोपांस वाटलें
गृहीं रिघाले आतुर होउन
दिसलें कांहीं तेह विलक्षण ॥९॥
तात नंद गंभीरपणानें
शून्यीं बघती निश्चल नयनें
भव्याकर्षक पुरूष कुणी तो
अधोवदन भूमीस रेखितो ॥१०॥
अश्रू ढाळी मूक रोहिणी
दीन यशोदा रडे स्फुंदुनी
हुंदका न मावे हृदयासी
कुरवाळी विलगल्या हरीसी ॥११॥
तिच्या कटीसी दोहातांनीं वत्सल विळखा घेई
वदे श्रीहरी गद्गद कंठें, “ जाऊं ना मी आई ” ॥१२॥
“ बाळ ” एवढें वदली आई
पुढें मुखांतुन शब्द न येई
“ माय ! असें कां बरें करावें ”
वदे श्याम मधु मंजुळ भावें ॥१३॥
“ येइन ना मी पुनः परतुनी ”
“ फसवितोस तूं, ” बोलत जननी
“ पाप असे रे कंसापोटीं
तो तव घ्या ” वच विरलें ओठीं ॥१४॥
बलरामें तंव म्हटलें तीतें
“ शोक आवरी हा प्रियमाते
हरीस कोठुन भय कंसाचें
ज्ञात न कां तुज प्रताप याचे ॥१५॥
जयें तुडविला नाग कालिया
सहज वारिली राक्षसमाया
चेंडूसम धरिला गोवर्धन
निर्भय यासी सगळें त्रिभुवन ॥१६॥
परतुन येऊं धुळीस मिळवून दुष्टांच्या उन्मादा
संशय वाहूं नकोस जननी, दे शुभ आशीर्वादा ” ॥१७॥
“ करूं नको रे साहस बाळा,
आपण तरि समजवा न ! याला ”
वदे करुण - विव्हला यशोदा
काय म्हणावें सुचे न नंदा ॥१८॥
शिर ठेउन मातेच्या चरणीं
निघतां बोलत शार्ङ्गपाणी
“ त्वरा करा, उद्धवजी, आतां
तुम्हीहि चलता ना हो, ताता ” ॥१९॥
निश्चय हरिचा पाहुन देवी
यशोमती अक्रूरा विनवी,
“ हृदय करितसे तुमचें स्वाधिन
पदर पसरितें आणा परतुन ” ॥२०॥
रामकृष्ण मथुरेस निघाले
क्षणांत हें चहुंकडे कळालें
धांवत आलें गोकुळ सारें
तशीच उघडी टाकुन दारें ॥२१॥
यशोमतीचें हृदय - रत्न तें चढे रथावर वेगें
गोपाळासह नंद निघाला गाड्यांतुन त्या मागें ॥२२॥
बसे पुढें अक्रूर धुरेवर
अश्व जाहले गमना तत्पर
तोंच वेढिला रथ गोपींनीं
कृत - निश्चय जणुं बहुशंकांनीं ॥२३॥
कुणी ओढुनी धरिलीं चाकें
रथासमोरी पथांत वाके
मिठ्या मारिल्या अश्वपदांसी
लोळण घेती कुणी महीसी ॥२४॥
ध्वनी तयांच्या शोकांतुन ये
जा जाणें तर तुडवित हृदयें
प्राण आमुचा टाकुन जाई
देहाची मा क्षितीच काई ॥२५॥
हास्य हरीच्या जें मृदुओठीं
स्नेहमयी जी विलोल दृष्टी
मधुमंजुल जें प्रेमल भाषण
तेंच असे व्रजमणीजीवन ॥२६॥
श्याम जीवनाधार तयांचा सोडुन निघतां दूर
कसाविस झाल्याविण केवीं राहिल कोमल ऊर ॥२७॥
“ श्याम कसा रे होशी निष्ठुर
क्रूर असे हा नच अक्रूर
तात, नंद, तुम्हांहि कळेना
कसा धाडिता अमुचा कान्हा ” ॥२८॥
शुद्ध आपुलीही त्या नव्हती
नयनीं अविरत अश्रू स्रवती
उष्णश्वासें ओठहि सुकले
अक्रूराचें हृदय द्रवलें ॥२९॥
गायवासरें अश्रू ढाळिती
पक्षी फिरती रथाभोंवतीं
चराचरांची बघतां प्रीती
विस्मित झाला तो निज चित्तीं ॥३०॥
रथावरुन भगवान उतरले
व्रजरामांसी हृदयीं धरिलें
पुसुनी अश्रू निज शेल्यानें
शांतविती त्या गोड वचानें ॥३१॥
खुणावितां अक्रूरा तो रथ हळूं काढी पुढतीं
फिरवित निजकर गाईपाठीं बोलत करुणामूर्ती ॥३२॥
“ गोपींनों तुमच्या प्रेमाला
सदाच आहे मी विकलेला
देहानें जरिही परदेशीं
परी मनें नित तुमच्यापाशीं ॥३३॥
तुम्हां सोडुनी जात दिसे जें
सुखें न तें उर फुटतें माझें
परि न इष्ट कर्तव्य चुकविणें
म्हणुन जातसें निरूपायानें ॥३४॥
देह वेगळाले जरि दिसती
तरीहि आहों अभिन्न - चित्तीं
यास्तव शोक उगीच करा नच
हंसत मुखानें निरोप द्या मज ॥३५॥
पुनः त्वरित यद्दर्शन व्हावें
पोंचवीत त्या दूर न जवें
म्हणुन फिरा गे परत गृहासी
वदुन असें झट चढे रथासी ॥३६॥
कृष्ण - दर्शने तन्मयवृत्ती, बोल न कानीं शिरती
निघतां रथ परि श्याम, श्याम रे गोप - वधू हंबरती ॥३७॥
वदती गोपी, “ लव थांबव रथ
बघुं दे कृष्णा पुरव मनोरथ ”
कृष्ण म्हणे, “ चल पुढें, त्वरा कर ”
दुध्यांत पडला तइं अक्रूर ॥३८॥
शंकाकुल तो म्हणे मनाई
“ कंस असे कीं क्रूर विशेषीं
धोका जर पोंचला हरीतें
प्राणा टाकिल सारें व्रज तें ॥३९॥
तळतळाट तो माझ्या माथीं,
कारण मी कंसाचा साथी
निंदितील मज सदैव सज्जन
लज्जास्पद मग होइल जीवन ” ॥४०॥
निज सामर्थ्यें परी हरीने
मोह नाशिला सहजपणानें
अनंत विश्वें होती जातीं
याच्या निमिषोन्मेषा वरती ॥४१॥
सादर वंदुन सहर्ष मग रथ आणी मधु नगरीतें
त्यातें भय कां कंसापासुन पटलें अक्रूराते ॥४२॥
नगरीं येतां बोलत सादर
हात जोडुनी, “ हे परमेश्वर
पद लागावें मम सदनासी
कृतार्थ करणे मज हृषिकेशी ॥४३॥
परब्रह्म साकार सांवळें
अतिथि जरी दासाचे झालें
धन्य धन्य ही गृहस्थता मम
मजकरितां घ्या हरि इतुके श्रम ॥४४॥
“ अक्रुरजी ! हें हवें कशासी
मी का परका असे तुम्हांसी
परि ज्यासाठीं मज कंसानें
आणविलें तें करूं त्वरेनें ॥४५॥
स्वस्थमनें मग पाहुणचार
घेउन राहूं इथेंच तोंवर
कांहीं करणें असती गोष्टी
कळवा कंसा उद्यांच भेटी ॥४६॥
नगरीच्या बाहेर उपवनीं परिवारासह वसले
रामकृष्ण जे धर्मोद्धारा भूलोकीं अवतरले ॥४७॥
दुसरे दिवशीं वदे मुरारी
“ चलान दादा पाहूं नगरी
नागरिकांच्या काय भावना
असती तेंही कळे आपणां ॥४८॥
जरी प्रजेची राजावरती
असेल उत्कट निश्चल भक्ती
तरी तयासी अशक्य वधणें
सहज सुलभ अन्यथा त्याविणें ॥४९॥
कसें होतसें अपुलें स्वागत
त्यावरुनी हें होइल निश्चित ”
गोपाळांसह मग परमेश्वर
येत बघाया तें मथुरापुर ॥५०॥
भाग्योदय होण्याच्यापूर्वीं
शुभविचार ये हृदयीं जेवीं
तेवीं परमात्मा मधुसूदन
मथुरेमाजीं करी आगमन ॥५१॥
रत्नखचित कांचनमय तोरण गोपवेश भगवंता
तेजोवलयांकित मुनिवरशी शोभा देई शिरतां ॥५२॥
नानारीती नटुन साजिरी
वासकसज्जा प्रिया आदरी
तेवीं मथुरापुरी अलंकृत
करी हरीचें प्रेमें स्वागत ॥५३॥
महानदीशी अगस्त्योदये
वेगळीच कीं प्रसन्नता ये
तसें हरीचें होतां दर्शन
तत्सुंदरता झाली शतगुण ॥५४॥
हरुनी घेउन रजकापासुन
राजवेष हरि करीत धारण
गोपवेश असतां जो सुंदर
हा घालिल मग त्यांत किती भर ॥५५॥
पथीं चालतां नंदकुमार
जनहर्षासी येत बहार
हरिचरणावर तयीं वाहिली
आदर - भावांची सुमनांजलि ॥५६॥
हरिकीर्तनें प्रथमच होत्या मोहविल्या पुरनारी
आज नेत्रफल लाभणार, मग गडबड झाली भारी ॥५७॥
कमळ - दळे विकसुनी प्रभातीं
सुंदरता जणुं प्रकटे वरतीं
तशीं गवाक्षें उघडीं होतीं
पुररमणी त्यामधें शोभती ॥५८॥
श्रीकृष्णाचें होतां दर्शन
आज वाटलें कृतार्थ लोचन
आनदाश्रू अर्ध्य जाहलें
कटाक्ष नच तीं नील उत्पलें ॥५९॥
भरुन ओंजळी फुलांफुलांनीं
कृष्णावर उधळितात रमणी
काय सर्व वासना भावना
हरिप्रती वाहती अंगना ॥६०॥
हांसत गालीं जयीं श्रीहरी
स्नेहल नयनें पाहत नारी
तईं वाटलें त्यास आपुलें
जीवन आजी सफल जाहलें ॥६१॥
कंस सेविका कुब्जेनें बहु सन्मानें प्रेमानें
जलद्रनीलतेजा अर्पियलें मलय - चंदनी उटणें ॥६२॥
उंच - सखलही भूमीं जेवीं
शशिकिरणें समचारु दिसावी
वृत्तिगता कुटीलता जशी वा
निमे गुरूंची करितां सेवा ॥६३॥
तसें कृपा करितां वनमाली
विकृतशरीरा सुंदर झाली
वंदनीय पुरूषांचा आदर
करितां विफल न जात खरोखर ॥६४॥
मोहक जें वाटतें कुठेंही
स्मित तें रमणीवदनीं येई
निवडुंगाचें पुष्पहि सुंदर
वानूं किति मल्लिका - फुलें जर ॥६५॥
वदे श्रीहरी तइं रामातें
“ लोक बहुत विटले कंसातें
प्रजाहिताहुन निज प्रतिष्ठा
अधिकतरा वाटत या दुष्टा ॥६६॥
नकोत ते निर्बंध निर्मिले
हवेत जे ते यास न सुचले
जीवित, वित्त न उरे सुरक्षित
राज्य नसे हें स्मशान निश्चित ॥६७॥
येतां आपण जनीं उदेली भाविसुखाची आशा
ती पुरवाया अवश्य आम्हां करणें खलनृपनाशा ” ॥६८॥
ज्या यज्ञाचें करुन निमित्त
कंसें आणविला व्रजनाथ
धनुर्याग मंडपीं तया ये
श्याम कांपवित खल - जन हृदयें ॥६९॥
वेदीवरचे चाप उचलुनी
कडकन मोडी हरि लीलेनी
गोष्ट नसेही तयास नूतन
रघुनंदन तो हा यदुनंदन ॥७०॥
दुष्ट आड जे आले होते
धनुखंडें दंडिलें तयांतें
गोप गर्जती जयजयकारा
ऐकुन झाला कंस घाबरा ॥७१॥
पीडण्यांत जो शूर कुवलयें
असा मत्त गज एक पुढें ये
चालुन हरिचे अंगावरती
पुरवासी जन डोळे मिटती ॥७२॥
दिसावया श्रीहरी कोवळा मदयुत करी प्रचंड
परंतु सानचि वज्र करितसे पर्वतास शतखंड ॥७३॥
चवताळुम तो चालुन येई
चपल सांवळा हुलके देई
धाप लागली गजास पाहुन
मुष्टीनीं त्या करीत ताडन ॥७४॥
चिडुन धांवला गज तो शेखीं
दांत हरीवर मदांध रोखी
तेच धरुन मोडिले हरीनें
इतर मतें जणुं वेदांतानें ॥७५॥
गतप्राण जाहला मतंगज
कंस करी मल्लांसी हितगुंज
रंग - सभे तो येत मुरारी
गजदंता मिरवीत शरीरीं ॥७६॥
मल्ल दोन मुष्टिक चाणूर
चालुन आले गिरिधर हरिवर
दाव अम्हां बल तुझ्या भुजांचें
मदोन्मत्त गर्जतात वाचें ॥७७॥
रक्त ओकवित रामहरीनें क्षणांत त्यां लोळविलें
जणु कंसाच्या धैर्यगडाचे बुरुज दोन ढासळले ॥७८॥
मल्ल - उरावर विजयी श्याम
पर्वतशिखरीं उदित रवीसम
दर्शनीय हो नागरिकां कीं
कंस उलुकसा नयना झांकी ॥७९॥
गोप, नंद, पुरजन, संसदिं जे
धनिक, दरिद्री, हुजरे, राजे,
बाल, वृद्ध, नर, नारी, यांना
दिसे भिन्न हरि जशी भावना ॥८०॥
डौल मिरवितें शीड झुकावें
तुटल्यावरती जसे तणावे
तशी मान ताठर कंसाची
लवे कळा ये मुखा मढ्याची ॥८१॥
मग लागे वडबडूं हवे तें
“ विध्वंसा रे यदुवंशातें
चिरडा या कारट्यास सत्वर
पेटवुनी द्या घरघर मंदिर ॥८२॥
गदा, ढाल, तलवार कुठें द्या मीच ठेचितों यातें
खोड जित्याची मेल्यावांचुन केव्हांही नच जाते ॥८३॥
सिंहासम झेप घे श्रीहरी
केस धरी कंसाचे स्वकरीं
ओढुन त्या फेकिलें महीवर
गुडघा रोवी उरांत गिरिधर ॥८४॥
दिसे श्रीहरी उग्रमनोहर
असतां कंसाच्या छातीवर
प्रलयाचें तांडव भूवर कीं
सतेज मनि जणुं सर्पमस्तकीं ॥८५॥
गळा दाबुनी चढवी ठोसे
रक्ताचे तो देत उमासे
हात पाय झाडी तडफडुनी
बघती सारे चकित लोचनीं ॥८६॥
अंती कंसें प्राण सांडिलें
नाना मथुरालांछन सरलें
देवकिचें दुर्दैव निमे वा
सज्जनतेची कीड मरे वा ॥८७॥
कंसाचा वध होतां जयजयकार करी जन सारा
स्वर्गीं दुंदुभिनाद होत सुर वर्षिति सुमसंभारा ॥८८॥
नंदानें धरिलें हृदयासी
प्रेमभरानें गोविंदासी
उचलुन घेउन हरिसी स्कंधीं
गोप नाचती अत्यानंदी ॥८९॥
रामकृष्ण धांवले त्वरेंसी
सोडविण्या जननी - जनकांसी
द्वारपाल येती काकुळती
पदीं लोळुनी क्षमा याचिती ॥९०॥
दुःख वीस वर्षांचें सरलें
देवकीस कळलें, नच पटलें
डोळे लावुन बसली होती
हरिच्या वाटेकडे परी ती ॥९१॥
राख होत होती आशांची
तिचिया एक तपावर साची
आज फुलोरा येइल त्यासी
हें न वाटलें सत्य तियेसी ॥९२॥
दार उघडुनी तों कारेचें प्रवेशला हरि आंत
सत्यहि परि माउलीस गमलें दिसतें तें स्वप्नांत ॥९३॥
धांवत येई त्वरें श्रीहरी
बेड्या तोडुन दूर झुगारी
जननीचरणीं ठेवितसे शिर
येत देवकी मग भानावर ॥९४॥
आज उग्र तप सफल जाहलें
भागनांस मग हृदय न पुरलें
वत्सलतेच्या सहस्र धारा
पट फोडुन वर्षती झरारा ॥९५॥
हृदयीं धरुनी घट्ट हरीसी
शतशत चुंबन घे प्रेमेसी
थांबवितों परि इथेंच वर्णन
दृष्ट वचें लागेल म्हणून ॥९६॥
बंधमुक्त करितां बलरामें
वसुदेवें निजपुत्रा प्रेमें
कृश हातांनीं कुरवाळीलें
नयन जलानें भरूनी आले ॥९७॥
नामगजर घोषीत हरीचा सारे मथुरा - वासी
जमले तेथें मिरवीत नेण्या राजगृहास तयासी ॥९८॥
एक वृद्ध नर पुढती येउन
वदे करोनी नत अभिवादन
“ त्रिवार जय जय अपुला देवा
धन्य अम्ही करितां पदसेवा ॥९९॥
कंस वधुन नच केवळ अमुचें
दुःख दूर केलें जगताचें
सदा अम्हां देण्यास विसांवा
राजमुगुट हा शिरीं धरावा ॥१००॥
नसतां राजा प्रजा जशीं कां
कर्णधार नसल्यावर नौका
राजकृपेच्या वर्षाखालीं
नीति धर्म - सौख्यास नव्हाळी ॥१०१॥
तुम्ही रिक्त केलें सिंहासन
आपणची व्हा तयास भूषण
शंकर एकच हर भव जेवीं
अमान्य नच ही विनती व्हावी ॥१०२॥
राजमुकुट ठेविला जनांनीं परमात्म्याच्या चरणीं
तेज अधिकची चढलें रत्नां श्रीहरिपदनखकिरणीं ॥१०३॥
वदे श्रीहरी मंजुल वाणी
राज - मुकुट नि करीं घेउनी
“ प्रेम एवढें करितां मजवर
धन्य लोक हो तुम्ही खरोखर ॥१०४॥
कंस निमाला तरी मोकळें
सिंहासन हें नसें जाहलें
महाराज जे उग्रसेनजी
नृपति येथ ही दृढमति माझी ॥१०५॥
चोर जरी ने लुटुनी मत्ता
प्रथम धन्याची नष्ट न सत्ता. ”
उग्रसेन मग सोडवुनी कीं
राजमुगुट ठेविला मस्तकीं ॥१०६॥
मुकुंद करि जयघोष तयाचा
चकित जाहला जन मथुरेचा
निःस्पृहता उपकारशीलता
बघुन हरीची नमला माथा ॥१०७॥
जनतेनें मग निज - हृदयाच्या सिंहासनीं हरीसी
वृत्तिजलें न्हाणुनी बसविलें ना म्हणवे न तयासी ॥१०८॥
ग्रहणमुक्तशशिकिरणें जेवीं
रजनी अभिनव तेजा मिरवी
तशीच उज्ज्वल मथुरा झाली
उ ग्र से न नृ प स त्ते खा लीं ॥१०९॥
धर्मनीतिसीमा संभाळुन
मथुरा व्यवहाराचें वर्तन
उभय - तटा उल्लंघि न साचा
जसा स्वच्छ शरदौघ नदीचा ॥११०॥
प्रदीप्त झाल्या यज्ञज्वाला
वृत्तींना परि संयम आला
निनता विद्या स्थिर हो लक्ष्मी
सुख रमलें सात्त्विकता - धामीं ॥१११॥
हरिप्रसादें पापकारिणी
मधुरा झाली मोक्षदायिनी
करितां जेवीं अनन्यभक्ति
दुराचारही सज्जन होती ॥११२॥
सर्व पडे जें ब्रह्मगिरीवर जल तें होतें गोदा
हरिचरणावर तसेंच सारें, भज भज मन गोविंदा ॥११३॥
विप्र थोर बाहुन सन्मानें
वसुदेवानें मग थाटानें
पुत्रांचें केलें उपनयन
कृष्ण दिसे पुनरपि बटुवामन ॥११४॥
मु ख बा हू रू च र णां पा सु न
निर्भित ज्याच्या चारहि वर्ण
महत्त्व त्या नच संस्कारांचें
पालन केलें जनरीतीचें ॥११५॥
निरोप घेतां श्रीकृष्णाचा
शोकें भरला उर नंदाचा
दुरावती हा वसुदेवात्मज
दुःख तयासी बोलवे न निज ॥११६॥
“ तात, नंद, लव दुःख करा ना ”
वदे श्रीहरी नमुनी चरणां
“ तुमचा होतों राहिन तुमचा
अन्यथा न मम समजा वाच ” ॥११७॥
घट्ट धरोनी हृदयीं कृष्णा चुंबुन मुख वात्सल्यें
मागें मागें बघत कसें तरि नंद गोकुला आले ॥११८॥
एकटेच पाहुन नंदासी
करिती आकांता व्रजवासी
कंसवधासह अद्भुत विक्रम
ऐकिलियावर लव निवळे श्रम ॥११९॥
परी हरीची भेट न झाली
ही तळमळ तिळभर न निमाली
“ हाय, जिवलगा, मेघश्यामा,
फसविलेंस ना अंतीं आम्हां ॥१२०॥
गंध फुलांचे उडुनी गेले
गळुनी पानें वन वठलेलें
खिन्न उषा ही उदास संध्या
सुके न जीवन - सरिता निंद्या ॥१२१॥
वेद सर्वही तव निश्वसितें
काय शिकावें गुरूसदनातें
दूर अम्हांपासुन परि व्हाया
निमित्त हरि हें करिशी वाया ॥१२२॥
अम्ही दरिद्री दीन खेडवळ
रूपाचें ही जवळ नसे बळ
म्हणुनी कां वद तुजसी आला
कंटाळा अमुचा घननीळा ॥१२३॥
गोड गोडशा देउन थापा
घेतलेस येथून निरोपा
आणि अतां टाळिसी अम्हांसी
परि नच सुटका होइल तैसी ॥१२४॥
असूं सकल भाबड्या म्हणुन डाव हा साधला
अम्हां फसवुनी व्रजामधुन येत जातां तुला
न त्यांत परि चातुरी लवहि वा नसे धाडस
हृदांतुन निघोन जा, मग तुझें खरें पौरुष ” ॥१२५॥
कंसोद्धार नांवाचा आठवा सर्ग समाप्त
लेखनकाल :-
फाल्गुन, शके १८६९
श्रीकृष्ण कथामृत - नववा सर्ग
( मथुरारक्षण )
सकलसुखवरिष्ठं संस्तुतं वेदसंघैः
अचरचरपदार्थे व्योमवद् व्याप्तदेहं
विनतजनदयालुं भक्तकल्पद्रुमं तं
चरणनिहितभालं चंद्रमौलिं नमामि ॥१॥
वाटा मोडुन सूक्ष्म दुस्तर जयीं सन्मार्ग संथापिले
अद्वैता चढवून साज अणिलें सौंदर्य भक्तीमुळें
ज्यांचें वाङ्मय लाळवीत अमृता दीनास जें माउली
संतश्रेष्ठ असे सदैव नमितों प्रेमादरें पाउलीं ॥२॥
वदे गर्गमुनि वसुदेवासी
“ पाठिव पुत्रां गुरूसदनासी
रत्न जरी मूळचें प्रकाशी
संस्कारें द्युति विशेष त्यासी ॥३॥
काश्यपगोत्री मुनि सांदिपने
योग्य गुरू तो मम दृष्टींनीं
शांत गतस्पृह शुची तपस्वी
दासी ज्याची विद्यादेवी ॥४॥
अवंतीस तो वसे कुलपती
त्यास करावी सादर विनती ”
कुलगुरूचें हें उचित बोलणें
वंद्य मानिलें कृष्ण - पित्यानें ॥५॥
त्वरें जाहली सर्व सिद्धता
गुरूकुलांत पाठविण्याकरितां
याता देवकिनें प्रेमानीं
आशीर्वचिलें सुतशिर हुंगुनि ॥६॥
गुरू जगताचे रामकृष्ण ते अतिविनीत वेषांनीं
समित्पाणि होऊन पातले जेथ गुरू सांदिपनी ॥७॥
स्वर्गामधला देवगुरूचा
आश्रम केवीं असेल साचा
तें जरि नाहीं ठाउक कवणा
याहुन त्या परि विशेषता ना ॥८॥
कल्पतरूंचें उपवन तेथें
असेल पुरवित मनोरथांतें
परी येथची नवलाई ही
वासनास मुळिं उद्भव नाहीं ॥९॥
संतहृदय जें परदुःखांनीं
क्षणांत पाझरतें कळवळुनी
तेंच आश्रमाप्रत या भूषण
तेथ चंद्रकांता जरि मान ॥१०॥
सकलहि विश्वाची सुंदरता
वसे येथ शिकण्या सात्विकता
मंत्रपूत आहुति - गंधानें
पवित्रतेचें चढतें लेणें ॥११॥
वेदघोष गंभीर तेथ नित भरवी वातावरण
तेज विलक्षण देत तया कीं निष्कलंक आचरण ॥१२॥
उंच तरू भिडले स्वर्लोका
मुनिकीर्तीचे जिने जसे कां
विविध फुलांचा फुले ताट्या
बहर जणूं आला सद्भावा ॥१३॥
सरस्वतीच्या प्रसन्न गालीं
आनंदानें जी खळि पडली
तेंच सरोवर येथ मनोहर
जलांत पावें स्मित रूपांतर ॥१४॥
पशुपक्षी उपवनांत रमले
जन्मजात निज वैर विसरले
सत्संगाचा वसंत अभिनव
प्रेमलतेसी फुलवी पल्लव ॥१५॥
छात्र नवागत शुकवचनांनीं
पाठ विसरले घेति जाणुनी
मयूर नृत्यें रिझती वृत्ती
दुजी उपाधी रंजक नव्हती ॥१६॥
शीततेस शांतसा विसांवा
वनांत त्या सर्वदा असावा
अंधारा परि लवहि ना ठाय
पाप वसे सद्हृदयीं काय ॥१७॥
श्रुतिस्मृती उपनिषदें आगम रमती विद्या सकला
जेथ तया आश्रमीं हरी ये भजण्या गुरूपद - कमला ॥१८॥
ब्रह्मपूर्ण जें सगुण गोजिरें
शिष्यभाव तें धरी आदरें
आचार्यासी तईं वाटलें
विद्येचें तप फळास आलें ॥१९॥
दोघांचेंही करूनी स्वागत
आश्रमनियमा कथिले त्यांप्रत
बलरामासह मग मनमोहन
आरंभीं विद्यार्था - जीवन ॥२०॥
ब्राह्ममूहूर्ती सोडुन शयना
शुचिर्भूत करि ईशस्मरणा
समंत्र देई अर्ध्य रवीतें
रूप आपुलें निरखुन तेथें ॥२१॥
प्रथम करावी बहु गुरुसेवा,
पाठ जवळ बसुनी मग घ्यावा
करितां प्रभू तो वेदाध्ययन
चढे ऋचांना तेज विलक्षण ॥२२॥
यावी कन्या सासुरवासी
बहुदिवसांनीं मातृगृहासी
मग ती हर्षित दिसते जेवीं
तशी ऋचा हरिमुखीं दिसावीं ॥२३॥
फलमूलांचें भोजन वाही स्वशिरीं समिधा काष्ठें
प्रेमळ निर्मळ पाहुन वर्तन मुनिवर मनिं संतुष्टे ॥२४॥
आज्ञा गुरूची जणूं पायरी
यशोमंदिराप्रत नेणारी
मानुन तत्पर करीत पालन
कधींच पुसलें नाहीं कारण ॥२५॥
गुरूवचनावर भाव धरावा
जीवाचा जणुं अमोल ठेवा
अनन्यचित्तें ऐकत जाण
सर्वांगांचे करुनी कान ॥२६॥
गुरूपत्नीची कृष्णावरती
विशेष वत्सल जडली प्रीती
पुत्रप्रेमा तिचा भुकेला
हरिसहवासीं तृप्त जहाला ॥२७॥
आश्रमवासी इतर बटूंना
हृदयविसांवा म्हणजे कान्हा
सुदामदेवा वाटतसे तर
श्रीहरि माझा प्राण बहिश्चर ॥२८॥
पान्हवती ना धेनू हरिविण हरिण न मृदु तृण खाती
फार काय फुलतीं न फुलेंही, जीवन त्यां श्रीमूर्तीं ॥२९॥
स्वच्छ दर्पणीं बिंब पडावें
रत्नासी निज तेज चढावें
शशीप्रती पूर्णिमा मिळावी
हरीस आल्या विद्या तेंवी ॥३०॥
परमेशाच्या ज्ञानीं साची
शास्त्रें कां भर पडावयाची
उलट हरीच्या रसनामात्रें
तदा उजळली सकलहि शास्त्र ॥३१॥
कुंभोद्भव मुनि महासागरा
श्रुतिशास्त्रांचा तसा पसारा
आत्मसात केला लीलेनें
तेथ अल्पकाळांत हरीनें ॥३२॥
अंगांसह वेदां चामासी
षट्सप्ताहीं षट्शास्त्रासी
चौदा दिन चौदा विद्यांना
प्रहर एक प्रत्येक कलांना ॥३३॥
शस्त्रास्त्रें दिन शिकला कांहीं
एक वर्ष गुरूसदनीं राही
थोरांचे पथ जन अनुसरती
म्हणुन वागला प्रभु या रीती ॥३४॥
काय अन्यथा कारण आहे हरिसी विद्याध्ययनीं
ज्यास शोधितां कुंठित झाले बुद्धि, श्रुति, मन, वाणी ॥३५॥
समाप्त होतां विद्याध्ययन
प्रेमें वंदुन गुरूचे चरण
वदत हरी बहु विनम्र भावीं
“ काय दक्षिणा मी अर्पावी ? ॥३६॥
जरि मम तनुमनधनसर्वस्वा
धनी असां आपण गुरूदेवा
अपांपतीही असुनी सागर
सरिज्जलाचा घे उपहार ” ॥३७॥
वसुदेवात्मज हृदयीं धरूनी
प्रेमभरें वदले सांदिपनी
“ काय दक्षिणा आणिकघ्यावी
श्रीहरिगुरू ही दिधली पदवी ॥३८॥
यांत सर्वही मला मिळालें
अतां न कांहीं हवें निराळें
ईशाचा अवतार तुझ्यासम
शिष्य जाहला हें भूषण मम ॥३९॥
सच्छिष्यानें विद्या घेतां तीच दक्षिणा गुरूसी
पुरेपूर ती लाभे मजला, हे सखया हृषिकेशी ” ॥४०॥
हरी निरोपा घेत ऐकतां
त्वरें तेथ आली गुरूमाता
वदत असे ती करुणवत्सला,
“ खरेंच कां हरि घरीं निघाला ॥४१॥
कैशी गति होईल तुझ्याविण
उदास दुःसह गमेल जीवन
तुझ्याकडे बघतां स्नेहाळा
पुत्रशोक मम पार विराला ॥४२॥
आतां करुं मी काय ? ” वदोनी
माय ढाळिते नयनीं पाणी
“ पुत्राहुन ही अधिकचि होता
लळा लागला तव मम चित्ता ” ॥४३॥
म्हणत हरी ठेवुन शिर चरणीं
“ शोक न लवही करणें जननी
तुम्हां उभयतांच्या सेवेची
संधी मज ही दिधली साची ॥४४॥
मृतपुत्रा तव परत आणितों, माते, मी तुजपाशीं
हीच दक्षिणा सादर माझी समजा गुरूचरणांसी ” ॥४५॥
गिळिला मणि सर्पे उगळावा
भूगत - निधि सहसा गंवसावा
स्फुरे विसरलेला जणुं मंत्र
आणी हरि सागर - गत - पुत्र ॥४६॥
विजयी भव, नमिता आचार्ये
चिरंजीवी हो, कवळुन आर्यें
विसर न आम्हां, सख्या श्रीहरी
गद्गदकंठें म्हटलें इतरीं ॥४७॥
रामकृष्ण जों वनराजीतें
लीन न तों निरखित होते ते
विरहाश्रूंनीं त्या सकलांचे
मचुळ होत लव वारि तळ्याचें ॥४८॥
पूर्ण करून विद्यासंपादन
हलधर तेवीं श्रीमधुसूदन
परतुन ये कळतां मथुरेचे
जन झाले बहु हर्षित साचे ॥४९॥
शिंग, तुतार्या, झांज, खंजिरी, वाजवीत हर्षानें
सामोरे येती जन गर्जत, उधळित गुलाल, सुमनें ॥५०॥
पुढतीं शृगारित शुभ गजवर
ज्यांच्या रंगित सोंडा सुंदर
करिताती ध्वनि सुवर्ण घंटा
रत्नमालिका रुळती कंठां ॥५१॥
औक्षण केलें सुवासिनींनीं
शीला रक्षक या अभिमानी
तारक पालक हरी स्वभावें
वंदन करिती पुरजन भावें ॥५२॥
विद्येनें संपन्न मुकुंद
वसुदेवा दे अति आनंद
सकलकलायुत बघुन शशीतें
सागरास जणुं यावें भरतें ॥५३॥
जननी - जनकां गर्ग - मुनीतें
वंदी माधव लववुन माथे
गुरुजन करिती सहर्ष कौतुक
प्रश्न कुशलते पुसुनि अनेक ॥५४॥
स्वस्थ जरा होउन कंसारी बोधितसे अधिकारी,
“ न्याय कोष सेना यावरती पुरवां दृष्टी सारी ॥५५॥
नृपासनासी ये स्थिरता ती
याच तिहींच्या शक्तीवरती
असतां यासह मंत्राचें बळ
राज्यासी भय नुरे एक तिळ ॥५६॥
खलपाशांतुन सुटका झाली
सत्ता अपुल्या घरांत आली
येवढेंच ना सुखवी जनता
टिके शांतता जरी सुबत्ता ॥५७॥
अवश्य जें कां प्रथम कराया
तें टाळुन मग पुढचें वायां
पाया अजुनी भरला नाहीं
कळसास्तव घ्या उजळा कायीं ॥५८॥
यास्तव सावधता बहु व्हावी
हयगय लवही कुठें नसावी ”
अशी रीत लावुन राज्यासी
बनवियलें आदर्श तयासी ॥५९॥
उसनें घेण्या जामाताचें मर्दुनिया कृष्णास
मथुरेवरती येत चालुनी जरासंध मगधेश ॥६०॥
सवें घेउनी अगणित सेना
रथी, पदाती, अश्वगजांना
सुसज्ज सकलहि शस्त्रास्त्रांनीं
कुवासना जणुं मदकांमानीं ॥६१॥
वादळांत सांपडतां नौका
लाटांचा वर बसे तडाखा
सेनाघात तसे वरचेवर
कंससासरा करि मथुरेवर ॥६२॥
सूडबुद्धिनें भरला साचा
रणोत्साह उन्मत्त तयाचा
विषें माखलेली तरवार
तशीच ती तद्वृत्ति भयंकर ॥६३॥
रागाचे सोडित सुस्कारे
जरासंध गर्जत हाणा रे
जसा कढतशा धूमा ओकित
अग्निमुखी गडगडतो पर्वत ॥६४॥
रामकृष्णही सुसज्ज झाले येतां तें परचक्र
रक्षणकरिता हरि असल्यावर होत न रोमहि वक्र ॥६५॥
दोन दिव्यरथ हरिसेवेस्तव
अवतरले मणिभूषित अभिनव
ध्वज गरुडांकित एकावरतीं
चढे तयावरतीं श्रीमूर्ति ॥६६॥
नीलशरीरीं सुवर्णवसनें
मेघ खुले जणुं कोमलकिरणें
शार्ङ्गशरासन शोभत हातां
पाठीवरतीं लटके भाता ॥६७॥
होउन वीरश्री - संचार
उग्रपणा लव नसे मुखावर
सुवर्ण कितिही जरी तापले
तप्त - लोहासम कधिं कां दिसलें ॥६८॥
तालतरूंचें चित्र तयावर
राम बसे हल - मुसल - गदाधर
अबद्धमंत्रें भैरव खवळे
तसें उग्रपण धारण केलें ॥६९॥
बघुन तया समारांत कोपला जरासंध निजचित्तीं
धांवत येउन म्हणत हरीसी, “ धनु धरिसी कां हातीं ॥७०॥
पिळतां अधरा दूध निघावें
त्या तुजसह कां मी झुंजावें
घरीं मुलींसीं खेळत बस, जा
मजपुढतीं नच दावी गमजा ॥७१॥
कपट करोनी अपुला मामा
वधिलासी तूं स्वकरें अधमा
क्षणहि न थांबावें मजपुढतीं
जीवाची जर असली प्रीती ” ॥७२॥
वदे हरी उपहासुन त्यातें
“ बाणरहित तव दिसती भाते
करी, न बोलत, बल असतां मा
खणखणतो बघ कुंभ रिकामा ” ॥७२३॥
सहन न झालें वच असुरा तें
खवळुन चावी निज अधरातें
रागानें शतशत फेकी शर
सेनाही करि बर्ष हरीवर ॥७४॥
शूल, परिघ, तोमर, खङ्गांची
छुरिका बहुमुख - शिलीमुखांची
भीड जाहली एकच सहसा
श्याम दिसे मेघावृत - रविसा ॥७५॥
परि नच टिकला शोक पळावर मथुरानरनारींचा
झांकतील किति गवती काड्या प्रखर भाग वह्नीचा ॥७६॥
विफल जाहली सकलहि शस्त्रें, शब्द अनुभवापुढतीं
अपूर्व विक्रम बघुन चरकला जरासंध निजचित्तीं ॥७७॥
श्रीकृष्णाचा एकच बाण
शतशस्त्रांसी निवटी जाण
रिपु रुधिराची वाहे सरिता
शव - कर चरणा ये जलचरता ॥७८॥
चंडमेघसम योद्धे भिडती
गर्जत पुढती सरती फिरती
शस्त्रें खटकुन चमके चपला
रुधिर न जणुं जलवर्ष जहाला ॥७९॥
घायाळांचे ते चीत्कार
वीरांचे हुंकार भयंकर
गर्ज घोर हो एकच साचा
तये तडकला घुमट नभाचा ॥८०॥
प्रेतांचा खच पडे चहुंकडे
फिरूं लागली नभीं गिधाडें
तुंबळ झालें रण यापरि तें
हर्ष वाटला विजयश्रीतें ॥८१॥
रणदेवी मग वरी हरीसी अर्पुनिया जयमाला
मथुराजनकृत जयघोषानें व्योम भाग दुमदुमला ॥८२॥
हतबल मगधाधिप निजपाशीं
आवळुनी बलराम तयासी
सजला वधण्या मुसलाघाते
तोंच हरी आवरी तया तें ॥८३॥
“ अतांच याचा वध न करावा ”
राम वदे उपहासुन “ वावा,
अवध्य वधितां अघ जें जोडें
वध्य सोडितां तेंच, न थोडें ” ॥८४॥
परि न मानिलें श्रीहरिनें तें
सोडुन दिधलें जरासुतातें
राजनीति - कुशलांचे हेतू
उघड न वदतां येति परंतू ॥८५॥
जया अवकळा विशेष आली
असुर असा मुख घालुन खालीं
परते पावुन घोर निराशा
जळत सर्पसा अक्करमाशा ॥८६॥
त्वरित जमवुनी खलजन सेना पुनरपि करित चढाई
ठेंच लागली तरिही मूर्खा येत नसे चतुराई ॥८७॥
गिरिशिखरावर कितिही वेळां
मेघ वादळासह आदळला
तरि लागत त्यासीच रडावें
मगधपतीचें तसेंच व्हावें ॥८८॥
घेई अपयश वारंवार
करावया हलका भूभार
तदीय हे उपकार म्हणावे
अधमांतहि चांगलें बघावें ॥८९॥
भारतभूच्या दुर्दैवासी
जन्म जाहला जिच्या कुशीसी
अशी कुबुद्धी सुचली त्यातें
साह्या विनवी परकीयातें ॥९०॥
कालयवन नामा नृप बर्बर
क्रूर कुटिल बळ ज्याचें दुर्धर
देउं करून त्या अर्धा वांटा
सेनेसह बोलवी करंटा ॥९१॥
गुप्तचरांनीं सकलवृत्त हें निवेदिलें कृष्णासी
विचार पडला बलरामातें भय उपजे मथुरेसी ॥९२॥
रोगासह जरि अपथ्य होतें
भिववी ना तें रसवैद्यातें
तेवीं श्रीहरिच्या चित्ताची
शांती स्थिरता लव न ढळेची ॥९३॥
वदे सांवळा निज जनकातें
“ उचित असे त्यजणें मथुरेतें
कालयवन तो देउन वेढा
अपणास्तव यां करील पीडा ॥९४॥
आजवरी जे छल युद्धाचे
शिणले तेणें जन मथुरेचे
ताण अधिक कीं सोसेल ना यां
रणभू - पालट हवा कराया ॥९५॥
अपरदिशेसी सिंधुतटावर
रचावया मी कथिलेसें पुर
त्वष्ट्यानें सहजीं ह्या वेळीं
असेल रचला समाप्त केली ॥९६॥
म्हणुन सकल यादवांस घेउन तुम्ही त्वरित जा तिकडे
इकडे मी या यवनमदाचे सहज करिन शत तुकडे ” ॥९७॥
एकटाच सोडणें हरीचें
मानवलें नच कुणासही तें
कुणी तरी वंचुन हृदयासी
जपेल कां देहास विशेषीं ॥९८॥
परी हरीनें चतुरवचानें
राजकारणी व्यवहारानें
समजविलें त्यां हृद्गत अपुलें
मथुरेंतुन मग सर्व निघाले ॥९९॥
पश्चिमसागरतटीं मनोहर
बघती यादव विशाल नव पुर
दशयोजन विस्तार जयाचा
विष्णुलोक ये भूवर साचा ॥१००॥
इंद्रगर्वपरिहार करी हरि
भय सरलें मग कनकगिरी वरि -
आले कीं सागरोदरांतुन
उन्नत भवनें तशी विलक्षण ॥१०१॥
शैल रैवतक करी पहारा
ज्या रवि दे कांचनकरभारा
कड दुसरी सागर संरक्षी
पिता जसा शिशु घेउन कुक्षीं ॥१०२॥
भव्य तटांच्या गोपुरवेशी पुररक्षण करिताती
पूर्णजलानें अथांग विस्तृत खंदक वेढा देती ॥१०३॥
प्रमदवनें, आराम, उपवनें,
बहरा आलीं सुफलें, सुमनें,
द्राक्षें, दाडिम, रसाल पेरू
मधुलिंबें, बदरी, रुचि चारु ॥१०४॥
फणस, गरे ज्यांतिल मधुकोमल
मृदुहृदयाचे उन्नत नारळ
काजुफळें सुंदर तरि विनयी
केळीं, पोफळ, जांभुळ, पपई ॥१०५॥
सुवर्णचंपक, हिरवा चांफा,
मोगरिचा शशिसुंदर वाफा,
पाटल, जाई, जुई, मालती,
केतकी न धरि भुजगीं प्रीती ॥१०६॥
श्यामल हिरवें वन तुळशीचें
पावन करिते भाग दिशांचे
कुंदकळ्यांचे गुच्छ हांसती
पारिजात, निशिगंध, शेवती ॥१०७॥
भरुनी ओंजळ मृदु सुमनांनीं स्वागत करिती प्रेमें
वाटे येथचि नित्य रमावें सोडुन सर्वहि कामें ॥१०८॥
चंद्रशिलानीं वा स्फटिकांनीं
रचिली सदनें शुभ्र हिमानीं
रजतगृहें, कांहीं कनकांची
शोभा केवीं वदूं तयांची ॥१०९॥
प्रवाळ, मरकत, पद्मराग मणि,
पुष्कराज, वैडूर्य, शिलांतुनि
इंद्रनील, हीरक, गजदंतें
भाग गृहांचे घडले होते ॥११०॥
असे मंदिरा थोर अगाशी
चंद्र - करें धवळिती जियेसी
सभोंवताली डुलतें उपवन
तेथ सुखाचें परिमल सेवन ॥१११॥
विहार करण्या जलीं दीर्घिका
कलह्म्सा जी रुचे भावुका
निशांत उज्ज्वल अवरोधास्तव
विनय न सोडी अनिल जिथें लव ॥११२॥
मंगल चित्रें प्रवेशदारीं कोरियलीं रत्नांनीं
पडदे सुंदर मौक्तिक - मंडित रुळती खिडक्यांवरूनी ॥११३॥
अखंड यौवन कीं सुरयुवती
पुष्पवाटिका ऐशा भंवतीं
प्रसन्न भासे हर्म्य तयासी
पति प्रियेच्या जणुं करपाशीं ॥११४॥
कुंज लतांचे करिती शीतल
भास्करतेजा दाहक उज्ज्वल
रमणीचे स्मितहास्या पाहुन
संताप न कां जाई वितळुन ॥११५॥
धारायंत्रें सहस्रलोचन
करिती सुरभितजलाभिषिंचन
थुइथुइ नर्तन जलबिंदूंचें
विलसित अवखळ रम्य शिशूंचें ॥११६॥
सरोवरीं कलरव हंसांचा
सुगंध तेवीं अरविंदांचा
जळ निर्मळ सुंदरा - आकृती
मन विसरे निज चंचलवृत्ती ॥११७॥
नियमबद्ध रचना नगरीची रेखिव सर्वहि होती
विचित्रता सारखेपणासह मिरवे धरुनी हातीं ॥११८॥
सुरेख, सम, विस्तृत, ऋजु वीथी
सुजनगतीची जणुं कीं साथी
अशोक - चंपक - बकुळ - रसालीं
शीतल छत्रें जीवन धरिलीं ॥११९॥
बहुविध वस्तूंनीं भरलेल्या
पण्यावीथिका गजबजलेल्या
देशदेशच्या कुशलपणाचें
सार्थक होई इथेंच साचें ॥१२०॥
बहुमोलाची सुंदर वस्त्रें
सूक्ष्म रेशमी मृदुल विचित्रें
दागदागिने नवरत्नांचे
गुजरींतुन जणुं वैभव नाचे ॥१२१॥
क्रीडोद्यानें सुरचित जैसीं नंदनवनिचा गाभा
चौक मनोहर विशाल तेथें वाढविती पुरशोभा ॥१२३॥
द्वारेचें या यथार्थ वर्णन
करण्यासी दुर्बल मम आनन
इच्छेमधुनी भगवतांचें
प्रगट जाहलें रूप जियेचें ॥१२४॥
रमले यादव वैभवशाली
राजराजपद मानुन खालीं
सुखां न्यूनता नव्हती कांहीं
गण सिद्धींचा राबत राही ॥१२५॥
मथुरेसी वसले श्रीमूर्ती
कालयवन तो मगधप्रेरित
ससैन्य ये पुरपुर विध्वंसित ॥१२६॥
जवळ अजुन जंव सैन्य न आले
एकटेच भगवान निघाले
खुले कस्तुरी चिह्न ललाटी
वनमाला शुभ रुळते कंठीं ॥१२७॥
सुवेषमंडित पीतांबरधृत हास्यवदन सुखकंद
एकलाच ये सन्मुख यवना लीलानट गोविंद ॥१२८॥
श्यामलं कोमल सुंदर मूर्ती
बघुन शंकला खळ निज चित्तीं,
हाच काय तों कंस - निबर्हण
कमल करी कां तरुचें छेदन ॥१२९॥
पुष्पाहुन ही कोमल काया
हात न उचले वार कराया
मगधेश्वर हो म्हणुन पराजित
शौर्य वसे याजवळ न किंचित ॥१३०॥
मनमोहक सुंदरता याची
होइल भूषा मम कोषाची
धरूं यास, खलनिजकटिकवळी
“ शस्त्र न एकहि याचे जवळीं ” ॥१३१॥
श्रीमूर्ती परि चपल - गती ती
गंवसे कां तरि खलजन - हातीं
पाठलाग करि यवन सुवेगें
सहचर सकलहि पडले मागें ॥१३२॥
कालयवन करि यत्न विशेषीं धरण्या पंकजनयना
नीचोत्थित अपवाद जसा कां पाठीं लागत सुजना ॥१३३॥
चढण बिकट बहु गिरिवरची ती
दाट लता - तरु वाट न देती
शील तरे विपदांस तसा हरि
रक्ताळुन तो यवन शिणे परि ॥१३४॥
सांपडला करि असे गमावें
तोंच जनार्दन दे हुलकावे
भरुनी आले पाय खलाचे
धाप शिणविते भाग उराचे ॥१३५॥
घाम ओघळे सकल शरीरीं
सहसा वळुनी बघत मुरारी
अंतीं खल दे शिव्या मुखानें
चिडती नीचचि पराभवानें ॥१३६॥
करकर दांतीं अधरां चावित
थांब, पळपुट्या हरिवर गर्जत
करि धडपड बळपणास लावुन
तरि न करीं गवसे मनमोहन ॥१३७॥
बघतां बघतां श्रीहरि अंतीं गुहेंत एक्या शिरला
लपला आपण मुचकुंदासी पांघरुनी निज शेला ॥१३८॥
नृप हा इक्ष्वाकूंचा वंशज
मांधात्याचा विजयी आत्मज
अमरास्तव निवटुनी दानवा
दीर्घ - काल घे येथ विसांवा ॥१३९॥
लाथ हाणितां यवन मदांध
मुचकुंदा समजून मुकुंद
जागृत पाही जइं निजदृष्टी
राख जाहला खल तिन चिमटी ॥१४०॥
शाप बांधले निरागसांचे
असूं पेटले पतिव्रतांचे
आज उद्यां परि अवश्य येतें
पापाचें कटू फल उदयातें ॥१४१॥
चकित करित भूपास अंतरीं
प्रगटे यदुकुलदीप पुढारी
उमज पडत ना मुचकुंदाप्रत
स्वप्न दिसे वा आहे जागृत ॥१४२॥
भूलोकीं वा सुरलोकीं मी अतलीं अवतरलों कीं
गोंधळुनी नृप अनिमिष नयनीं वरिवरि हरिस विलोकीं ॥१४३॥
कोण यक्ष गंधर्व, म्हणे नृप
“ फळास अथवा आलें मत्तप
असामान्य रमणीय रूप हें
मानव - सुर असुरांतिल नोहे ॥१४४॥
दीप्त तेज रविचें आह्लादक
व्हावें त्यापरि दिसतें कौतुक
विष अथवा श्रम यांच्यावांचुन
झरें अमृत तव मधुहास्यांतुन ॥१४५॥
गतचंचलताश्रीची कांती
तुझें पदनखीं समावली ती
चरण - तलाच्या स्पर्शानें तव
गमे रम्यता उषेस अभिनव ॥१४६॥
भगवन् तव दर्शनसौभाग्यें
कृतार्थ झालीं ममबहिरंगें
अंतर पावन व्हाया श्रवणीं
पडो गिरा मधु विनवी चरणीं ॥१४७॥
वदुन असे शिर नमवुन ठेला आदरभरितमनानें
मधुसूदन निजवदनकरानें स्पर्शित त्या प्रेमानें ॥१४८॥
स्रवे मधुरतम गिरा हरीची
हो पुलकित तनु मुचकुंदाची
शयनोत्थित यद्दर्शन व्हावें
आस वाहिली तुझिया जीवें ॥१४९॥
तोच असे मी वसुदेवात्मज
जनन घडे मृदुकिरणकुलीं मज. ”
भाषण या परि करितां देवें
आनंद न न्रुपहृदीं समावें ॥१५०॥
आठहि सात्त्विक भाव उदेले
गमे सुकृतगण फळास आले
पदीं ठेवुनी शिर विनयानें
अपार केलें स्तवन नृपानें ॥१५१॥
“ रसना न वदो तव नामाविण
तव पदयुगुलीं सतत रमो मन
प्रेम विपुल दे दुजे नको मज ”
प्रसन्न झाला मनीं अधोक्षज ॥१५२॥
“ तथास्तु भूपा मिळेल तुजशी अनपायिनी सुभक्ती
मत्सायुज्या येशिल अंतीं, ” बोलत करुणामूर्ती ॥१५४॥
नमुन पुनः श्रीजगदीशासी
येत सरळ नृप हिमालयासी
यवनचमूचे करुं निर्दालन
परते पुरनपि पदनतपावन ॥१५५॥
यमाकरीं यवनां सोंपवुनी
निघे द्वारके यदुकुलतरणी
तोंच जरासुत अयुत चमृसह
हरीस रोधी आस अजर अह ॥१५६॥
मगध नृपाचें आयु न सरलें
म्हणुन तयासीं समर न केलें
गिरीवरी हरिसह संकर्षण
चढे नाम ज्या असे प्रवर्षण ॥१५७॥
शिखरें उंचचि भिडलीं गगना
टोक दिसेना मोडुन माना
पाताळाच्या पाउल वाटा
दर्या अशा ये बघतां कांटा ॥१५८॥
कडे खडे तुटलेले भीषण
वीर उभे जणुं छाती काढुन
घळी उतरत्या झरे तयांतुन
लपाछपीचे करिती नर्तन ॥१५९॥
उग्र, उबट ये वास, पांखरें गोड काढिती सूर
भुर्या निळ्या टेकड्या पसरल्या क्षितिजावरती दूर ॥१६०॥
रान निबिड बहु हिरवें निळसर
शिरूं न धजती सूर्याचे कर
वनदेवीच्या पदराखालीं
अंधारा अभयता मिळाली ॥१६१॥
हिंस्र पशूंना भर दिवसांही
स्वैर फिराया अडचण नाहीं
गुरगुर नित कधिं गर्ज भयंकर
कंपित व्हावें धीरांचे उर ॥१६२॥
निबिडवनीं त्या हरि गवसेना
शोधुन सारी दमली सेना
म्हणुन लाविला वणवा मूर्खीं
तेच जळाले तयांत शेखीं ॥१६३॥
“ जळे सैन्य तरि जळो, न खंत,
मम शत्रूचा झाला अंत ”
समाधान हें जरासुतातें
लिखित विधीचें हांसत होतें ॥१६४॥
अग्नीसी सामर्थ्य जयाच्या बळें तया श्रीरंगा
स्पर्शहि करण्या ज्वाला केवीं शकेल, बुध हो, सांगा ॥१६५॥
सराम हरि ये द्वारानगरीं
सुखावली मग पुरी अंतरीं
सुंदरते तेज निराळें
जसें कांतसुख - सेवित - बालें ॥१६६॥
शासन होतें वसुदेवाचें
तरी मुकुंदीं लक्ष पुरीचें
श्वशुरवचासी असते तत्पर
कुलजेचें परि चित्त पतीवर ॥१६७॥
व्यापी त्रिभुवन यदुकुलकीर्ति
त्रिविक्रमाची जणूं पदकांति
विधिभवनीं मुनि नारद गाई
द्वारेसम पुर दुसरें नाहीं ॥१६८॥
विशाल उत्सुक अबोधसुंदर
वेढितसे तिजसी रत्नाकर
निज कोषांतिल हीरकमोती
उधळी तिजवर निर्मळराती ॥१६९॥
जगदीश्वर हरि सहवासें जी झाली यथार्थनामा
राजकारणें खेळविते ती यादव सभा सुधर्मा ॥१७०॥
यादव - विक्रम रक्षित - सागर
हतबल झाले जलपाटच्चर
यवन, हूण, शक, बर्बर, यांना
भरतभूकडे बघवतसे ना ॥१७१॥
शास्त्र - कला - व्यापार - मिषांनीं
वैभव नांदे तेथ सुखानीं
रामकृष्ण हे शशिसूर्यासम
अशांततेचा वितळविती तम ॥१७२॥
कमलासन - परिषद्गत रेवत
आनर्ताधिप यश तें ऐकत
ब्रह्मवचें तो द्वारवतीसी
ये उजवाया निजकन्येसी ॥१७३॥
भूपें निज तनया अनुरागीं
मृगनयना रेवती शुभांगी
बलरामासी अर्पण केली
उभयकुला जी ललाम झाली ॥१७४॥
थाटांत लग्न झालेम अतृप्त कोणी न याचकांमधुनी
वैभव बघुन गमावें वाहतसे येथ साच कामधुनी ॥१७५॥
मथुरारक्षण नांवाचा नववा सर्ग संपूर्ण
लेखनकाल :-
चैत्र शके १८७०
श्रीकृष्ण कथामृत - दहावा सर्ग
( रुक्मिणीपरिणय )
यस्माद्धि शास्त्रसरितामुगमो बभूव
यत् स्वाश्रय तनुभृतां भय - विह्वलानाम्
तापातनोदनिपुणं परमव्ययं तत्
दिव्यं महेश्वरपदाब्जमहं नमामि ॥१॥
ज्यांनी सुंदरमंदिरा उभविले गीर्वाणवाणीस्तव
ज्यांचे वाङ्मय नित्य नूतन असे गोडी उणी ना लव
जे का कौस्तुभ शारदाहृदयिंचे त्या कालिदासांदिकां
प्रेमें वंदन अर्पितो लववुनी अत्यादरें मस्तकां ॥२॥
तेजस्वी सुकुमार मनोहर
रूप पाहता उपजे आदर
मूर्त जणूं का सात्विक भक्ति
अशी शुभांगी विहरत होती ॥३॥
प्रेमदवनी रमणीय आपुल्या
वन नच ते सुरवधू लाजल्या
अनघदर्शनें त्या युवतीचे
रूप घेतले म्हणुन लतांचे ॥४॥
सुडौल आंबा बकुल अशोक
परिजात नव - सुवर्ण - चंपक
कुंदमोगरा जुई शेवंती
नाजुकशी ती फुले मालती ॥५॥
तरुवेलींचे संमेलन तें
भास उपजवी रसिक - मनातें
काय उत्सवी वसंत - कालीं
युव - युवतीं ही खेळुं मिळाली ॥६॥
त्रिभुवनांतही नसेल इतुकें सुंदर उपवन कोठें
सहाय्य घेउन मधुचें मदनें स्वयेंचि रचिलें वाटे ॥७॥
उंच उंच ते तरू सुरूचे
जणू काय घडले पाचूचे
भूषविती त्या प्रेमदवनाला
ध्येयें उन्नत जशीं नराला ॥८॥
भ्रमर घालिती मोहुन रूंजा
बघतां असल्या श्यामल कुजा
नृत्य करावें वाटत मोरा
निज सुंदर पसरून पिसारा ॥९॥
पिक सारस मैनांचें कूजन
तरु विंझण ते द्विरेफगुंजन
परिसुनिया भ्रम पडे मनाला
उपवन कीं ही गायन - शाला ॥१०॥
नानाकृति कारंजा भवतीं
इंद्र - धनुष्यें बागडताती
गमे रंग इथलेच वसंतें
हरिले पुष्पां रंगविण्यातें ॥११॥
दहा पाकळ्यांच्या कमलासम जें स्फटिकांनीं रचिलें
मधें एक कासार जयासी जल न चांदणें भरलें ॥१२॥
विमल असें की सज्जनमानस
वः शिशुचें हें हास्य निरागस
तेज तरळतें वधू लोचनीं
तेंच होत कीं येथिल पाणी ॥१३॥
निळीं मनोहर तांबुसपिवळीं
पांघरलीं जणु वसनें कमळीं
शीतलशय्येवर लहरींचे
खेळ चालले मोहक त्यांचे ॥१४॥
बिसतंतूंची गोडी चाखित
राजहंसगण सलील पोहत
कमळें सुंदर बहुविध रंगीं
बिंबित होती तदीय अंगीं ॥१५॥
शोभा मग ती दिसे निराळी
कोंदणांत जणु रत्नें जडलीं
अतिरमणीया अशी वाटिका
उतरे नंदनवन भूलोका ॥१६॥
प्रमदवना स्वामिनी असे जी
तीस वर्णण्या शक्ति न माझी
जिच्या पदतलीं व्हाया पावन
फुले चौफुली होती उडुगण ॥१७॥
शिशुहास्यापरि भाव तियेचा
सहज मनोहर निर्मळ साचा
शील शुद्ध की धवल जयासम
अनन्यदूषित शिखरींचें हिम ॥१८॥
कुंजलतासी करेत हितगुज कुरवाळीत सुमांना
वसंतशोभेसम देवी ती विहरत सुमनोद्याना ॥१९॥
वगळून गेली मजसी पुढती
धरुनी पदरा तरुं आडविती
गोंजरिते त्या हासुन देवी
कोड मुलांचे पुरवित जेवीं ॥२०॥
मंद सुगंधी मृदुल फुलें तीं
उधळी तिजवरती प्राजक्ती
चंद्रकलेवर लाख चांदणी
जशी वर्षते प्रेमळ रजनी ॥२१॥
फिरून उपवनीं विसावण्याला
पुष्करणीवर ती ये बाला
स्फटिक पायरी तिचे पदतलीं
माणिकमणि निर्मितशी दिसली ॥२२॥
होता पावन तन्मुखदर्शन
कुमुदां लाभे दिनींहि विकसन
काल असे विपरीत जरीही
सत्संगें भय वितळून जाई ॥२३॥
जननी बघतां वत्सल बाळें
तसे हंस तिज समीप आले
शिर कुणी ठेवी अंकावरती
माना घासित फिरती भवतीं ॥२४॥
कुरवाळुन त्या प्रेमभरेसी
देई मौक्तिककवल मुखासी
ठेवितसे जणु सकल चराचर
मातेसम तिज विषयीं आदर ॥२५॥
उभय करी टेकून हनुवटी विचार कसला चित्तीं
करीत असतां तिचा सखीजन हासत जमला भवतीं ॥२६॥
वदे एक लडीवाळपणें तिज
काय चिंतिसी सांग तरी गुज
धुकें विरळ पसरले उषेवर
तशी छटा तव मुखीं खरोखर ॥२७॥
इतकीं बाई खुळी कशी तूं
वदे दुजी हा उघडा हेतू
लग्नावांचुन युवतीचित्ता
असेल कसली दुसरी चिंता ॥२८॥
खरेंच गे तव, अन्य म्हणाली
राजसुताही उपवर झाली
महाराज भीष्मकही तत्पर
शोधण्यांत हिज साजेसा वर ॥२९॥
अनेक राजे धरुनी आशा
दूत धाडिती विदर्भदेशा
समय जाणते चतुर भाषणी
तया जवळ निज चित्र देउनी ॥३०॥
चित्र दावुनी प्रतिदूतानें निजनृप महती गावी
आणि यातची सतत गुंतले महाराज नी देवी ॥३१॥
मघांपासुनी मनांत येतें
तोच उचित या नृप - तनयेतें
वदत कुणीं, यद्दर्शन मजसी
घडलें होतें मधुनगरीसी ॥३२॥
कसे करूं गे तदीयवर्णन
नयन मुके जिव्हेस न लोचन
ओवाळुन शतसहस्र मदना
नखाचीहि त्या दृष्ट निघेना ॥३३॥
सिंहासम गंभीर चालणें
स्मित शुभ झळके प्रसन्नतेनें
गजशुंडा जणुं दीर्घभुजा त्या
बळकट तरि मृदु वाटत होत्या ॥३४॥
वानावा किति अद्भुत विक्रम
म्हणती धरिला गिरी फुलासम
बाळपणीं मारिली पूतना
उद्धरिले यमलार्जुन यांना ॥३५॥
मदोन्नत्त हत्तीसह केलें युद्ध पाहिलें नयनीं
मगधपतीसी अनेक वेळां लोळविलें निजचरणीं ॥३६॥
त्रिभुवन कांपे कंसा थरथर
त्यास दाविलें क्षणांत यमपुर
शौर्य असें हें असुनी देहीं
मधुरपणासी उणीव नाहीं ॥३७॥
इंदीवरतनु पळही दिसतां
हृदयावर मग उरे न सत्ता
वेडे होती जन त्यासाठीं
कृपा जयावर करिते दृष्टी ॥३८॥
प्रेमसागरीचे कल्लोळ
तसे तयाचे मंजुळ - बोल
श्रवणीं पडले ते तरि गमतें
कान चाखिती अमृतरसातें ॥३९॥
लाजवीतसे बुद्धि निधीला
बृहस्पती जणु यापुन शिकला
राजकारणी किती चातुरी
रामराज्य जाहली मधुपरी ॥४०॥
यदुवंशाचा मुकुटमणी तो वासूदेव कंसारी
त्याहुन हीतें योग्य पती ना शोधुन पृथिवी सारी ॥४१॥
सत्य सांगते सखे रुक्मिणी
हरीच वर तूं पाणिग्रहणीं
श्रीविष्णूच्या हृदीं रुळावे
हेंच कौस्तुभा शोभत बरवें ॥४२॥
स्त्रियांत दुसरी नसे तुझ्यासम
तसाच आहे हरि पुरुषोत्तम
समसमास कीं संगम व्हावा
आस लागली ही मम जीवा ॥४३॥
तपें करोनी शत जन्मासी
मिळेल होण्या तदीय दासी
तरी भाग्य तें थोर म्हणावें
एक मुखें मी कितितरि गावें ॥४४॥
ही बघ त्याची छाबी चिमुकली
मम पतिनें जी कुशल रेखिली
दिली भीमकीच्या तइं हातीं
सुवर्णपदकांकित मूर्ती ती ॥४५॥
चिंतित होते चित्त जयासी अबोधपूर्वस्मरणें
तीच गोडहुर्हूर जणूं का रेखियलीच विधीनें ॥४६॥
नयन नीळ कमळासम विकसित
खिळले चित्रीं लवति न किंचित
नृपकन्येसी तदा वाटलें
हृदय काय प्रतिबिंबित झालें ॥४७॥
कुंडलिनी योगांत उठावी
ज्ञानवृत्ति आत्म्यांत मुरावी
भक्त धरावा हृदयीं ईशें
शुभेस त्या सुख गमलें तैसें ॥४८॥
रोम ठाकले देहावरती
आनंदाश्रू नयनीं स्रवती
स्फुरण पावती सकलशुभांगे
सख्या परस्पर हसती अंगे ॥४९॥
हृदय मुकें नित कुलकन्याचें
असें सख्यांनी जाणुन साचें
वृत्त भीष्मका निवेदिले तें
झाला अतिशय मोद तयातें ॥५०॥
वृद्ध जाहलों प्रियबाळांनों मंद आमुची दृष्टि
धन्य तुम्ही स्थळ दाखविलें हें केली मज सुखवृष्टी ॥५१॥
यदुभूषण हा मिळे जावई
असेल कां इतुकी पुण्याई
अपुला आपण यत्न करावा
येइल यश जरि रुचेल देवा ॥५२॥
ज्येष्ठसुता परि नच ते पटलें
तयें कोपुनी पितया म्हटलें
वा ! वा ! इतुका करुन विचार
हाच योजिला काय तरी वर ॥५३॥
वृद्धपणीं निज - बुद्धी चळते
म्हणती जन तें खरेच दिसतें
तुम्हा अन्यथा पटला नसता
कपट - पटू हा गवळी ताता ॥५४॥
राजे आपण चतुःसमुद्री
राज्यहीन तो असे दरिद्री
अशास निज तनया देण्याहुन
फार बरें द्या कूपीं ढकलुन ॥५५॥
मूर्खपणाचें सुतभाषण तें परिसूनि भीष्मक राजा
म्हणे मनीं हा कसा निघाला दिवटा मुलगा माझा ॥५६॥
खुळ्या सारखे करी न रुक्मी
पूर्ण विचारें बोलतसे मी
नच पिकले मम केस उन्हानें
विचार कर तूं शांत मनानें ॥५७॥
शौर्य धैर्य मति बघतां सद्गुण
श्रीकृष्णासी तुळेल कवण
शक्ति जया शत नृप निर्माया
राज्यहीन तो म्हणणें वाया ॥५८॥
रुक्मिणीसही तोच हवा वर
तीही दिसते मूर्ख पुरेपुर
काय तिला कळतें पोरीला
गर्वे ताठुन रुक्मि म्हणाला ॥५९॥
पाहें या तरि तुमची बुद्धि
म्हणुनी इतुकी दिधली संधी
अतां न आपण यांत पडावें
मान आपुले राखुन घ्यावें ॥६०॥
दमघोषाचा पुत्र सुलक्षण चेदि देशचा राज
धीर धीर शिशुपालचि होइल समजा शालक माझा ॥६१॥
आड येवुनी वृथाच मातें
हांसें करुनी न घ्या जनातें
वदुन असें त्या सुताधमाने
भीमकास घातिली बंधनें ॥६२॥
घेउन हातीं सकलहि सूत्रें
निजमित्रासी धाडीत पत्रें
वक्रदंत पौंड्रक शाल्वासी
ससैन्य यावें या लग्नासी ॥६३॥
सन्मानानें करी निमंत्रण
वरदेवा शिशुपाला लागुन
तदा तया मतिमंदा वाटे
स्वर्ग राहिला दोनच बोटें ॥६४॥
शृंगाराया मग कुंडिनपुर
रुक्मी आज्ञा करीत सत्वर
निमुट बापुडे लोक राबती
काय चालतें सत्तेपुढतीं ॥६५॥
वृद्धपणें हतबल झालेला भीमकराजा चित्तीं
व्याकुळ झाला मार्ग दिसेना वदे सुतेसी अंतीं ॥६६॥
प्रिय कन्ये गे भाग्यवती तूं
म्हणुन जडे तव हरिवर हेतू
संमत मजसी निवड तुझी ही
काय करूं परि समर्थ नाहीं ॥६७॥
वृद्धपणीं पुत्राचे आधिन
बाळे सहजाचि होतें जीवन
यांतुन काढी वाट तूं गे
चतुर मुली तुज कथणें नलगे ॥६८॥
देतो आशीर्वाद तुला मी
ईश पाठ राखिल या कामीं
प्रताप आहे तदीय अद्भुत
सिद्धी जाइल तुझा मनोरथ ॥६९॥
निजाग्रजें उन्मत्त - पणानें
अवगणिलें तातास हटानें
ऐकुन झाली व्यथा हृदाला
गोंधळुनी ती जात सुशीला ॥७०॥
कुलरबामिनी माय अंबिके रक्षी मज या समयीं
शरण पदा मी अनन्यभावें मार्ग दाखवी देवी ॥७१॥
हृदयनाथ यदुवंश - विभूषण
रक्षक दुसरा नसेच याविण
तया निरोपूं भाव हृदीचा
कुणी पाठवुन विश्वाचा ॥७२॥
असें मनीं चिंतून सुशीला
बाही सत्वर सुदेवजीला
चरण धुवोनी अर्घ्य समर्पुन
केलें त्याचें सादर पूजन ॥७३॥
वंदन करूनी नम्रपणानें
वदत तयासी नतवदनानें
विप्रवरा मी अनाथ आजी
एक कार्य मम कराल कां जी ॥७४॥
कोमल आहे हृदय आपुलें
विनवाया म्हणुनी मी धजलें
द्वारकेस जाउन मजसाठीं
वळवा श्यामल हरि जगजेठी ॥७५॥
हृदय वाहिलें हरिचरणीं मी तरि मज शिशुपालातें
देण्या सजला ज्येष्ठभ्राता जरि न रुचे पितया तें ॥७६॥
म्हणुन सुदेवा असें करावें
कीं हरिनें मज घेउन जावें
ना तरि माझें समाप्त जीवन
काय कथूं तरि तुम्हास याहुन ॥७७॥
परोपकारी ब्रीद आपुलें
सदया यास्तव याचन केलें
द्विजवर्या मी शरणं तुम्हासी
तारा अथवा मारा मजसी ॥७८॥
वेद निपुण तो सुदेव चित्तीं
हर्षित झाला परिसुन विनती
काकुळती कां इतुकी दीए
यांत धन्यता मला स्वभावीं ॥७९॥
याच निमित्तें जगदीशाचें
दर्शन मजसी घडावयाचें
संशय कसला न धरी आतां
तुझ्या करींच्या परि दे लिखिता ॥८०॥
अल्पहि जरि लिहिलीस अक्षरें श्रीकृष्णास तरी तीं
अर्थबहुल रमणीय जणूं का महाकवीची रीती ॥८१॥
असूं अम्ही विद्वान तरीही
तव वचनाची सरी न येई
भव्य अशा वटवृक्षावरती
मधुर सुवासी फुलें न फुलती ॥८२॥
लिही त्वरेनें वेळ करी ना
आजच आहे मुहूर्त गमना
आग्रह केला बहुत सखींनीं
कशीतरी मग धजे शालिनी ॥८३॥
रत्नशलाका घेउन हातीं
धवल रे श मी प ट्टा व र तीं
जणू प्रेममय केशररंगी
हेत हृदींचे लिही शुभांगी ॥८४॥
हृदय दुजें तें लिखित घेउनी
सुदेव ये द्वारकापट्टणीं
करीत हरि सानंद स्वागत
बहु उपचारें पूजी त्याप्रत ॥८५॥
निरिच्छ विद्यावंत दयाळू शांत तपोधनराशी
असे द्विजोत्तम आपण आलां कृतार्थ करण्या मजसी ॥८६॥
भवत्पदरजें पावन झालें
सदन न नुसतें पट्टण सगळें
सेवा सांगुन मज भूदेवा
उपकृत हा नत दास करावा ॥८७॥
हरि वचनें त्या द्विज गहिंवरला
नावरती नयनाश्रु तयाला
तुलाच शोभे हरि हें कौतुक
सन्मार्गाचा तूं उपदेशक ॥८८॥
नेत जसा द्विज नलसंदेशा
तसेंच मातें समज परेशा
विदर्भ नृप नंदिनी रूक्मिणी
पाठवीत मजसी तव चरणीं ॥८९॥
त्वरा करावी रक्षाया तिज हेंच मागणें माझें
वाट पाहते ती तव घे हें पत्र तुला दिधलें जें ॥९०॥
गोल टपोरें सुरेख अक्षर
उत्सुकतेनें बघे परात्पर
हृच्छुक्तींतिल भाव मौक्तिका
प्रेमगुणीं गुंफिलें जणूं का ॥९१॥
ऐकोनियां भुवनसुंदर सद्गुणातें
कानीं शिरून हरिती सकल श्रमातें
सौंदर्य जें बघुनि सार्थक लोचनांसी
माझें जडे हृदय नाथ ! भवत्पदासी ॥९२॥
विद्याधिकार - कुलशील सुरूपताहीं
साजेलशी तुज जगांत कुणीच नाहीं
जाणीव ही असुन देव कुलीन कन्या
तूंतेंच इच्छित पती म्हणुने अनन्या ॥९३॥
चित्तें वरून तुज मी तव होत जाया
घे धांव सत्वर अतां मज वांचवाया
घालील धाड शिशुपाल कळे न केव्हां
कोल्हा स्वभाग पळवी रुचते न सिंहा ? ॥९४॥
केलीं व्रतें नियमही धरिले विशेषीं
पूजीयले सतत देव गुरुद्विजासी
ना लाविले कधिच विन्मुख याचकातें
तें पुण्य उद्यत करो तुज यावयातें ॥९५॥
आले ससैन्य मगधेश विदूरथादि
रक्षावया परिणयातुर भूप चेदि
सर्वां तयास निज बाहु पराक्रमानें
दंडून ने मजसि राक्षसपद्धतीनें ॥९६॥
आली समीप बहु लग्नतिथी मदीय
आतां विलंब करण्या उरली न सोय
मी योजना तुज कशी सुचवूं शकेन
झालें भयेकरून या मतिहीन दीन ॥९७॥
इच्छा जरी न पुरली मम पद्मनाभ
देईन जीव सहसा हसडून जीभ
घेऊन जन्म शत उग्रतपें तुझे तें
पावन पाय शिवही नमितो जयातें ॥९८॥
भावभरित ती प्रेमळ भाषा
रिझवी डुलवी श्रीजगदीशा
अर्थगर्भ थोडक्यांत सुंदर
लिही तोच कीं चतुर खरोखर ॥९९॥
अभिनव कोमल भाव उदेले परमेशाच्या हृदयीं
बहरा येई आम्रतरू जणु ऋतुराजाच्या उदयीं ॥१००॥
विविध छटा तरळती मुखावर
श्री हरीच्या शंकला विप्रवर
परि प्रभूचा दक्षिण नयन
स्फुरुन तयाचें शांतवीत मन ॥१०१॥
अनिंदितेच्या मृदु हृदयातें
अवमानावे गमे कुणातें
फुलें जरी चरणास वाहिलीं
म्हणुन कुणी का पदीं तुडविलीं ॥१०२॥
वदे प्रगट तो सुदेव सज्जन
मौन कशाचें समजूं लक्षण
स्थानीं सप्तम नृपकन्येचे
फल देतिल ना ग्रह उच्चीचे ॥१०३॥
प्रसंग खालीं बघावयाचा
मज विप्रास न येवो साचा
छे छे नाहीं तसें सुदेवा
उपाय चिंतित काय करावा ॥१०४॥
नृप कन्या येईल जरी का नगराच्या बाहेरी
तरी सुलभ मग कार्य घडे हें बोलत नतकैवारी ॥१०५॥
सहजी येइल संधी तैसी
विप्र निवेदन करी हरीसी
लग्नापूर्वी कुलदेवीची
ओटी भरणें रीत वधूची ॥१०६॥
नृपधानी पासुन तें दूर
वनांत आहे देवी मंदिर
कार्य म्हणा हें तडीस गेलें
श्रीकृष्णानें हासुन म्हटलें ॥१०७॥
उठा उठीं रथ सिद्ध जहाला
चपल विजेसम अश्व जयाला
मेघपुष्प सुग्रीव बलाहक
शैब्य असे शुभ जोडी दारुक ॥१०८॥
सुदेव - विप्रासवें मुरारी
चढे रथीं नरवीर केसरी
पवनगतीनें धावे स्यंदन
ठरति न त्यावर विस्मित लोचन ॥१०९॥
एकटाच हरि जात हराया वैदर्भी नृप - कन्या
कळतां हे रेवतीपतीही निघे घेउनी सैन्या ॥११०॥
झाली इकडे एकच घाई
गुढ्या तोरणा गणती नाही
सोनसळी रेशमी वितानीं
अमरपुरीसम ती नृपधानी ॥१११॥
मंगल वाद्यें वाजति नाना
बार - योषिता करिति तनाना
शाल्व - जरासुत - दमघोषादि
ताठुन गेली खलजनमांदि ॥११२॥
घटी बघावी उत्सुकतेनें
हर्षित हृदयीं शिशुपालानें
परी रुक्मिणी व्याकुळ होई
पळपळ बुडतो विपदा डोहीं ॥११३॥
धीर द्यावया बघती तिजशी
सख्या स्वयें ज्या मनीं उदासी
तों दारीं ये अवगुंठित रथ
चढे वधू ती भग्नमनोरथ ॥११४॥
निघती मागुन शुभा पुरंध्री घेउन मंगलपात्रें
सुसज्ज सैनिक रक्षण करण्या पाजळुनी निजशस्त्रें ॥११५॥
वाद्य गणांच्या घनझंकारी
मिरवणूक ये अशी मंदिरीं
खणा नारळीं भरतां ओटी
येत उमाळा दाटुनी पोटीं ॥११६॥
जगदंबे कुलदेवि भवानी
हिमगिरिनंदिनि शिवे मृडानी
मोकलिसी कां बये अशी मज
भेटिव गे प्रिय सखा अधोक्षज ॥११७॥
प्रिय तुजशी जो पिनाकपाणी
पती मिळविला तोच तपानीं
याच कारणें विवाहकाला
वंदनीय तूं नवरमुलीला ॥११८॥
अंबे व्रजजननाथ हरिविना
धजो न दुसरा पाणिग्रहणां
वरा मजसी दे असा ना तरी
प्राण न नांदो क्षणहि शरीरीं ॥११९॥
गिरिजाचरणीं भाल ठेविलें न्हाणित नयन जलांनीं
शिरीं वर्षिलीं फुलें वाहिलीं करि कीं कृपा मृडानी ॥१२०॥
नमुनी उठतां बघे सुदेवा
मूर्त जसा शुभ कौल मिळावा
स्मितमुख त्याचे जणु अरुणासम
तिच्या हृदींचा वितळविला तम ॥१२१॥
वेळेवर बघ आलों देवी
दीनाची या स्मृति ठेवावी
पुनः कशाचें तव शुभदर्शन
गिरिजेसी कर शुभे प्रदक्षिण ॥१२२॥
उजवे घाली सती रुक्मिणी
उत्सुक धडधडत्या हृदयानीं
करें लपेटुन तोंच कटीसी
रथांत ओढी हरी तियेसी ॥१२३॥
पाहुन नयनीं ती श्रीमूर्ति
मान ठेविली स्कंधावरती
झाला गंगा - सागर - संगम
कीर्तीनें जणु वरिला विक्रम ॥१२४॥
सदाचार सन्नीति मधूसह गोडी कनकाकांती
जीव शिवाची भेट जाहली ज्ञानीं समरस भक्ति ॥१२५॥
सुधा घेउनी गरुडभरारी
तशी त्वरा तइं करी मुरारी
नयनाचें नच लवलें पातें
तंव घटनाही होउन जाते ॥१२६॥
गडबड गोंधळ धांव ओरडा
करी मागुनी मग जन वेडा
मुक्ता हरिली कलहंसानें
काक काव करि कंठरवाने ॥१२७॥
शिव्या मोजितां सैन्या ओठीं
रुक्मी धांवत हरिचे पाठीं
चिडुन तरस वा जसा ससाणा
पार जाहला परि यदुराणा ॥१२८॥
द्यूत मांस मदिरा मदिराक्षी
यांत दंग असती वरपक्षी
वृत्त कळे हे नसे कल्पना
शस्त्रहि धड गवसे न तयांना ॥१२९॥
कसें तरी सावरून निघती मगधादिक वेगेसी
परी हलधरें मधेच गाठुन धूळ चारिली त्यासी ॥१३०॥
उंच सखल पथ फार अरूंद
रथगति मंदावीत मुकुंद
कोमलेस या त्रास न व्हावा
सुममंचक ही जिला रुतावा ॥१३१॥
तंव जवळी ये खवळुन रुक्मी
थांब चोरट्या बघ आलों मी
लोळवीन तुज रणांगणासी
तरी दाखविन मुख नगरीसी ॥१३२॥
उचल शस्त्र चल बघूं शौर्य तव
हांसत चढवीं चाप रमाधव
सहन न झाले शर रुक्मीसी
कवच तुटोनी पडे महीसी ॥१३३॥
धनु हातांतिल भंगुन गेलें
तुरग - ध्वज सारथी - निमाले
खंडित झाली लोह गदाही
परि मद कांहीं शमला नाहीं ॥१३४॥
पाश - बद्ध त्या करून हरीनें शस्त्र शिरावर धरिले
परि बघतां ते भीमककन्या हृदय दया कळवळलें ॥१३५॥
वदे करुण कर धरुन गोमटी
जीवदान द्या या मजसाठीं
कसाहि असला तरी सहोदर
हा आहे मम हे प्राणेश्वर ॥१३६॥
प्रियजन विनती होतन विफला
देत हरी सोडून तयाला
परत जावया वदन न उरलें
विदर्भयुवकें नव पुर रचिलें ॥१३७॥
सवें घेउनी विदर्भकन्या
द्वारवतीसी ये हरि धन्या
जनहर्श न तइं मावत गगनीं
औक्षण केलें सुवासिनींनीं ॥१३८॥
गुढ्यापताका रम्य तोरणें
धनुषाकृति उभविली पथानें
अपूर्व शोभा नगरीला ये
घरोघरीं जणु मंगल कार्यें ॥१३९॥
सुरांगना गंधर्व अश्वमुख भगवंताच्या सेवे
आले नर्तन गीतवादना श्रुतिसुख किमु वर्णावे ॥१४०॥
प्रसन्नता आनंद मूर्त कीं
तशी गमत वसुदेव देवकी
बोलविलें मग त्यानीं सादर
विप्र जाणते सात्त्विक तत्पर ॥१४१॥
मंत्रपूत आचरलीं हवनें
दिलीं बहुत कांचनगोदानें
वेदविदांनी मंगलवाचन
केलें, वधुवरशुभसुखचिंतुन ॥१४२॥
श्रीहरि भगवान् पुरुष परात्पर
प्रकृति मूळची रमा खरोखर
ज्या उभयांच्या सत्ते - वरतीं
इंद्र वरुण रवि विश्वें जगती ॥१४३॥
लोकसंग्रहा तरी प्रभूनें
स्तविलें देवा वेदविधीनें
हविल्या सादर अनलीं लाजा
सप्तपदीनें वरिली भाजा ॥१४४॥
दाखविला ध्रुव निशि मुनिवेष्टित
म्हणे असें मन राहो अचळित
तरी लाभतें सुख संसारीं
प्रिये आण हें सदा विचारीं ॥१४५॥
भगवंतासह वैदर्भीचा विधिवत् विवाह झाला
हर्षित झाली सृष्टी; वर्षत वरुनी स्वर्ग सुमाला ॥१४६॥
असामान्य गुणवंत अधीची
उपमा अन्यां होत जयांची
कसें करूं मग त्यांचे वर्णन
विनम्र भावें चरणी वंदन ॥१४७॥
वरातिच्या शुभमंगलवेळीं
वैभव शोभा शिगेस गेली
चौचौहातीं रम्य तोरणें
उभारिलीं बहुमोल पुरीनें ॥१४८॥
हर्ष - सागरा भरती आली
तसे शोभती जन ते कालीं
फुलें उधळीलीं जाती अविरत
फेस जणूं कां तिथला उसळत ॥१४९॥
सुंदरपण वर - यात्रेचें तें
कवणा ध्यानीं येतच नव्हतें
मोहक भूषा वा ललनांची
शुद्ध न कोणा निरखायाची ॥१५०॥
वाद्य गणांच ध्वनि मग मंजुळ
लक्ष कुणाचें वेधुन घेइल
श्रीवर सस्मित नयनें बघतां
मुकेन मी त्या, भय हें चित्ता ॥१५१॥
असामान्य ते युगुल घेतसे वेधुन इंद्रियवृत्ती
मजचि विषय हा परम सुखाचा ज्ञानेंद्रियगण म्हणती ॥१५२॥
करुन निजहृदाची पेटिका ग्रामवासी
जपुन बहु मुदानें ठेविती श्रीहरीसी
पुढुन जरि निघोनी दूर गेली वरात
तरि दिसत पुढारी लोक ना हालतात ॥१५३॥
रुक्मिणी - परिणय नांवाचा दहावा सर्ग संपूर्ण
लेखनकाल :-
वैशाख शके १८७०
श्रीकृष्ण कथामृत - अकरावा सर्ग
( प्रेमदर्शन )
यस्माद्धि शास्त्रसरितामुगमो बभूव
यत्स्वाश्रयं तनुभृतां भयविह्वलानाम्
तापापनोदनिपुणं परमव्ययं तत्
दिव्यं महेश्वरपदाब्जमहं नमामि ॥१॥
सुद्गुरो श्रीमहाराजा दीना या धरणें करीं
त्याविना पार होईना महासिंधूं ही तरी ॥२॥
नंदनीं कृष्णलीलांच्या सुगंधी सगळीं फुलें
शब्दसूत्र थिटें माझें ओवूं काय, न तें कळें ॥३॥
अपार गगना ऐसें श्रीहरीचें चरित्र हें
नानालीला जणूं होती नक्षत्रें गणनाऽसहें ॥४॥
अदूर दुखरी दृष्टि दासाची आपुल्या असे
तारका कोणत्या पाहूं कळेना श्रम होतसे ॥५॥
कोषागारीं कुबेराच्या भिकारी शिरल्यावरी
भांबावतो तसें झालें माते श्रीचरितांतरी ॥६॥
दुर्बला कविताशक्ति झोळी ज्यापरि फाटकी
रत्नें भरूं कशी तेथें निवडून निकीं निकीं ॥७॥
गावी कृष्णकथा आज्ञा आपुली मज जाहली
आतां आपणची दासा सांभाळा गुरुमाउली ॥८॥
श्रीमुख कां तरि सुकलें देवा
चिंतन करिता तरि, कसलें वा
जवळ असुन मी म्लान मुखाब्ज
वृथाच म्हणतां शशिवदना मज ॥९॥
आळ जसा ये स्यमंतकाचा
तसाच दुसरा काय कशाचा
अदितीच्या कुंडलास कायी
दैत्य पुन्हा कुणि चोरुन नेई ॥१०॥
नर्मविनोदें वदे रुक्मिणी
“ तप करिते का कालिंदी कुणि
पावा तिज जड होत न साचा
भरल्या गाड्यां भार सुपाचा ॥११॥
परि न स्मित ये भगवद्वदनी बघतां शंकित देवी
अनुचित वेळीं थट्टा केली क्षमा नाथ मज व्हावी ॥१२॥
खरेंच घडलें विशेष कांहीं
मला सांगण्यासम का नाहीं
मृदु - कुटिलालक हरिचे चुंबित
वदे स्नेहळा स्कंधा स्पर्शित ॥१३॥
पण्डु सुतांचे कुशल असे तर ?
अपुला अवघा जीव तयांवर
लाक्षागृहसम पुनः काय नव
विघ्न आणिती त्यांवर कौरव ॥१४॥
शिरसा मानुन नारदशासन
भ्रमतो तीर्थें प्रियसख अर्जुन
भेट न झाली बहुवर्षांची
म्हणुन लागली ओढ तयाची ॥१५॥
“ प्रिये कमलजे तसें न कांहीं ” कुंजविहारी वदले
“ गोकुळच्या स्मरणानें व्याकुळ देवी मम मन झालें ॥१६॥
कण कण माझ्या देहामधला
गोकुळच्या प्रेमांत वाढला
श्वास, तेज नयनीं, हृत्स्पंदन,
व्रजांतुनीं त्या सर्वा जीवन ॥१७॥
डोळ्यांतिल जपतात बाहुली
त्याहुन चिंता मम वाहियली
खुपो न कांहीं मम चरणासी
पायघड्या केल्या हृदयासी ॥१८॥
क्षेम कुशल पुसण्यास तयांचें
तसे कळाया गूज जिवींचें
व्रजा धाडिला मी उद्धवजी
अजुन न आला म्हणुन काळजी ॥१९॥
दूत धाडिले बरेच वेळां
मथुरेहुन, येथुनी व्रजाला
त्या नच इतका विलंब झाला
वेळ होत कां ? नकळे याला ॥२०॥
तोंच आंत येई प्रतिहारी
नमवुनिया शिर अवनितलावरि
“ जयतु राजराजेश ” वदे ती
“ उद्धवजी दर्शनास येती ” ॥२१॥
ऐकतांच हे धीन न धरवे भक्तवत्सला क्षणही
धांवत दारीं येउन धरिलें उद्धवास निजहृदयीं ॥२२॥
नेउन बसवी निजासनावर
लवे ठेवण्या चरणावर शिर
“ हां, हां काय हरी हें भलतें
सेवकास कुणि वंदन करितें ? ” ॥२३॥
“ सख्या उद्धवा, वंदनीय तूं
पाहिलेंस गोकुळ या हेतु
घेतलेस दर्शन तातांचें
ऐकिलेंस वच गोपगणांचे ॥२४॥
व्रजललनांसह बोलसास तूं
चाखिलास तेथिल गोरस तूं
प्रिय यमुनेच्या पूत जलाचें
स्नान पान तुज घडलें साचें ॥२५॥
वेळ न लावी आतां सखया
सुधा सिंचुनी शमवी हृदया
निरोप वद रे, असतिल जे जे
तुज आवडले ना व्रज माझें ॥२६॥
परिसुनिया हें उद्धवजीच्या भरलें की जल नयनीं
कंथ दाटला मस्तक नमवी श्रीकृष्णाचे चरणीं ॥२७॥
ज्ञानाचा अभिमान असे मज
म्हणुन वाटतें दाखविलें व्रज
होईन केवीं मी उतराई
रक्षिलेंस मज माझे आई ॥२८॥
तें तव गोकुल न, राजधानी
भक्तीची, भूतला शिराणी
सदाचार - सदनें शुभ साधीं
उज्वल सुंदर नसुन उपाधी ॥२९॥
गोदा भीमा प्रवरा तुंगा
सिंधू रेवा शरयू गंगा
सरिता या झाल्या जणुं धेनू
सकलहि सिद्धी जमल्या वा म्हणुं ॥३०॥
रूप न कळलें वेद ऋचांना
नेति म्हणाल्या लववुन माना
त्याच गोपिका होउन आल्या
प्रेमरसीं त्ज समरस झाल्या ॥३१॥
ओंकारासह मंगलता जणु नंद यशोदा गमले
ब्रह्म जयीं हे सगुण सावळें अंगावर खेळविलें ॥३२॥
तुडवित वाळू यमनियमांची
गीतें गातां तव लीलांची
गोप नाचती यमुनापुलिनीं
प्रेममधू तो भरिती नलिनी ॥३३॥
मुकुंद माधव हरे मुरारे
मंजुल रव करितात पाखरें
गुरें वासरें तन्मय जमती
चरणें सोडुन त्या तरुभंवतीं ॥३४॥
गंध फूलांना तव कीर्तीचा
फळांत साठा प्रेमरसाचा
तृणपर्णांतुन तव लीलांची
कोमलता जणु भरली साची ॥३५॥
पाय ठेवण्या त्या भूभागीं
योग्य नसे मज - सम दुर्भागी
तुझ्या पदानें पावन झाला
कण कण जेथिल धूळी मधला ॥३६॥
प्रेम दिसे जें तेथ पशूंतुन तें न माझिया हृदयीं
अविट माधुरी भक्तिरसाची चाखलीच कधि नाहीं ॥३७॥
सुकृत फला ये बहु जन्माचें
दर्शन म्हणुनी घडे वज्राचें
सकलांचा तो बघतां प्रेमा
गहिवरतें मन हें सुखधामा ॥३८॥
पाहतांच मज प्रेमभरांनीं
आलिंगन दिधलें नंदांनीं
बौ दिवसीं लडिवाल घरासी
यावा, त्यापरि हर्ष तयासी ॥३९॥
नानारीती करूनी स्वागत
मला तयानीं म्हटलें हांसत
“ वात कशी ही इकडे चुकली
उद्धवजी धन्यता वाटली ॥४०॥
असे कुशल ना राम कन्हय्या स्मरण करिति का माझें
साधा गवळी मी, ते झाले सत्ताधारी राजे ” ॥४१॥
उपहाराचें घेउन हातीं
माय येत तों ओटीवरतीं
पुसे मला बहु आतुरते ती
प्दर जरासा ओढुन पुढतीं ॥४२॥
“ घेतलेस बहु उद्धवजी श्रम
कुशल असे ना बाळ तिथें मम ?
येइल इकडे सांगा केव्हां ?
ओढ लागली नित या जीवा ॥४३॥
राम येउनी गेला भेटुन
हरीस नुरली काय आठवण
अम्हास परि त्याच्या लीलांचा
पळही विसर न पडतो साचा ॥४४॥
हंसणें रुसणें रडणें पडणें
अवखळ खोड्या करुनी छळणें
हळूच खाई चोरुन लोणी
सायीकारण बसे हटोनी ॥४५॥
मिळत असे ना तेथ उद्धवा त्यास साय नित लोणी
तुमचा झाला राजा तरिही बाळच माझा अजुनी ” ॥४६॥
जरि स्मरण तव हृदयीं आलें
यशोमतीचे भरती डोळे
उरीं धरून तव विटी, बासरी
वत्सल - हृदयां मना आवरी ॥४७॥
कृष्णाकडुनी उद्धव आला
कळतां सारा व्रज - जन जमला
शब्दां - शब्दां - म्धुन तयांचे
तरंग उठती तव प्रेमाचे ॥४८॥
अनेक लीला कथिल्या त्यांनीं
असे तिथें हे पुसती कोणीं
लाजुन मी एवढेच म्हटलें
रत्नासह कधिं खापर तुळलें ? ॥४९॥
नंद - यशोदा - व्रज - गोपाला -
सवें परिसतां तव मधुलीला
प्रसन्नता दश दिशांस आली
न कळे केव्हां रजनी सरली ॥५०॥
गोकुळच्या त्या प्रभातकाला मी न कधीं विसरेन
अपूर्व कांहीं सुख अनुभविलें उपमा त्यास दुजी न ॥५१॥
प्रभात समयीं प्रभा उषेची
मुखें उजळवी दिशादिशांची
ध्यान स्थित शुक्राच्या हृदयीं
जणु का संजीवनी स्फुरे ही ॥५२॥
शीत सुगंधी वाहत वारा
वृक्षांचा डुलवीत पिसारा
संगीताचे वातावरणीं
राज्य पसरलें मधुर निदानीं ॥५३॥
वनांतुनीं पक्ष्यांचें कूजन
कमला भंवतीं द्विरेफ गुंजन
वाजति रुणुझुणु घागरमाळा
बिलगुन धेनूंच्या कंठाला ॥५४॥
फेनिलपात्रीं धारांचा ध्वनि
मथनाची ये खळबळ कानीं
घरघर मंजुळ ती जात्याची
साथ जयासह वधूवराची ॥५५॥
वृंदवादनी मधुर अशा या भजन तुझ्या नामांचें
दामोदर हरि मुकुंद माधव अमृत जणूं श्रवणाचें ॥५६॥
गेलों ऐकत मधु भजनें तीं
स्नानास्तव मी यमुनेवरतीं
भेट तेथ मज पावन झाली
तुझ्या देवतांची वनमाळी ॥५७॥
तव भक्तीच्या प्रेमसुधेनीं
सूर्याच्या शुभ कोमल किरणीं
जणूं कमलिनी सजीव झाल्या
अशा गोपिका तेथ मिळाल्या ॥५८॥
त्या सकलांतहि दिसे विशेषीं
बहुविधभक्ती मधुरा जैसी
उशा जियेच्या चरण - तलासी
अळता लावी प्रमभरेसी ॥५९॥
उपमा देऊं कशी रतीची
अधिदेवी जी कामुकतेची
पवित्र जणु ही यज्ञज्वाला
शीतलता लाजवी शशीला ॥६०॥
अशी राधिका भवभयहरणी तेथ पाहतां नयनीं
देवा मम अभिमान गळाला नत झालों तत्त्चरणीं ॥६१॥
नानारीती तुझिया विषयीं
गोपी वदती हर्षुन हृदयीं
गंहिवरूनी, रुदुनी, कोपानें,
निघे वाकडे वचन मुखानें ॥६२॥
एक विचारी पाहतांच मज
“ आनंदी ना असे अधोक्षज ? ”
वदे दुजी “ त्या कधींच कायीं
आठवही येथिल नच होई ” ॥६२॥
अन्य म्हणे “ गे अम्ही अडाणी
रूप गुणांची नसे मोहिनी
त्यास संगती कशी रुचावी
लता माधवी भ्रमरा व्हावी ॥६३॥
“ कुठें गुणांची पारख त्यातें
अरसिक चंचल तो ” कुणि वदतें
संगत तुटली, बरें खलाची
स्मृतिही आतां नको अशाची ॥६४॥
पुरते मिळले व्रज मातिस वा नाहीं तें बघण्यासी
धाडियलें ना त्या कपट्यानें उद्धवजी अपणासी ॥६६॥
समजुत त्याची करण्यासाठीं
वेदांताच्या कथिल्या गोष्टी
परी उलट माझे ती राधा
वाभाडे काधी गोविंदा ॥६७॥
म्हणे राधिका मज उपहासुन
“ उद्धवजी हें तुमचें भाषण
गमे मला कीं जसे सिताफळ
गर बहु थोडा, बियाच पुष्कळ ” ॥६८॥
तुज विषयीं बोलत असतां ती
प्रेम बघुन तें उत्कटताती
तन्मयता भावाकुल वृत्ती
पडलो मी तच्चरणावरतीं ॥६९॥
आज कळालें मज गोपाळा
गोकुळचा का तुला जिव्हाळा
व्रजललनांचे निघता नांवहि
गंहिवर का तुज इतुका येई ॥७०॥
मांदुन सोन्याच्या देव्हारीं
पूजिसि बल्लवमूर्ति मुरारी
करिशी त्यांचें भावें चिंतन
अतां उमगलें त्यांतिल कारण ॥७१॥
देवा या दीनाची चरणीं एकच विनती आतां
प्रेम तसें दे मजसी मोक्षहि शुष्क तुच्छ ज्या पुढतां ॥७२॥
पायबंद घाली प्रेमासी
तर्कट बुद्धी नको विनाशी
श्रद्धा सात्विक सुंदर भोळी
राहो हृदयीं मम वनमाळी ॥७३॥
श्रीकृष्णाच्या असुनी जवळी
उद्धवास योग्यता न कळली
व्रजांत व्हावी जाणिव त्याची
हीच थोरवी सत्संगाची ॥७४॥
कृपा करिल जरि कां जगजेठी
भागवतांची होतें भेटी
ईश न उमगे सत्संगाविण
कसे चक्र हें असे विलक्षण ॥७५॥
पूर्व - जन्म - कृत - पूण्य - बलानें
उद्धव तरला ते लीलेनें
धन्य धन्य तो भगवतोत्तम
लोटांगण तत्पदी सदा मम ॥७६॥
नयन जलानें भिजवित चरणा
उद्धव घे लोळण दीन - मना
उचलुन हृदयीं श्रीहरि त्यातें
वदे “ हेंच रे हवें अम्हातें ॥७७॥
पूर्णकाम असतांही मजसी हवीं भक्तजनहृदयें
तयाविणें करमेन म्हणुन मी जन्मा भूमीवर ये ॥७८॥
रहा उद्धवा शांतमनें तूं
पुरविन मी तव सकलहि हेतू
पुनः कधीं तरि कथीन साचें
हृद्गत जें मम गूज जिवीचे ” ॥७९॥
सेवकास सांगत हृषिकेशी
“ घेउन यारे सन्मानासी
प्रिय उद्धव हा आज तयाचें
पूजन मजसी करावयाचें ॥८०॥
पीतांबर बहुमो जरीचा
सुरेख कंठा नवरत्नांचा
प्रेमें टःएवीं मुगुट शिरावर
रत्नखचित दैदीप्य रमावर ॥८१॥
प्रेमळ हृदयीं उद्धवजीच्या
लहरी उठल्या कोमलतेच्या
हर्ष - भरित शुभनयना मधुनी
थेंब दोन पडले हरिचरणीं ॥८२॥
शक्ति तया बिंदूतिल नच ये शब्दांच्या सिंधूसी
हसुनी दिधली निरोप देवें आलिंगून तयासी ॥८३॥
एके दिवशीं प्रभात समया
द्विजगण - वंदित - रवि ये उदया
कमल - वनाची उघडुन दारें
स्वगत करिती द्विरेफ सारे ॥८४॥
द्वारावतिची जागृत झाली
प्रसन्नताही जणु त्या कालीं
कस्तूरी - जल - समार्जित - पथ
लक्ष वेधिती शृंगारित - रथ ॥८५॥
मूल्यवान सुंदर वेशातें
उच्चनीच हें नवह्तें नातें
सर्वहि मंगल सर्वहि सुंदर
सत्संगें जणु सकल चराचर ॥८६॥
जिंकाया कीं वीणेचा स्वन
पक्षी करिती मंजुल कूजन
उपवन - सुरभित - शीतल - वारा
पथिकांचा श्रम विनवी सारा ॥८७॥
काठीचा आधार घेउनी विप्र एक त्या समयीं
अधोवदन जातसे पथानें शंकाकुलसा हृदयीं ॥८८॥
मूर्त तयाची कृश दुर्बल ती
मांसाविण जनु घडली होती
उठुनी दिसती कोपर जानू
ग्रंथिल बोरूच्या काड्या जणुं ॥८९॥
रक्तरहित ती त्वचा पांडुरा
भासतसे कीं भस्म - धूसरा
चिंधीं मळकट माजे - भवतीं
जवळ उपाधी दुसरी नव्हतीं ॥९०॥
भावहीन मुद्रा सुरकुतली
दाढींतहि नच जाय झाकली
खोल जाउनी शोधित होते
नेत्र काय हृदयस्थ हरीतें ॥९१॥
वृक्ष, भडकतां भवसीं वणवा
होरपळोनी जसा दिसावा
शिणलेला हा संकट - जर्जर
तसा दिसतसे तेथ विप्रवर ॥९२॥
दारिद्र्या जणु आश्रय दे हा ज्या सकलानीं त्यजिलें
सुरसमुदायीं शिवेंचि केवळ भयद विषा प्राशियलें ॥९३॥
अपल्याशीं करि विचार तो द्विज
“ ओळखील का मित्र अतां मज
या विभवाचा तो कीं स्वामी
भीक न पुरती मिळत अस मी ॥९४॥
तथें नमविले बलाढ्य - राजे
पोरहि मानित नाहीं माझें
आम्हांमधें हे कितितरि अंतर
हीन काजवा मी, तो भास्कर ॥९५॥
आस न लवही मज विभवाची
धनें शमविली तृषा कुणाची
भेट तयाची केवळ व्हावी
गोष्ट परी ही कशी घडावी ॥९६॥
परिचय नाहीं इथे कुणाशी ”
असें म्हणत जों विप्र मनासी
पौर वदे त्या नमन करोनी
दिव्जवर्या आलांत कुठोनी ॥९७॥
बहु लांबुन मी श्रीकृष्णाच्या भेटीसाठीं आलों
पाहुन तुमची श्रीनगरीही गोंधळुनी परि गेलो ॥९८॥
अपूर्व शोभा अपार वैभव
क्षणोंक्षणींला रूप धरी नव
ग्रुहें सारखी कांचनमय हीं
शोधूं कोठें न कळे लवही ॥९९॥
साह्य तुम्ही मज कराल कां जी
भेट हरीसी करवा माझी
पुरुष वदे तो अवश्य देवा
धन्य म्हणा आपुल्या सुदैवा ॥१००॥
प्रतिदिन देउन अर्ध्य रवीसी
अग्निकार्य संपता विधीसीं
सुवर्ण मंडित - शत - गोदानें
द्विजास देती हरि सन्मानें ॥१०१॥
दान जन्मभर येइल कामीं
बरा भेटलों वेळेवर मी
नवल आपुलें वाट मजला
आजवरि न कां येथें आला ” ॥१०२॥
वासुदेव भगवान आपुलें नित्यकर्म उरकोनी
सभेस निघती तो दारी हा द्विज देखियला नयनीं ॥१०३॥
भान न उरले यदुनाथातें
मिठी मारिली धावुन त्यातें
संपवुनी निज वनवासासी
राम भेटला जणु भरतासी ॥१०४॥
“ धन्य भाग्य मम उदया आलें
रोग्यासी हें अमृत मिळालें
किति दिवसांनीं सुदाम देवा
भेटलास तूं हृदय विसावा ॥१०५॥
आज जाहली होय आठवण
वदे हरी कर हातीं घेउन
हृदयीं हर्ष न शके समावं
मित्रा झाले कुठें न ठेवं ॥१०६॥
अंतरगेही नेउन त्यासी
प्रेमें बसवी चेपित पायां
कुशल विचारी चेपित पाया
श्रम झाले तुज इथवर याया ॥१०७॥
सन्मुख आली विनयें कमला सादर वंदन केलें
पुत्रवती सुअभाग्यवती भव दिजवर सस्मित बोले ॥१०८॥
सुदाम देवा वरती चामर
ढाळित देवी सेवा तत्पर
झटे निजांगें सर्वहि कामा
विरघळला निजमनीं सुदामा ॥१०९॥
उटणीं नानापरी सुवासिक
अभिक्षेकासी तें उष्णोदक
भोजन रुचकर सुधेहुनीही
रिझला द्विज या उपचाराही ॥११०॥
हरी विचारी मग मजसाठीं
काय दिली वहिनीनें भेटी
रिक्तकरानें भेट न घ्यवी
रीत असे ही तुजसी ठावी ॥१११॥
विद्वानांचा मुगुटमणीं तूं
सदाचार धर्माचा केतू
चूक न होइल तुझिया हातीं
वर्तनांत तव जगते नीति ॥११२॥
मुकुंद वदतां या परि लज्जित झाला विप्र मनासी
खिन्नपणें उत्तरला देउ काय सख्या मी तुजसी ॥११३॥
हरी, सुदामा तुझा अकिंचन
तव नामाविण जवळ नसे धन
उसनें मागुन कसें तरी हें
आणियलें मी मुठभर पोहे ॥११४॥
ते द्याया परि धीर न होई
कृष्णेपरि ऐकिलेंच नाही
झोंबुन घेई पुरचुंडी ती
आम्र जणूं ये क्षुधिता हातीं ॥११५॥
त्यांत भाग मागतां रमेने
लव देई परि बहु कष्टानें
उरवी एकहि नच कण फोल
वदे कितीही भेट अमोल ॥११६॥
विश्वांतिल सर्वहि संपत्ती
मिळुनहि होय न इतुकी तृप्ती
संतजनांचा हा उपहार
अल्पहि तरि सामर्थ्य अपार ॥११७॥
हृदय भरुन ये कवळी द्विज तो प्रेमें कृष्णपदासी
पुलकित वदला सीमा नाहीं हरि तव थोरपणासी ॥११८॥
अज्ञ विप्र मी दीन दरिद्री
कण रेतीचा जसा समुद्री
विश्वासाचा तूं धनी नियामक
सहर्ष माझें करिसी कौतुक ॥११९॥
थोरपणा हा तुलाच साजे
कृतार्थ झालें जीवन माझें
फुलें सुखाची हृदयी फुलली
तव चरणीं तीं मीं वाहियली ॥१२०॥
अधिकचि मधुर सुवास तये ये
प्रसन्नाताही अविचल राहे
नियती घेउन दुःखें भारी
कष्टविण्या मज येतें दारीं ॥१२१॥
परी टाकिते श्वास हताशी
बघुन मला तव पदकमलासी
प्रेम सदोदित असेंच राहो
अन्य नको मज याहुन लाहो ॥१२२॥
एक - मास - पर्यंत सुदामा
वास करी श्रीहरिच्या धामा
बहुगुज गोष्टी गुरूघरच्या वा
करितां रात न दिवस पुरावा ॥१२३॥
विहार, शय्या, भाषण, भोजन
क्षणहि न गेला परस्परांविण
शब्दार्थासम अभिन्न जीवन
उभयपदां मम भावे वंदन ॥१२४॥
निरोप देतां घेतां वदती उभयहि गद्गदवाचें
स्मरण असूं दे प्रियमित्रा मम, धारण तेंच जिवाचें ॥१२५॥
निरिच्छहृदयीं त्या विप्राचे
सिंधु उसळती आनंदाचे
श्रीकृष्णानें दिलें न कांहीं
याची जाणिवही त्या नाहीं ॥१२६॥
इंद्रिय मन बुद्धीच्या जे पर
आत्मसुखी त्या रमता अंतर
स्पर्श कराया त्या मग केवी
ओंगळशी वासना धजावी ॥१२७॥
धन्यवाद अर्पीत हरीसी
ब्राह्मण ये जों निजसदनासी
म्हणे भ्रांत मी कैसा झालों
द्वारकेस परतुनिया आलों ॥१२८॥
सुदाम देवा जयजयकारें
आदरिती जै पुरजन सारे
अधिकचि बावरला द्विज त्यानें
कळलें नच हरिचें हें देणें ॥१२९॥
घरास ये परि कुठें झोपडी गवसेनाच तयासी
इंद्राचें जणु भव्य मनोहर मंदिर त्या स्थानासी ॥१३०॥
भार्या दारीं सुवेष भूषित
उभी स्वागता परिजन - परिवृत
वदे सुदामा काय तरी हें
वेड लागलें काय म्हणूं हें ॥१३१॥
नम्रपणानें वदली कांता
आपुलेंच हे वैभव नाथा
शंकित व्हा नच आंत चलावें
सर्वहि कथितें श्रम निववावे ॥१३२॥
त्वष्ट्या करवी रचिली सृष्टी
रमावरें ही अपणांसाठीं
हें वैभव, हें गृह, हे सेवक
पुरिचेही या तुम्हीच पालक ॥१३३॥
हर्षुन सस्मित रमणी वदली
परी द्विजाची कळी न खुलली
म्हणे मनीं हे बरें न झालें
दूर काय मज कृष्णें केलें ॥१३४॥
हातीं देउन नश्वरास फसवूं कां पाहतोसी हरी
होवोनी विषयास मोहित परी जाईन मी ना दूरी
माझे प्रेम तुझें स्वरूप हृदयी राहील कीं सारखें
नाहीं भीति मला असें तुज जरी घे ही परीक्षा सुखें ॥१३५॥
प्रेमदर्शन नांवाचा नववा सर्ग संपूर्ण
लेखनकाल :-
कार्तिक शके १८७०
श्रीकृष्ण कथामृत - बारावा सर्ग
( मनोरथपूर्ति )
व्योमानिलानलजलावनि सोमसूर्य
होत्रीभिरष्ट - तनुभिर्जगदेक नाथः
यस्तिष्ठतीह जनमंगलधारणाय
तस्मैनमोस्तु निरपेक्षहृदे शिवाय ॥१॥
ज्ञानप्रेमपुटांत मौक्तिक निघे भक्तीचिया शिंपलीं
बांधी ज्यास गळ्यांत वत्सलपणें तीं श्री विठूमाउली
भक्ताचार्य खरेच जे उभविती पंजाबदेशी ध्वज
त्या श्रीसद्गुरुनामदेव चरणीं ठेवी शिरा मी निज ॥२॥
वानामे किति कैसे वाचें
वसंत वैभव रैवतकाचें
तरुणपणाचें रसरसलेला
दिसे जसा युवराज निराळा ॥३॥
तांबुस कोमल तरुचीं पानें
शोभविती केशरी उटीनें
जाई जुइ मालती नवाळी
फुलें सुगंधी भूषण घाली ॥४॥
पुष्पराज पाचूंत खुलावा
सुवर्ण चांफा तसा दिसावा
खरेंच समजुन मणी तयासी
भ्रमर न येई जवळ मधूसी ॥५॥
प्रथम पदें पळसावर पडली
वसंत शोभा जयीं उतरली
म्हणुनी लाली येत फुलांतें
रक्त अशानें कवण न होतें ॥६॥
किरण पिउन आरक्त रवीचे
हर्ष फुलें जणु मुखीं लतांचे
दंव बिंदूंचें झालें मोतीं
न कळे कसली किमया होती ॥७॥
प्रतान पसरुन कोमल वेली आलिंगिति वृक्षांतें
पतिच्या आधारें जणु युवती सुखकर जीवन जगतें ॥८॥
कांत टाकिलेल्या सर्पासम
तेज दिसे त्या गिरिचें अनुपम
विपुलधनाच्या लाभें सहसा
प्रसन्न निर्धन गुणिजन जैसा ॥९॥
रान पांखरांची मधु किलबिल
अति सुख दे परि त्यांतहि कोकिल
बहुविध वाद्यांच्या समुदायी
सारंगी जणु सुखकर होई ॥१०॥
उसळत अदळत शिलांशिलावर
खळखळ करिती मंजुळ निर्झर
दरींत लपती मधेंच कोठें
लपंडाव कीं खेळति वाटे ॥११॥
लोभ धरूनी आम्र फलांचा
फिरे नभासी थवा शुकांचा
उत्सवार्थ जणु काय वसंतीं
छत दिधलें हें हिरवें वरतीं ॥१२॥
प्रणय चंचला - भ्रू ललनेची
तशा मनोहर उठती वीची
डुलती कमलें हृदयें कीं ही
रसिक मनासी उमगत नाहीं ॥१३॥
सरोवरीं नच समावली का म्हणुनी कुंजलतासी
गिरिकुहरीं वा वृक्षतलीं ये प्रसन्नता कमलासी ॥१४॥
तसें न हो हें पुरजन सगळे
जेथें द्वारावतिचे जमले
मदनोत्सव साजरा कराया
सवें घेउनी श्री यदुराया ॥१५॥
सात्यकि उद्धव विपृयु विदूरथ
चारुबाहु, प्रद्युम्न भीमरथ
भैमी, भामा सती रेवती
शुभा सुभद्रादिक युवयुवती ॥१६॥
प्रसन्न चित्तें विलास नाना
कला नृत्य संगीत तनाना
परस्परां कुणि उटणीं लावी
फुलें कुंतलांतुन माळावी ॥१७॥
सनाल कमलें घेउन हातीं
चिंब करावी जलें प्रिया ती
चषक करावे रिते सुरेचे
कुंज फिरावे रानफळांचे ॥१८॥
असे सकलही गिरिवरती त्या रंजविती चित्ताला
सूर्य टेकला अस्तगिरीवर रंग उत्सवा चढला ॥१९॥
रविकिरणांचा झोत सुवर्णीं
मेघांमधुनी उमटे गगनीं
दृश्य मनोरम वाटत होतें
येत कल्पना रसिक मनांते ॥२०॥
चित्रकार रवि या जगताचे
पद्मपत्र घनरूप तयांचें
त्यांत खोचिल्या वर्णशलाका
सरल्यावर निज कार्य जणूं का ॥२१॥
मावळतीचे उरले अंशुक
धारण करिती श्याम बलाहक
शोभा भासत करुणरम्य ती
विभक्तवसना नलदमयंती ॥२२॥
प्रदोष - लोहित - रंग निमाला
नभीं चमकती मग उडुमाला
डमरूयंत्रा जडले साचे
उडुनी हिंगुळ कण पार्याचे ॥२३॥
झिरझिरीत रेशमी पटासम पसरे प्रभा शशीची
दिसे वनश्री रम्य तयांतुन नवयुवती परि साची ॥२४॥
लक्ष सुभद्रा वेधुन घेई
सुंदरशा त्या जन समुदायीं
शुक्राची चांदणीच जैसी
असुन तारका विपुल नभासी ॥२५॥
यौवन अजुनि न पुरे विकसलें
अरुणोदयिची जणुं का कमलें
कोमलता पाहुन अंगाची
शिरीष सुमनें कठोर साची ॥२६॥
सरळ नासिका सतेज डोळे
ओठ जणूं का दाडिम फुटले
गाल लालसर भिवया रेखिव
विपुल कुंतला शोभा अभिनव ॥२७॥
उरोज उन्नत सिंहकटी ती
कृशोदरीं त्रिवली खुलताती
अंक तियेचे धरिती शोभा
सुवर्ण केळीचा जणु गाभा ॥२८॥
खुले चंद्रिका जललहरीवर
लालडीस ये कांती सुंदर
मोहक वसनांनीं त्यापरि ती
वरतनु रमणी शोभत होती ॥२९॥
हरिभगिनी ती अशी सखीसह खेळत नर्म विनोदें
तेजस्वी कुणि तरी प्रवासी निरखी दुरुनी मोदें ॥३०॥
तदाकृतीसी साजत नव्हता
वेष तयें जो धरिला होता
वीर तपवी म्हणु का भार्गव
छटा विलासी परि नयनीं लव ॥३१॥
उंच भव्य ती शरीर - यष्टी
खांद्यावर धनु भाता पृष्ठीं
विशाल उन्नत भरली छाती
भुजा दीर्घ मांसल, दिसताती ॥३२॥
रम्य सांवळा वर्ण घनासम
तेज अलौकिक सुचवी विक्रम
तापस वेषा धरी विसंगत
बघे सुभद्रा - विलसित विस्मित ॥३३॥
संगीता स्वर्गीय भुलावें
निश्चल त्यानें तसें असावें
रातराणिच्या मदगंधा वा
मोहित झाला तसा दिसावा ॥३४॥
वदत सुभद्रा रम्य कितीही वनस्थलीं या शैली
इथेंच गमते सदा करावी उत्सव कार्यें सगळी ॥३५॥
हांसुन गाली म्हणे सुवेषा
“ बरी तुझी ही कळे मनीषा
करीन विनती मी बलदेवा
लग्नोत्सव येथेंच करावा ” ॥३६॥
“ खरेंच कां गे सर्वहि ठरलें ”
“ काय न तुजसी अजुनी कळलें ?
पदवी भारत सम्राज्ञीची
सखीस आपुल्या मिळावयाची ॥३७॥
राजेश्वर दुर्योधन यासी ”
तोच भामिनी रोधी तिजसी
बोल न पुढती एकहि अक्षर
मग कवणातें इच्छित अंतर ॥३८॥
“ लोभविती नच वैभव सत्ता
मोह गुणांचा पडतो चित्ता
पराधीन मी लाभ न बोलुन
रूचे वृद्धx या तीर्थाटन ॥३९॥
दुःखित हर्षित शंकित चित्तें इकडे व्यथित प्रवासी
भक्तवरद हरि उभा राहिला येउन तो पाठीसीं ॥४०॥
सस्मित ठेवी कर तत्पृष्ठीं
दचकुन मनिं तो वळवी दृष्टी
बघतां हरिसी तच्चरणावर
विनम्र भावे वांकविलें शिर ॥४१॥
प्रेमभरें त्या धरिले पोटीं
एक तपानें ही तव भेटी
गंहिवरूनी तो वदे प्रवासी
ओळखिलेंसी मज हृषिकेशी ? ॥४२॥
विचारिसी हें कैसें अर्जुन
जाइन मी मग मलाच विसरुन
त्यांतुन बघण्या उचलुन पाते
धजे दुजा का मम भगिनीते ॥४३॥
चुकलों कृष्णा मला क्षमा कर
बावरलें मम खरेंच अंतर
मर्यादेचें भान न उरलें
हरिनें त्यावर हांसुन म्हटलें ॥४४॥
छे छे सखया क्षमा कशास्तव उलट इष्ट मजसी हें
सुभद्रेस तरि कोण तुझ्याविण साजेसा वर आहे ॥४५॥
दादांनीं परि सुयोधनातें
देण्याचें योजियलें हीतें
म्हणुनी हित तूं हरूनी नेई
क्षत्रियास उचिता रीती ही ॥४६॥
इच्छित तेंची मम भगिनीचें
कारण नाहीं लव शंकेचें
मनांतुनी अनुरक्ता युवती
पराक्रमी पुरुषावर असती ॥४७॥
पार न विजयाच्या हर्षासी
बघे चाचपुन निज बाहूसी
अधरा किंचित चावुन दातीं
श्वास घेतला भरूनी छाती ॥४८॥
दुसरे दिवशीं परतायाची
एकच धांदल हो सकलांची
संधी पाहुन धनंजयानें
सुभेद्र्स उचलिले बळानें ॥४९॥
रथावरी चढवुनी ती ललना प्रत्यंचा धनुवरती
निघे त्वरेनें वीराग्रणि मग परिजन ओरड करिती ॥५०॥
आनंदांतहि छटा भयाची
चंचल वृत्ती हो रमणीची
तदा सुभद्रा दिसे मनोरम
उदयापूर्वीं पूर्व दिशे सम ॥५१॥
गोंधळ उडवी अवचित घटना
शस्त्र सावरी यादव - सेना
लाल जाहला इलधर सारा
खैराचा जणु काय निखारा ॥५२॥
भीम - गर्जना घुमें नभातें
कापे भूतल चरणाघातें
कुठे चोर तो उद्धट अर्जुन
मुसळा घातें करितो कंदन ॥५३॥
गरुडध्वज परि दिसला नाहीं
राम मानसी शंकित होई
सहाय्य आंतिल असल्यावरतें
काय वेळ घर फुटावयातें ॥५४॥
वैद्य आपुली आज्ञा दादा कृष्ण वदे परि कांहीं
क्षत्रिय धर्मा सोडुन अनुचित घडलें वाटत नाहीं ॥५५॥
असेंच केलें आपण मागें
अतांच का मग येतां रागें
सुयोधनाहुन माझा अर्जुन
श्रेष्ठ सर्वथा आहे शतगुण ॥५६॥
युद्धीं करि त्याचा प्रतिकार
कोण दुजा वगळिल्यास शंकर
प्रिया सुभद्रा वांच्छीत हेची
दैना करिता काय तियेची ॥५७॥
वृत्ती निवली बलरामची
बरें खरें होउं दे तुझेंचि
लिखित विधीचें कुठुन चुकावें
जा त्या सत्वर घेउन यावें ॥५८॥
करुन महोत्सव बहु थाटानें
विधिपूर्वक मग बलरामानें
दिएले सुभद्रा अर्जुन हातीं
हर्ष सागरा आली भरती ॥५९॥
बोळविलें त्या सन्मानाने विपुल धनें अर्पुनिया
विनवी भगिनी पाठराखणी तूंच येइ यदुराया ॥६०॥
तसाच आग्रह धरीत अर्जुन
सवें निघे मग शशिकुल भूषण
मोडवतें ना प्रिय - शब्दातें
सार गर्भ जणु लोहाहुन तें ॥६१॥
इंद्रपस्थीं अति हर्षानें
केले स्वागत युधिष्ठिरानें
द्वारावतिपति दे आलिंगन
वधुवर करिती सलज्जवंदन ॥६२॥
कुरवालुन मुख धरुन उरासी
वत्सल कुंती देत शुभाशी
नववधुसी पाहुन पांचाली
परिहासें अर्जुना म्हणाली ॥६३॥
दुजा तिढा पडतां भार्याते
पहिले बंधन ढिलेंच होतें
नवीं भूषणें येतां हातीं
धूळ साचते पहिल्या वरतीं ॥६४॥
तसे न होवो, ऐकून अर्जुन सस्मित उत्तर देई
मुरलेल्याची सरी कदापि न नव्या आसवा येई ॥६५॥
फार दिसाच्या प्रिय भेटीस्तव
धर्मे केला थोर महोत्सव
श्रीकृष्णाच्या प्रिय सहवासी
नित्य नवा ये बहर सुखासी ॥६६॥
मय - निर्मित - मंदिरांत सुंदर
असतां हरिसह भूप युधिष्ठिर
वदत तयासी एके दिवसीं
“ राजसूय करूं कां हृषिकेशीः ” ॥६७॥
नारद म्हणती कर हें राया
परलोकीं पितया सुखवाया
होय म्हणालों करण्या राजी
शक्य परी हें होईल का जी ॥६८॥
गमेल मत्सर सकलहि भूपा
यज्ञाचा या मार्ग न सोपा
म्हणुन याचा विचार तूं कर
उड्या आमुच्या तुझ्या बळावर ॥६९॥
तुझीच कृपा म्हणुनीच भोगतों वैभव हे इंद्राचें
तूं पाठीसी असतां अवघड वाटत नाहिं कशाचें ॥७०॥
फारचि उत्तम अत्यानंदें
शब्द काढिले तदा मुकुंदें
अवश्य करि हा राजसूर्य तूं
त्रिखंड कीर्तीचा जो हेतु ॥७१॥
साधतील कीं अनेक गोष्टी
लवहि न व्हावें मनांत कष्टी
प्रयत्नास नच अशक्य कांहीं
तव भाग्यासी उणीव नाही ॥७२॥
यज्ञ न हा सम्राटपदाविण
मगधेश्वर ही तयास अडचण
धरुनी हेतू नरमेधाचा
जयें बंधिला गण राजांचा ॥७३॥
अपार त्याच्या बलसंभारा
द्वंद्वयुद्ध हा एक उतारा
यास्तव घेउन भीमार्जुन मी
स्वयेंच जातो बघ या कामी ॥७४॥
वेळ न लावावा शुभकार्या धर्मा यास्तव अंगें
मगधपुरा जायाची अमुची करी सिद्धता वेगें ॥७५॥
आज्ञा हरिची वंद्य मानिली
सर्व सिद्धता धर्में केली
वदे देत हें बंधू माझें
तुझ्या करी प्रिय जीवाहुन जें ॥७६॥
अग्नि तीन जणु दीप्त जहाले
तसे वीर पूर्वेंस निघाले
कानन सरिता गिरि ओलांडित
सरोवरांच्या शोभा लक्षित ॥७७॥
मगधीं आले ब्राह्मणवेषी
अद्वारें मग राजगृहासी
जरासंध मनिं शंकित झाला
पुसे कोण तुम्हि कां तरि आलां ॥७८॥
तेज तुमचे गमें निराळें
सत्य वदसि भगवान म्हणाले
वासुदेव मी हे पृथुनंदन
परमविक्रमी भीम नि अर्जुन ॥७९॥
स्वागतपूजा नको अम्हासी दे भिक्षा युद्धाची
द्वंद्व तिघांतुन कुणासवें कर कीड मरो जगताची ॥८०॥
वदे जरासुत दर्पे दुःसह
भीम बरा हा लढतो यासह
उसळुनि केला गर्ज भयंकर
कल्पांतीचा जणु का सागर ॥८१॥
मत्त गजासम देती धडका
प्रलय मेघ जणु आदलती का
पुरजन ते बघती भय कंपित
लोळविला शेवटीं जरासुत ॥८२॥
अमर वर्षती फुलें अपार
बंधमुक्त नृप जयजयकार
उपकारासी धरुन शिरातें
सर्वहि झालें अनुयायी ते ॥८३॥
जरासंधसुत सहदेवासी
बसवी राज्यावर हृषिकेशी
युद्ध घडे हें खलनाशास्तव
धन सत्तेचा लोभ नए लव ॥८४॥
वदे हरी धर्मास येउनी विजयासह माघारी
दिग्विजयासी अतां सुखें जा निष्कंटक भू सारी ॥८५॥
भीमें वधिले मगधेशासी
कृष्णबळावर हें सकळासी
कळतां बहुता सुख हो निर्भर
भय सर्वासी कुणास मत्सर ॥८६॥
धर्म पाठवी दिग्विजयातें
चहुबंधूंना चार दिशातें
बाळेष्ठ बाहू जणु विष्णूचे
भीमार्जुन नी सुत माद्रीचे ॥८७॥
बहुत नृपानी वाकवुनी शिर
अर्पण केला निजकरभार
बळें दंडिले परि ते राजे
झाले उद्धट गर्वभरें जे ॥८८॥
यश संपादुन चार दिशांतुन
पय जनु कां गाइच्या सडांतुन
अर्थ संपदा बहु मेळविली
चहु वाणींतुन जणु त्या कालीं ॥८९॥
कुबेर भासे रंक असे धन गिरिसम तेथें पडलें
जमले कौरव यादव तेवीं नृणगण मुनिजन आले ॥९०॥
वे द शा स्त्र सं प न्न वि प्र ग ण
याज्ञवल्क्य धौम्यादिक मुनिजन
व्यास निदेशें यज्ञा बसले
मन अग्नीचें प्रसन्न झालें ॥९१॥
दिधली वाटुन कामें नाना
बघून योग्यता सर्वजणानां
उणीव जेथें पडेल कांहीं
उभा त्या स्थलीं श्रीहरि राही ॥९२॥
उच्चनीच नच म्हटलीं कामें
विप्रपदांसीं धुतलें प्रेमें
सादर काढियलींही उष्टीं
निजभक्तास्तव हरि नच कष्टी ॥९३॥
राजसूय - मख - दिक्षित धर्मा
बधुनी गंहिवर आला भीष्मा
सार्थक झालें मम विद्येचे
द्रोणाचार्या गमले साचें ॥९४॥
यज्ञधूम तो पावन भिंगल घोष श्रुतिमंत्राचा
पुण्यविभव ते अपूर्व गाया शक्त न अनंतवाचा ॥९५॥
विप्र दक्षिणें देव हवेनें
तृप्त जाहले याचक दानें
अपूर्व सन्मानानें नृपगण
मिष्टान्नें सेवून इतरेजन ॥९६॥
हविर्धूम - निर्धूत - मनो - मल
सकलहि झाले परि शिणले खल
पांडवकीर्ति श्रवुन अलौकिक
मत्सर करिती सुयोधनादिकि ॥९७॥
यज्ञोत्सव तो संपत आला
सत्कारा आरंभ जहाला
भव्य सभागृह फुलुनी गेलें
स्वर्णासन सर्वां दिधलेलें ॥९८॥
नृत्य - वाद्य - संगीत - कलांनीं
तोषविले सर्वा कुशलांनीं
नंतर राहुन उभा युधिष्ठिर
विनती भीष्मा करीत सादर ॥९९॥
पितामहा मज आज्ञा व्हावी पूजूं प्रथम कुणासी
सद्गुणमंडित सर्वहि म्हणुनी विकल्प ये चित्तासी ॥१००॥
सर्व सभासद उत्सुक चित्तीं
खिळली दृष्टी भीष्मावरतीं
गांगेयाची गिरा जशी का
स्वयंवरातिल शुभा कन्यका ॥१०१॥
प्रसन्न परि गंभीर जसा घन
भीष्म तसे मग करिती भाषण
योग्य पूजना पूर्ण विचारीं
सर्वोत्तम गोविंद मुरारी ॥१०२॥
साधुसाधु हा योग्य निवाडा
वेदहि याचा गात पवाडा
सुख होउन बहु सज्जन वदले
पांडव हर्षा हृदय न पुरलें ॥१०३॥
भीष्म गिरा परि हो ठिणगी ही
जणु कोठारी ज्वालाग्राही
शिशुपालादिक जे जळफळले
ते या वचने भडकुन उठले ॥१०४॥
चळले बुद्धि भीष्माची या ? सर्प ओकला गरळा
काय पाहुनी या गवळ्यासी मान तुम्ही हा दिधला ॥१०५॥
मान न शोभे वडिलपणाचा
बसला येथें पिता तयाचा
योग्य न हा आचार्य पदासी
गुरु द्रोण आहेत सभेसी ॥१०६॥
ज्ञानी ऐसें म्हणाल या जर
व्यास इथें हे वेदविदांवर
शौर्य असे कीं विदित जगाला
हा मथुरा सोडून पळाला ॥१०७॥
विप्र न हा नच वृद्ध न ऋत्विज
धरुं नच शकतो छत्र शिरीं निज
प्रिय तुमचा म्हणुनी यां भजतां
थोर अम्हासम येथें असतां ॥१०८॥
सोडुन देतां गरुड मयूरा
घुबडाच्या करितां बडिवारा
काय असा अपमान कराया
पाचारण आम्हास मखीं या ॥१०९॥
फूत्कारें या शिवशिव म्हणती बुधजन, हसले पापी
राजसू य शेवटा सुखानें जात नसेच कदापी ॥११०॥
भीष्में धिक् म्हटलें शिशुपाला
टाकिलें न परि शांतपणाला
डोकें तव दिसतें न ठिकाणीं
म्हणुन अमंगळ वदसी वाणी ॥१११॥
थोर असूं दे कुणी कितीही
श्रीहरिची सर तयास नाही
इतर आम्र वा चंपक चंदन
कल्पतरू हा परि यदुनंदन ॥११२॥
विशाल याचें ज्ञान शिवासम
विष्णु तसा हा अद्भुत विक्रम
सागर जणु हा ऐश्वर्याचा
असे रक्षिता भयभीतांचा ॥११३॥
धरी कौतुकें मानव वेषा
म्हणुन उणें नच मान परेशा
वंद्य सेव्य हा सुरासुरातें
काय आमुची वार्ता तेथें ॥११४॥
मूर्खाची या बडबड धर्मा आणु नको चित्तासी
अर्घाहरणी अग्रमान दे विशंक यदुनाथासी ॥११५॥
भाषण हें झोबलें खलाला
क्रोध विलक्षण ये शिशुपाला
भकूं लागला अद्वातद्वा
भानरहित मद्यपी जसा वा ॥११६॥
भीष्म दिसे हा पुरता वेडा
म्हणुन गाढवा म्हणतो घोडा
अधम दुजा ना या काळ्याविण
जवळी वसती सर्वहि दुर्गुण ॥११७॥
कपट हाच कीं धर्म जयाचा
वेदपठण हें असत्य - वाचा
कर्म जयाचें दुष्टपणा हें
परोत्कर्ष या लवहि न साहे ॥११८॥
कंसाचा वध कपटें केला
स्त्रियांसही हा घातक झाला
धरीत पौंड्रक यत्समवेषा
तयांस वधिले करुनी द्वषा ॥११९॥
भ्याड मूर्ख शठ दुरात्म्यास या परमात्मा म्हणताती
त्याच्या मागुन मंदमतीचे इतर आंधळे जाती ॥१२०॥
मान्य करी तूं धर्मा माझें
तेंची होइल तुझ्या हिताचें
शाल्व भूप दुर्योधन वा मी
अधिकारी या पूजन कामीं ॥१२१॥
भीष्माची या कुजली बुद्धी
स्तवितो नीचा शठास वंदी
सहन न झाले वच भीमातें
हात घातिला तयें गदेतें ॥१२२॥
आवरती परि भीष्म धरुन कर
भीमा धरणें शांती क्षणभर
समर्थ माधव, करि तो साची
गणती याच्या पराधांची ॥१२३॥
घडा पुरा भरतां पापाचा
बंद सदाची होईल वाचा
पुण्य शेष या अपशब्दांही
सरुनी जाया विलंब नाहीं ॥१२४॥
आयू उरले पळची कांहीं या अधमाचें भीमा
मरणें मरती दुष्ट आपुल्या मग कां कोप करा मा ॥१२५॥
शिशुपालाच्या संतापासी
पार न उरला या वचनासी
ठेचुन दगडानें मारा रे
थेरड्यास या मिळुनी सारे ॥१२६॥
गर्व जाहला पंडुसुतांनां
षंढासम सहता अपमाना
उठा वीर हो या वाक्याहीं
दुष्ट नराधन चळले कांहीं ॥१२७॥
अर्जुन - धनु परि बघतां चढलें
शौर्य तयांचे मनींच जिरलें
गजशुंडेसम बळकट बाहू
भीमाचे नच शकले पाहूं ॥१२८॥
भीषं म्हणति मी इच्छा - मरणी
रोम वक्र करुं शके न कोणी
अम्ही पूजितो इथें चक्रधर
करा विरोधा बल असलें तर ॥१२९॥
खवळुन धांवे खल कृष्णावर निर्लज्जा पशुपाला
पूजन घेसी वृद्ध - सभेसी हरितों तव गर्वाला ॥१३०॥
उठुन सिंहसा निजासनाहुन
पुरूषोत्तम हरि करीत भाषण
वचन दिलें मी तव मातेला
आज संपलें तें शिशुपाला ॥१३१॥
क्षमाच केली शत अपराधा
दोषांची मज अतां न बाधा
चिडला खल तो हरिवचनें या
क्षुद्रा पुरते निमित्त वायां ॥१३२॥
आहे ठाउक तुझा पराक्रम
चिरडुन टाकिन तुला किड्यासम
मथुरेशाचा मगधेशाचा
सूड उगवितों कपटवधाचा ॥१३३॥
वदुन असें खल शस्त्र उगारी
स्तंभित झाली परिषद सारी
सुदर्शनानें तोंच हरीचे
उडवियलें शिर नराधमाचें ॥१३४॥
अमर्याद जे मदांध होती विसरुन नय - नीतीतें
निज कृत्याचें असेंच भीषण लाभतसे फल त्यांतें ॥१३५॥
कोसळतां सुत दमघोषाचा
सज्जन करिती स्तव जयवाचा
प्रशंसिले माधवा मुनींनीं
जळती परि ते खल जन मानी ॥१३६॥
जगदीशा मग युधिष्ठिरानें
सादर नमिलें प्रेमभरानें
अर्घ्यपाद्य अर्पिले समंत्र
जल धरिलें तें शिरीं पवित्र ॥१३७॥
यथाधिकारें यथाक्रमानें
पूजियलें सकलां सन्मानें
धृतराष्ट्रासह निजबंधूंचा
विशेष आदर केला साचा ॥१३८॥
बघुन तेथली वैभव सत्ता
विषाद धरिली कौरव चित्ता
मत्सर वाटे सुयोधनातें
सर्प - शरीरीं पय विष होतें ॥१३९॥
तशांत एके दिवशीं मंदिर, मय - निर्मित बघतांना
हांसलि बघुनी फजिती त्याची परिहासानें कृष्णा ॥१४०॥
जल मानुनि भूसी स्फटीकाचे
भिजतिल म्हणुनी आवरि ओंचे
मणिमय - भू समजून जलाला
सुत अंधाचा पुरता भिजला ॥१४१॥
तेणें सहजचि हसले पांडव
हा चिडला तंव थट्टेनें लव
डंख धरी या अपमानाचा
होत नायटा कीं कांट्याचा ॥१४२॥
या ठिणगीचें पुढें भयंकर
वणव्यामाजीं हो रूपांतर
क्षत्रियकुलवन जयें जळावें
दुष्टासह बहु जपुन असावें ॥१४३॥
राजसूयमख समाप्त झाला
सन्मानानें जन वोळविला
दातृत्वाची अपार कीर्ती
दिशादिशांना याचक गाती ॥१४४॥
मुगुट ठेवुनी हरिचरणावर धर्मराज तइं वदला
गद्गदकंठें, “ मम तनु मन - धन अर्पण परमेशाला ॥१४५॥
गोप - जन - प्रिय हे यदुनाथा
गाउं कसा मी तव गुण - गाथा
भक्त जनांचा तूं कैवारी
कमलावर हे कृष्ण मुरारी ॥१४६॥
उपकारासी तुलना नाहीं
कसा तुझा होइन उतराई
वैभव हें धन हे यश उज्वल
तुझ्या कृपेचें सत्यसत्य फल ॥१४७॥
थोर थोर बल - धन - युत राजे
छत्र चामरा धरिती माझे
चढलों मी चक्रेशपदावर
तू पाठीसी म्हणुन रमावर ॥१४८॥
मी नांवाचा राज - पदासी
पालक रक्षक तूं हृषिकेशी
पर्वतास जरि म्हणती भूधर
भार खरा परि शेष शिरावर ॥१४९॥
सद्धर्माचा उपदेशक तूं वरदकरा शिरिं धरणें
दुजी न इच्छा जड पडतां मज जननीसम सांवरणें ॥१५०॥
प्रेमें उचलुनि वृकोदराग्रज
जवळी बसवी त्यास अधोक्षज
स्निग्ध रवें हरि वदला त्यासी
मोहविते तव सद्गुणराशी ॥१५१॥
पूर्ण काम मम असतां वृत्ती
लोभ उपजतो तुमचा चित्तीं
प्रेमरूप हें बंधक - जाळें
असुनी मज परि सुखकर झालें ॥१५२॥
धर्मा पुतळा सत्याचा तूं
नयनीतीचा आश्रय हेतू
तुज बोधावें असें न कांहीं
राजपदी परि सावध राही ॥१५३॥
दोष इथें मोहादिक राया
टपले असती सुयश गिळाया
विशाल पावन असुनी सागर
आंत असे कां हिंसक जलचर ॥१५४॥
सत्ता वैभव अतुलरूप बल यांतिल एकहि धर्मा
सच्छीलाही भ्रष्टविताती करुं देती न सुकर्मा ॥१५५॥
मजसम कोणी उरला नाहीं
अशी अहंता हृदयीं येई
उपदेशक ते शत्रू गमती
हितचिंतक जे हां, जी म्हणती ॥१५६॥
सदैव कर जोडुन जे स्तविती
थोर पदावर तेची चढती
नर्तक गायक विट चेटांना
भाव येत चुगली करि त्यांना ॥१५७॥
गुरु वडिलांची होत अवज्ञा
मान न मिळतो द्विजाश्रुतिज्ञां
उपेक्षिले जाती नित सज्जन
अस्थिर दीनांचे धन जीवन ॥१५८॥
सदाचार उपहासा विषय
ज्ञानाचा मग तुटतो आश्रय
शुद्ध नुरे स्त्रीविषयक वृत्ती
अपहाराची आवड चित्तीं ॥१५९॥
असे किती तरि सांगूं यास्तव सावधता बहु ठेवी
दाशरथी रामासम कीर्ती दिगंत तव पसरावी ॥१६०॥
पारखुनी मंत्री निवडावे
सखे सोयरे म्हणुन नसावें
कोषवर्धना राही तत्पर
परि नच लादुन नवे नवे कर ॥१६१॥
तूं न करी अन्याय कुणासी
अवसर देई नच कवणासी
करितो टीका म्हणुनी द्रोही
असे नृपा समजेन कधीही ॥१६२॥
वर्ण चारही अपुली सीमा
त्यजतिल ना, या लावी नेमा
संकर व र्णा श्र म ध र्मा चा
रोग भयद हा मानवतेचा ॥१६३॥
बहुतांशीं मानवी प्रवृत्ती
कामार्थातुन उगमा घेती
स्वतंत्रता परि त्यास नसावी
शांततेस ती वणवा लावी ॥१६४॥
अधिष्ठान नी ध्येय या परी घर्म मोक्ष दो अंगा
असल्यानें उन्नतीस - सहसुख - देती करिति न दंगा ॥१६५॥
दक्ष असावें तव अधिकारीं
निर्लोभी सप्रेम विचारी
असोत शेतें अदेवमातृक
विमुख न जावें परतुन याचक ॥१६६॥
लक्ष असे मजवर भूपाचें
सदा करी तो रक्षण माझें
असें गमावे प्रत्येकासी
स्थिरता येते मग राज्यासी ॥१६७॥
द्यूत तसे मदिरा मदिराक्षी
क्षणांत सारें वैभव भक्षी
पाश तयांचें अतिशय दुर्धर
गवसावे ना तयांत पळभर ॥१६८॥
शील सुरक्षित जेथ सतींचें
सज्जन - धन जीवन दुबळ्याचें
धर्माचरणा संकट नाहीं
लक्ष्मी तेथें सदैव राही ॥१६९॥
असंतोष पसरतां प्रजेसी सर्वनाश ओढवला
विदित असेना तुज वेनाचा शेवट कैसा झाला ॥१७०॥
कुणि नसो राज्यांत उपाशी
सुखी वीतभय असो प्रवासी
औषध रुग्णा योग्य मिळावे
रामराज्य मग हेच म्हणावे ॥१७१॥
एक आणखी ठेवी ध्यानीं
उदात्ततेसी व्य व हा रा नीं
मोजित जावे तरीच होतें
जनतेचें कल्याण नृपा तें ॥१७२॥
उदात्ततेची पोकळ भाषा
पराक्रमाच्या करिते नाशा
राजानें भू व्यवहाराची
त्यजूं नये, ती स्थिती यतीची ॥१७३॥
दुष्टासी करितांना शासन
म्हणतिल कायी मज परकेजन
भीड नसावी अशी नृपासी
बाध तयें ये प्रजाहितासी ॥१७४॥
असो पुरें हे इथेंच वर्णन
असेंच आहे तव सद्वर्तन
तुझेंच पाहुन मुनिही शिकती
धर्मराज तुज यास्तव म्हणती ॥१७५॥
येउन येथें बहुदिन झाले
कामहि आतां कांहीं नुरले
निरोप द्यावा सुखें अता मज
युधिष्ठिरासी वदे अधोक्षज ॥१७६॥
कान करोनी सर्वांगाचे
श्रवती पांडव वचन हरीचे
अवगाहन करि की गंगेसी
तान्हेला तापला प्रवासी ॥१७७॥
गमे तया बोलता असाची राहो हा हृषिकेशी
पुरे वाटलें काय सुधेचे आरोगण कवणासी ॥१७८॥
निरोप द्या मज सहसा माधव
वदतां, तरळे नयनीं आसव
विह्वल झाली बहु पांचाली
तया शांतवी मग वनमाली ॥१७९॥
नानारींती पंडुसुतांनीं
पूजियला हरि आभरणांनीं
गंहिवरलेल्या अंतःकरणें
वदला अर्जुन करुनी नमनें ॥१८०॥
ना जाई म्हणणें अमंगळ हरी जाजा म्हणू रे कसें
तूंते थांब म्हणों तरी तुजवरी सत्ताच तीं होतसे
इच्छे येइल ते करी जरि वदूं ती तो उदासीनता
ठेवी आठव आमुचा न वदवे यावीण कांहीं अतां ॥१८१॥
मनोरथपूर्ति नांवाचा बारावा सर्ग समाप्त
लेखनकाल :-
वैशाख शके १८७१
श्रीकृष्ण कथामृत - तेरावा सर्ग
( मुनर्मीलन )
तदूरेऽस्ति तदंतिकेऽस्त्यापिच तद् बाह्ये तथाऽभ्यन्तरे
तन्नैजत्यथ चजतीति निगमो जानात्यजानन् परम्
देवेत्थं वचनं विसंगतमिदं बोद्धुं न शक्ता वयम्
जानेऽहं त्विदमेव मे हितकरं मातापिता नः शिवः ॥१॥
रसाळ भाववाणिने अनेक संत गाइले
जना तरून जावया कलींत मार्ग दाविले
हिरे अमोल वाङ्मयी धरी शिरीं सरस्वती
महीपतीस त्या असो मदीय आदरें नती ॥२॥
सुरेख मंदिर शुभ्रशिलांचें
भव्य शिखर जणु हिमालयाचें
तीर्थपतीची पवित्रता वा
गृहरूपें या घेत विसांवा ॥३॥
दिवसा स्पर्धा करी रवीसी
पूर्णचंद्रसा दिसे निशीसीं
प्रसन्नतेसह शांती मंगल
परी सर्वदा राही निश्चल ॥४॥
गृहाकृती ती सुरम्य उज्वल
श्री - कमलासम वैकुंठातिल
ज्या बघतां ये प्रत्यय साचा
क्षुद्रमनाही विशालतेचा ॥५॥
मंद सुगंधित वायु विनयें
गवाक्ष - भागीं संचरुनी ये
सात्विकता वात्सल्य जिव्हाळा
शिकवितसे मग इथुन जगाला ॥६॥
विरक्तमुनिजन - तपोवनासम उपवन हर्म्याभवती
रम्यसुवासी तरुवेली ज्या फलसुमभारें लवती ॥७॥
शोभा तेथिल जीस न तुलना
परी करी हृदया चंचल ना
प्रवेशतां हो याच वनास
मदनहि झाला बाळ निरागस ॥८॥
( नाम धरी प्रद्युम्न मनोहर
सती रुक्मिणी हर्षित निर्भर
शिवप्रसादें अशी हरीची
होत गृहस्थी सफला साची ) ॥९॥
राज हंस शुक मयूर चातक
सुंदर नयनांचे मृग - शावक
रमती होउन मुदित मनातें
बंधन लवहि नसुनी तेथें ॥१०॥
ऋग्वेदी सौंदर्य उषेचे
शांतिपाठ वा उपनिषदांचे
मूर्त होउनी जरि या ठायीं
राहतात तरि कौतुक नाहीं ॥११॥
जगदीशाची जननी ज्यासी
पावन करिते निजसहवासी
अधिक बोलणें नलगे कांहीं
सती देवकी येथें राही ॥१२॥
दर्शन घ्याया प्रिय जननीचें प्रतिदिवशीं वनमाळी
प्रभात समयीं येई घेउन सुमनें निजकर कमलीं ॥१३॥
प्रेमभरें शिर चरणीं ठेवी
उचलुन बसवी जवळी देवी
वात्सल्यानें कुरवाळी मुख
परात्पराचें घेई निजसुख ॥१४॥
शुद्ध दुधाचें पायस हाता
देउन वदली हरीस माता
कथिलें मजसी गर्गमुनीनीं
ग्रहण रवीचें आलें म्हणुनी ॥१५॥
येत्या मासांतिल अंवसेशीं
गिळील राहू रवि - सर्वांशीं
मज वाटे या पर्वासाठी
सरस्वतीच्या जावें कांठीं ॥१६॥
राजर्षी कुरुच्या पुण्याहीं
पावन झाली विशेष भूही
अवतीं भवतीं या भूमीचे
वेल वाढले यदुवंशाचे ॥१७॥
पर्वकाल हा यास्तव साधूं जाउन त्या क्षेत्रातें
थोर थोर जन संत महात्मे सहजीं मिळतिल जेथें ॥१८॥
वदे श्रीहरी अवश्य माते
जाउं कुरुक्षेत्रा पर्वातें
इच्छेची तव कधि न अवज्ञा
ही तो मंगलकारक आज्ञा ॥१९॥
बलरामासह सकलहि यादव
मेळवीत मग सभे रमाधव
विचार आपुला कथिला त्यासी
सर्वहि झाले मुदित मनासी ॥२०॥
चपलगतीच्या अनलस दूता
पाठवुनी ही कळवी वार्ता
प्रियसखये जे पांडव त्यासी
स्वजना विसरत नच हृषिकेशी ॥२१॥
द्वारा नगरीचे संरक्षण
प्रद्युम्नावर दिलें सोपवुन
यादव सेना दिधली संगें
कथिलें सावध असण्या अंगें ॥२२॥
जननी जनका बलरामासह घेउन निजपरिवारा
यात्रेसाठीं निघे दयामय आश्रय धर्माचारा ॥२३॥
प्रवासांतही अमाप वैभव
श्रीशिबिरासी उणें नसे लव
स्वयें द्वारका सचेत झाली
प्रभुसह जणु यात्रेस निघाली ॥२४॥
ग्राम नगर वा असले कानन
स्वागत करिती प्रेमभरें जन
कुणी दूध फल धान्य कुणी रे
कुणी फुलांचें अर्पी गजरे ॥२५॥
मनापासुनी समभावानें
घेतियलें तें गदाग्रजानें
हीन थोर ही निघड न कांहीं
प्रेमें भिल्लहि धरिले हृदयीं ॥२६॥
यास्तव या अग्रणी ग्रामणी
श्रीमान् न्यायी म्हटले जाणी
जनास नेता असा असे जर
कशी विपत्ती करि डोकें वर ॥२७॥
सरस्वतीसी ये परमात्मा स्वजना घेउन संगें
पूर्णचंद्र जणु नक्षत्रासह आकाशीच्या गंगें ॥२८॥
क्षेत्र सुखद तें ब्रह्मावर्त
पावन होतें जें मर्यादित
स र स्व ती नें दृ श द्व ती नें
मनुज जसा का चिज्जडतेनें ॥२९॥
तीर्थ त्या स्थलीं समंत पंचक
पापताप - संताप - विमोचक
क्षत्रिय - हननो - द्वेजित रामें
इथेंच केलें तप निष्कामें ॥३०॥
यास्तव पावन विशेषची तें
तिथें श्रेय निज मिळवाया तें
दूर दूरचे लोक मिळाले
प्रवाह जणु सागरीं रिघाले ॥३१॥
पाण्ड्य अवंती कलिंग केरल
कामरूप अपरान्त नि कोसल
विदर्भ मैथिल मगधनृपादी
यादव पाण्डव कौरव चेदी ॥३२॥
अत्रि अंगिरा अरुंधतीवर भृगु कश्यप मैत्रेय
च्यवनगर्ग शांडिल्य पराशर गौतम मार्कंडेय ॥३३॥
असे पातले तीर्थीं मुनिवर
ब्रह्मज्ञानाचे जणु सागर
आश्रय जैसे यमनियमांचे
दीप्ताग्नीसम तेज जयांचें ॥३४॥
निज अस्तित्वें करिती पावन
भूतल सारें असे संतजन
गृहस्थ आले सहसुत - दारा
येती घेउन वणिज पसारा ॥३५॥
सान थोर नरनारी येती
समावल्या कीं अठरा जाती
क्षेत्र दिसे तें जेवी कानन
शारदकालीं गेले बहरून ॥३६॥
ग्रहतारागण मंडित अंबर
प्रगटित वैभव वा रत्नाकर
जनसंमेलन मधुर दिसेतें
विविधवर्ण जणु इंद्रधनूतें ॥३७॥
कुरुक्षेत्र ते गमे मनोहर गोडगळ्यांतिल गाणें
संवादी स्वर मिळता जेवीं बहुविध आलापानें ॥३८॥
अनेकांत एकत्व बघावें
भेद अभेदामधें समावें
वैषम्या ये समता केवीं
रीत भारतामधें शिकावी ॥३९॥
भव्य उभविलीं शिबिरें कोणी
कुणी मंडपी कुणी वितानीं
कुणी पाहिली छाया तरुची
क्षिती कुणासी नसे उन्हाची ॥४०॥
हत्ती जणु कीं जिवंत डोंगर
चपल - गतीचे घोडे सुंदर
बैल जयांचीं थोर वशिंडें
गाईंच्या शिंगाप्रति गोंडें ॥४१॥
बघण्यापूर्वी सोय अपुली
दुसर्यासाठीं झटती सगळीं
साध्य एकची असल्यावरतें
मत्सर लोभा स्थल ना उरतें ॥४२॥
गजबज असुनी बजबज नव्हती कुठेंच त्या समुदायीं
समाधान सकलांही होते ही पूर्वज पुण्याई ॥४३॥
शिबिर हरीचें मधें विराजे
मेरुसम गिरिगणांतरी जे
तेच पांडवां होय विसावा
मधु सोडून का भ्रमर रमावा ॥४४॥
पांचाली सह वसे रुक्मिणी
देवकीस कती सन्मानी
श्वशुर हरीचे उत्सुक चित्तें
हृदयी धरिती निजकन्यांतें ॥४५॥
सखे सोयरे आप्त मिळाले
भेटीनें त्या प्रसन्न झाले
मुनिजन घेउन हरिचें दर्शन
म्हणती आजी कृतार्थ जीवन ॥४६॥
परी स्वस्थता हरिसी नाहीं
जणू विसरले चुकले कांहीं
धुंडिति चंचल नयन कुणातें
उदास मुद्रा मधुनी होते ॥४७॥
देह वसे शिबिरीं परिवारीं मन परि तेथें नव्हतें
भलतें उत्तर दे मग हांसुन सावरण्या पाहत तें ॥४८॥
द्रुपदसुता रुक्मिणी धनंजय
कृष्णवर्तनें करिती विस्मय
वदे सहेतुक मग पांचाली
गोकुळची कां बरें न आली ॥४९॥
मंडळीस त्या बघावयाची
आस असे मज फार दिसांची
तुझ्या मुखें हरि कितितरि वेळां
महिमा ज्यांचा मी ऐकियला ॥५०॥
तदा म्हणे श्रीहरिची जाया
मीही आतुर त्या वंदाया
त्यांतहि केव्हां पाहिन राधा
तुलनेची कीं जिला न बाधा ॥५१॥
भाव भक्तिची जी परिसीमा
संत जियेचा गाती प्रेमा
दिधलें यानी मज आश्वासन
तुज या पर्वीं व्रज जन दाविन ॥५२॥
मीही त्यांची वाट बघत गे प्रिये काल पासोनी
बोलत माधव कधीं भेटती गोपी, व्रजजन, जननी ॥५३॥
तीर्थ - विधीस्तव या पर्वासी
येतिल मत्प्रिय गोकुलवासी
येथवरी मी विश्वासें या
आलों झाले श्रम परि वाया ॥५४॥
प्रिय - भक्तांच्या भेटीवांचुन
काय दुजें मज उरे प्रयोजन
मी त्यांच्यास्तव ते मजसाठीं
अवतरतो या प्रेमापोटीं ॥५५॥
तोंच आतं कुणी सेवक येई
धां न मावे ज्याच्या हृदयीं
हर्ष जयाच्या फुलला वदनीं
विनम्र झाला प्रभुचें चरणीं ॥५६॥
करी त्वरे तो मंगलभाषण
महाराज यदुवंश विभूषण
जवळ गोपगण अगदीं आला
गात मुखानें अपुल्या लीला ॥५७॥
ऐकुन दिधली मौक्तिकमाला गळ्यांतली त्या दासा
वार्ता नच ही सुधा वर्षली तृषितावरतीं सहसा ॥५८॥
पंडुसुताचा हात धरोनी
त्यासह गरुडध्वज वेगानीं
सामोरा ये गोपजनांसी
गगन पुरेना आनंदासी ॥५९॥
गोपाळांसह नंद यशोदा
वृषभानूची तनया राधा
भजनें गाती जन अनुरागें
गाड्या हळुहळु येती मागें ॥६०॥
पिटिती टाळ्या कुणी झल्लरी
टाळ वाजवी कुणी बांसरी
चाळ बांधुनी कोणी नाचे
नामें हरिची गाउन वाचें ॥६१॥
व्रजनाथा हें कुंजविहारी
मुरलीधर मावध गिरिधारी
नंदकिशोरा हे घननीळा
राजिवनयना हरि गोपाळा ॥६२॥
मुक्तकंठ गातात रंगलें चित्त विसरलें भान
समरस अर्जुन ऐकत करूनी सर्वांगाचे कान ॥६३॥
कृष्ण येतसे बघतां नयनीं
गोप गर्जले उ च्च र वा नीं
आज तपस्या फळास आली
हरि भवतीं सर्वही मिळाली ॥६४॥
पूर जसा ये महानद्यांना
उफाळल्या त्यापरी भावना
शब्दफुटेना स्रवती डोळे
काय करूं किति नको न झालें ॥६५॥
सहस्त्र डोळे भरून बघावें
सहस्त्र हातीं कवटाळावें
सहस्त्र वदनीं घोष करावा
लाभ अम्हा हा कुठुन घडावा ॥६६॥
वासव हैहय शेष न आम्ही
प्रभो दिली इंद्रिये निकामी
गोपांच्या ये असे मनासी
रोम रोम नाचती तनूसी ॥६७॥
परमात्मा दे मिठी पदांसी येउन नंदा जवळी
सकंप सद्गद कंपित हाते वृद्ध तया कुरवाळी ॥६८॥
हरि आला हें यशोमतीनें
ऐकियलें परि दिने न नयनें
जलें डंवरूनी गेली दृष्टी
हर्षित झाली जननी कष्टी ॥६९॥
आर्त रवें संबोधुन मातें
हरिने दिधली मिठी गळ्यातें
रामें जणु सरतां वनवास
धन्य धन्य गर्जलें दिवौकस ॥७०॥
मुकुंद भेटे मग राधेसी
मंगल सारे यदाश्रयासी
मोह - तमाचा स्पर्श न जीतें
गंगोत्री जी भक्तिरसातें ॥७१॥
श्रीहरिची जी चिन्मय छाया
मिठी देत तिज दृढ यदुराया
शुभमीलन नच भेद कळावा
कवण राधिका कवण हरी वा ॥७२॥
प्रेमसमाधी पाहुनिया ती मुनिजन हृदयीं धाले
प्रेमाचा या अंशहि मिळतां जीवन सार्थक झालें ॥७३॥
व सु दे वा नें श्री नं दा चा
आदर केला फारचि साचा
दोघांचेही गंहिवरलें मन
किति दिवसांनीं झालें दर्शन ॥७४॥
शिबिरासी वा परिवारा निज
पुरा विसरला अतां अधोक्षज
गो पा ळा स ह वृ क्षा खा लीं
पूर्णपणें रमला वनमाळी ॥७५॥
यदुनाथ न हरि जणु हा आतां
प्रौढवयाची नुरली सत्ता
तत्त्वज्ञानी नच, ना वीर;
व्रजरमणीप्रिय नंदकिशोर ॥७६॥
यशोमतीसी करण्या वंदन
सवें सर्वही सुनांस घेउन
येत देवकी हर्षित चित्तें
विस्मय झाल व्रजललनांतें ॥७७॥
या हरिच्या भार्या हे कळतां यशोमतीच्या हृदयीं
वात्सल्यासह आनंदाचे अपूर्व भरतें येई ॥७८॥
वधू वंदिता, सती यशोदा
प्रेमभरें दे आ शि र्वा दा
“ प्रियबाळे सौभाग्यवती हो
गुणबलशाली सुत तुज लाहो ” ॥७९॥
शिर कुरवाळित अंगावरचें
कुतुकें निरखित वदन हरीचे
पुसे देवकीप्रती यशोदा
बसली होती जवळच राधा ॥८०॥
“ कुणास मिळवी काय पराक्रम
करून वदा हा श्याम तरी मम
थोरपणींच्या याच्या लीला
ऐकूं द्या मज म्हातारीला ” ॥८१॥
हांसुन सांगे सती देवकी
वडिल सून ही पहा भीमकी
विदर्भभूपाची प्रिय कन्या
हरीस इच्छित असे अनन्या ॥८२॥
भावानें परि धरिला आग्रह अर्पाया शिशुपाला
हिनें विनविता हरिलें कृष्णें करुनी घोर रणाला ॥८३॥
कमलमुखी ही दुसरी भामा
रुसवा धरिते कधीं रिकामा
हिचा पिता घे आळ हरीवर
स्वमंतकाचा तूंची तस्कर ॥८४॥
वधिला बंधू मम रत्नास्तव
आरोपें या शंकित यादव
परी प्रसेना वधिलें सिंहें
जांबवतासी रत्न मिळे हें ॥८५॥
कलंक दुःसह होय हरीसी
रत्न आणिलें तयें प्रयासी
सत्राजित मग पश्चात्तापी
कन्येसह निज, रत्न समर्पी ॥८६॥
जांबवतासह रत्नाकारण
युद्ध करी अपुला व्रजमोहन
तयें तोषुनी बाहुबलाही
जांबवती दिधली दुहिता ही ॥८७॥
कालिंदी ही दिनकर - कन्या गिरिजेसम तप करुनी
भाग्यवती ही पुण्यानें त्या झाली हरिची रमणी ॥८८॥
कोसल - नृप - तनया सत्या ही
वीर्य - शुल्क ठरविली विवाही
सात मत्त बैलांस वेसणुन
वरिली रामासम जिंकुन पण ॥८९॥
ही भद्रा कैकयी तरीही
फारच आहे प्रेमळ हृदयीं
मम नणदेची सुता, पित्यानें
कृष्णा दिधली प्रेम भरानें ॥९०॥
हीहि त्यापरीच मित्रविंदा
स्वयंवरानें वरी मुकुंदा
बंधू दोघे विरोध करिती
कोण टिके परि याचे पुढतीं ॥९१॥
आणिक ही लक्ष्मणा सुलक्षण
आणी हरुनी स्वयंवरांतुन
आहे ही मद्राधिप तनया
पट्टवधू हरिच्या आठहि या ॥९२॥
नरकासुर वधुनी कारेंतुन त्याच्या ज्या सोडविल्या
असती त्या भार्या बहु याच्या सगळ्या येथ न आल्या ॥९३॥
गोविंदाच्या भार्याविषयीं
ऐकुन राधा हर्षित हृदयीं
धन्य तुम्ही वरिलें गोपाळा
लबाड परि गे हा सांभाळा ॥९४॥
सहवासें निज लावुन गोडी
हरि हा सहजीं तयास तोडी
धरा भरवंसा कधी न याचा
नेम न कांहीं या फसव्याचा ॥९५॥
हृदीं बिंबतें प्रतिमा याची
तीच खरी गे विश्वासाची
तिला न लवहि द्यावें अंतर
सुखास मग ना पुरेल सागर ॥९६॥
बाहिरुनी हा भारी छळतो
काम उपजवीं तृप्त न करितो
हृदयांतिल परि याची मूर्ती
इच्छेपूर्वी करीत पूर्ती ॥९७॥
वदे श्रीपती सस्मित “ राधे ! कलह निर्मिसी कायीं
डोळे लावुन बसतां सगळ्या धडगत माझी नाहीं ॥९८॥
सखे राधिके सत्य तुझेंचि
म्हणे रुक्मिणी प्रिया हरीची
धन्य भाग्य झालें तव दर्शन
गाढ दिधलें प्रेमालिंगन ॥९९॥
रमा राधिका भिन्न तरीही
तत्व एकची उभयां ठायी
श्रीहरि या एका तत्त्वाचीं
दोघीही त्या रूपें साचीं ॥१००॥
भक्तीची नु परा मधुरा कीं
शीतलता वा प्रभा शशांकीं
एक चारुता दुजी सुरभिता
कमलाची परि एकचि सत्ता ॥१०१॥
सती यशोदा सकलांनाही
जवळ बसवुनी प्रेमें घेई
वदे देवकी या सर्वांना
बाई कांहीं बोध कराना ॥१०२॥
कुलस्त्रियांनां भूषण तुम्ही आश्रय गृहिणी धर्मा
तुम्हामुळेंची श्रीहरिसी या इतुका आला महिमा ॥१०३॥
जरी गुणाच्या सर्व सुना मम
तेजगुणा ये बोधें अनुपम
पैलू पडतां जशी हिरकणी
चमकतसे कीं अपूर्वतेनीं ॥१०४॥
बरें म्हणाली हसुन यशोदा
बोलत मग बघुनी गोविंदा
प्रसन्न करणें मन भर्त्याचे
रहस्य हेंची xxxx - धर्माचे ॥१०५॥
पतीस मानी दैवत पत्नी
तो तिजलागी सुखवी यत्नी
परस्परीं विश्वास पुरा जर
हर्षसुखा साम्राज्यचि ते घर ॥१०६॥
मान करावा वडिल जनांचा
नम्र असावी सदैव वाचा
मनीं जिव्हाळा साना विषयी
धरितां सकला प्रिय ती होई ॥१०७॥
चित्त आपुल्या वश ठेवावें आवरुनी यत्नानें
भावनांस जपणें दुसर्यांच्या अतिशय कोमलतेनें ॥१०८॥
दक्ष असावें गृहकृत्यासी
अल्व न सहावें मलिनपणासी
नच माना हें काम न माझें
आळस लक्षण नच विभवाचें ॥१०९॥
रविकिरणांचें व्हावें स्वागत
गृहांगणीं जे स्वच्छ सुशोभित
धाक असावा दास - जनासी
परि नच येउन संतापासी ॥११०॥
सर्वां आधीं शयन त्यजावे
सकलां वादुन मग जेवावें
कार्य निमित्तें कधी पतीची
करा उपेक्षा लवहि न साची ॥१११॥
हाच पतीसी वश करण्याचा
उपाय आहे एक, सुखाचा
ताइत गंडे जी कुलटा ती
शोधित बसते आत्म - विघाती ॥११२॥
निजपावित्र्या प्राणपणेंही रक्षा नित्य अनन्या
पवित्र जी नच ती नच माता भगिनी पत्नी कन्या ॥११३॥
त्याग धर्म हा संयम भूषण
स्वभाव व्हावा कीं प्रेमळपण
उलट पतीच्या कधिं न असावें
इतर सर्व मग यांत समावे ॥११४॥
तुम्हे घराच्या असा स्वामिनी
आय तसा व्यय घ्यावा स्वमनी
पालन करणें कुलधर्माचें
सन्मानावे पद अतिथीचें ॥११५॥
फार किती तरि कथूं तुम्हासी
सती देवकी पुण्यबळेंसी
तुम्हा लाभल्या अनुकरणातें
आचरणें निज सुखवा त्यातें ॥११६॥
पावन वाणी यशोमतीची
सकल जणींना रिझवी साची
नयन जलानें भिजवित चरणा
भामेनें तिज केलें नमना ॥११७॥
गोकुळजन - समुदायीं लाभे समाधान सर्वांना
सरळ प्रेमळ निर्लोभांचा स्नेह न सुखवी कवणा ॥११८॥
आनंदी प्रियजन सहवासें
चार दिवस गेले क्षण जैसे
पर्व दिवस ये मग अवसेचा
वेध लागलासे ग्रहणाचा ॥११९॥
पर्वविधीस्तव धांदल झाली
सर्वहि तीर्थी सचैल न्हाली
निराहार राहुन जप करिती
दानें देती बहुविध रीतीं ॥१२०॥
गिळीत राहू क्रमें रवीसी
डाग लागला पसरायासी
लोक समाजीं अफवा जैसी
स्पर्शहि नसतो जरीं मुळासी ॥१२१॥
ग्रस्त होतसे बिंब सबंध
प्रकाश अगदीं झाला मंद
तारे हसले हळुच नभासी
क्षुद्र खुले जइं विपत् सतांसी ॥१२२॥
सांज जाहली कशी अवेळीं चाराही नच घेती
घरट्यासी परतली पाखरें दीनरवें किलबिलती ॥१२३॥
बिंब होतसे लाल काळसर
वातावरणहि झालें धूसर
उदास भासे जगतीं सारें
पडलें होतें अगदीं वारें ॥१२४॥
सृष्टीची खिन्नता परी ही
फार वेळ कीं टिकलीं नाहीं
दिसूं लागले हाम्य रवीचें
धैर्य चळे नच कधि सुजनांचे ॥१२५॥
बिंबरवीचें पुनः प्रकाशे
संकट कांहीं नव्हतें जैसे
पाप पळालें या भावानें
लोकांनीं ही केलीं स्नानें ॥१२६॥
यथासांग कर्मे करिती जन
सद्धर्माची ओळख ठेवुन
दाता नच दे उपकारास्तव
घेणाराही अगतिक ना लव ॥१२७॥
यात्रिकांस नच छळती कोणी धर्म दक्षिणेसाठीं
व्यंगांचें निज करून भांडवल कुणि ना भरती पेटी ॥१२८॥
पर्वीं राहुन उभे जलातें
हरिने जपिलें गायत्रीतें
सर्वकाळ राही उपवासी
धन्य वाटले धर्मविधीसी ॥१२९॥
श्रीनंदाच्या हातें वैभव
अपुलें करवी दान रमाधव
नंदाची मग उदारकीर्ति
तृप्तमनानें याचक गाती ॥१३०॥
करी यशोदा शत गोदानें
भूषविलें ज्यां मणि हेमानें
अन्नदान, गणती वस्त्रांची
इंद्रासहि ना करवे साची ॥१३१॥
पर्वकाळ तो अशारितीनें
समाप्त झाला आनंदानें
परस्परांचा निरोप घेउन
लोक निघाले गेहा परतुन ॥१३२॥
गोपगणांच्या हृदयासी परि व्याकुळता ये भारी
धरिती कवळुन निजहृदयासी पुनः पुन्हा गिरिधारी ॥१३३॥
पोचविण्या ये दूरवरी हरि
घेई लोळण नंद पदांवरि
निज शेल्यानें गो प ज नां चे
जयन पुशी, स्रवती निज साचे ॥१३४॥
कसे तरी शेवटीं एकदा
व्रज परते सहनंद यशोदा
वळूनी मागें बघती विह्वल
मार्गा भिजवी नेत्रांतिल जल ॥१३५॥
नवें तेज ये श्रीकृष्णासी
गोपजनांच्या प्रियसहवासीं
सेवन करितां दिव्य रसायन
भरे, ओज उत्साहें जीवन ॥१३६॥
पर्व एक सरलें ग्रहणाचें
वेध लागले परि दुसर्याचे
संकट कधिं एकटे न येई
कळप करून जणु असतें तेंही ॥१३७॥
रुचलें न कुरुक्षेत्रा येउनिया लोक जाहले परत
योजी स्वमनीं कांहीं भूमी ती नित्य रक्त - लेप - रत ॥१३८॥
पुनर्मीलन नांवाचा तेरावा सर्ग समाप्त
लेखनकाल :-
भाद्रपद शके १८७१
श्रीकृष्ण कथामृत - चौदावा सर्ग
( संकट निवारण )
कैलासेऽतिमनोहरे निजपदन्यासैर्महीं पावयन्
नृत्योत्क्षेपविकीर्णपिंगलकचैःसंवेष्टयन्नम्बरम्
उच्चैस्तालमृदङ्गवादनरतैः संस्तूयमानः सुरैः
कुर्वन् ताण्डवमीश्वरो विजयतां नः श्रेयसे प्रेयसे ॥१॥
वेणा कर्मा कान्हो केरी भागू स xx मिरा बहिणा
मुक्ता जणु नवभक्ती या माझे नमन त्यांचिया चरणा ॥२॥
केवळ भक्तिबळाने परमेशा जी सती जनाबाई
बसवी जात्यावरती ठेवित मी तत्पदावरी डोई ॥३॥
देवी वंद्य अहल्या पावनचरिता सती रमाबाई
वंदन नम्र तयासी इहपर मार्गी जया तुला नाहीं ॥४॥
देवांचे अधिदेव उमाधव
येत दया ज्या तप करिता लव
वर मिळवाया त्यांचे पासुन
शाल्व दुर्मती करि तप दारुण ॥५॥
त्याचे सगळे प्रिय सहकारी
कंसादिक त्या वधी मुरारे
म्हणुन हरिवर जय लाभाया
यत्न करी हा दुर्जन वाया ॥६॥
प्रसन्न होउन पिनाकपाणी
विमान देई सौभ म्हणोनी
चढुन बळावर ज्या, आकाशीं
फेकाया ये आयुधराशी ॥७॥
गर्वानें मग ताठुन जाई
जणु ना उरले दुर्धट कांहीं
प्रचंडसेना घेउन संगे
द्वारेवर ये चालुन वेगे ॥८॥
कृष्ण नसे नगरीत अशी ती संधी दुर्जन साधी
बघुन विगुणता तनुची जेवी आक्रमितो का व्याधी ॥९॥
सन्मुख व्हावे श्रीकृष्णासी
सौभबळेही धीर न त्यासी
र्पद्युम्नासी गु प्त च रा नी
वार्ता ही कळविली त्वरेनी ॥१०॥
घरी कुणाच्या शिजते कायी
ज्ञान असावे भूपतिठायी
चार जयाचे असतिल मंद
जमजावा तो नृपती अंध ॥११॥
चतुर वीर तो तनय रमेचा
बळकट करि तट शीघ्र पुरीचा
हुंडीं चढविल्या थोर शतघ्नी
फेकिताति ज्या सुदूर अग्नी ॥१२॥
झणी मिळविली यादव सेना
दक्ष करी युद्धास तयाना
बंद करविल्या सर्वहि वेशी
जा ये, केवळ होत खुणेसी ॥१३॥
दूर करी नट नर्तक गायक
वर्ज्य ठरविले मद्य नि मादक
तहान भूक न झोप तयासी
विशेष जपले स्त्री - बालासी ॥१४॥
राहूच्या ग्रहणातुन सुटला सूर्य दिवस मावळला
द्वारकेस तइ, केतकीस जणु अहिचा, वेढा पडला ॥१५॥
घोर निशा की अवसेची ती
अंधाराने भरली होती
मेघामागे दडल्या तारा
भये जाहला स्तंभित वारा ॥१६॥
रेघ तमीं काढणें काजळे
गृहगिरि तरु त्यासम, न वेगळे
विषण्ण हृदया येत निराशा
दिशा जाहल्या उदास तैशा ॥१७॥
विपदे माजी दुर्जन - वाचा
तेवि ध्वनि - कटु ये घुबडाचा
कोल्हे गाती स्मशानगाणी
टिटवी रडते केविलवाणी ॥१८॥
निःशब्दाच्या भयाण नाचा
चाळ बांधिला रातकिड्यांचा
हिंस्त्र पशूंचे जळते डोळे
कामास्तव या हिलाल झाले ॥१९॥
रात्रीसी त्या जन शाल्वाचे जमले नगरी भवती
पापे बहुधा अंधारातचि अपुली कामे करिती ॥२०॥
सुसज्ज पाहुन परी द्वारका
खल हृदयासी बसला चरका
तोंड रणा लागले प्रभाती
रक्ते रंगित झाली माती ॥२१॥
क्षेमवृद्धि वेगवान् विविन्ध
शाल्वाचे हे वीर मदान्ध
क्रोधे भिडले यदुवीरासी
चारुदेवष्ण मुख, जे बलराशी ॥२२॥
श्रीहरि ज्या रण - विद्या शिकवी
स्तुती तयांची किती करावी
सिंहासम ते करिती विक्रम
विरले रिपु रविपुढे जसा तम ॥२३॥
प्रद्युम्नाच्या श र सं धा ना
मेघवर्षही तुळू शकेना
पक्कफलापरि रि पु शि र रा शी
सहज तये रचियली महीसी ॥२४॥
निजसेनासंहार पाहुनी शाल्व चढे क्रोधाते
प्रद्युम्ने परि सवेच त्यासी लोळविले शरघाते ॥२५॥
हर्षे गर्जे यादवसेना
अरि सैन्याचा पाय ठरेना
शाल्व तोच की सावध झाला
क्रोध येत अनिवार तयाला ॥२६॥
म्हणे कुठे तो तुमचा राजा
पहा पराक्रम आता माझा
भ्याडपणे का बसला दडुनी
मित्रांची मम घेतो उसनी ॥२७॥
सौभामाजी बसे त्वरेने
युद्ध करी तेथुन मायेने
शास्त्रांचा वरुनी भडिमार
व्याकुळ झाले बहु यदुवीर ॥२८॥
वीरवर प्रद्युम्ना वरती
खले सोडिली अमोघ शक्ति
श्रांत वीर तो त्या आघाते
मूर्च्छित होउन पडे रणाते ॥२९॥
सेनानी घायाळ जाहला पाहुन यादव सारे
विह्वल झाले धैर्य गळाले गर्जति हाहाःकारे ॥३०॥
रिपुसैन्याने मग धरिले बळ
अधोर झाले रण ते तुंबळ
वीर शोणिते माखुन गेले
प्रलय पातला जणु त्या वेळे ॥३१॥
अजुन वीर तो पाहुन मूर्च्छित
रणातुनी ते दूर सूतरथ
जल शिंपी प्रद्युम्न - मस्तकी
सावध करण्या कुशल दारुकी ॥३२॥
घाय बांधिले नीट पुसोनी
वारा घाली आतुरतेनी
तदीय यत्नाप्रति यश आले
रौक्मिणेय तो उघडी डोळे ॥३३॥
बघता निज रथ नसे रणासी
राग येत त्या वीरवरासी
यशास हा मम कलंक आहे
मूर्खा केले काय तुवा हे ॥३४॥
पाठ देऊनी रणा, पळावे शील न हे वृष्णीचें
भूषण वाटे रणी कराया स्वागत ही मृत्युचे ॥३५॥
सूत जुना तूं असुनी केवी
भुरळ अशी ही तुला पडावी
काय बोलतिल यादव माते
कसे दाखवूं मुख ताताते ॥३६॥
तयीं सोडिले पुर मम हातीं
काय तयाचे या अपघातीं
धिक् पौरुष म्हणती अबला जन
छे छे लज्जास्पद हे जीवन ॥३७॥
आयुष्मन् व्हा नच चुकलोसे
कर्तव्या मी नच चुकलोसे
मूर्च्छित वीरा सांभाळावे
हेच सारथी - धर्मा भावे ॥३८॥
जाइल कोठें शाल्व अता तो
बघा त्वरे रथ रणांत नेतो
वदुन असे प्रेरिले हयासी
स्फुरण पुनः ये यदु वीरासी ॥३९॥
प्रद्युम्नाने अद्भुत केला विक्रम समरावेशी
प्रलयकाळचा रुद्र भयंकर भासे शाल्वजनासी ॥४०॥
कमलनयन ते प्रद्युम्नाचे
जणूं जाहले कोकनदाचे
तप्तसुवर्णासम मुख सुंदर
वृत्रवधोद्यत जसा पुरंदर ॥४१॥
वीरामागुन वीर रिपूंचे
बघते झाले सदन यमाचे
शाल्वा बसुनहि सौभामाजी
सहन न होई ती शरराजी ॥४२॥
रणविद्येतिल त्याची माया
अता जाहली अगदी वाया
शस्त्र शिलांचा वर्ष करी तो
परी न पोंचत असे महीतों ॥४३॥
पाहुन हरले सर्व उपाय
शाल्व घेतसे मागे पाय
द्वारवतीची केली दैना
कृष्णकरी वर मुख आताना ॥४४॥
समाधान मानुन निजचित्ती असें, ससैन्य पळाला
मृत्यु असे पाठीस परी की तो चुकला कवणाला ? ॥४५॥
शाल्व पळाला सौभासंगें
पाहुन रतिपति धांवत मागें
प्रखर घेउनी निजकरि शक्ती
उद्धवजी परि त्या आडविती ॥४६॥
“ देशकालबल आण विचारी
घातक याचे नियत मुरारी
प्रथम पुरीची करी व्यवस्था
मदन धरी या वचनी आस्था ॥४७॥
परत फिरे तो जयजय घोषे
स्वागत करिती यादव हर्षे
सुवासिनी त्या प्रति ओवाळी
कुंकुम रेखुन, भव्य - कपाळी ॥४८॥
तीर्थाहुन परतले मुरारी
चकित पाहुनी xरानगरी
तारकपीडित इंद्रपुरीसम
दिसे दुर्दशा नागरिका श्रम ॥४९॥
ढासळला तट खचलें गोपुर ढीग पथीं दगडांचे
विशीर्ण झालें उपवन बुजलें सर फुलल्या कमलांचे ॥५०॥
दारीं येता श्रीमधुसूदन
प्रद्युम्नानें केले वंदन
खाली घालित मान परंतु
शद्ब फुटेना बहुभयहेतूं ॥५१॥
परी सात्यकी कथीत सगळें
शौर्य कसे मदनें गाजविले
पिता धरी मग तयास हृदयीं
धन्यवाद इतरासहि देई ॥५२॥
खंत न मानावी थोडीही
अपयश हे नच दूषण कांहीं
कर्तव्या परि व्हावे तत्पर
सोडुन पाणी सर्वस्वावर ॥५३॥
प्रयत्न हाची धर्म नराचा
यश अपयश हा खेळ विधीचा
समाधान वा धैर्य चळो ना
काळहि मग हो केविलवाणा ॥५४॥
वास्तुविशारद कु ल का क र वी
कोट गोपुरे निर्मीत नवी
नगर दिसे ते पुनः मनोहर
देह जसा काया कल्पोत्तर ॥५५॥
शाल्व - वधाची करी प्रतिज्ञा
सह घेउन वीरा समयज्ञा
निघे मार्तिकावत नगरीसी
शासित होता शाल्व जियेसी ॥५६॥
शाल्वनृपासी प्रजा तेथली त्रासुन गेली होती
अपुला म्हणुनी किति सोसावी यथेच्छ - वर्तनरीती ॥५७॥
आदर नुरला लव धर्माचा
उदो होतसे नव रीतींचा
भ्रांत - कल्पना - प्रेरित सेवक
लोभ - मस्तरे - पूरित शासक ॥५८॥
गळचेपी हो व्यक्तिमताची
वाण जाहली वस्त्रान्नाची
सीमा केली महर्गतेनें
काय करावे वदा प्रजेनें ॥५९॥
मूर्त धर्म त्या श्रीकृष्णासी
इच्छित होते म्हणुन मनासी
तोच येतसे कळता चालुन
सर्व लोक गेले आनंदुन ॥६०॥
शाल्व परी तो मानुनिया भय
सागरतीरा घेई आश्रय
लावुनि नियमा त्या राज्यासी
सिंधुतटी खल धरी त्वरेसी ॥६१॥
समर होत घनघोर तेथ मग लंकेवरती जेवी
दांत खाउनी हरिवर करकर युद्ध करी मायावी ॥६२॥
दुष्ट म्हणे तो श्रीकृष्णासी
“ तदा कुठें लपला होतासी
बरा अता आलास येथवर
झेप किडा घे जसा दिव्यावर ॥६३॥
मगधेशा वधिले कपटेसी
प्रिय शिशुपाला राजसभेसी
घेइन आता त्याचे उसने ”
मुकुंद हासे उपहासानें ॥६४॥
“ तव शक्ती या धावपळीनी ”
म्हणे मुरारी “ येत कळोनी
तुझी उपेक्षा करण्यामाजी
चूक होय ती वारिन आजी ” ॥६५॥
शस्त्रांस्त्रांचा करि खल यारा
व्यर्थ गिरीवर जणु जलधारा
माया त्याची कठुन हरीते
भूल पाडण्या समर्थ होते ॥६६॥
पळुन जात तो पाहुन अंती फेकुनिया निजचक्रा
कृष्णे वधिला शाल्व पडे शव जलांत सुख हो नक्रा ॥६७॥
हर्ष जाहला या द व वी रा
व्योम न पुरले जयजयकारा
वाजविती सुर मुदे नगारे
मही तोषली खल - संहारे ॥६८॥
दुष्टवधाचे सरे प्रयोजन
करी प्रतिज्ञा मग मधुसूदन
“ शत्र करीं नच धरिन अता मी
साक्ष अब्धि, गिरि, सविता व्योमीं ॥६९॥
उरले जे ते अर्जुन हाती
सांगिन मी तो केवळ युक्ती ”
कृतार्थ करूनी स्नाने सागर
परत निघाला श्रीकरुणाकर ॥७०॥
दीन हांक तों कानीं आली
धाव धाव रे हे वनमाली
निघे कुठुन मग धीर हरीला
इतर जनासी विस्मय झाला ॥७१॥
द्रुपदसुतेची हांक असे ती विटंबनेते भिउनी
कौरपतिचा नीचपणा तो प्रेरक ज्यासी शकुनी ॥७२॥
तिथे असे कीं घडले होते
शकुनि म्हणाला सुयोधनांतें
“ पाहिलेस ना पांडववैभव
सावध हो वा सरले कौरव ॥७३॥
भाग दिलाती त्यासी अर्धा
गणिता नच माझिया विरोधा
सर्प सोडीले कसे मोकळे
जतु सदनीं ज्या तुम्ही दुखविले ॥७४॥
तुज दिसलेना क्षेत्रावरती
लोक सर्वही धर्मा भजती
कपट असे हे त्या काळ्याचे
तोच वाढवी महत्त्व याचे ॥७५॥
तो चढला सम्राट -- पदावर
तूं हाती बांगड्या तरी भर
राज्य हरी ते करून तातडी
अथवा मोल तुझे बघ कवडी ॥७६॥
युद्धाचा उपयोग आज ना जन नच अपुल्या मागे
धाड निमंत्रण धर्मासेसे तूं द्यतमिषें अनुरागें ॥७७॥
सर्व हिरावुन घेऊं द्यूतें
हात कोण मम धरील तेथे ”
मान्य करी ते खल दुर्योंधन
मार्ग वाकडे धरिती दुर्जन ॥७८॥
द्यूता वा वाहिले रणा जर
ना न म्हणावे क्षत्रें त्यावर
त्यातुन धर्मा आवड होती
तीच जाहली घातक अंती ॥७९॥
धन गज बाजी गेले वैभव
आनंदाने फुलले कौरव
धृतराष्ट्रासी कौतुक भारी
काय मिळाले अंध विचारी ॥८०॥
राज्यहि सारे हरला शेखीं
कपटासी तो धर्म अनोखी
बंधूसह मग पणास लावी
घडती घटना कशी टळावी ॥८१॥
दुर्योधन दुःशासन शकुनी नीचपणाने हसले
“ धीर न सोडी धर्मा अजुनी रत्न अमोलिक उरले ॥८२॥
पांचांची जी तुमची भार्या
जोड जियेच्या नच सौंदर्या
ती मृदुलांगी लाव पणासी
हरता होइल अमुची दासी ” ॥८३॥
“ होय ” म्हणाला खिन्न युधिष्ठिर
भीमा ये संताप अनावर
“ भलते करितो हा अविचारे
सहदेवा झणि आण निखारे ॥८४॥
हात जाळितो धर्माचे या
खेळे लावुन पणास जाया ”
परी अर्जुनें बहुप्रयासी
आवरिलें त्या वायुसुतासी ॥८५॥
द्युतीं हरला पुनः युधिष्ठिर
सभेत सज्जन वदती हरहर
मद चढलासे अंधसुताना
जा पांचाली सभेत आणा ॥८६॥
दुःशासन धावला त्वरेनें अधमाधम म्हणुकाय
केस धरुन तिज फरफट ओढी खाटिक जैसा गाय ॥८७॥
करी विनवण्या बहु पांचाली
नराधमा त्या दया न आली
सूर्य न पाहूं शकला जीते
ओढित तिजसी भर रस्त्याते ॥८८॥
सभेत केली उभी मानिनी
सभ्या बोलत ती त्वेषानी
थोर वृद्ध जन बसले येथे
काय सर्व हे संमत त्यते ॥८९॥
भीष्मा द्रोणा धृतराष्ट्रा हे
कशी साहता विडंबना हे
क्रद्ध पाहते निजभर्त्याते
ते खाली वळविती मुखाते ॥९०॥
बुद्धिमती ती वदे भामिनी
प्रश्ना उत्तर द्या मम कोणी
दास असे जो स्वयेच झाला
कसा पणा लावीत पराला ॥९१॥
आज्ञा पतिची असली तरिही टाकुनिया सुगुणासी
सदोष वर्तन करीन नच मी होइन केवी दासी ॥९२॥
विचार पडला भीष्म द्रोणा
पेच कठिण तो सुटला कोणा
नियम एकदा जो स्थापियला
जरी प्रसंगी तो दोषाला ॥९३॥
तरी मोडणे उचित नसे तो
रीतीला तो घातक होतो
समाज - धारण नियमे होते
व्यक्तिस्तव कधि मोडु नये ते ॥९४॥
कुणी न शकले उत्तर देऊं
भीमा झाले गिळुं की खाऊं
आवरीत परि त्यासी अर्जुन
बोलत खोचुन मग दुर्योधन ॥९५॥
मी वागतसे धरूनी नियमा
विरोध मातें कोण करी मा
मय भवनी मज हासत होता
अवसर लाभे मजसी आता ॥९६॥
थांबलास का तरि दुःशासन
हिचे त्वरे घे लुगडे फेडून
लाच कशाची दासीला या
ही तो वस्तू उपभोगाया ॥९७॥
विकर्ण ठाके उभा म्हणाला गर्जुन तो गुणराशी
“ धर्म विवाहे परिणतपत्नी कधि नच होईल दासी ” ॥९८॥
“ सुयोधना ये शुद्धेवर तूं
अनर्थास हे होईल हेतू ”
विदुर वदे परि कुणा न माने
नीच न वळती उपदेशानें ॥९९॥
कर्ण करी धिःकार तयांचा
काम उसळला अंधसुताचा
सभेत करूनी मांडी उघडी
म्हणे बैस चल येथें धगडी ॥१००॥
भीम भडकला कालाग्नीसम
बसेल तेथें भव्य गदा मम
म्हणे गर्जुनी थांब खला लव
चुरा करिन या मांड्य़ांचा तव ॥१०१॥
पुनः शांतवी त्यासी अर्जुन
पुढे पापमति ये दुःशासन
घालि सतीच्या निरीस हाता
कुणी न उरला तिजसी त्राता ॥१०२॥
घट्ट धरोनी वसना हातें ओरडली ती साध्वी
अंत किती बघसी गोविंदा भडके वणवा भोंती ॥१०३॥
हे व्रजनाथा हे यदुनाथा
कोण तुझ्याविण अता अनाथा
धांव धांव हे करुणामूर्ते
गांजितात रे दुर्जन माते ॥१०४॥
गोपीप्रिय हे नाथ रमाधव
भवनाशन करुणाघन केशव
हाक न माझी का ऐकूं ये
होशी कां हरि निष्ठुर हृदये ॥१०५॥
धाव धाव शरणागत वत्सल
टाहो फोडी ती भयविह्वल
कृष्ण हाच की ध्यास तियेसी
मोकली न हरि निजभक्तासी ॥१०६॥
लाज राखण्या पतिव्रतेची
वसने पुरवी बहुमोलाची
एक ओढिले त्या दुष्टानें
दुजे आंत चमके तेजाने ॥१०७॥
दुःशासन ओढी ईर्षेने लुगड्या मागुन लुगडी
व्यर्थ परि श्रम साली काढुन केळ न होते उघडी ॥१०८॥
सभाभवन भरले वस्त्रांनीं
चिंब जाहला खल घामांनी
अंती थकुनी बसला खाली
सतेज वसनावृत पांचाली ॥१०९॥
प्रभाव दिसला पतिव्रतेचा
अंधा धसका बसे भयाचा
भावि अनर्थातुन तनयासी
वाचविण्या तो म्हणे सतीसी ॥११०॥
वत्सल - हृदये सती द्रौपदी
मला क्षमाकर मी अपराधी
हूड असे मत्पुत्र सुयोधन
कृती तयाची मनांत आण न ॥१११॥
स्वतंत्र अससी तूं पांचाली
माग हवे ते मज या काली
करीन आदर तव आज्ञेचा
अन्यथा न ही होइल वाचा ॥११२॥
काय अता ही मागत हीची उत्सुकता सकलासी
म्हणे द्रौपदी दासपणातुन मुक्त करा भर्त्यांसी ॥११३॥
सिंह वनी मोकळे असावे
साह्य कुणाचे कशास व्हावें
मृगेंद्रता स्वयमेव तयासी
वरिते मोहुन शौर्य बलासी ॥११४॥
मानधनेचे ते तेजस्वी
भाषण ऐकुन माथा डुलवी
द्रोण भीष्म कृप विदुर सुलक्षण
चरफडले परि मनांत दुर्जन ॥११५॥
म्वयें अर्पिले वैभव सारे
धृतराष्ट्रे दर्शनी उदारे
ओटी भरुनी पांचालीची
करी बोळवण अंध तियेची ॥११६॥
संपले न परि हे इतुक्यानी
पुनः भारिला पिता खलानी
विचारुनी त्या द्युतासाठी
परत बाहिले धर्मापाठी ॥११७॥
बारा वर्षे वनवासी मग एक वर्ष अज्ञाती
हरेल त्यानें जावे हा पण ठरलासे त्या द्यूतीं ॥११८॥
पराभूत हो धर्म पुनःहि
प्रथम येतसे जय कपटाही
धर्माचरणा म्हणती थोर
परिणामाचा करुन विचार ॥११९॥
पांडव होती तइं वनवासी
द्रुपदसुता अनुसरे तयासी
धर्म जातसे नत - मुख होउन
क्रुद्ध भीम निजबाहु उभारून ॥१२०॥
वाळू फेकी अर्जुन जाता
मुक्तकेश ती पांडवकांता
मंत्य्र म्हणतसे धौम्य पुरोहित
प्रजा जाहली सर्वहि दुःखित ॥१२१॥
अमुचा सर्वाधार निघाला
या भावें जन विह्वल झाला
बसले धरुनी पद राजाचे
धर्म म्हणे त्या मंजुल वाचें ॥१२२॥
दुःख न राही कुणा सर्वदा सुख ना नित्य कुणासी
धर्म गणावा सखा जिवीचा भय ना मग विपदासी ॥१२३॥
सुशील पांडव वनांस आले
मुनिजन सारे हर्षित झाले
केले त्यानी प्रेमें स्वागत
सज्जन गौरव होते सदोदित ॥१२४॥
रविप्रसादे हत वैभवही
धर्मा पडले उणे न कांहीं
शत शत विप्रासह निष्कामी
वनीं वसे नृप काम्यकनामीं ॥१२५॥
घोर निबिड ते विशाल कान्न
रम्य मनोहर तरिही भीषण
विसंगतीतहि थोरी साची
मूर्त जशी भगवान हराची ॥१२६॥
असूर्यपश्या वनभू तेथिल
नृपजाया जणु अवरोधातिल
रवि - कर - दंडित अंधारासी
आश्रय दे जी विसावण्यासी ॥१२७॥
भरदिवसासी उन्हाळ्यांतही तेथ चांदणें नांदें
दाखवीत वाकुल्या शीतता चंडकरा आनंदें ॥१२८॥
कलरवनादित कुठें तटाकें
कुठें घातला गोंधळ भेकें
प्रफुल्ल होती कमळीं कांहीं
दुजी घाणश्या शेवाळांहीं ॥१२९॥
गगनश्रीमुख - चुंबन - लोलुप
भव्य भव्यतर कोठें पादप
नि ज ज न नी च्या अंकावरतीं
झुडुपें कोठें लोळण घेती ॥१३०॥
करवंदीच्या झिंबड जाळ्या
माजघरासम वाघां झाल्या
तरूमूलाच्या बिळांत कांहीं
ससा गोजिरा चाहुल घेई ॥१३१॥
उपमा ललनांच्या मृदुतेची
अशी फुलें फुललीं शिरिषाचीं
पर्णहीन भुक्कड काटेरी
वृक्ष कुठें रसिकास निवारी ॥१३२॥
परी वसंती त्या वृक्षीही शाखांच्या शेंड्यातें
लाल तुरे अतिसुंदर येती मोहविती नयनाते ॥१३३॥
अपात्र दाता मधु अविवेकी
वा समदृष्टी संत म्हणूं की
संत न हा छे कठोर कांटे
यत्संसर्गे गळले कोठें ॥१३४॥
जुनाट वृ क्षां च्या खो डा व र
वेढुन असती वेली ठोसर
जणु वृद्धाच्या पायावरती
फुगलेल्या या शिराच दिसती ॥१३५॥
विशाल मंडप भव्य असावा
तसा वृक्ष - विस्तार दिसावा
खोडे ज्यांची पाचांच्या ही
कवेंत येतिल वाटत नाहीं ॥१३६॥
फांद्या त्यांच्या धरुनी हातीं
उड्या माकडें यथेच्छ घेती
सर्प थोर लोंबतात पाहुन
पळती दंता विचकुन चिरकुन ॥१३७॥
गजबजलेले प क्षि ग णां नी
वृक्ष कितीतरि असती रानीं
तेथ समृद्धी असे फळांची
कां न उठावी नगरे यांची ॥१३८॥
सिंह - गर्जना ऐकुन चित्तीं
व्याकुळ चीत्कारा करि हत्ती
बिलगुन जाती लता भयानें
पादपास पसरुनी प्रतानें ॥१३९॥
मधुन मधुन त्या वनांत जेथें आश्रम पावन होते
शीतताच केवळ त्या ठायीं सौंदर्यासह येते ॥१४०॥
घाण तेथ ना पाचोळ्याची भय ना हिंस्र पशूंचे
सर्प कशाला येतिल ऐकून केकारव मोरांचे ॥१४१॥
तळ्यांत निर्मळ कमळें फुलती
शांत रवंथ हरिणे करिताती
फलसंभारें विनम्र पादप
कोमल राही सदाच आतप ॥१४२॥
विविध तरूंचा परिमल हुंगित
फुलांफुलांतुन वारा वाहत
नववधुसमनित हरित चिरासी
नेसुन तेथें रमे वनश्री ॥१४३॥
निज भक्ताना त्या विपदेसी
धीर द्यावया ये हृषिकेशी
प्रिय भामेसी सवे घेउनी
कमल विभूषित रम्य काननीं ॥१४४॥
पाहुन पुढती श्रीवनमाली
शोकाकुल झाली पांचाली
रडे स्फुंदुनी करुण, सती ती
प्रिया जवळ दुःखा कढ येती ॥१४५॥
देवल कश्यप नारद गाती स्तोत्रें तव जगदीशा
कर्तुमकर्तुंकर्तुमन्यथा शक्ति तुझी परमेशा ॥१४६॥
रूप तुझें हें ब्रह्म सनातन
उरले सकल त्रिभुवन व्यापुन
प्रभु तूं विभु तूं सर्वात्मा तूं
झाला छळ मम कवण्या हेतूं ॥१४७॥
श्रीकृष्णा मी तुझी प्रिय सखी
वीर पती हे असुन मस्तकीं
कुत्री सम मज ओढी दुर्जन
कशास असले दुःसह जीवन ॥१४८॥
जिवंत असुनी यादव पांडव
समर्थ असतां तूंहि रमाधव
कसे वाटले अंध सुतासी
उपभोगूं हिज गणुनी दासी ॥१४९॥
पती असो की दुबळा निर्धन
निज पत्नीचें करितो रक्षण
बलशाली हे असुनी पुढती
विटंबना मम मुकाट बघती ॥१५०॥
असो तुम्हा धिःकार कशाला गांडिव चक्र गदा ही
अबलेचे ही रक्षण ज्याते करावया नच येई ॥१५१॥
पुत्र पती ना असती भ्राते
पिता न तूंही कृष्णा माते
कुणीहि ना मज कुणीहि नाही
कां न छळावें क्षुद्रानीहि ” ॥१५२॥
त्वेषसहित अति उद्वेगाचे
भाषण बोचक हे प्रमदेचे
धनंजयाच्या वसे जिव्हाळी
जशी पहाटे ठेच हिवाळीं ॥१५३॥
टपटपटपटप पडती धारा
उरोभाग तो भिजला सारा
मुखास झाकुन दो हातानी
मुक्त रडे क्षतहृदया मानी ॥१५४॥
स्कंधा स्पर्शुन वत्सल हाते
म्हणे “ व्यथा तव समजे माते
घडते नच हे असतो मी जरि
सुदूर होतो शाल्व - वधा परि ॥१५५॥
शोक न करि गे, विजयी पांडव
होतिल, रडतिल रिपु भार्या तव
संकटातची सच्छीलांचे
तेज चढे अनलीं हेमाचे ॥१५६॥
शोक भार तो हलका झाला श्रीहरिच्या सहवासी
संताची प्रिय भेट अशीची वाढविते हर्षाची ॥१५७॥
पुरुषोत्तम सर्वज्ञ रमाधव
म्हणे घेउनी जवळी पांडव
वर्षे बारा तुम्हां मिळाली
करा त्यांत सिद्धता आपुली ॥१५८॥
धोरण पुढचे समजेल जया
तोच आणितो खेचुन विजया
स्वस्थ कधी न बसेल सुयोधन
तुम्हीहि करणें बल संपादन ॥१५९॥
विजया जा तूं इंद्रपुरासी
मिळीव तेथिल अस्त्र बळासी
भीष्म - द्रोणासवें रणांते
प्रसंग आहे पुढें तुम्हांते ॥१६०॥
तपें शंकरा तुष्ट करावे
पाशुपता त्यापुन मिळवावे
शैव - शक्ति ती येतां हातीं
सुरासुरांची नुरली भीती ॥१६१॥
नको धरु युधिष्ठिरा लवही मानसीं संशय
हवी प्रबल शक्तिता खलजनां बसाया भय
अधर्म असतो खरा वरुन धर्म भासे जरी
कधी उलट ही असे समजण्यांत ते चातुरी ॥१६२॥
संकट निवारण नांवाचा चौदावा सर्ग समाप्त
लेखनकाल :-
भाद्रपद शके १८७१
श्रीकृष्ण कथामृत - पंधरावा सर्ग
( शमोद्योग )
व्योमानिलानल जलावनि सोमसूर्य -
हो त्री भि र ष्ट त नु भि र्ज ग दे क ना थः
यस्तिष्ठतीह जन -- मंगल -- धारणाय
तस्मै नमोस्तु निरपेक्षहृदे शिवाय ॥१॥
झरे सतत वाहते तव कृपारसाचे नवे
जरी न मज लाभले तरि न शब्दही आठवे
फुलेल तरु पोषणाविण कसा कथावें तरी
म्हणोनि गुरुमाउली वरदहस्त ठेवी शिरीं ॥२॥
वास वनीं अज्ञातीं तेवीं
धर्म बळावर धर्म संपवी
धौम्य पुरोहित म्हणे तयासी
“ दावध व्हावें अतां मनासी ॥३॥
राज्य तुझें तुज वडिलोपार्जित
युद्धावांचुन मिळे न निश्चित
त्यादृष्टीनें वर्षे गेलीं
अंधसुतानीं खटपट केली ॥४॥
जनार्थ केल्या बहुसुखसोयी
प्रवास आतां निर्भय होई
पाट काढिले शेतीसाठीं
रंजक वस्तू भरल्या हाटीं ॥५॥
वाया जाइल मानव शक्ति
नाद लाविले किती या रीतीं
करुन विडंबन गतकालाचें
पवाड गाती निजमहतीचे ॥६॥
सतत असत्या प्रचारुनीया शाश्वत - हित विध्वंसी
तेच गोड वाटते जनांसीं आली बकता हंसीं ॥७॥
प्रजा असे विसराळू राया
स्पर्शवेदिनी सत्य म्हणाया
भूत भविष्या नच बघते ती
तिज शिकवावे लागत संतीं ॥८॥
भेटुन वरि वरि परराष्ट्रासी
असे निर्मिला स्नेह तयासी
नृपवश करूनी घेत सुयोधन
गमे तया हा जनहित कारण ॥९॥
निस्वार्थी नी उदारवृत्ती
हस्तक इतरा नित ऐकविती
तोच सुखाचा गमे जनातें
कुणा दुरचें आंतिल दिसतें ? ॥१०॥
यास्तव सोपें नसे युधिष्ठिर
विजय मिळविणे सुयोधनावर
मुळें नृपा ! या विष - वृक्षाचीं
फार खोलवर गेली साचीं ॥११॥
जनांस कौरव आवडती जर
तेच सुखे नांदोत महीवर
हवें कशाला राज्य मला तें
असें न धर्मा आण मनातें ॥१२॥
लोक तुला नच सर्व विसरले स्मरती अजुनी चित्तीं
अशांत म्हणुनी असती कौरव वाटत त्यासी भीती ॥१३॥
सुयोधनानें स्वार्थापोटीं
प्रजा वळविली प्रेयापाठीं
मिळवुन द्यावे श्रेय तयांचे
कार्य असे हें निर्लोभाचें ॥१४॥
द्वारकेस जातो कपिकेतू
विराट - कन्या - परिणय - हेतूं
निजपुत्रासीं अणावयातें
दे त्यासह संदेश हरीतें ॥१५॥
योगेश्वर तो बुद्धिमतांवर
येथ विवाहास्तव आल्यावर
मंत्रबळें होईल तयाएं
विफल सर्वही सुयोधनाचें ॥१६॥
सांगतसे जें तेथ पुरोहित
सहज पांडवा झालें संमत
प्रमाण अपुली आज्ञा म्हणुनी
वाकविती निज - मस्तक चरणीं ॥१७॥
धर्मा करुनी नमन धनंजय निघे द्वारकेलागीं
पवनगतीचे चपल अश्वही गमती त्या लघुवेगीं ॥१८॥
पुरी द्वारका सोन्याची ती
रविकिरणांनीं चमकत होती
प्रहर दोन टळले दिवसाचे
अर्जुन ये मंदिरा हरीचे ॥१९॥
पर्यंकीं श्रीहरी निजेला
अंगावरती घेउन शेला
सोनसळी तो पदर तयाचा
निश्वासें हळुं हालत साचा ॥२०॥
नयन निमीलित तरिही सुंदर
पुष्ट भुजेवर ठेवियलें शिर
सरळ बाहु आजानु दुजा शुभ
शय्येवरतीं रुळतें कौस्तुभ ॥२१॥
उच्चासन घेऊन उशासीं
असे सुयोधन खल मदराशी
सळ नयनीं, वळवीत मिशांना
तुच्छ जणूं मानी सकलांना ॥२२॥
सुयोधनासी बघतां क्षणभर अर्जुन थबके दारीं
गमे तया धनराशी जवळी जणुं कां नाग विखारी ॥२३॥
जवळी येउन चरणा सन्निध
उभा ठाकला मग विजयायुध
नम्रपणें जोडिले करासी
उठुनी बसले तों हृषिकेशी ॥२४॥
वदती विजया हर्षित - हृदयें
“ दूर असा कां बैस इथे ये
प्रिय सखया आलास कधीं तूं
काय धरियला मनांत हेतु ” ॥२५॥
विनवाया तुज म्हणे किरीट
तोच आडवुन म्हणें कुहीटी
“ मदीय परिसे वचन रमाधव
प्रथम इथें मी आलों यास्तव ॥२६॥
प्रथम येत जो त्या तोषविणें
मान्य करोनी त्याचें म्हणणें
तुज ठावी ही सज्जनरीती
श्रेष्ठ म्हणुन तव पूजा होती ” ॥२७॥
“ तुला कौरवा केव्हांपासुन सन्नीतीची महती
पटली, झालें फार बरें वा ” ! हसुन म्हणे श्रीमूर्ती ॥२८॥
“ प्रथम जाहलें तुझें आगमन
प्रथम पाहिला मी परि अर्जुन
म्हणुनी मजसी उभयांचेंही
प्रिय - संपादन अवश्य होई ॥२९॥
भावि रणास्तव हवें तुम्हातें
सहाय्य मम हें कळतें मातें
दोन दिशा मी तुमचें पुढती -
ठेवित, घ्यावी जी आवडती ॥३०॥
पूर्ण निरायुध एक असा मी
नारायण मम सैन्य दुजें हें
शूर सज्ज जे विशाल आहे ॥३१॥
ग्रहण हवें तें करणें यांतुन
असे धाकटा तुम्हांत अर्जुन
संधी पहिली म्हणुन तयासी
चोजविणें प्रथमतां शिशूसी ” ॥३२॥
व्यकुळ झाला मनीं कृपण तो “ मागे अर्जुन काय
सेना जातां, घेउन कृष्णा काय करूं मी हाय ” ॥३३॥
त्यजी परिस जड मुरडून नाकीं
निवडि गारा बघुन चकाकी
दूध टाकिलें थुंकुन ओठीं
लाळ घोटितो मद्यासाठीं ॥३४॥
सूज्ञ परी टाकून पसारा
मूळ सूत्र घे करूनि विचारा
म्हणे धनंजय “ हवास तूं मज
शस्त्र न धरिसी तरी अधोक्षज ॥३५॥
कुरूराजा बहु हर्षित होई
“ म्हणे मूढ हा नच चतुराई ”
रुची कीड्यांची हंसा नाहीं
पाहुन बगळा करितो ही ही ॥३६॥
कौरव विनवी बलरामातें
तो न करी परि साह्य कुणातें
म्हणें “ सारखे दोघेही मज
विरुद्ध त्यांतुन होत गदाग्रज ॥३७॥
तव पक्षानें प्रिय बंधूसह लढणें दुःसह मजसी
येथ तईं नच वसेन जातों तीर्थाटन करण्यासी ” ॥३८॥
पुरा गजाह्वय परते राजा
वदे हरी “ मी कुठल्या काजा
कां म्हणुनी विजया मजलागी
घेतलेस तूं मागुन वेगीं ॥३९॥
देई उत्तर विनयें अर्जुन
दुजें नको मज तुझ्या कृपेविण
तं ज्या अपुल्या म्हणसी हृदयें
स्वयें त्याकडे श्री, यश जय ये ॥४०॥
कुरू - राजाच्यामुळेंच हेही
भाग जाहलेम वदणें पाही
न मागतां तरि मुलास आई
काय दयाळा सोडुन जाई ॥४१॥
या करितां नच मी आलेला
मत्स्यपुरा परि तुज नेण्याला
अभिमन्यूचे लग्नासाठीं
सर्वहि आतुर तुझिया भेटी ॥४२॥
विराट कन्या शुभा उत्तरा कलावती गुणशाली
भाच्यासी तव वधु नेमियली सर्व सिद्धता झाली ॥४३॥
रणविद्या तूं अभिमन्यूसी
स्वयें दीधली अनुपम ऐसी
लतितकलांचीमम शिष्या ती
परस्परां हे भूषण होती ॥४४॥
श्रीकृष्णासी झालें बहुसुख
उत्सुक देवी बघण्या सुनमुख
निघे पुरींतुन वर्हाड सत्वर
लग्नाकरितां विशाल सुंदर ॥४५॥
शृंगारित रथ अभिमन्यूचा
सभोंवतालीं गण ललनांचा
कांतीनें ज्याचिया तनूचें
तेज गमे निस्तेज हिर्याचें ॥४६॥
नवरदेव तो खुले तयांनीं
जयंत जैसा सुरांगनांनीं
नीति श्री धृति कीर्तीनें वा
वीर जसा शोभून दिसावा ॥४७॥
हत्तींवरच्या अंबार्या त्या शिखरें जणुं मेरूचीं
चमकत होतीं सूर्यकरांनीं झूलहि भरगच्चीची ॥४८॥
हिरे मानके पांच मण्यांनीं
भूषविले जे कनक नगांनीं
अश्व असे तेजाळ सुलक्षण
पथें चालतां करिती नर्तन ॥४९॥
ध्वजा रथाच्या नभीं फडकती
असंख्य सुंदर ज्या विविधाकृति
रम्य फुलांनीं हें नटलेलें
सजीव कानन जणुं कीं चाले ॥५०॥
सती सुभद्रा सती रुक्मिणी
तशाच दुसर्या श्रीहरिरमणी
रमा शारदा सावित्रीसम
पवित्र पावन ज्यांचा विभ्रम ॥५१॥
रथांत एक्या नर - नारायण
सस्मित चाले प्रेमळ भाषण
त्यांतिल गोडी चाखायास्तव
भंवती फिरती सात्यकि उद्धव ॥५२॥
वनमालीची वैभवशाली सेनाआली या रीतीं
वाजत गाजत सुरसरितेसम साजत जी का भूवरतीं
करी स्वागता थाट, समुत्सुक विराट गाती भाट जया
धरी मुरारी उरीं नृपासी जरी वाकला धरुनि नया ॥५३॥
“ दिष्ट्या त्वं वर्धसे युधिष्ठिर
सत्य निष्ठया ” वदे रमावर
प्रभा तुझी ग्रहमुक्तरवीसी
उजळवील कीं पुनः महीसी ॥५४॥
अर्ध्यादि स्वीकारुन पूजन
वसे मंदिरीं रम्य दयाघन
पुढें उत्तरा अभिमन्यूचा
विवाह झाला बहु थाटाचा ॥५५॥
मनीं सर्वही हर्षित झाले
मिष्टान्नानें याचक धाले
आहेरासी करी रमावर
गणती त्यांची करणें कुठवर ॥५६॥
हत्ती घोडे रथ सोन्याचे वस्त्रें बहुमोलाचीं
कुबेर लज्जित व्हावा ऐशी राशी नवरत्नांची ॥५७॥
पांडवपक्षी नृप जे तेथें
द्रुपद मगध पुरुजितादि होते
दंप्तीस पूजिले तयांनीं
अमोल सुंदर वस्त्राभरणीं ॥५८॥
समारंभ तो सरल्यावरतीं
राजसभेसी बसले नृपती
रत्नें मंडित शुभासनासी
वदे तयांना मग हृषिकेशी ॥५९॥
“ नृप हो द्या अवधान जरासें
घ्या निर्णय जो समुचित भासे
सदाचार सन्नीति तुम्हासी
गमे प्राणसी सदा हवीशी ॥६०॥
अन्यायाची चीड तुम्हांसी
बोलतसे मी या विशासीं
नको सांगणें इथें नव्यानें
कसें कपट केलें शकुनीनें ॥६१॥
सरळ मनाच्या युधिष्ठिरा तो नडुन कपट द्यूतें
धृतराष्ट्रासी वश करुनीया धाडी वनवासातें ॥६२॥
कोण फेडितो स्वप्नांतील ऋण
हाल सोसुनी द्यूताचा पण
सत्यनिष्ठ हा परी युधिष्ठिर
शिणला वर्षे तीन दहांवर ॥६३॥
उदार - कीर्तीं हरिश्चंद्र नल
धर्म असे हा त्या मालेंतील
राजर्षी हा विपदा भोती
जसा कुणी बलहीन अभागी ॥६४॥
विजयी हा गांडीव धनुर्धर
श्रेष्ठ जयाहुन एकच शंकर
भूमीलाही उलथायाचें
अपार बल कीं या भीमाचें ॥६५॥
सूत माद्रिचे हे बलशाली
एरि सकलीं मुख घालुन खालीं
भोगियले दुःसह हाला या
पण धर्माचा सत्य कराया ॥६६॥
पुरी प्रतिज्ञा केली अपुली धैर्यें पंडुसुतांनीं
अवश्य आहे मिळणें आतां राज्य तयां परतोनी ॥६७॥
वडिलोपार्जित राज्य असें हें
उभयां त्यावर सत्ता आहे
कौरव जरि ते सरळपणानें
देतिल ना तरि अनर्थवाणें ॥६८॥
धर्माच्या या उदारहृदयीं
क्षमाच आहे शत्रूविषयीं
विनाश व्हावा सुयोधनाचा
लवही नाहीं भाव तयाचा ॥६९॥
न्याय परायण नृप हो यास्तव
विचार कांहीं सांगा अभिनव
कौरव पांडव या दोघांहीं
जया मुळें अन्याय न होई ॥७०॥
मनीं वाकड्या कुरुराजाचें
आज काय तें कळत न साचें
गमे पाठवूं म्हणुनी कोणी
दूत विवेकी सुशील मानी ॥७१॥
अर्ध भाग राज्याचा देउन समेट जरिकां झाला
आनंदाची गोष्ट असे ती युद्ध हवें कवणाला ॥७२॥
भाषण ऐकून भगवंताचें
अर्थ - धर्म - युत मृदु समतेचें
साधु साधु बहु योग्य वचांनीं
स्तवन मांडिलें सकल नृपांनीं ॥७३॥
विचार विनिमय करुन घडीभर
द्रुपद करी सकलांस्तव उत्तर
“ पक्ष आपुला असो नयाचा
म्हणुन यत्न हा केवळ साचा ॥७४॥
समेट होईल त्या अधमासी
स्वxxतहि नच पटे अम्हांसी
भुजग कदाचित निर्विष होइल
दुष्टभाव नच कौरव सोडिल ॥७५॥
नाश करावा पंडुसुतांचा
हेत तयांचा फार दिसांचा
अतां न त्याची कींव करावी
सीमा शांतीसही असावी ॥७६॥
उतरेल न मद अंशसुतांचा युद्धावांचुन देवा
धर्मासाठीं ससैन्य आम्ही सिद्ध वेंचण्या जीवा ॥७७॥
चेकितान युयुधान सात्यकी
विराट राजा मत्स्यासह कीं
कुंतिभोज हा पाण्ड्य दुजे ही
नृपती यासी संमत पाही ॥७८॥
दंड यमाचा योग्य खला या
संधि तरीही हवा कराया
दशननासम असुरासींही
रघूत्तमें संधी दिधली ही ॥७९॥
परी आमुची विनवी आहे
तुम्हीच घ्यावें कार्य शिरीं हें
कुरूराजासी निजप्रभावें
कसें दुज्यांनीं उपदेशावें ॥८०॥
सभेमधे ज्या श्रीभीष्मादिक
तेथे तुम्हीची उन्नतमस्तक
चतुरपणा ये चातुर्यासी
अपणाजवळी हें हृषिकेशी ॥८१॥
सूर्यशतापरि तेज आपुलें श्रुतिसम पावन वाणी
विचार करितां सामर्थ्याचा गमता पिनाक - पाणी ॥८२॥
आपणची जा श्रीयदुनाथा ”
वदले सर्वहि नमवुन माथा
“ होय बरें ” म्हणती जगजेठी
दूत जाहले भक्तासाठीं ॥८३॥
हर्षित झाले सकलहि राजे
वदती “ कळवा घडेल जें जें
आज्ञा व्हावी अम्हांस तोंवर
कथितां होऊं सेवे सादर ” ॥८४॥
निज नगरासी जाई नृपगण
पाण्डव आणि श्रीमधुसूदन
परस्परीं करितात विचारा
प्रश्न कसा हा सुटेल सारा ॥८५॥
विवेक नुरला सुत मोहानें
लवही ज्या त्या धृतराष्ट्रानें
संजय नामें दूत आपुला
उपप्लव्य नगरास धाडिला ॥८६॥
भेद काढणें युधिष्ठिराचा पाहुन बलावलासी
युद्धापासुन विन्मुख करणें बोधियलें हें त्यासी ॥८७॥
वंदन करुनी पंडुसुतांना
कुशलें त्यासी पुशिलीं नाना
अपुलीं हीं त्या सांगुन साचीं
बोलत वाणी धृतराष्ट्राची ॥८८॥
“ नित्य असो कल्याण आपुलें
साम घडावा हेंच चांगलें
मूर्ख परी मम सुत दुर्योधन
बसला आहे हट्टा पेटुन ॥८९॥
तो कवणाचें मानित नाहीं
परी तसें ना तुमचें कांहीं
तुम्हें जाणतें अहांत सारे
युद्ध करा नच हें अविचारें ॥९०॥
पाट वाहवुन नर - रक्ताचे
काय तरी सुख या राज्याचें
विषय सुखाचें नसे प्रयोजन
निभेल तुमचें परभृत होउन ॥९१॥
मूर्खासंगें मूर्ख न व्हावें ही सुजनांची रीती
सहजशीलता पंडु - सुतांची असामान्य ही ख्याती ॥९२॥
म्हणे कोपुनी कंस - निबर्हण
“ दूता आवर हें तव भाषण
धर्म न कारण या नाशासी
कसें दिसें परि हे अंधासी ॥९३॥
पांडवांस या कथिसी भिक्षा
चोरा सोडुन धन्यास शिक्षा
अम्ही जाणतों धर्म अधर्मा
नृपनीतीच्या तसेंच मर्मा ॥९४॥
परतुनियां जा क्षमा असे तुज
दूत दंड्य ना म्हणे अधोक्षज
मीच येउनी गजनगरासी
स्वयें सर्व मांडीत सभेसी ” ॥९५॥
सर्वां चरणीं ठेवुन मस्तक
परता झाला अपाप सेवक
दूत म्हणोनी भगवंताची
होत सिद्धता निघावयाची ॥९६॥
सूर्यासम दैदीप्य रथासी अश्व चार तेजस्वी
ध्वज गरुडांकित फडके वरतीं दारुक विनयें विनवी ॥९७॥
धर्मराज विनवी विनयेंसी
सर्व समर्था हे हृषिकेशी
करी न भाषण तेथ विरोधी
कसाहि हो परि सामच साधी ॥९८॥
हट्ट धरी जरि फार सुयोधन
दुखवूं त्यासी नको अवर्जुन
पांचचि गावें पुरेत मातें
राज्य तयासी लखलाभों तें ” ॥९९॥
“ युद्ध शक्य तोंवरि टाळावें ”
म्हणे धनंजय वत्सल भावें
“ सर्वहि साधे यत्न बळावर
सांगू तुज मी काय रमावर ” ॥१००॥
कभिन्न काळा कठोर कातळ
अवचित पाझरणें त्यांतुन जल
तेवीं तापट भीम म्हणाला
“ साम करावा तिथें दयाळा ॥१०१॥
रक्तपाद होवो न महीवर जन नांदोत सुखानें
युद्ध कराया मन नेघे मम ” बघत हरी नवलानें ॥१०२॥
खैराचा अंगार निवावा
पर्वत जेवीं हलका व्हावा
शेळपटे वा सिंह वनींचा
भाव तसा हा वृकोदराचा ॥१०३॥
कृष्ण बोलला त्या उपहासुन
होय कसें विपरीत विलक्षण
धगधगती संतप्त भावना
विझली भीमा कशी कळेना ॥१०४॥
कोठें गेला तुझा पराक्रम
कीचकादि खल जनास जो यम
अंधसुताच्या मांडीवरती
आदळणारी गदा कुठें ती ॥१०५॥
पक्षाघातें गळले बाहू
कीं भ्रम झाला तुज हें पाहूं
तुझा भरवंसा मजसी होता
अवसानीं या करिशी घाता ॥१०६॥
भीम उत्तरे शांतपणानें देवा म्हण कांहीं तूं
भरतकुलाचा नाश न होवो हाच मनींचा हेतू ॥१०७॥
सती द्रौपदी हें संभाषण
ऐकत होती दूरी राहुन
शांतपणा हा त्या वीरांचा
भाल्यासम तिज रुतला साचा ॥१०८॥
दुःखानें त्या परि संतपएं
मानधना ती थरथर कांपे
उरीं हुंदके समावती ना
श्वास शिणविती नाकपुड्यांना ॥१०९॥
लाल तांबड्या नयनांमधुनीं
स्रवे क्रोध जणु जलरूपानीं
गाल पोळले अश्रूनीं त्या
बटा कचांच्या मुक्तचि होत्या ॥११०॥
केंस मोकळे धरुनी हातीं
शोकावेगें वदे सती ती
आठव करुनी या केसांचा
यत्न करावा मग सामाचा ॥१११॥
अपमानाचें जगणे जीवन हें का फल धर्माचें
अतां सह्य नच होत मला हें सत्य सांगते वाचें ॥११२॥
राज्य नको जर असेल यासी
पुरा गजाह्वय कशास जासी
पांच तरी कां हवींत गांवें
भिक्षा मागुन सुखें जगावें ॥११३॥
त्रैलोक्या जिंकील बळानें
शौर्य होत तें केविलवाणें
वेष, वर्ष जो धरिला होता
भिनला कीं तो हृदयीं आतां ॥११४॥
भैरवता नांवातच केवळ
थिजली वृत्ती मरगळलें बळ
रिपुमर्दन करण्याचें सोडुन
बसा सुखें जपमाळा घेउन ॥११५॥
जळो शांतता युधिष्ठिराची
धिक धिक् यश किर्ती विजयाची
अर्थ न उरला भीमबळा या
विडंबिती खल ज्यांची जाया ॥११६॥
तेरा वर्षे धुमसत आहे मम हृदयीं जो अग्नि
रिपुरुधिराच्या अभिषेकाविण तो नच जाय विझोनी ॥११७॥
बलशाली ते पांचपुत्र मम
अभिमन्यू हा अतुल पराक्रम
लोळवुनी कौरवा महीव
निववितील हें जळतें अंतर ॥११८॥
मीच करंटी ये जन्मासी
कशास देऊं दोष कुणासी
तुम्हांस पडतो मोह शमाचा
खेळ असे हा हतदैवाचा ॥११९॥
शोक करी ती साध्वी विह्वल
द्रवेल ऐकुन वज्र शिलातल
तिला शांतवी मग वनमाली
दुर्दिन सरलें तव पांचाली ॥१२०॥
भीमार्जुन हे तव शत्रूंची
रणीं दुर्दशा करतिल साची
मान न देती मम वचनाला
विनाश त्यांचा मग ओढवला ॥१२१॥
सम्राज्ञी होशील पुनः तूं
समर्थ आहे हा कपिकेतू
विदीर्ण होतिल शतधा कौरव
असत्य माझी गिरा नसे लव ॥१२२॥
निरोप घेउन या परि चढले रथावरी भगवंत
सवें सत्यकी विश्वासाचा श्रेष्ठ वीर धीमंत ॥१२३॥
काल रम्य तो ऋतु शरदाचा
त्रास न होई पथें धुळीचा
दिसे वनश्री उह्लसिता ती
वरांगना जणु न्हाली होती ॥१२४॥
डुलती सुफलित विस्तृत शेतें
जणों वंदितीं भगवंतातें
सूर्य करांनीं विकसित पद्म
जशी यशःश्री निवास सद्में ॥१२५॥
सज्जन - हास्या परी सुनिर्मळ
शोभत होतें तळ्यांतलें जल
शुभ्र हंस गण आंत विलासे
पवित्रतेचें वाहन जैसें ॥१२६॥
अजें दुजें ना लव शरदासी
सुंदरता दे सकल तरूंसी
पूर्ण - यौवना वररमणीसम
हरित - पटावृत अवनी अनुपम ॥१२७॥
शुभ्र पांढरे मेघ तरळती नील नभासी कोठें
फेनपुंज सागरावरी जणु वायु डुलवी वाटे ॥१२८॥
निरपवाद शोभा शरदाची
निजदृष्टींनें खुलवित साची
कुरुनगरा प्रभु पोंचे येउन
उभा स्वागता असे सुयोधन ॥१२९॥
पायघड्या पसरल्या पथावर
रत्नांचे वर तोरण सुंदर
घुमती मंजुल मंगल वाद्यें
चारण गाती स्वागत पद्यें ॥१३०॥
दुर्योधन शकुनी दुःशासन
वंदन करिती आदर दावुन
विनती करिती कृत्रिम भावें
“ यदुराया मंदिरी चलावें ॥१३१॥
सहा ऋतूंच्या सुख सौंदर्या
एकदांच ये उपभोगाया
जिथे असा तो हर्म्य मनोहर
दासी मोहक सेवे तत्पर ” ॥१३२॥
उपहारा हरि नसे भुकेला शुद्ध भाव त्या रुचती
वररंगानें भुलेल का तो हृदयीं ज्याची वसती ॥१३३॥
“ सस्मित वदती सुयोधनासी
श्रम करिसी हें व्यर्थ कशासी
द्वारेचा मी आज न राजा
आप्तपणा नच तुमचा माझा ॥१३४॥
प्रियभक्ताचें करण्या रक्षण
दूर सारिली लाज गोत - धन
दास असे मी पंडुसुतांचा
घेउन आलों निरोप त्यांचा ॥१३५॥
तूं राजा मी दूतचि केवळ
विदुरासदनीं असें मला स्थळ
असो पाहुणा सम अधिकारी
असे सांगती लोक विचारी ” ॥१३६॥
“ भोजनास तरि निदान यावें मम सदनीं यदुनाथा ”
लगट करी तो खल दुर्योधन विनवी लववुन माथा ॥१३७॥
म्हणे मुरारी त्या झिडकारुन
योग्य मानिती तदाच भोजन
जिथें प्रेम तें असतें उत्कट
धनहीना वा येतां संकट ॥१३८॥
फार शिरूं की नये खोलवर
ऐक सांगतो स्पष्ट हवें तर
कुंठलीही मज नसे विपत्ती
तुझी नि माझी लव ना प्रीती ॥१३९॥
रथ घे विदुराघरी दारुका
ऐकुन बसला खलास चरका
मनांत भारी जळफळले ते
सुधा वर्षली विदुरावरतें ॥१४०॥
वळे दयाघन भाग्यसमीरें
धन्य धन्य हे नाथ मुरारे
साध्वी त्याची घे लोटांगण
कुंती माता दे आलिंगन ॥१४१॥
प्रेमळ वत्सल गुज गोष्टींनीं
दीर्घ तरी ती सरली रजने
निरोप धाडी नृपा जनार्दन
येऊं कधी मी भेटी लागुन ॥१४२॥
दुसरे दिवशीं राजसभेसी शिनिवीरा सह येई
वासुदेव भगवान रमाधव संतजना सुखदायी ॥१४३॥
श्यामल कांती नवजलदासम
धीर गती सुचवीत पराक्रम
नतजनतारक रम्य पदें तीं
जणुं फुललीं कमलें भूवरतीं ॥१४४॥
पीतांबर हा बहुमोलाचा
लखलख चमके कांठ जयाचा
शोभत शेला अंगावरती
पदरा जडलें माणिक मोतीं ॥१४५॥
गजशुंडेपरि अ जा नु बा हू
धजती ना खल तयास पाहूं
दीप्त रवीसम हृदयीं कौस्तुभ
कोमल ओठीं हास्य खुले शुभ ॥१४६॥
डुलते कानीं सुरेख कुंडल
स्कंधीं रुळती कुरळे कुंतल
तिलक केशरी मृगमदमिश्रित
मुगुट शिरींचा तेजे तळपत ॥१४७॥
असा मनोहर योगविदांवर येता परिषत्स्थानी
उभे राहुनी स्वागत केले भीष्मासह सर्वांनीं ॥१४८॥
सुवर्ण मंचक रत्नें मंडित
पादपीठ ज्या असे सुशोभित
तेथ आदरें समापतीसी
बसवी राजा नम्रवचेंसी ॥१४९॥
सर्व सभासद बसले खालीं
वृत्ती त्यांची उत्सुक झाली
परमेशाचें श्रवण्या भाषण
उठतां श्रीहरि शांत सभाजन ॥१५०॥
“ कुरुकुल - तिलका धृतराष्ट्रा हे
सख्य करूं मी आलों आहे
कौरव पांडव या दोघांचें
भलें असो हें हेत मनींचे ॥१५१॥
वंश असे हा श्रेष्ठ कुरूंचा
वचक दूरवर असे जयाचा
वंशाची या उज्वल कीर्ती
सुरलोकींही किन्नर गाती ॥१५२॥
मलिन न व्हावे यश ऐसे हें म्हणुनी सावध राही
मिथ्या वर्तन करणारासी स्वतंत्रता बरि नाहीं ॥१५३॥
तुझे लाडके पुत्रचि येथें
डाग लाविती कुलकीर्तीतें
धर्मार्थासी हे अवमानुन
करूं पाहती नृशंस वर्तन ॥१५४॥
दुर्बल लवही नसती पांडव
शांत राहिले प्रेमानें तव
तुझेच ते त्या जवळ करावें
हेंच विनविले तयीं सुभावें ॥१५५॥
धर्म म्हणे तुज हें प्रिय ताता
दुजा आसरा अम्हां न आतां
तुम्ही आमुचे वडिलांमागें
लालन पालन केलें अंगें ॥१५६॥
दुःख साहिलें तव आज्ञेनें
समय पाळिला सर्व नयानें
जागा आतां निज वचनासी
राज्य करावें परत अम्हांसी ॥१५७॥
पंडू सुतांचा असा असे हा निरोप भूपा तुजसी
अपार शक्ति असुनी अंगी विनम्र ते गुणराशी ॥१५८॥
कथितों राजा तुझ्या हिताचें
अर्ध - राज्य दे पंडुसुतांचें
युद्धाची ती वेळ न आणी
सर्व - नाश होईल निदानी ॥१५९॥
जय मिळवाया कौंतेयावर
समर्थ नाहीं कुणी सुरासुर
राजा त्यासह सख्य करावें
जगताचे हित यांत समावें ॥१६०॥
सांगा हो मज तुम्ही सभाजन
द्रोणा भीष्मा करा निवेदन
बोलत का मी अन्यायाचें
असत्य शिवलें ना मम वाचें ॥१६१॥
धर्म जाणती तुम्ही विचारी
उत्तरदायी अहांत सारीं
निर्णय घेतां अन्यायाचे
सभासदांसीं पाप तयांचें ॥१६२॥
निग्रह करूनि तव पुत्राचा समेट राजा साधी
धर्म युधिष्ठिर तव आज्ञेसी नाहीं लवहि विरोधी ॥१६३॥
धर्मनीतियुत वच समयोचित
ऐकुन झाले जन रोमांचित
भीष्म पितामह वदले तेव्हां
“ सकल हिताचा बोल हरी हा ॥१६४॥
धृतराष्ट्रानें उत्तर केलें
श्रेयस्कर तव भाषण सगस्ळें
काय करूं परि सुतासमोरी
गुंग होत मम बुद्धी सारी ॥१६५॥
धरी दुराग्रह मूर्ख सुयोधन
रुचते ना मज त्याचे वर्तन
उपाय परि मम चालत नाहीं
तूंच पहा त्या सांगुन कांहीं ॥१६६॥
सर्वंकष तव कुशाग्र बुद्धि
वश असती तुज सकला सिद्धि
चतुर भाषणी तूं यदुराया
बोध करी हट्टी तनया या ” ॥१६७॥
“ फार बरें ” मधुसूदन वदले “ कुरुराया तुजसाठीं
सुयोधनासी बोधिन म्हणती ऐक हिताच्या गोष्टी ॥१६८॥
कुलदीपक तूं कुरूवंशाचा
परिचय आहे तुज विद्यांचा
ज्ञान असे तुज भल्या बुर्यांचें
वचन मोडिसी कां वडिलांचें ॥१६९॥
अवगणितां हितचिंतक बाप्पा
कारण होतें पश्चातापा
दुराग्रहा बळी पडुनी पाही
कुलक्षया नच कारण होई ॥१७०॥
कामाहुन अर्थाची महती
अर्थ अकिंचन धर्मापुढतीं
अधिष्ठान हें कधिं नच टाकीं
हित साधावें इह परलोकीं ॥१७१॥
द्वेषा करिसी जन्मापासुन
पंडुसुतांच्या तूं निष्कारण
क्षमाच आहे त्याचे हृदयीं
परी तियेचा अंत न पाही ॥१७२॥
क्रोध न आला युधिष्ठिरासी अर्जुन धनु ना चढलें
तोंची निजहित साध सुयोधन ! वा संकट ओढवलें ॥१७३॥
याच परी भीष्मद्रोणांनीं
बोध तया केला विदुरांनीं
परी सुयोधन बहु अभिमानी
वाक्य कुणाचें लव नच मानी ॥१७४॥
क्रोध तयाचा उसळूनि यावा
म्हणे “ माधवा कळला कावा
ढोंग दावुनी निःस्पृहतेचें
हित केवलो तूं बघसी त्यांचें ॥१७५॥
बोधाची कां उगी उपाधी
लवही नाही मी अपराधी
द्यूतीं मजसी विजय मिळाला
नसे कुणाचा मी ओशाळा ॥१७६॥
पोसुन माझ्या अन्नावरती
द्रोणभीष्म मज उलटे कथिती
धाक घालिसी हरी कुणासी
भीत न मी त्या बृहन्नडासी ॥१७७॥
राज्य राहुंदे सुइच्या वरची देइन ना मातीही
समरीम मृत्यू येइल येवो मज वीरा भय नाही ॥१७८॥
म्हणे जनार्दन “ बरें तथास्तु
वीर वृकोदर पुरविल हेतू
वीरशयन तुज मिळेल निश्चित
तदा न मागें घे यत्किंचित ॥१७९॥
निर्दोषी मानिसी स्वताला
पहा शोधुनी निज चित्ताला
घातियलेंसी विषान्न भीमा
जाळाया यतलास तया मा ॥१८०॥
सती द्रौपदी तुझी भावजय
तिला गांजिले सोडुनियां नय
सभेंत धजसी करण्या उघडी
तदाच भरली तव पूर्ण घडी ॥१८१॥
तुझिया पापा गणती नाही
त्यजिलें सत्य न पंडुसुतांहीं
एकच झाली चूक तयांची
तुला ठेविलें जिवंत हेंची ॥१८२॥
सुधारिली ती जाईल आतां सुचली तुज दुर्बुद्धि
मत्सामर्थे संतजनांचे हेतू नेइन सिद्धीं ॥१८३॥
कथितों अंती धृतराष्ट्रा तुज
उच्चरवानें म्हणे अधोक्षज
बंदित घाली सुताधमा या
मोहासी वश होइ न वाया ॥१८४॥
कुल रक्षाया वधणें व्यक्ति
गांवासाठी कुलास मुक्ति
त्यजणें गांवहि देशासाठीं
सूज्ञ जनांची ही परिपाटी ॥१८५॥
कंसा वधिलें मी ज्ञातीस्तव
प्रजापतीनें दमिले दानव
तसें त्यागुनी सुतमोहासी
साध - देश - कुल कल्याणासी ॥१८६॥
असें ऐकतां हरिचें भाषण
कर्ण ठाकला गर्वे ताठुन
वदे सभेसी धिक्कारुनियां
हात उचलतो कोण बघूं या ॥१८७॥
दुर्योधन नृपवरा तुम्हासी
साह्य सदा मी असे रणासी
त्रिभुवन - विजयी भार्गवछात्रा
पुढे टिकेल न अत्रपरत्रा ॥१८८॥
तुम्ही उधळुनी द्या हा संधी
विश्वहि सगळे असो विरोधी
बडबड या शठ वाचाळाची
मनांत लवहि न धरावयाची ॥१८९॥
भीष्म म्हणाले गर्जुन कर्णा मूर्खपणा आवर हा
घातक असली भर नच घाली सुयोधनाच्या मोहा ॥१९०॥
गंर्धवानें धरितां राजा
तुझा पराक्रम नच ये काजा
पार्थे केलें मुक्त तुम्हांसी
आठव त्याचा करी मनासी ॥१९१॥
विराट नगरी गोहरणास्तव
होतासी ना ? तूं सह कौरव
गाय न ऐकहि परी मिळाली
उलट नेसतीं वस्त्रें गेलीं ॥१९२॥
तदा एकटा होता अर्जुन
घेसी तरि माघार रणांतुन
डौल दाविसी कशास पोकळ
रणांत ज्याची विद्या निष्फळ ॥१९३॥
सुयोधना तूं ऐक हरीचें
रक्षण करि यश धन विभवाचें
गोता देइल तुझी प्रभावळ
गर्वे जी नित वदते बाष्कळ ॥१९४॥
अपमानाएं समजुन भाषण
कर्ण चालता होत सभेंतुन
संतापें मनिं जळपळलेला
खल दुर्योधन त्या अनुसरला ॥१९५॥
बंधन करण्या श्रीकृष्णासी अधमाधम मनि योजी
म्हणे हरी मी अपवादांतुन मुक्त जाहलों आजी ॥१९६॥
धृतराष्ट्रा हे परिषज्जन हो
बोल अम्हावर अता न राहो
भोगा आतां परिणामासी
संहारी या तुम्हेंच दोषी ॥१९७॥
मूर्ख पाहतो मज निगडाया
समर्थ नाहीं भुवनत्रय या
अजुनी आज्ञा दे मज राजा
शासन करितो तुझिया तनुजा ॥१९८॥
तुझ्या कडुन परि घडेल ना तें
लिखित विधीचे वृथा न होतें
नारी घेतिल मुखांत माती
रडतिलफिरतिलबडवितछाती ॥१९९॥
असो पुरे हें बोलूं कायी
कार्य अतांमम उरलें नाहीं
परिषज्जन हो आज्ञा द्या मज ”
वदे सवंदन देव अधोक्षज ॥२००॥
सात्यकिचा कर धरुनी त्यजिती सभाग्रुहा भगवंत
दीप्त तेज ते पाहुन थिजले खल चित्ती भयभीत ॥२०१॥
हरि, विदुराचा निरोप घेउन
करीत कुंतीसी अभिवाद्न
जननी वृद्धा वदें तदा ती
तेज जणूं का जळती ज्योती ॥२०२॥
“ सुतांस माझे कळिव शुभाशी
आलिंगन प्रिय पांचलीसी
सांग तया संदेश विभो मम
रणांत दावा अपुला विक्रम ॥२०३॥
अर्थ न कळताम विप्र जसे का
वेद ऋचांचा करिती घोका
तत्व विसरुनी तसे युधिष्ठिर
श्रीकृष्ण कथामृत - सोळावा सर्ग
( मोहनिरास )
कर्माकर्मविवेकमूढमनसां बुद्धिं विधाय स्थिराम्
मोहध्वान्तमपाकरोति नितरां यस्यप्रभा चिन्मयी
यस्मिन् ब्रह्मणि राजते जगदिदं सिन्धौ तरङ्गोपमम्
तं विश्वेशमहं नमामो सततं गङ्गाधरं श्रीगुरुम् ॥१॥
सोडा धीर न देवा मागुति उभा धर्मास नाहीं भय
व्हवें उद्धट उद्धटास हरणीं हाची यशाचा नय
ऐसें बोधुन ओतिलें नव पुनःचैतन्य राष्ट्रांतरी
त्या श्रीसद्गुरु रामदासचरणां मी वंदितों आदरीं ॥२॥
यज्ञ सत्र हे कृतांत घाली
कुरुभूमीवर जणु त्या कालीं
धूळ उडाली पदघातानीं
तीच शोभते नभीं वितानीं ॥३॥
वीरवरांच्या रथीं पताका
गुढ्या तोरणें त्याच जणूं का
क्रोध पेटला पांचालीचा
अग्नि तोच या समर - मखाचा ॥४॥
हवि ते सैनिक यूप मतंगज
होता अर्जुन धनु चढवी निज
स्रुवे तेथचीं शस्त्रें नाना
गणा उपाकृत अंधसुतांना ॥५॥
टणत्कार जे शरासनांचे
ध्वनि ते स्वाहा तसे स्वधेचे
कंकण बांधी धर्म युधिष्ठिर
सेना पत्नी व्रतास तत्पर ॥६॥
पार्थसारथी यदुकुल भूषण भगवान् कृष्णमुरारी
यज्ञाचा त्या वेत्ता झाला रचित योजना सारी ॥७॥
विजयरथाच्या बसे धुरेवर
ध्येय मुनींचें असा परात्पर
रश्मी हातीं धरून ह्यांचे,
विनवी अर्जुन त्या मृदुवाचें ॥८॥
दो सैन्याचे घे मध्यावर
रथ माझा हे अच्युत सत्वर
वीर बघूं दे कोण रणींया
उभे खलांचें प्रिय साधाया ॥९॥
मेरू जैसा तमःप्रकाशी
भव्य तसा रथ उभयबलासी
मधें आणुनी कृष्णें म्हटलें
पाहा पार्थ हे कुरुगण जमले ॥१०॥
पुढती पाहुन भीष्म पितामह
गुरु, मातुल सुत बंधु सखे अह
वीराचे त्या मन विरघळलें
ओसरलें बल धनुही गळलें ॥११॥
म्हणे करुण तो कृष्णाबघतां स्वजना युद्धोत्सुक या
तनु थरथरते भ्रमतें मस्तक कवण कांपवी हृदया ॥१२॥
वधुनी वांधव सुख मिळवावे
पाप असे हे मज नच भावे
त्रैलोक्याच्या राज्या करितां
होईन ना मी वडीलां वधिता ॥१३॥
लोभें झालें अंध तयांना
धोर कुलक्षयजरि दिसलांना
ज्ञान सर्वही असुनी आम्हा
उद्यत व्हावें कसें अधर्मा ॥१४॥
जातिधर्म कुलधर्म विनाशुन
वर्णसंकरा व्हावें कारण
पितरांचें वारनें तिलोदक
राज्यसुखासी होउन उत्सुक ॥१५॥
होईल हें न कधीं मम हातें
वधोत कौरव सुखेन मातें
निरयगती तरि टळेल तेणें
पाप नको हें जीवनभेणें ॥१६॥
वदुनी ऐसें सहसा अर्जुन रथांत बसला खालीं
चाप टाकिलें भरले डोळे विषण्णता बहु आली ॥१७॥
वासुदेव म्हणतात तयासी
दुर्बुद्धी ही सुचली कैसी
षंढपणा हा शोभत ना तुज
उठ अर्जुना धनु सावर निज ॥१८॥
वदे धनंजय टाकुं कसे शर
पूजनीय भीष्मद्रोणावर
वडिला मारुं महानुभावा
भीक बरी कीं त्याहुन देवा ॥१९॥
विमूढ झालें चित्त मदीय
समजत ना मजसी हित काय
शिष्य तुझा मी शरण पदासीं
शोक हरी मम हे हृषिकेशी ॥२०॥
शक्य मला ना लढणें तोंवर
देई प्रभु उपहासुन उत्तर
नको तयाचा शोक करीसी
वदसी भाषा प्राज्ञपणेंसी ॥२१॥
राहो जावो प्राण कुणाचा पंडित शोक न करिती
देह विनाशे मरे न आत्मा या ज्ञानें स्थिर वृत्ती ॥२२॥
आत्मा शाश्वत विभु अविकारी
बघतां होती विस्मित सारी
भूतें परि असती क्षणभंगुर
शोक तयांचा व्यर्थ खरोखर ॥२३॥
श्रेय जगीं क्षत्रियास कांहीं
धर्मयुद्धसम दुसरें नाहीं
स्वधर्म तव हा त्याग तयाचा
कारण बहुविध अपकीर्तीचा ॥२४॥
जयापजय वा सुखदुःखासी
सममानुन हो रत युद्धासी
पाप न मग लागेल कशाचें
दोष सर्व हे काम्यकृतीचे ॥२५॥
भोगलोलुपा असतां बुद्धी
स्थिरतेची नच लाभत सिद्धी
टाक सर्वही त्रिगुणोपाधी
सोड फलाशा मिळे समाधी ॥२६॥
“ स्थिर बुद्धीचे लक्षण मजसी सांग केशवा सारें ”
म्हणे हरी “ टाकिता वासना स्थितप्रज्ञ तो वा रें ॥२७॥
अपुला आपण तुष्ट असे जो
वीतराग - भयरोष सदा जो
आवरुनी इंद्रियास मत्पर
विषय न चित्तीं सर्वनाशकर ॥२८॥
निजे जिथें जागे इतरेजन
कामें तृप्ती नच हें जाणुन
निस्पृह निर्मम निरहंकारी
शांतिसुखाचा तो अधिकारी ॥२९॥
स्थितधी पुरुषाचें हें लक्षण
ब्राह्मी स्थिति ही मोहविनाशन
लाभ हिचा होउनही अंती
ब्रह्मरूप त्या मिळते मुक्ति ॥३०॥
बुद्धि श्रेष्ठा जर कर्माहुन
लाविसी कां मग कार्या दारुण
गोंधळ केला अधिकची माझा
एक हिताचें वद यदुराजा ॥३१॥
वदती भगवान् कथिल्या पूर्वीं ज्ञान - कर्म - निष्ठा मी
कर्म टाकून नैष्कर्म्य न ये शक्य न वास निकामी ॥३२॥
देह आवरी ध्यास मनांतें
हें न खरें तूं त्यज संगातें
यज्ञ येत हा जन कल्याणा
ब्रह्मसर्वगत यज्ञीं जाणा ॥३३॥
कार्य नसे जरि आत्मरतासी
झटतो तो परि लोक हितासी
जनकसमांसी याहीं सिद्धी
जनार्थ मीही घेत उपाधी ॥३४॥
चळवावी नच बुद्धि जनांची
मूर्ख समजतो कर्ता मीची
खेळ गुणांचा ज्ञाता मानी
लढ तूं कर्मे मज अर्पोनी ॥३५॥
विनाश होतो त्यजितां मम मत
भला स्वभावा धरुनी वागत
गंवसावे ना रागद्वेषी
गणुन भयावह परधर्मासी ॥३६॥
पापा होतो प्रवृत्त का नर या प्रश्ना हरि सांगे
क्रोध काम हे रजोगुणांचे प्रेरिति त्या बलवेगे ॥३७॥
ज्ञान झाकिती रिपु हे आधी
वास करुन इंद्रिय मन बुद्धीं
मन बुद्धीच्या पर तत्त्वासी
जाणुन या रिपुयुग्मा नाशी ॥३८॥
योग हाच मी कथिला सूर्या
क्रमें जाणती राजर्षी या
रहस्य कथिलें भक्त सखा तू
मनीं अर्जुना आण न किंतू ॥३९॥
तुझें नि माझे जन्म किती तरि
धर्मोद्धारा येतों भूवरीं
मुक्त होत हे तत्व कळे ज्या
ज्ञान - पूत ये रूपीं माझ्या ॥४०॥
जसा भक्त मज तसा तया मी
चार वर्ण रचिले गुणकर्मी
कर्म न लिंपे स्पृहा न मातें
अलिप्त करूनी, म्हणुनी ज्ञाते ॥४१॥
कर्माकर्मी बावरती बुध कथितों शुभकर तुज तें
सर्व परिग्रह टाकुन करितां कर्मचि अकर्म होतें ॥४२॥
यज्ञासाठीं ज्ञा ना व स्थि त
केलीं कर्मे जाति लयाप्रत
बाह्यरूप हा यज्ञ जयाचा
प्रकार कांहीं असो तयाचा ॥४३॥
ज्ञान - यज्ञ हा श्रेष्ठ तयासी
जाणुन घे तो भजुन गुरुसी
ज्ञाना सम ना पवित्र कांहीं
सर्व त्यामधें जळुनी जाई ॥४४॥
अश्रद्धा संशय बहु घातक
लोक न दोन्ही तयें न वा सुख
छेद अर्जुना सत्वर त्यासी
ज्ञान खङ्ग घे ऊठ करासी ॥४५॥
“ संन्यासाची गासी महती
कर्मयोगही कृष्णा ! पुढती
एक सांग ” मग म्हणे मुरारी
सांख्य योग दोन्ही हितकारी ॥४६॥
अज्ञ मानिती भेद तयासी, एकचि फल दोघांचे
कर्मयोग हा सुलभ, कष्ट बहु होती संन्यासाचे ॥४७॥
करणें अपुल्या विषया घेती
लेप तयाचा लव ना चित्तीं
ईश न कारण भल्याबुर्यासी
मोह पडे तो अज्ञानासी ॥४८॥
हर्षोद्वेगा वाव न राही
सम - दर्शी ते सर्वांठायी
बाह्यस्पर्शज भोग दुःखकर
तेथ न योगी रमवी अंतर ॥४९॥
द्वंद्व निमे, हृदि उजळे ज्योती
ब्रह्मपदा गतपातक येती
मला जाणतां महेश्वरासी
शांति मिळे त्या यतेंद्रियासी ॥५०॥
कर्म करी सोडूण फलाश्रय
तो योगी तो यती, न अक्रिय
विषय - कर्म - संकल्पा टाकी
पदवी योगारूढ तया कीं ॥५१॥
तारक मारक अपुले आपण आत्मा निज जिंकावा
सोनें माती शत्रुमित्र ज्या सम तो युक्त म्हणावा ॥५२॥
एकांतासी शु भा स ना व र
करून बसावें देह मनस्थिर
ध्यान करावें मम यत - चित्तें
त्या योग्या पर शांती मिळतें ॥५३॥
युक्तवर्तनीं योग सुखावह
आत्मनि होते स्थिर मन निस्पृह
सुख आत्यंतिक मिळे अतीन्द्रिय
मोठें दुःखहि नुपजवि मग भय ॥५४॥
योग निग्रहें हा साधावा
इंद्रियगण हळुहळूं दमावा
यत्नें करणें आत्मसंस्थ मन
ब्रह्मसुखा ये सुटतां चिंतन ॥५५॥
सर्वांभूतीं बघे स्वतांला
आपणांत सर्वहि भूताला
एकपणें मज भजे विभूसी
योग साधला पूर्ण तयासी ॥५६॥
प्रमाथि चंचल दुर्निग्रह हें मन, तरि वश करितां ये
सतताभ्यासें दृढ वैराग्यें म्हटलें श्री यदुरायें ॥५७॥
योग न साधो एक्या जन्मीं
वायापण परि नसे सुकर्मीं
सुकुलीं जन्मे पुण्यबलानें
तेथें मिळवी यश यत्नानें ॥५८॥
ज्ञान कर्म तप या सर्वांहुन
थोर योग हो योगी अर्जुन
योग्यांतहि जो भजतो मातें
मानितसे मी श्रेष्ठ तयातें ॥५९॥
जाणशील तूं पूर्णपणें मज
पार्था देतों ज्ञान असें तुज
जाणायाचें मग ना उरतें
तत्व कुणा मम विरळा कळतें ॥६०॥
प्रकृति मदीया पराऽपरा ही
प्रणव जगा, पर मजहुन नाहीं
वस्तूंचे वस्तुत्व असे मी
काम मी जो वसे सुधर्मीं ॥६१॥
त्रिगुणा आश्रम मीच राहती मयि ते मी नच त्यासी
माया मोहित जाणती न हें कळते मम भक्तासी ॥६२॥
भक्त चतुर्विध मज भजताती
ज्ञानी त्यांतिल माझी मूर्ती
प्राप्ती दुर्लभ परी अशाची
मी श्रद्धा चळवी न कुणाची ॥६३॥
मी मायेनें असे समावृत
जीव सर्वही द्वंद्वें मोहित
क्ळे न माझें रूप कुणासी
कळतें ज्या तें मोक्ष तयासी ॥६४॥
म्हणे किरीटी ब्रह्म कर्म तें
अधिदैवत अधिभूत कोणतें
कशास रे अध्यात्म म्हणावें
कसें शेवटीं तुज जाणावें ॥६५॥
देव सांगती मग पुरूषोत्तम
अक्षर जें तें समजे ब्रह्म
सर्ग कर्म, अध्यात्म स्वभावा
अधिभूते मानी क्षर भावा ॥६६॥
पुरुष तोच अधिदैवत पाही अधियज्ञू मी देही
मत्स्मरणें त्यजितां तनु मिळतो मजसी संशय नाहीं ॥६७॥
अंती स्मरतां तद्भावा ये
लढ तूं स्मरुनी मजसी हृदयें
ध्यान घडे ज्या परात्पराचें
त्या योग्या भय नच जन्माचें ॥६८॥
परंधाम मम अक्षर पार्था
नसे निवर्तन जेथें जातां
अनन्य भक्ता लावतसे तें
अयनें दोन्ही समचि तयातें ॥६९॥
शुक्ल क्रुष्ण या दोन गतीसी
जाणें, होत न मोह तयासी
योग असा हा पार्था साधी
स्थान जयाचें सर्वां आधीं ॥७०॥
ज्ञान ऐक हें म्हणे दयाघन
सुटसी जेणें तूं अशुभांतुन
लिप्त नसे मी प्रसवे माया
आध्यक्षीं मम चराचरा या ॥७१॥
मूढा न कळे तत्व खरें मम मोहित राक्षस भावीं
परी महात्मे अनन्य होती प्रकृति तयांची दैवी ॥७५॥
गाती कीर्ती करिती वंदन
निश्चय करुनी युक्त उपासन
विश्वमुखा मज दुसरे ज्ञानी
भजती भेदाबेद मतींनीं ॥७३॥
सर्वाश्रय मी सर्व गती मी
वेद यज्ञ ओंकार धनी मी
सकाम यज्ञें भजती मातें
भोगितात मग गतागतातें ॥७४॥
सकलहि भजती पर्यायें मज
मिळे गती परि हेत जसा निज
पान फूलही अनन्य भावें
देतां मीं त्या उरीं धरावें ॥७५॥
सम आहें मी सर्वां भूतीं
दुष्टहि भजतां सज्जन होती
परागती मिळते नीचा ही
भक्ता मम नच दुर्लभ कांही ॥७६॥
सर्व समर्पुन मज मन्मन हो मद्याजी मद्भक्त
शरण मला ये होशिल पार्था सर्वमुक्त मद्युक्त ॥७७॥
ऐक भारता हे मम भाषण
म्हणे श्रीहरी तव हितकारण
प्रभव न माझा कळे कुणाही
मज जाणें तो मुक्त मळेंही ॥७८॥
पृथग्भाव बहु मनू महर्षीं
उगम मीच कीं एक तयांसी
हें जाणुन मज भजती ज्ञाते
रमती बोधित परस्परांते ॥७९॥
बुद्धियोग मी देतों भक्तां
विनवी अर्जुन जोडुन हातां
“ परमेशा तुज मुनिगण गाई
तेंच बोधिता स्वयें मलाही ॥८०॥
कुणि न तुला तुजवीण जाणती
सांग तूंच मज आत्मविभूती
“ बरे ” बोलती मग पुरूषोत्तम
“ विस्तारासी अंत नसे मम ॥८१॥
आदि मध्य मी अंत जगाचा आत्मा सर्वांभूती
विद्या मीची अध्यात्माची काल मीच धृतिकीर्ती ॥८२॥
वृष्णी माजी वासुदेव मी
पंडुसुतांसी अर्जुन तो मी
सत्व असें मी सत्ववतांचें
दंड शासनीं स्वरूप माझें ॥८३॥
थोड्या कथिल्या या मुख्यांतिल
कोण विभूती माझ्या मोजिल
वैभव लक्ष्मी प्रभाव जेथें
विशेष दिदतां मदंश तेथें ॥८४॥
लावूं हे पाल्हाळ कशासी
इतुकी उक्ती होय पुरेशी
एकच अंशें सर्वहि विश्वा
व्यापियलें मी जाण पांडवा ॥८५॥
“ अद्भुत तव हें रूप महेश्वर
दाखिव मजसी नयनें श्रीवर
शक्ति जरी मम असेल साची
तव वचनीं मी इच्छित हेंची ॥८६॥
वदती भगवान् पहा अर्जुना विश्वरूप हें माझें
यांत चराचर असे, दिव्य घे दृष्टी, निरख हवें जें ॥८७॥
देव विश्वतोमुख झालासे
सूर्य - सहस्रासम भा भासे
एकवटे जग विभक्त तेथें
वदे धनजंय लववुन माथें ॥८८॥
भूतसंघ तव दिसे शरीरीं
अपार रूपें दिशांस चारी
दीप्त तेज हें दिपवी नयना
अज अव्यय तूं पुरूष पुराणा ॥८९॥
लोकां भिववी रूप भयंकर
स्तविती विस्मित नमुनी सुरवर
कराल - मुख - पद - कर - नयनांची
रूपें उडविति गाळण माझी ॥९०॥
तुझ्या भयानक दाढांखालीं
वीर मंडळी चिरडुन गेली
जळत्या वदनीं शिरतां दिसती
लोक,कोण तूं भैरवमूर्ती ॥९१॥
“ लोकक्षयकृत् काळ असें मी वधिलें सकलहि वीरां
निमित्त हो तूं जय मिळवाया, ऊठ करी रण, धीरा ” ॥९२॥
भीत भीत मग वदला अर्जुन
महिमा योग्यच तुझा जनार्दन
अचिंत्यरूपा अ नं त शक्ते
सहस्रशा तुज नमो नमस्ते ॥९३॥
अजाणतां तुज सलगी केली
अपराधा त्या उदरीं घाली
भ्यालों तव या भीषण रूपें
रूप धरावें पुनरपि सोपें ” ॥९४॥
सौम्य होउनी वदे रमाधव
“ आज तुला जें दिसलें वैभव
तें न दिसे जप यज्ञाध्ययनें
लाभे केवळ अनन्य भजनें ॥९५॥
असंग मत्पर भक्त मदीय
“ मत्कर्मे मद्रूपचि होय
म्हणे धनंजय भक्त तुझा कीं
ब्रह्मोपासक उत्तम लोकीं ॥९६॥
क्लेश तया बहु, उद्धरितों मी मत्पर ज्याची वृत्ती
अव्यक्ताचा मिळे उपासक मलाच येउन अंती ॥९७॥
मज मध्यें मन नच होतां स्थिर
कर फलाचा त्याग तरी कर
त्यागें मिळते अपार शांती
मित्र करुण तो सकलांभूतीं ॥९८॥
आवडतो तो मजसी भारी
सदा असे जो स्थिर अविकारी
धर्म्यामृत हें आचरिती जे
सुभक्त ते प्रिय अतिशय माझे ॥९९॥
क्षेत्र देह हा मी क्षेत्रज्ञ
छंद सूत्र गाती मुनि तज्ञ
भू ता हं का रा व्य क्तें द्रि य
क्षेत्र बुद्धि सविकार नि सविषय ॥१००॥
लोभदंभहिंसा न शिवे वा
क्षमा शौच शम दम गुरुसेवा
असक्त मम सद्भक्त विरागी
ज्ञान उलट अज्ञान विभागी ॥१०१॥
ज्ञान ऐक जें देई अमृत
परब्रह्म हें अतीतसदसत
अनादि अव्यक्त असक्त निर्गुण
विश्वा तरि जें करितें धारण ॥१०२॥
तेजाचें तेज हें ज्ञान हें ज्ञेय हेंच हृदयस्थ
जाणुनिया हें सकल भक्त मम होतो मद्भावस्थ ॥१०३॥
प्रकृति सगुण कारण सर्गासी
पुरुष महेश्वर भोक्ता त्यासी
उभयाधीन स्थावर जंगम
हें कळतां दे मृत्यु न त्या श्रम ॥१०४॥
पुरुष अकर्ता तदीय सत्तें
एकत्वा ना त्यजती भूतें
क्षेत्रासी या प्रकाशवी तो
ज्ञानें बघतां ब्रह्मा मिळतो ॥१०५॥
गर्भ धरीं मी विश्वाचा या
महद्ब्रह्मयोनीं कौंतेया
कळल्यावर हें व्यथा न होते
अव्यय आत्मा त्रिगुणीं गुंते ॥१०६॥
प्रकृति - गुणांनीं सत्व रजस्तम भरले सर्वहि भावीं
प्रकाश सत्वीं कार्य रजासी तमांत जडता व्हावी ॥१०७॥
ज्ञान अनामय सुख सत्वासी
जात तयानें उर्ध्वगतीसी
दुःख लोभ वासना रजाचें
लक्षण, मध्यें स्थान तयाचें ॥१०८॥
तमीं मूढता प्रमाद निद्रा
गती तयानें मिळे अभद्रा
अमृत लाभतें त्यजिलें या जरि ”
म्हणे विजय “ हें घडे कसें परि ” ॥१०९॥
देव सांगती प्रिय भक्तासी
मूळ वरी या अश्वत्थासी
अव्यय हा यच्छखा खालीं
छंद जयाचीं पानें झालीं ॥११०॥
विषयांकुर तरु सर्व दिशांसीं पसरे रूप न कळतें
असंग शकें छेदुनियां जितमोहा स्थिरपद मिळतें ॥१११॥
अंश जीव मम लिंगशरीरीं
वि ष यां से वी करणपुढारी
स्थूल गतागत येणें होतें
मूढा न कळे बघती ज्ञातें ॥११२॥
रवि चंद्रानल भासवितों मी
रक्षि औषधी धरितों भूमी
जठराग्नी मी मी सर्व हृदीं
ज्ञानाज्ञानस्मृतिकर वेदीं ” ॥११३॥
कूटस्थासी म्हणती अक्षर
जाणावें क्षर सर्व चराचर
पर दोन्हीहुन मी पुरूषोत्तम
लोकवेद विख्यात यशें मम ॥११४॥
विगतमोह सर्वज्ञ मलाही
जाणुन भावें मत्पर होई
गुह्य कळे हें जयास सत्य
होत भारता तो कृतकृत्य ॥११५॥
अभय विशुद्धि स्वाध्यायार्जव
सत्य अहिंसा अगर्व मार्दव
धैर्य दान तप धर्मीं आस्था
हीच संपदा दैवी पार्था ॥११६॥
क्रोध दर्प पारुष्य मूढता दंभ आसुरी जाणें
बाधक ही, दैवी उद्धरिते, ती तव शोक न करणें ॥११७॥
द्विविध लोक ते दैव नि आसुर
दैवी कथिले तुला सविस्तर
त्याग योग नकळे असुरांसी
शुचिता सत्य न धर्म तयासी ॥११८॥
नाहीं म्हणती जगास कारण
ओळखती ना कामार्थाविण
मत्त, थोर मानिती स्वतःला
मी त्यां नेतों अधोगतीला ॥११९॥
क्रोध कामहीं नरकद्वारें
वर्ते म्हणुनी शास्त्राधारें
शास्त्र पाहुन निर्णय घ्यावे
म्हणुन पार्थ हें युद्ध करावें ॥१२०॥
“ श्रद्धान्वित जे कर्म करिती सोडुन शास्त्रविधीला
निष्था त्याची कसली कृष्णा ” या प्रश्ना प्रभु वदला ॥१२१॥
स्वभावजा ती त्रिविधा श्रद्धा
सात्विक राजस तामस भेदा
श्रद्धा जैसी तसा होत नर
मददंभें मज कष्टविती खल ॥१२२॥
यज्ञदान तप आहारीं वा
त्रिभेद हेंची धरुन स्वभावा
पवित्र सात्विक दंभी राजस
मूर्ख अमंगळ असती तामस ॥१२३॥
ॐ तत्सत् या निर्देशानें
करिती बुध कर्में श्रद्धेनें
अश्रद्धेनें जें जें होतें
उपभोगी तें इथें न तेथें ॥१२४॥
विजय म्हणे हे रथांगपाणे
तत्व कथी मज पृथक्पणानें
संन्यासाचें त्यागाचेंही
संशय इतुका हृदयीं राही ॥१२५॥
वदे श्रीहरी सकाम कर्में त्यजितां तो सन्यास
त्याग बोलती परी विचक्षण कर्म - फल - त्यागास ॥१२६॥
कर्मे टाका म्हणती कांहीं
त्याग परी तो तामस पाही
यज्ञदान तप नच टाकावें
फलाभिलाषी मत्र नसावें ॥१२७॥
जिवंत तोंवर कर्म सुटेना
म्हणुन म्हणावें भलें बुरें ना
पांच कारणें तया सदैव
कर्तृ करण चेष्टा स्थल दैव ॥१२८॥
अलिप्त बुद्धी निरहंकारी
बाध न त्यासी वधितां सारी
ज्ञाता ज्ञान ज्ञेय अशी ही
कर्मचोदना त्रिविधा पाही ॥१२९॥
संग्रह आहे त्रिविध असाची
पुनः कल्पना गुणभेदाची
सात्त्विक कर्ता असंग राही
अनहंवादी विकार नाहीं ॥१३०॥
कामुक हिंसक राजसकर्ता, तामस मूढ विषादी
ज्ञान कर्मही आहे पार्था त्रिविध असे गुणभेदी ॥१३१॥
परिणामीं जें हितकर होतें
सात्विक सुख तें म्हणती ज्ञाते
राजसगोडी मुखास केवळ
आद्यंतीं तामसी अमंगळ ॥१३२॥
वर्णां कर्में दिलीं स्वभावज
सिद्धी मिळते अनुसरतां निज
नच टाकावें सदोष म्हणुनी
कर्म न एकहि, दोषा वांचुनि ॥१३३॥
कर कर्में तूं मदाश्रयानें
सर्व संकटें तरशिल तेणें
ऐकशील ना अभिमानें जरि
सर्वनाश होईल तुझा तरि ॥१३४॥
ईश्वर हृदयीं सर्वांभूतीं
फिरवी जीवा मायाशक्तीं
भावानें जा शरण तयासी
भोग तत्कृपें शांति - सुखासी ॥१३५॥
प्रिय तूं माझा म्हणूण तुला हें गूज जिवींचें कथिलें
सर्वगुह्यतम वाक्य ऐक हें आतां हितकर वाहिलें ॥१३६॥
सकलहि धर्मा दूर करावे
मज एका ये शरण सुभावें
सर्व पातकांतुन मी तुजसी
तारिन रे त्यज शोक भयासी ॥१३७॥
शास्त्र अर्जुना बहु हें पावन
नास्तिकास सांगणें कदापि न
श्रद्धा धर्मीं नसे जयासी
पडों न देई छाया त्याची ॥१३८॥
अभिमान न ज्या परंपरेचा
असे पोसणा जो परक्यांचा
तुच्छ जयासी देव देश कुल
अधिकारी तो येथ नसे खल ॥१३९॥
सज्जनास मम वच सांगावें
चरितहि मम त्या सन्मुख गावें
भाव धरोनी जो परिसे हीं
पुण्य लोक मिळवील विदेही ॥१४०॥
ऐकिलेस ना तूं पार्था हेंमन करूनी एकाग्र
श्वेतवाहना सरलासे ना तव संमोह समग्र ॥१४१॥
श्रुति पावन जणुं जागृत झाली
गंगेचा ये प्रवाह खालीं
उपनिषदांची सुरधेनू ही
आर्थमिषें जगता सुख देई ॥१४२॥
बोधानें या श्रीकृष्णाचे
मोह - पटल हरलें विजयाचें
राख झडावी अंगाराची
कमळ खुले वा हंसतां प्राची ॥१४३॥
भानावर जणु येई मूर्च्छित
धुकें वितळलें रवि प्रकाशत
विद्या विस्मृत जणु का स्फुरली
फुले आम्रवन वसंत - कालीं ॥१४४॥
श्रीकृष्णास करी धनंजय तदा अत्यादरें वंदन
ठाके वीर शरासना चढवुनी प्रेमें करी भाषण
गेला मोह समूळ ये स्मृति विभो बोध प्रसादें तव
आज्ञा मानुन युद्ध हें करित मी आतां न शंका लव ॥१४५॥
मोहनिरास नांवाचा सोळावा सर्ग समाप्त
लेखनकाल :-
आश्विन शके १८७१
श्रीकृष्ण कथामृत - सतरावा सर्ग
( समरप्रसंग )
महाभीषणं ताण्डवं संविधित्सुम्
ज्वलल्लोचनं कर्कशं गर्जयन्तम्
महीं शीर्णशैलां भृशं कम्पयन्तम्
प्रभुं भीमरूपं हरं तं नमामि ॥१॥
कृष्णा त्वदीय महिला विलसे अपार
त्याचा कधीं जडमती न पवेल पार
आलों तटा - निकट मी गुरूच्या कृपेनें
आतां कृतार्थ करणें मज चक्रपाणें ॥२॥
काय तरी हे रणभूमीवर
करिती प्रलया ताण्डव सागर
लाटा भीषण उठती ना या
सजल्या सेना युद्ध कराया ॥३॥
रथी महारथ अतिरथ तैसे
वीरश्रीचे वल्लभ जैसे
पराक्रमाचे प्रदीप्त पर्वत
मारुं मरूं वा घृति ही निश्चित ॥४॥
कल्पघनासम कभिन्न काळे
महाकाय गज औत मिळले
घोडदळाची पा य द ळा ची
कुणी करावी गणती साची ॥५॥
झेपावति की अग्निज्वाला
कालीच्या वा जिभा कराला
तळपाव्या वा विजा तशी तीं
दिसती खङ्गें वीरा हातीं ॥६॥
मुकुट भटांचे कळस रथांचे कवचें गजगण्डांचीं
अशीं चमकती कीं भासतसे रचिनें त्यजिली प्राची ॥७॥
भीष्म पितामह कुरू - सेनानी
यद्रथ मंडित सित छत्रांनीं
द्रोण कर्ण कृप अश्वत्थामा
कौरव खल तो शकुनी मामा ॥८॥
यु धि ष्ठि रा नें द्रु प द सु ता सी
नेमियला अधिपति सेनेसी
भीम सात्यकी दो पक्षावर
उणें वारण्या पार्थ धनुर्धर ॥९॥
संमुख झाल्या परस्परांना
समरोत्सुक त्या उभयहि सेना
पांचजन्य फुंकीत रमाधव
घोषें त्या बहु भ्याले कौरव ॥१०॥
पांडव वाजविती निज शंखा
घोर रणाचा गर्जे डंका
कुरुसैन्यें ही शिंगतुतारी
नादविती दम घेउन भारी ॥११॥
प्रतिपक्षावर वार कराया वीर भुजा स्फुरताती
हिसके देती अश्व लगामा चरणें उकरित माती ॥१२॥
वी पाहती वाट खुणेसी
त्यजिलें धर्मे तो स्वरथासी
चालत येई कुरू सैन्यातें
बघती सारे विस्मित चित्तें ॥१३॥
विकार नाना विचार नाना
बोध न होई इतर जनांनां
परी जाणिलें जगन्निवासें
पार्थ - सारथी प्रसन्न हासें ॥१४॥
भीष्म पदावर ठेवुन माथा
म्हणे युधिष्ठिर जोडून हातां
ताता मजसी क्षमा असावी
गंहिवरला तों वीर तपस्वी ॥१५॥
हुंगुनिया शिर पंडुसुताचें
वदे पितामह वत्सल वाचें
नीतीचें तूं वत्सा भूषण
विजयीभव जा सुखें करी रण ॥१६॥
द्रोणाचार्या वंदन करितां प्रसन्न वदले तेही
“ शिष्यवरा कर्तव्य सुखें कर रोष मनीं मम नाहीं ” ॥१७॥
बसे रथीं येऊन युधिष्ठिर
शिंग खुणेचें झालें सत्वर
त्वेषानें मग भिडल्या सेना
प्रेरी माधव विजय - ह्यांना ॥१८॥
तोंड लागलें घोर रणासी
लढती योद्धे समरावेशीं
गदा तोमरें परीघ शस्त्र
खणखणतीं, सुटली बहु असें ॥१९॥
अमुं वधिष्ये, अमुं हनिष्ये
दिसती मंडल सतत धनुष्यें
बाणांचें छत होत नभासी
भंगवें न तें रविकिरणासी ॥२०॥
फुटती कवचें जणुं का हंड्या
उडती रक्तांच्या चिळकंड्या
कोसळताती वीर महीवर
झंझावातें जैसे तरुवर ॥२१॥
प्रातःकालीं संध्यावंदन करुनी जे रण जुंपें
सूर्य मावळे तों चाले तें भूमंडळ थरकापें ॥२२॥
एक दिनीं कुरुराजवचानीं
चढले कोपा भीष्म चिडोनी
दिसे वृद्ध तो, पर सैन्यासी
जसा मतंगज केळवनासी ॥२३॥
नित - मंडल - धनु वर्षतसे शर
शवें साचली सर्व महीवर
तदा हरीनें रथ विजयाचा
भीष्मावर घातियला साचा ॥२४॥
आज न ये परि उपयोगा तें
जर्जर हो अर्जुन शरधातें
रक्तें फुलला तो पळसासम
पडला मूर्च्छित होउनिया श्रम ॥२५॥
मागें पाही पदनतवत्सल
रथीं धनंजय विकीर्ण कुंतल
भिजला पुरता निजरूधिराहीं
हृदय हरीचें विदीर्ण होई ॥२६॥
सावध होत न बघतांअर्जुन आला क्रोध हरीतें
निज प्रतिज्ञा विसरून घेई चक्रसुदर्शन हातें ॥२७॥
“ प्राण तुझा मी घेतों भीष्मा
सहाय्य होसी कसा अधर्मा
वधिलासी मम भक्त सखा हा
खल कपट्यांच्या गुंतुन मोहा ॥२८॥
वाचिव पाहूं हे शठ कौरव ”
धावे गर्जुन असे रमाधव
लाल जाहले क्रोधें लोचन
फिरे गरगरा करी सुदर्शन ॥२९॥
पाहुन ऐसा रथांगपाणी
भीष्माच्या ये नयना पाणी
हात जोडिले त्यजुन चप निज
म्हणे “ मार ये मला अधोक्षज ॥३०॥
भक्त तुला प्रिय तुझ्याहुनी ही
हे दावियलें मी या ठायीं
कारण झालों तव कीर्तीसी
काय हवें याहुन महीसीं ॥३१॥
तुझ्या करानें मरण येत हें भाग्य थोर बहु माझें
ये प्रभु चालिव तुझें सुदर्शन कारण मोक्ष सुखा जें ॥३२॥
हर्षित भीष्में वाकविलें शिर
सावध झाला तोच वीरवर
बघुन सुदर्शन करीं हरीचे
उंचबळे मन भक्तवराचें ॥३३॥
दासासाठीं काय दयाळा
बाध आणिसी निजवचनाला
भूषण तुज परि दूषण आम्हां
हो मागं हो मेघश्यामा ॥३४॥
मिठी घालुन पदकमलासी
करी याचना भक्त हरीसी
पुनः सारथी हो यदुराया
तुझ्या कृपें मी अजय रणीं या ॥३५॥
शतगुण झाली उरीं धडाडी
प्रखर तीक्ष्ण शर अविरत सोडी
सतेज वज्रें जसा पुरंदर
ध्वज भीष्माचां पडे महीवर ॥३६॥
पांडव सेना विजयी झाली सरले कौरव मागें
कसा पराभव होइल सांगा करिं धरतां श्रीरंगें ॥३७॥
चढे विक्रमा प्रतिदिन अर्जुन
युद्ध वृकोदर करी विलक्षण
स्रुवे म्हणा त्याचिया भुजांना
निवडुन देई हवी कुरूंना ॥३८॥
सुयोधनाचे अनेक भाऊ
तयें घातिले काळां खाऊं
पद घातां खालींच तयाच्या
होत चिंधड्या किती भटांच्या ॥३९॥
नवव्या दिवशीं अराक्रमाची
शर्थ जाहली पंडुसुतांची
येत अवकळा कुरुसेनेला
वदे सुयोधन मग भीष्माला ॥४०॥
“ तुम्ही, अजोबा ! ज्या सेनेचे
नायक व्हावें दैन्य तियेचें
जयें जिंकिलें भार्गवरामा
भाता तो कां होत रिकामा ॥४१॥
अर्ध्यावरती सैन्य निमें मम
अजुन धरुं मी किती वदा दम
वाढतसे यश मम शत्रूंचे
बल सरले कां भगद्भुजांचें ॥४२॥
वाटतसे मज मनापासुनी युद्ध न करितां तुम्ही
पंडुसुतांचें प्रेम आपणा नावडता आहे मी ॥४३॥
व्यर्थ ठेविला भाव तुम्हावर
मित्र खरा मम कर्ण धनुर्धर
तुमचे ठायीं तो जर होता
कधींच मत्प्रिय साधुन देता ॥४४॥
विषण्ण झालें भीष्म मनांतें
दुर्जनसेवा विफला होते
वेदती धरिता गंधर्वानें
काय लाविले दिवे वृषाने ॥४५॥
गोग्रहणाच्या समयीं राजा
कामा ये का जिवलग तूझा
कितिदां कथिलें तुजसी मी कीं
अजिंक्य अर्जुन असे त्रिकोकीं ॥४६॥
परमात्मा सारथी तयाचा
कोण पुढें मग टिकेल साचा
तयें दीधलें अनला खांडव
स्वयें विरोधी असुनी वासव ॥४७॥
चुकार झालों मी न परंतू
तरी वाहसी मूढा किंतू
दुराग्रही मतिमंदा पुढतीं
ज्ञानें सर्वहि परि लटपटती ॥४८॥
दैवकुणाला टळे, प्रतिज्ञा ऐक नृपा मम आतां
अपांडवी भू करिन उद्यां वा भोगिन मी तनुपाता ॥४९॥
वृत्त सर्व हें गुप्तचरांनी
युधिष्ठिरा कथियलें त्वरेनीं
अनाथ झालों गमे तयासी
शोकाकुल मग वदे हरीसी ॥५०॥
“ तूंच एक हरि आशा माझी
पार आटलें जीवन आजी
उद्यां बरी गत नच विजयाची
सर्वनाश मम हृदया जाची ” ॥५१॥
परी शांतवन करी रमावर
“ धीर न सोडी असा युधिष्ठिर
रक्षण करण्या पंडुसुतांचें
सडे करिन मी निजरक्ताचे ॥५२॥
सुलभ इंद्र यम जिंकायासे
अजिंक्य परि गांगेय रणासी
तरी प्रतिज्ञा पितामहाची
अन्यार्थे मी घडविन साची ॥५३॥
थोरवंद्य हा सुत गंगेचा साथी परि दुष्टासी
शठ दुर्योधन दुर्जन यानें घातियला पाठीसी ॥५४॥
पाप वाढवी पुण्यात्मा हे
अतां उपेक्षा उचिता नोहे
पापा कारण, पुण्य नसे तें
पुण्यास्तव ना पातक होतें ॥५५॥
तप पावन वस्तुतः सुमंगल
जईं वाढवी दैत्यांचें बल
भयद तेंच मग विनाश्य होतें
भीष्म असे हा तसाच येथें ” ॥५६॥
येत रमावर भीष्म - निवासी
रक्षकास पटवून खुणेसी
सवें घेउनी पांचाली ते
म्हणे “ करी वंदन वडिलातें ” ॥५७॥
नयन धरोनी अर्धोन्मीलित
मृगाजिनावरतीं ध्यान स्थित
वृद्ध असे तो प्रसन्नचित्तें
अवलोकी हृदयस्थ हरीतें ॥५८॥
चंद्रासम त्या महात्मतेजें
शिबिरहि मंगल धवल विराजे
सती दौपदी जवळी येउन
करी तयासी सकंप वंदन ॥५९॥
कंकण - रव ऐकुन भीष्में दिधला सहज शुभाशी
स्थिर राहो सौभाग्य मुली तव भोग सदासुखराशी ॥६०॥
वदे सती पावेन कधीं मी
वर हा या, वा पुढच्या जन्मीं ”
भीष्म पाहती उघडुन डोळे
म्हणती “ या जन्मांतच वाळे ” ॥६१॥
त्वरित मिळे फळ संतवचांचें
स्वार्थ शिवे ना मना जयांचे
“ एकटी न आली मुली तूं
कुठें सखा तव खगपतिकेतू ॥६२॥
कृपा जयाची सदा तुम्हांवर
जशी पिलावर घाली पांखर
मती जयाची होउन नौका
तुम्हास तारी टाळून धोका ॥६३॥
उभा असे तो ऐकुन दारीं
विनवी मग “ ये आंत मुरारी
करीत होतों ज्याचें चिंतन
धन्य मला तें झाले दर्शन ” ॥६४॥
चरणीं भावें ठेवुन मस्तक वदती “ हे श्रीमूर्ति
विराटरूपें मागेचीं तूं हरिली जीवनशक्ति ॥६५॥
लीला नट तूं करिशी कौतुक
मीही मोक्षा असे समुत्सुक
पुढें करी रे रणीं शिखंडी
विजया हातीं मम तनु खंडी ॥६६॥
त्यक्तशस्त्र शरणागत नारी
भीतावर मी कर न उगारी
परी अर्जुनाविण दुसर्याचे
शर देहीं नच शिरावयाचे ॥६७॥
कृपा जयावर करी पिनाकी
ईश्वर तुजसम यद्रथ हाकी
निवातकवचा वधिलें ज्यानें
मज मारावें त्या कृष्णाने ॥६८॥
देई भीष्मा दृढ आलिंगन
प्रेम भरें वदले यदुनंदन
पावनकीर्ती तव अजरामर
उद्धरील नित जनांस भूवर ॥६९॥
दुसरे दिवशीं रण - भूमीवर युद्ध होत घनघोर
कृतांत काळासम भासे तो क्रुद्ध भीश्म रणधीर ॥७०॥
अपूर्व शरलागह्व तें त्यांचें
चक्राकृति धनु सदैव नाचे
बाण कधी घे केव्हां जोडी
कदा कळेना रिपुवर सोडी ॥७१॥
प्रवाह वाहे सतत शरांचा
शक्य नसे प्रतिकार तयाचा
अर्जुन हो मग पुढें त्वरेंसी
प्रथम शरा टाकीत पदासी ॥७२॥
शिरीं बाण फेकीत पितामह
तोंच शिखंडी येतपुढें अह
आवरिला कर बघता त्यासी
वर्षे अर्जुन खरशरराशी ॥७३॥
विह्वल होउन त्या आघातें
कोसळला कीं भीष्म महीतें
थांबवून परि जयघोषासी
दुःखित पांडव नमिती त्यासी ॥७४॥
तीक्ष्ण शरांच्या पर्यंकासी स्थितधी शांत असे तो
करीत अर्जुन उसें शरांचें मुनिगण भीष्मा स्तवितो ॥७५॥
द्रोण जाहले मग सेनानी
घोर मांडिलें युद्ध तयांनी
तिसरे दिवशीं चक्रव्यूहा
माम्डुन म्हणती भेद्य नसे हा ॥७६॥
अभिमन्यू परि हरिचा भाचा
करी लीलया भेद तयाचा
जसा सतांचा बोल अनुभवी
अल्पहि संशयगणास उडवी ॥७७॥
सान वयीं तो वीर धनुर्धर
कोमल तनु मदनासम सुंदर
असह्य झाला तरी कुरुंते
अवलंबुन नच तेज वयातें ॥७८॥
अंती मिळुनी सहा जणांनीं
वधिला अर्जुनसुत अधमांनी
देत जयद्रथ लाथ शवासीं
चीड तयानें ये विजयासी ॥७९॥
अधमाधम खल रावण साचा
अपमान न तरि होत शवाचा
पवित्र माझा बाळ सुकोमल
पाय लावितो तया कसा खल ॥८०॥
अपार होउन शोक म्हणे तो उद्यां प्रदोषापूर्वीं
वधिन जयद्रथ नातरि भक्षिन अग्निकाष्ठ दुर्दैवी ॥८१॥
जयद्रथासी रक्षायातें
द्रोण कर्ण कृप कौरव होतें
परी हरीनें अपूर्व युक्तीं
विफला केली रिपुजनशक्ति ॥८२॥
मरे दुःशलाधव, कुरूराजा
म्हणे “ अंत कां बघतां माझा
द्रोणा तुम्हा इष्ट मनानी
मला वधावें पंडुसुतांनी ” ॥८३॥
“ दुर्दैवें तव फिरली बुद्धि
पाप कधें कां जाइल सिद्धी
द्रोण म्हणे मी आज तुझ्यास्तव
लढेन रात्रीं राहिन ना लव ॥८४॥
अंधारीं बहु घोर निशा ती
द्रोण पणा लावी निजशक्ति
कृष्ण वदे मग घटोत्कचासी
विशेष बल दैत्यास निशेंसी ॥८५॥
दाखिव पाहूं तुझा पराक्रम मायावी अनिवार
जर्जर व्हावे कौरव सारे तुज वरतीं मम भार ॥८६॥
माता चित्तीं स्मरुन हिंडिंबा
भीमात्मज निर्मीत अचंबा
गुप्तपणानें कुरु सैन्यासी
ओती वरुनी पर्वत राशी ॥८७॥
उलथुन पाडी गजघोड्यांना
भिरकावी रथ लाथ रथींना
काड्यांसम मोडीत धनुष्यें
काय करावें इथें मनुष्यें ॥८८॥
व्याकुळ झाली कैरवसेना
उपाय कांहीं कुणा सुचेना
कर्णासी मग म्हणे सुयोधन
तूंच वाचवी आतां यांतुन ॥८९॥
अमोघ शक्ती वासवदत्ता
बाळगिशी तूं अर्जुनघाता
तीच टाक या घटोत्कचावर
भाग न हा मेल्याविण सत्वर ॥९०॥
अधिरथनंदन मग निरूपायें जपुन ठेविली शक्ति
मंत्रुन टाकी निशाचरावर धूप पडे त्या घातीं ॥९१॥
म्हणे मुरारी हर्षित चित्तें
आतां भय ना भक्तवरातें
कर्ण खरा हा आजच मेला
धीर जयाचा फार खलला ॥९२॥
उभ्या उभ्याची रणांत घेती
वीर निशीं त्या लव विश्रांती
चंद्रकला उगवता प्रभातीं
रणार्नवा ये पुनरपि भरती ॥९३॥
अंधसुतानें कोपविलेले
द्रोण तदा दावानल झाले
जों जों पुढती येइल कोणी
जीर्ण तरूसा जात जळोनी ॥९४॥
चाड न उरली नयनीतीची
आचार्या त्या समयीं साची
अस्त्रें नव्हती ज्ञात जयांना
टाकुन अस्त्रें वधिती त्यांना ॥९५॥
दीन असे घायाळ भीत हा हें न पाहिलें त्यांनीं
सर्व सारखे मरणा जैसे, लढती क्रूरपणानीं ॥९६॥
म्हणे हरी “ दुर्धर म्हातारा
शोक हाच या वरी उतारा
मेला माझा पुत्र, असे जर
कळेल या हतबल होई तर ” ॥९७॥
गज नावानें अश्वत्थामा
त्यास वधाया कथिलें भीमा
आणि करविली थोर हकाटी
धर्मा सांगे मग जगजेठी ॥९८॥
खराच मेला स्तु का माझा
द्रोण असंशय पुसेल राजा
मेला म्हणुनी सांग तयातें
धर्म म्हणे हें शक्य न मातें ॥९९॥
आजवरी मम अनृतां वाणी
शिवली नाही रथांगपाणी
जीभ कशी मग अतां विटाळूं
तीहि गुरू वधण्यास दयाळू ॥१००॥
“ सूक्ष्म रूप सत्याचे धर्मा कसें कळेंना तूंतें
सूज्ञ शोधिती सदैव अंतर मूर्ख भुले कवचातें ॥१०१॥
जेणें साधे जीवांचें हित
म्हणती ज्ञाते सत्य तयाप्रत
या मायामय विश्वाठायीं
वस्तुस्थितिचें महत्व कायी ॥१०२॥
गो वि प्रां सीं र क्षा या तें
वदतां कांहीं अनृत न होतें
सर्वनाश हा ओढवल्यावर
असत्यतेचा दोष न तिळभर ॥१०३॥
खोटें वदतां स्वार्थ घडाया
दूषण त्यासी लागत राया
खल नाशास्तव युद्ध असे हें
अन्यायी हा दोर्णहि अहे ॥१०४॥
सत्य बोलणें हा मम बाणा
या गर्वें नाशिसी प्रजांना
कीर्ती व्हावी स्वार्थ न कां हा ?
युधिष्ठिरा त्यज या दुर्मोहा ॥१०५॥
“ बरें ” म्हणोनी कथी गुरूसी “ अश्वत्थामा मेला
“ कुंजर वा नर हें न कळे परि ” राजा हळुच म्हणाला ॥१०६॥
आत्मवंचना येथ परंतु
तीच जाहली दोषा हेतू
अधर फिरे जो रथ राजाचा
तोच टेकला महीस साचा ॥१०७॥
पुत्रशोक जाहला गुरूसी
गात्रें पडली ढिली विशेषीं
द्रुपदसुतानें खङ्गें सत्वर
वृद्धाचें त्या उडवियलें शिर ॥१०८॥
धृष्टद्युम्ना बहु धिःकारुन
दुःख गुरूचे करीत अर्जुन
शांतविले श्री हरिनें त्यासी
हाहा उडली कुरू सैन्यासी ॥१०९॥
कर्णा करुनी सेनानायक
एक खरा तूं मम हितचिंतक
म्हणे अंधसुत त्या दोघांनीं
अहितचि मम चिंतिलें मनानी ॥११०॥
“ राजा चिंता सोड ” म्हणे वृष “ पहा वीरता माझी
कृष्णार्जुन जरि सहस्र आले वधिन तयां शरराजीं ॥१११॥
सुयोधनें मग करूनी विनंती
कर्णा दिधला शल्य सारथी
भिडला येउन वेगें विजया
म्हणे क्षणीं मी मिळवीन जया ॥११२॥
तुल्यबली ते वीर परस्पर
लढतां जमले व्योमीं सुरवर
टणत्कार ऐकुन धनूंचे
स्तंभित झाले दिग्गज साचे ॥११३॥
कर्ण भयंकर सर्पमुखीं शर
सोडी लक्षुन विजयाचें उरे
पार्थसारथी कुशल न सीमा
बसवुन अश्वा चुकवी नेमा ॥११४॥
कर्ण चिडे या पराभवानें
तों रथचक्रा गिळिलें भूनें
अस्त्रांचा ना आठव होई
शल्य तयांतुन टोचित राही ॥११५॥
चाक उचलण्या वंची स्वबला थांब म्हणे कृष्णासी
निःशस्त्रावर बाण न टाकी रक्षी निज धर्मासी ॥११६॥
कृष्ण म्हणे मग त्या उपहासुन
“ धर्म आज तुज सुचला कोठुन
सुप्त पांडवां जतु - सदनासीं
जाळाया जो सहाय्य होसी ॥११७॥
धर्म न सुचला कपटद्यूतीं
सभेंत नेली बळे सती ती
विटंबिता तिज खल दुःशासन
नीचा दिधलें तूं प्रोत्साहन ॥११८॥
अभिमन्यूचा मम बाळाचा
घात मिळुन तूं केला साचा
अशस्त्र होता तो वधतांना
धर्म तदा कां वच सुचला ना ? ॥११९॥
धर्म आठवे नीचा व्यसनीं
ठोकरिलें ज्या पूर्वीं चरणीं
धर्म राखितों सदैव आम्ही
तूंही बडबड कर न रिकामी ॥१२०॥
सोड अर्जुना बाण तीव्रतम अवसर हा साधावा
दुष्टांचा वध करण्यासाठीं संशय कधि न धरावा ” ॥१२१॥
गांडीवाचा गुण आकर्णा
ओढुन सोडी शर वर कर्णा
मस्तक तुटुनी पडलें भूवर
दुःखें लपवी वदन दिवाकर ॥१२२॥
पांडव सेना जयजयकारें
गर्जे अंबर घुमलें सारें
अनाथ झाले अगदीं कौरव
दुर्योधन परि निराश ना लव ॥१२३॥
शल्या नेमी तो सेनेवर
अमर असें कीं अशा दुर्धर
द्रोण भीष्म वृष हे हतविक्रम
शल्य तिथें करणार पराक्रम ॥१२४॥
धर्मा हातें शल्य निमाला
खल दुःशासन भीमें वधिला
हात माखिले तद्रक्तानीं
द्रुपदसुतेची घाली वेणी ॥१२५॥
सरोवरीं लपला दुर्योधन बाहुन त्या बाहेरी
म्हणे वृकोदर लाव प्रणासी दुष्टा शक्ती सारी ॥१२६॥
पाहूं जिंकित कोण अतां पण
भव्य गदा मम फांसा भीषण
द्यूत युद्ध हें चल या ठायीं
दुर्योधन उचलीत गदाही ॥१२७॥
हलधर तो ये तेथें अवचित
बघे शिष्य निज युद्धा उद्यत
म्हणे पुढें मम युद्ध करावे
नियमकुणीही नच मोडावे ॥१२८॥
सतताभ्यासें चपल सुयोधन
लोखंडाचा पुतळा कल्पुन
भीम त्या सवें बारा वर्षे
गदायुद्ध तो करी अमर्षें ॥१२९॥
पुष्ट भीम तो बलिष्ठ देहीं
घावाची त्या क्षिती न कांहीं
सरती फिरती घेती मंडल
घाव हाणिती लावुनियां बळ ॥१३०॥
परस्परा मारिती तडाका
जसे मतंगज घेती धडका
पर्वत जणु पंख न तुटलेल
स्थल कलहासी प्रवृत्त झाले ॥१३१॥
अग्निज्वाला उठे गदांतुन
वीज जशी का घन मेघांतुन
गर्जे भीषण कोसळती गिरि
अचला भूमी गडबडली तरि ॥१३२॥
पाहुनियां श्रीकृष्णें कोणी आटोपत ना कवणा
अंक आपुलो थोपटुनी लव भीमा दिधलें स्मरणा ॥१३३॥
जाणुन तें मग भीमें, भारी -
घाव घातिला दुष्ट शरीरीं
उसळी मारी तों मांड्यावर
बसला झाला चुरा खरोखर ॥१३४॥
भूवर दुर्योधन कोसळला
राग येत परि बलरामाला
मांड्या फोडिन अशी प्रतिज्ञा
सांगुन माधव निववी सुज्ञा ॥१३५॥
द्रोण - सुताच्या अधम कृतींतुन
वांचवीत निजभक्त दयाघन
पांडव झाले विजयी समरीं
सहर्ष आले परतुन शिबिरीं ॥१३६॥
वदे अर्जुना श्री मधुसूदन
“ उतर खालतीं प्रथम रथांतुन
वानरराया जा स्वस्थानीं ”
पार्थ वचें या विस्मय मानी ॥१३७॥
भुभुः कार करूनी कपि गेला त्यजिला रथ भगवंतें
असंभाव्य भडकल्या तोंच की ज्वाला स्पंदन भंवते ॥१३८॥
क्षणांत झाले भस्म तयाचें
भयें च्कित मन सकल जनांचें
धर्म्रा अतिनम्रपणेंसी
पुसे “ काय हें वद हृषिकेशी ॥१३९॥
गुरू द्रोण नी भीष्म पितामह
यांचें अस्त्रे प्रदीप्त दुःसह
प्रतिकार न कीं उचित तयांचा
झाला असता नाश जगाचा ॥१४०॥
अप्रतिकारें अर्जुन - जीवित
तृणसम जळुनी जातें निश्चित
परि हनुमंतें तसेंच मीही
आवरिलीं ती आत्मबलाहीं ॥१४१॥
युद्ध संपता जाई कपिवर
म्हणुन अर्जुना प्रथम महीवर
उतराया मी कथिलें आजी
पार जाहली कार्ये माझी ॥१४२॥
ऐकताच ही गिरा विनतजनपूरित - काम हरीची
उर भरूनी ये, घेई अर्जुन, शिरीं धूळ चरणांची ॥१४३॥
चुंबन घेई पदकमलांचें
तुझ्या प्रभावे फल विजयाचें
गर्व मला लव पराक्रमाचा
तो अनलीं या जळला साचा ॥१४४॥
कृपा करीं रे मेघश्यामल
चित्त ना व्हावें विकारचंचल
जें जें कांहीं घडलें हातुन
सर्व असो तें तुला समर्पण ॥१४५॥
करूनी वारासार रणीची
वाट धरियली गज नगराची
धृतराष्ट्राच्या भेटी साठीं
पंडुसुतांनीं सह जगजेठीं ॥१४६॥
पंडुकुमारां आलिंगाया
अंध आपुल्या पसरी बाह्या
वरिवरि बघतां वाटे प्रेमी
श्रीहरि परि सर्वातर्यंमी ॥१४७॥
भीमा वरती राग तयाचा जाणुन हें कृष्णानें
पुतळ केला पुढें लोहमय चुरिलें त्या चुलत्यानें ॥१४८॥
वदे मुरारे धृतराष्ट्रासी
झी कृती ही, फळली तुजसी
न्यायी पांडव, राग न ठेवी
आपुलीच तीं मुले गणावीं ॥१४९॥
धृतराष्ट्राची वदली भार्या
“ तूं प्रेरक मम कूलक्षया या
वंश तुझा हरि तुझे समोरी
निमे असाची ” हसे मुरारी ॥१५०॥
“ शाप सुखे दे मज गांधारी
दुःख मला नच मी अविकारी
तुझ्या मुलांचें अघोर पातक
अंती झाले तयांस घातक ॥१५१॥
सज्जन आहे धर्म युधिष्ठिर
तो न तुम्हासी येइल अंतर
तुम्हीच त्यागी वडिलां ठायीं
शुभ चिंतावें त्याचें हृदयीं ॥१५२॥
सूज्ञपणें मग धृतराष्ट्रानें
धर्म उरीं धरिला प्रेमानें
निज भक्ताचें प्रिय संपादन
ईशाते या अवघड कोठुन ॥१५३॥
रक्षी वेद, धरीत मंदर गिरी, काढीवरी मेदिनीं
दैत्या फाडित, व्यापिलें त्रिभुवना ज्यानें त्रिपादीं क्षणीं
राजांचा मद नाशिला, दशमुखा संहारिलें, मागुती
झाला अर्जुन सारथी महितला तोची प्रभु श्रीपती ॥१५४॥
समरप्रसंग नांवाचा सतरावा सर्ग समाप्त
लेखनकाल :-
आश्विन शके १८७१
श्रीकृष्ण कथामृत - अठरावा सर्ग
( महन्मंगल )
हे गंगाधर देवदेव चरणौ वन्दे त्वदीयौ शुभौ
दीनं ममुररी करोषि भगवन्, प्रायोऽपि हीन गुणैः
संतुष्टोस्मि तथाधुनाऽखिलगुरो शंभो प्रसादात् तव
सर्वे सन्तु निरामयाःक्षितितले भद्राणि पश्यंतु च ॥१॥
जयीं मजवरी कृपा सतत ओतिली आपुली
धरून मजसी करीं सकल संकटें वारिली
मला जवळ घेउनी हरिकथा - दुशा पाजिली
दयाळु गुरु संत हे नमन त्यांचिया पाउलीं ॥२॥
मंगलकर - जल तीर्थपतीचें
तसें घेउनी पुण्य - नद्यांचे
अभिषेकी कीं स्वये रमावर
धर्मासी सम्राट पदावर ॥३॥
उपनिषदांची वि चा र धा रा
ओतुन जेवीं जीव शरीरा
सद्गुरु त्यासी ब्रह्मपदावर
नेत तसा हा प्रसंग सुंदर ॥४॥
ब्राह्मण म्हणती वेद ऋचांसी
तत्पर होते व्यास महर्षी
बंधू ढाळिति छत्रें चामर
मंगल वाद्यें घुमती सुस्वर ॥५॥
सरलें शासन खल नहुषाचें
राज्य पुनः हो पुरंदराचें
हर्षित झाले तदा जसे सुर
तसे आतां लोक मद्दीवर ॥६॥
प्रसन्न चित्तें करी प्रजाजन जयजयकार नृपाचा
द्रौपदीस हरि म्हणे ऋणांतुन मुक्त तुझ्या मी साचा ॥७॥
म्हणे सती ती करुनी वंदन
प्रेमपाश परि करिती बंधन
भक्त जोंवरी असती देवा
तोंवर जाशिल सांग कुठें वा ॥८॥
पावुन निष्कंटक राज्याहीं
युधिष्ठिरा सुख लवही नाही
येत असे वैताग तयातें
सोडित ना खिन्नता मनातें ॥९॥
कुलक्षया मी झालों कारण
पापगिरी हा नच सिंहासन
गुरुजन वधिले वधिले बांधव
वधिले क्षत्रिय कुल मी शिव शिव ॥१०॥
अधमाधम मी दुर्जन पापी
योग्य राजपद मज न कदापि
वनांत जातो त्यजुनी सारी
लोकहिता मी नच अधिकारी ॥११॥
शोक तुला नच शोभत धर्मा वेड शिरे कुठुनी हें
भीष्म पितामह शांतवील तुज चाल तिथें लवलाहें ॥१२॥
परिसुनियां हें हरिचें भाषण
धर्म उत्तरे सद्गद होउन
मुख हें दावूं कसे तयासी
अन्यायें मी छळिले ज्यासी ॥१३॥
कोपा येतिल बघतां मातें
घोर शाप देतील हरी तें
पडले ते पंजरीं शरांच्या
किती वेदना असतिल त्यांच्या ॥१४॥
त्रासिक होतो पीडेनें नर
त्यांतहि पीडा किति ही दुर्धर
लज्जा वाटे वाटे भयही
व्याकुळता बहु येते हृदयीं ” ॥१५॥
“ धर्मा संशय तुझा निकामी
म्हणे हरी त्या ओळखितो मी
थोर हृदय त्या सत्पुरूषांचें
मुनिही गाती पवाड त्यांचें ॥१६॥
क्षमादयेचा सागर रे तो पुतळा सद्धर्माचा
ब्रह्म तया प्रत्यक्ष न लागे श्रुतिसी पार जयाचा ॥१७॥
देइल शांती तुझ्या मना तो
अधोगतीसी संशय नेतो
चुकलों चुकलों वाटत जें तें
चाळविते कीं तव हृदयातें ॥१८॥
सुखें जाय तूं भीष्मापाशी
वंद्य महात्मा तो गुणराशी
उपदेशानें त्य अधीराचे
कृतार्थ होइल जीवन साचें ॥१९॥
पांचालीसह घेउन पांडव
कुरु भूमीवर येत रमाधव
महापुरूष तो जेथ्य निजेला
ज्या भंवती मुनिगण जमलेला ॥२०॥
समाप्तमख पावन वैश्वानर
मावळता वा जणों दिवाकर
अर्घ्य द्यावया त्या प्रेमाचें
जमले जणु समुदाय मुनींचे ॥२१॥
रथांतुनी उतरून अनवाणी पांडव जवळी आले
उच्चारूनि निजनाम आदरें भीष्मा वंदन केलें ॥२२॥
हर्ष जाहला पितामहासी
जवळी यारे म्हणे तयांसी
अंगावरूनी फिरवी हाता
गद्गद अर्जुन ताता ताता ॥२३॥
वंदन केलें श्रीकृष्णेंही
वदे “ शांत ना तव मन राही ?
तुज सम नाहीं थोर महात्मा
नव्हता होइल पुढें कसा मा ॥२४॥
धर्मराज हा प्रिय तव नातू
दर्शनास ये धरूनी हेतू
पाप लागले ज्ञातिवधाचें
तया सारखें वाटत साचें ॥२५॥
शोक मोह हा हरी तयाचा
अधिकारी तव विमला वाचा
व्यवहाराचें नृपनीतीचे
धर्म कथी या मोक्षपदाचे ॥२६॥
भगवंता पाहून समोरी झालें सुख बहु भीष्मा
धन्य धन्य मज भेटलास तूं हे सच्चित्सुख धामा ॥२७॥
श्रीकृष्णा तव अतुल कृपेनें
स्वस्थ असे मी येथ सुखानें
दृढ आहे मम मन मति वाणी
शक्ति तुझी ही रथांगपाणी ॥२८॥
कारण कार्याहुन तूं परता
अद्वितीय तव अगाध सत्ता
आदि मध्य तुज अंतहि नाहीं
ब्रह्म परात्पर तूं या ठायीं ॥२९॥
अदिती पोटीं द्वादश मूर्तिं
सूर्य तूंच कीं सुवर्ण - कांती
सुधाधवल मृदुशीतल इंदू
तूंच देव - पितरां सुख सिंधू ॥३०॥
बृहदुक्थीं वा अग्निष्टोमीं
स्तविती ब्राह्मण ज्या निष्कामी
वेस्ररूप तो तूं परमेश्वर
योग शयन करिशी शेषावर ॥३१॥
प्राणजयी योगी जी ज्योती दहरीं बघती ती तूं
सहस्रदल जे कलम असें कीं ते तव निवास हेतू ॥३२॥
सकल चिकित्सा आरोग्यासी
अर्थ एकची बहुविध भाषीं
जशा प्रवृत्ती सर्व सुखास्तव
धर्म विविध तूं ध्येय रमाधव ॥३३॥
शिव तूं ब्रह्मा प्रजापती तूं
इंद्रवरूण यम दिक्पालहि तूं
विश्वात्मा तूं सर्वव्यापक
जीवा सद्गुरू तूं उपदेशक ॥३४॥
वंदन तुजसी त्रिगुणातीता
नमन असो तुज कमलाकांता
भवभयखंडन यदुकुलमंडन
वरचेवर तुज सादर वंदन ॥३५॥
धर्माचा तूं सखा दयाळा
आणियलें कां इथें तयाला
तुजपेक्षां का ज्ञान असे मज
वेद तुझे निश्वास अधोक्षज ” ॥३६॥
“ तुझी योग्यता शांतनवा बहु थोर तूंच उपदेशी
वडिल वयानें धर्म कसें मग बोधावें मी त्यासी ॥३७॥
तव वदनी जीं येतिल वचनें
वंद्य जना तीं स्मृतिप्रमाणें
होतिल हा मम वर या बोला ”
विनवी तेंची मुनिजन त्याला ॥३८॥
“ भीष्मा पावन अपुली वाणी
शांतिसुखाची जणु का खाणी
अम्हा ऐकवा हीच विनंती
विफल याचना होत न संतीं ॥३९॥
बरें म्हणोनी पितामहानें
धर्मा दिधली शांतपणानें
योग्य उत्तरें तत्प्रश्नांची
ज्यांत रहस्ये नृपनीतीची ॥४०॥
वदे नीति ही नित पाळावी
चूक अल्पही त्यांत न व्हावी
मनुष्य म्हणुनी चुकावयासी
अवसर नाही लव नेत्यासी ॥४१॥
मनुज करांतुन सहजी चुकतें
सत्य असे तें व्यक्ती पुरतें
झाल्या, लव मर्यादित हानी
परी नृपाचे तसें न जाणी ॥४२॥
प्रजाहिताचा भार जयावर
राजकारणीं तो चुकला जर
भयद संकटें जनतेवरतीं
धर्मा मग अविरत कोसळतीं ॥४३॥
विनाश होतो स्वगुणें कोठें
कुठें दैव पडतें उफराटें
नाश कुठें फल अज्ञानाचें
कुणा बाधती स्वार्थ खलांचे ॥४४॥
विनाशपथ हे यत्नें टाळी सावध नित्य असावें
होणारें चुकते न कधीं हें व्यवहारीं न वदावें ॥४५॥
वीर पुरूष जो उद्योगीं रत
दुर्लभ त्या नच जगतीं किंचित
केवळ दैवावर भरंवसता
उन्मुखही फळ येत न हातां ॥४६॥
अहंकर निज उदात्ततेचा
घातक होतो पहा प्रजेचा
लोकहितास्तव खालीं येउन
करितां कांहीं त्यांत न दूषण ॥४७॥
शिवशीर्षाहुन हिमनग शिखरीं
पुढतीं भूंवर तिथुन सागरीं
खालखालतीं उत्तरे गंगा
करावया नतजनमलभंगा ॥४८॥
अधःपतन हें त्या सरितेचें
अविवेकी जन वदतिल वाचें
उदात्त हेतूस्तव ये खालीं
खरी थोरवी यांत मिळाली ” ॥४९॥
कथिलें वर्णाश्रम धर्मासी
सुख साधन जें ब्रह्मपदासी
ध्येयहि कथिलें कर्तव्यासह
धन्य धन्य तो भीष्म पितामह ॥५०॥
शोक नाशिला पार तयाचा अंती म्हणती त्यासी
युधिष्ठिरा करि अश्वमेध तूं भूषण जो राजासी ॥५१॥
मानुन आज्ञा करूनी वंदन
पांडव आले गेहीं परतुन
म्हणे अर्जुंना श्रीहृषिकेशी
सोड मोकळा अश्व महीसी ॥५२॥
इतर तिघे जा हिमालयासी
अपार आणा सुवर्णराशी
पुण्य तिथें संवर्त मुनीचे
सांचे धरूनी रूप धनाचें ॥५३॥
पांडव तत्पर हरि वचनांते
गेला अर्जुन दिग्विजयातें
इकडे वेळा विचित्र आली
सती उत्तरा प्रसूत झाली ॥५४॥
बाळ जन्मला परि मेलेला
जळुनी जो कीं पडला काळा
नीच कर्म तें द्रोण सुताचें
अधम किती हे हृदय खलांचे ॥५५॥
हंबरडा फोडीत उत्तरा हाणी हात कपाळीं
सहन न झाले दुःख तिला तें अबला मूर्च्छित झाली ॥५६॥
रडे द्रौपदी रडते कुंती
शोकासी त्या सीमा नव्हती
काय जाहलें हे बघण्यासी
येत हरी सूतिकागृहासीं ॥५७॥
मृत - शिशु ठेवुन हरिचें चरणीं
म्हणते कुंती केविलवाणी
काय जाहलें पहा प्रभो हें
सोसावें रें दुःख किती हें ॥५८॥
बाळें मेलीं पांचालीची
तीच गती प्रिय अभिमन्युची
वंशां न हा एकच उरला
आशेसह तो पार जळाला ॥५९॥
व्हावा का न्रिवंश असा रे
परलोकाची मिटलीं दारें
गोविंदा माधवा दयाळा
तूंच अतां वाचीव अम्हाला ॥६०॥
सती उत्तरा सावध होउन थोर करी आकांता
कुणाकडे पाहुन देवा मी सांग जगावें आतां ॥६१॥
दशा अशी पाहून सुनेची
भरली नयनें श्रीकृष्णाची
दयाघनाचें कळवळलें मन
आसन घालून करी आचमन ॥६२॥
करी प्रतिज्ञा श्रीहृषिकेशी
ऐकवीत जणूं सर्व जगासी
कधि न असत्यें विटाळले मुख
जिवंत ओवो तरि हा बालक ॥६३॥
अधर्म वर्तन केलें नाहीं
अधर्म ना बोधिला कुणाही
स्वार्था झालों कुणा न घातक
जिवंत होवो तरि हा बालक ॥६४॥
दुष्टा वधिलें धर्मासाठी
युद्धांतुन ना फिरलो पाठीं
सत्य जरी गोब्राह्मण पालक
जिवंत होवो तरि हा बालक ॥६५॥
काया वाचा मने जरी मी पाप न केलें कांहीं
इंद्रियजय जरि सत्य असे तरि बाळा परतुन येईं ॥६६॥
सरस्वती ही परमेशाची
जीवन - मंगलता विश्वाची
सचेत झाले सतेज बालक
निरखुन पाही श्रीहरिचें मुख ॥६७॥
इवले इवले जरि ते डोळे
हर्ष सुखाचें निधान झाले
प्रथम सान तीं फुललीं कमलें
वदनचंद्र तें पाहुन हसले ॥६८॥
बाळ उरासी उचलुन घेई
उत्तरेस ना वदवे कांहीं
आनंदाश्रू हरिचरणासी
निवेदिती जें तिच्या मनासी ॥६९॥
कृतज्ञ करिती सर्वहि वंदन
आले विजयी जइं भीमार्जुन
कळतां सारें वृत्त तयांसी
शक्ति न मज ते वानायासी ॥७०॥
पुढें हरीच्या कृपाप्रसादें हयमख सिद्धी गेला
अपूर्व वैभव पाहुन झाल अविस्मय फार जनांला ॥७१॥
दान जोंजळी भरूनी रत्नें
हेम दक्षिणा नुचले यत्नें
आब्राह्मण चांडाल सर्वही
तृप्त जाहले मिष्टान्नाही ॥७२॥
कोषागारें करी रिकामीं
दान सर्वही दिधली भूमी
श्रीमंतीचें असेंच लक्षण
दान हेंच राजाचें भूषण ॥७३॥
चंचल सर्वहि वैभव सत्ता
कीर्ति एकची कीं स्थिरमत्ता
उदारता ही कारण येथें
धर्माचें यश विश्वहि गातें ॥७४॥
परममहोत्सव तो आनंदें
तडीस गेला हरिप्रसादे
उणें अल्पही पडले नाही
दिग्गज झाले शुभ्र यशेंही ॥७५॥
समाधान वाटलें प्रभूसी आलिंगन धर्मा दे
आज मला कृतकृत्य वाटलें म्हटलें श्री गोविंदे ॥७६॥
युधिष्ठिरानें नाना रीतीं
पूजियलीसे ती श्री मूर्ती
विनवी देवा जवळी राही
तव विरहें भय वाटत पाही ॥७७॥
तारे रविहुन बहु तेजस्वी
परी दूरता त्या लुकलुकवी
म्हणुन न व्हावें दूर दयाघन
नेम न विषया भुलेल कधिं मन ॥७८॥
प्रसन्न हांसुन म्हणे मुरारी
गेले आतां तें भय दूरीं
येतों, मोदें निरोप द्या मज
द्वारकेस मग येत अधोक्षज ॥७९॥
भगवंताच्या छत्रा खालीं
सर्वसुखें यादवां मिळाली
अलोत वैभव अपार सत्ता
भय कसलें ही नव्हतें चित्ता ॥८०॥
रमले सारे सुखांत भौतिक
रजस्तमां बळ हरलें सात्विक
नयनीतीची चाड न उरली
विषय वासना हृदयीं भरली ॥८१॥
ज्ञाते झाले स्वार्थ परायण
सशक्तास मद चढला दारूण
धनलोभानें गिळिलें वणिजा
उद्धट सेवक करिती गमजा ॥८२॥
अनाचार सर्वत्र माजला भय नुरले धर्माचें
स्नेह नम्रता आदर सरले स्वैरपणा बहु नाचे ॥८३॥
मद्यपान कलह व्यभिचारा
लोलुप जन वाव न सुविचारा
स्थल ना कोठें विश्वासासी
शतपळवाटा निर्बंधासी ॥८४॥
नित्य नवे निर्बंध करावे
वासुदेवें ते फोल ठरावे
पातक केवीं लपलें जाइल
हीच वाहती मग चिंता खल ॥८५॥
महत्व येतां कामार्थासी
निर्बंध न ये उपयोगासी
धर्मचि करितो समाज धारण
भ्रांत जनां हें पटे न कारण ॥८६॥
श्रद्धा होती जी वडिलांची
तरुणां वाटे मूर्खपणाची
वागवितां त्या अपमानानें
खंट न वाटे कुणा मनानें ॥८७॥
यथेच्छ निंदा पूज्य जनांची करतां भूषण वाटे
शिकलेल्यांची ऐकुन भाषा उठती देहीं कांटे ॥८८॥
स्त्रीपुरूषीं ना दृष्टी पावन
थट्टा वाटे विवाह बंधन
अशी पाहुनी स्थिति यदूंची
करी विचारा मूर्त हरीची ॥८९॥
भूमीचा मी भार हराया
अवतरलों यदुकुला मधें या
अधर्म परि वाढला इथेची
मी न उपेक्षा करीन यांची ॥९०॥
सडकें फल तें फेंकुन द्यावें
अवयव कुजतां त्या कापावे
हें कर्तव्यहि करणें आतां
अवश्य मातें जातां जातां ॥९१॥
ऐके दिवशी श्रीहरि दर्शन
घेण्या आले थोर ऋषी - जन
देवल नारद मैत्रावरूणी
वामदेव गाधिज बहुमानी ॥९२॥
पाहुन त्यांतें कुमार वदती प्रस्थ माजलें यांचें
गंमत आतां करूं जराशी बळ पाहूं ज्ञानाचें ॥९३॥
सांबा दिधला वेष वधूचा
सुंदर भारी देह जयाचा
घड्या बांधुनी मग वाथ्यावर
भासविलें त्या प्रती गरोदर ॥९४॥
जवळी येई मंद गतीनें
श्रमली जणु कीं गर्भ भराने
मुरकत वंदन करी मुनीसी
सखी विचारी तपोधनासी ॥९५॥
मम मित्राची प्रिय पत्नी ही
गर्भवती ही प्रथमचि राही
पुत्र सुता वा होईल हीतें
कळावया ही उत्सुक चित्तें ॥९६॥
परी लाजते पुसावयासी
कुलजा ही शालीन विशेषीं
तुम्ही ऋषी जाणितां त्रिकाला
सांगा ही प्रसवेल कुणाला ॥९७॥
या कपटानें संतापुन मुनि देई शाप अधोर
मुसळ हिला होईल करी तें तुमचा कुल संहार ॥९८॥
नाश जयाचा जवळी आला
दिसे सर्व विपरीत तयाला
नवल काय मग यदुयुवकासी
तुच्छ वाटले जरी महर्षी ॥९९॥
तपोधनांची अमोघ वाणी
तिला वृथापण येत कुठोनी
सांबा झालें मुसळ खरेंची
अघटित घटना हृदया जाची ॥१००॥
श्रीकृष्ण हें कळवायसी
धीर न झाला परी कुणासी
परभारें खल करूनी केला
मुसळाचा त्या चुरा निराळा ॥१०१॥
उरला तुकडा एक तयासह
चुरा सागरीं त्यजिला दुःसह
गमले झालों निर्भय आतां
पहा किती ही मति विपरीता ॥१०२॥
चुरा लागला तटास झाले बेट तयें वेताचं
लोहकील माश्यांत मिळे शर लुब्धक करी तयाचे ॥१०३॥
कळे सर्व परि रमावरासी
इष्टापत्ती गमत तयासी
म्हणे मनीं हें झालें उत्तम
नको निराळे मज करण्या श्रम ॥१०४॥
हरि वंदाया आले सुरवर
वरुण विधाता सूर्य पुरंदर
संगें भगवान् पिनाकपाणी
करिती विनती नम्र वचांनीं ॥१०५॥
हे परमेशा कमला कांता
निजधामासी यावें आता
होउन गेलीं वीस शतावर
वर्षे तुम्हा येवुन भूवर ॥१०६॥
कार्य संपलें अवताराचें
झालें निर्दालन दुष्टांचें
आतां सुखवा देव गणासी
हे जगदीशा निजसहवासीं ॥१०७॥
विचार माझा तसाच आहे येइन वैकुंठा मी
वदती भगवान् वसुदेवात्मज वेळहि आली नामी ॥१०८॥
यादव झाले सर्व अनावर
मांडितील उच्छाद महीवर
समोर माझ्या नाशुन त्यासीं
मग येतों मम परमपदासी ॥१०९॥
श्रीचरणावर ठेवुन माथा
पुनः पुनः नमुनी यदुनाथा
परते सुरगण निजलोकासी
इकडे उसळे प्रयळ पुरीसी ॥११०॥
निजशक्तीचें सगळें वैभव
हृदयीं रोधुन घेत रमाधव
द्वारवतीसी उत्पातांनीं
सहजीं मग पीडिले भयांनीं ॥१११॥
दिवसां शिरती घरांत घुबडें
भालूंचें जणु फुटलें नरडे
काक गिधाडें झडपा घेती
विझे लावतां दीप ज्योती ॥११२॥
उल्का पडती भूतल कांपे
आटुन गेली नद्यांत आपें
सोसाट्यानें वाहत वारा
रक्तासह वर्षतात गारा ॥११३॥
नग्न नाचता दिसती भूते
मेघांवाचुन नभ गडगडतें
घाण अमंगळ अन्ना येई
प्रजा भयानें विह्वल होई ॥११४॥
धांव घेतली हरिचरणासी म्हणती वांचिव आम्हा
क्षमा कराफ़्वें अमुचें पातक हे कृष्णा सुखधमा ॥११५॥
म्हणे श्रीहरी निघा प्रभासा
ब्रह्मशाप हा टळेल कैसा
मुलें बायका इथेंच ठेवा
शान्ति स्तव जप होम करावा ॥११६॥
त्रिलोक जननी सती रूक्मिणी
वसली नाही परी पट्टणीं
सोडुन तुम्हा मी समयीं या
कधी न राही श्री यदुराया ॥११७॥
बरें म्हणाले श्रीहरि सस्मित
जाणितेस तू माझें हृद्गत
शोभतेस सह - धर्म - चारिणी
तूं मम शक्ति प्रिये रूक्मिणी ॥११८॥
प्रभासासम मग आले यादव
शंकित परि निजहृदयीं उद्धव
म्हणे न लक्षण ठीक दिसे हें
घोर वाटतें भविष्य आहे ॥११९॥
साष्टांगें वंदून हरीसी बोलत सद्गदभावें
“ प्रभो काय तव मनांत आहे कृपया मज सांगावें ॥१२०॥
झाली माझी दशा विलक्षण
उमगेना परी कांहीं कारण
हृदय कसें हें व्याकुळ झालें
उगाच येती भरूनी डोळे ॥१२१॥
दूर दूर तूं त्यजिलें मातें
असें सारखें वाटत चित्तें
घाबरतें हें शोकाकुल मन
धीर मला दे प्रभो दयाघन ” ॥१२२॥
एकांती त्या म्हणे श्रीहरी भक्तवरा परिसावें
विवेक शाली वशी भक्त तूं विह्वल लव ना व्हावें ॥१२३॥
स्वाभाविक ही स्थिति तव सखया
भविष्य कळतें सज्जन हृदया
संहारून यादव वंशा मी
असें निघालो रे निजधामीं ॥१२४॥
वैकुंठासी मी गेल्यावर
द्वारवतीसी बुडवी सागर
घोर कली लागेल पुढारी
तदा बोध तूं जन सुविचारीं ॥१२५॥
श्रीकृष्णाच्या वियोगभेणें
रडे भक्त तो केविलवाणें
क्षणहि न गेला कधीं तुझ्याविण
निष्ठुर होशी आज दयाघन ॥१२६॥
ब्रह्मशाप का बाधक तूंतें
तूंच नियंता या विश्वातें
कांहीं होवो तुजसी सोडुन
मागें नच राहीन दयाघन ॥१२७॥
तूं गेल्यावर मढें असे मी बोधूं काय जनासी
अम्ही वागतों तव शक्तीनें तूं झालास उदासी ॥१२८॥
जवळी घेउन उद्धवजीसी
बोध करी परमेश तयासी
विश्वाचें तुज तत्व न ठावें
शोक होत हा तयें स्वभावें ॥१२९॥
विश्व जयीं हें नव्हतें कांहीं
तदा न सदसत् दोन्ही राही
प्रकाश नव्हता नव्हता तमही
नाम न रूप न शून्य न पाही ॥१३०॥
उदरीं घेउन महदाकाशा
अवात कांहीं करितें श्वासा
अनंत अव्यय गूढ अनादि
आश्रयवर्जित विभु निरूपाधी ॥१३१॥
त्याचे विषयीं कधीं कुणासी
लवना येई बोलायासी
व्यवहारासी म्हणती आत्मा
ब्रह्म, तोच रे मी परमात्मा ॥१३२॥
मलाच माझी इच्छा झाली वदती कुणि या माया
आया जी ना येत णासी कारण ती विश्वा या ॥१३३॥
त्रिगुणांतुन ही सृष्टी झाली
स्वप्नें पडलीं जागृत कालीं
महदादी हा भूत पसारा
मायेनें मम ये आकारा ॥१३४॥
व्यापुन मी या असंग आहे
मला जाणुनी प्रशांत राहे
निर्गुणांत मी सगुणी येतो
ज्ञानें भजतो निस्पृह जो तो ॥१३५॥
ब्रह्म असें हें विश्व असें हें
हें निर्गुण हें गुणवत् आहे
भक्ति निराळी ज्ञान निराळें
व्यवहारास्तव केवळ बोलें ॥१३६॥
देव भक्त हा गौरव केवळ
भक्ति अभक्ति भाषा निव्वळ
अवघा आहे मीच महेश्वर
या भावी दृढ करणें अंतर ॥१३७॥
देहभाव तो असतो जोंवर लोकीं ज्ञान न होतें
म्हणुनी करिती भक्ति माझी अभेदभावीं ज्ञाते ॥१३८॥
व्यवहारासी आत्मज्ञानें
पावनता ये थोरपणानें
तरी समुच्चय तदीय नाहीं
विरळा जाणे मार्मिकता ही ॥१३९॥
उभारितां घर सपाट भूमी
भाग मानणें गोल निकामी
हिरा कोळसा एक तरी ही
योग्यतेंत भिन्नतात राही ॥१४०॥
व्यष्टि समष्टी धर्माधर्मी
उलटापालट घातक हे मी
कल्याणास्तव कथितों तूतें
हें उपदेशी तूं जगतातें ॥१४१॥
संकट येउन कोसळल्यावर
जगतीं चिडतीं बावरती नर
गमे तयां मी चुकलों नाहीं
आली कां मग आपत्ती ही ॥१४२॥
परी उद्धवा जाण निश्चयें
निज दोषाविण संकट ना ये
कारण न कळे अल्पमतीसी
जरि दडुनी तें असें मुळाशी ॥१४३॥
व्यर्थ निंदिलें लक्ष्मणास, मोडियली मर्यादा जी
सीतेसमही पतिव्रता मग गंवसे विपदेमाजी ॥१४४॥
निज बुद्धीसी जे कां पटतें
तेंच धजावें करावयातें
सत्य जरी हें परि ती बुद्धि
विमल विपुल असली तर सिद्धी ॥१४५॥
तपःपूत निर्लोभ निरागस
निश्चल सात्विक ज्यांचे मानस
ते सज्जन जो निर्णय घेती
तोच होतसे हितकर अंतीं ॥१४६॥
मंद तामसी राजस पापी
तयीं भरवसूं नये कदापी
निज बुद्धीवर, जी का कामुक
ती नच लाभूं देत खरें सुख ॥१४७॥
म्हणुन उद्धवा सन्मार्गावर
उपदेशुन, तूं वळवावे नर
परी धरावा विवेक तेथें
सर्व सारखें नसती कीं ते ॥१४८॥
सत्य एकची निश्चित जाणें
भेद पडे भूमिकेप्रमाणें
हें जाणून नच वाद करावा
प्रेम - भाव सर्वत्र धरावा ॥१४९॥
वर्णाश्रम - पुरूषार्थ - चौकडीं समाजधारण होतं
न्यून तयासी पडतां कोठें दुःख भाग फल त्यातें ॥१५०॥
इह सुख दे त्या वदे प्रवृत्ती
मोक्षसुखासी हेतु निवृत्ती
दान पंख हे धर्म विहंगा
एक तुटे तरि अघ करि दंगा ॥१५१॥
माजविती खल दंभ रिकामे
हरिहरि जपती सोडुन कामें
तयां कधींहि न जवळिक माझी
स्वकर्म रत त्यावर मी राजी ॥१५२॥
ज्ञान म्हणे जो मजसी झालें
उरलें नाहीं कार्य निराळें
तो न पायरी प्रथमहि चढला
उलट गर्व हा घातक जडला ॥१५३॥
तीन एषणा मनुजाठायीं
लोक - दार - धन - विषयक पाही
कृत्य होतसें जें जें हातुन
तें नच यांची कक्षा सोडुन ॥१५४॥
थोर थोर ज्या म्हणती लोकीं
तेही यांचे दास विलोकी
कुणी प्रगट कुणि झाकुन वागे
सद्भक्तचि या सारित मागें ॥१५५॥
सर्वभूतहितरत तो ज्ञानी
भक्तहि त्याचा मी अभिमानी
मत्पर होती भाव तयाचे
यत्नें करि रक्षण जगताचें ॥१५६॥
असंग व्हावें आंतुन वरि जनरीती अवलंबावी
परी नाशिलें नष्टें जगता तूं ही स्थिति सुधरावी ॥१५७॥
बोध तुला हा केला उद्धव
लोक संग्रहा असंग तूं तंव
शांतमनें जा हिमालयासी
अक्षय राहिन तव हृदयासी ॥१५८॥
हृदयीं धरूनी पद बहुवेळां
वदरीसी हरिभक्त निघाला
वळुन वळुन तो मागें पाहे
भक्ता सुख भक्तींतचि आहे ॥१५९॥
होम दान जप शांति सुखास्तव
निरूपायानें करिती यादव
सरतां तें ये मधुक्रमासी
रंग जाणों पारणा जपासी ॥१६०॥
घड्या मागुनी घडे रिकामे
करिती यादव तइं अविरामें
मद्यप्यास का विवेक राही
बुद्धी पुरती नाशुन जाई ॥१६१॥
निमित्त कांहीं काढुन निंदी सात्यकीस कृतवर्मा
त्यानें ही वाक्प्रहार केले पाहुन त्याच्या मर्मा ॥१६२॥
ज्वालाग्राही कोठारावर
ठिणगे पडली हीच भयंकर
दोन जाहले तट तेठायीं
विकोपास तें भांडण जाई ॥१६३॥
सिंधु तटाचें वेत लव्हाळे
घेउन हातीं प्रहार केले
क्रोधावेशें परस्परांवर
शाप फळा ये असा भयंकर ॥१६४॥
प्रेतांचा खच पडला भूसीं
मदांध लढती तुडवित त्यासी
शिव्या घालिती ओंगळ, ओठीं
कुणि ना उरला जिवंत पाठी ॥१६५॥
अश्वत्थाच्यातळीं शिलेवर
बसुनी सारे बघत रमवार
शेताची जणु काय कापणी
धनी पाहतो शांतपणानीं ॥१६६॥
उत्पत्ति स्थिति या जो कारण तोची करि संहारा
वणिज जसा उठतां हाटांतुन आवरि तोच पसारा ॥१६७॥
बलरामानें जवळी येउन
हरीस दिधलें प्रेमालिंगन
वडिलपणाचें विसरून नातें
मिठी मारिली घट्ट पदातें ॥१६८॥
चुकलों त्याची क्षमा असावी
प्रभो अतां मज आज्ञा व्हावी
स्मितवदनानें वदे दयाघन
सुखें करी अवतार विसर्जन ॥१६९॥
सागरतीरा बसुनी हलधर
योगें पाही हृदीं परात्पर
अदृष्य झाली तदीय मूर्ती
बघे श्रीहरी प्रसन्न चित्तीं ॥१७०॥
भूचा हरला भार सर्वही कार्य न आतां उरलें
असें जाणुनी देव मुरारी ध्यानावस्थित झाले ॥१७१॥
परमेशाची मूर्ती सुंदर
अधिंकचि भासे तदा मनोहर
शुभ्र पीतांबर वरी मेखळा
तुळशीची रुळते वनमाला ॥१७२॥
स्म्ति वदनावर नत - मंगल जें
शतसूर्यासम तेज विराजे
पायाखालतीं एक महीवर
दुसरा विलसे वामांगावर ॥१७३॥
कमल नयन ते मिटले होते
हृदयीं निरखी निजरूपांतें
तोंच लुब्ध कें माया - मोहित
बाण मारिला मुसलशेषयुत ॥१७४॥
पाय कोंवळा कोमल तांबुस
त्यास वाटलें हें मृग पाडस
रूप चतुर्भुज बघतां जवळी
हृदया त्याचे धडकी भरली ॥१७५॥
येत बापडा तो काकुळती
श्रीहरि त्यातें परि शांतविती
घडले सारें मम इच्छेनें
जरे ! न कर तूं दुःख भयानें ॥१७६॥
दारुकास मग कथी परात्पर जा तूं द्वारवतीसी
यदुकुल - संक्षय गमनहि माझें सांग तिथे सकलांसी ॥१७७॥
द्वारेमाजी कुणि न वसावे
इंद्रप्रस्था सत्वर जावें
अर्जुनास हें कथी सविस्तर
करील मग तो वारासार ॥१७८॥
श्रीकृष्णाचा रथ गरुडांकित
नभीं उडोनी हो अंतर्हित
विस्मित दारुक करूनी वंदन
शोकमग्न करि आज्ञा पालन ॥१७९॥
जवळी आली सती रुक्मिणी
निज मस्तक ठेवी श्रीचरणीं
म्हणे श्रीहरी ! तुमचे आधीं
त्यजिते मी भूलोक उपाधी ॥१८०॥
प्रदक्षिणा घातली हरीसी
गंहिवर तो दाटला उरासी
प्रेमें वरिवरि नमनें केली
पद्मासन ती देवी घाली ॥१८१॥
जगताची ती वत्सल माता शक्ति परमेशाची
निजधामासी जायासाठीं सज्ज जाहली साची ॥१८२॥
नासाग्रीं स्थिर करूनी दृष्टी
साठवून हरि हत्संपुष्टीं
योगबलानें निर्मी ज्वाला
गेली जननी वैकुंठाला ॥१८३॥
स्वाग करण्या परमेशाचें
तत्पर झाले देव दिवींचे
सुरांगना करितात तनाना
देव वर्षती दिव्य सुमांना ॥१८४॥
बघाव्या निर्याण हरीचें
उत्सुक झाले मन देवांचें
सप्तर्षीसह शंकर आले
इंद्रादिक सुर सिद्ध मिळाले ॥१८५॥
कर जोडुन ते स्तविती सारे
कृष्ण हरे गोंविंद मुरारे
दृष्टी खिळली श्रीमूर्तीवर
आनंदासी पुरे न अंतर ॥१८६॥
वाजतात दुंदुभी जाहला हर्श बहु स्वर्गातें
वर्णूं बुध हो परी कसें मी काय वाटलें भूतें ॥१८७॥
अंतरतें सौभाग्य महीचें
स्पर्श पुनः ना श्रीचरणांचें
मधुर दिसे स्मित हास्य न आतां
दीन जनासी नुरला त्राता ॥१८८॥
हृदयीं आहे हा संतासी
सामान्यांची गत परि कैसी
त्यासी आतां श्रीमूर्तींचें
दर्शन कोठुन घडावयाचें ॥१८९॥
पृथ्वी साई विह्वल झाली
सोडुन तिज जातों वनमाली
नरनारींचे भरती डोळे
हरि दर्शन सुख ज्या अंतरलें ॥१९०॥
प्रसन्नतेनें सर्व दिशांसी
पाहुन झाकी हरि नयनासी
योगेश्वर निजरूपें हृदयीं
संत जनांचें दर्शन घेई ॥१९१॥
ती मूर्ति प्रभुची मनोहर अति ध्यानामधे रंगली
देवांही बघवे न तेज नयनीं जे दीप्त योगानलीं
लीलाविग्रह वासुदेव भगवान् जाती स्वलोकाप्रती
झाले विस्मित वासवादिक मनीं त्यां ती कळेना गती ॥१९२॥
आज जाहले कृतार्थ जीवित
कळसा गेले कृष्णकथामृत
नाम शकाचें असुन विरोधी
तो मम कार्या या ने सिद्धी ॥१९३॥
ठसा यावरीं निज मुद्रेचा
करो वरद कर गुरो तूमचा
तरीच संमत संत - समाजीं
होय अल्प ही सेवा माझी ॥१९४॥
वस्तुगतीनें या कार्याचें
कर्तृत्व न लव मजसी साचे
सद्गुरूराया हे तुमचे बळ
झालोसे मी निमित्त केवळ ॥१९५॥
लेखन करितें टोक बरूचें
परि तें कौशल लिहिणाराचें
दिसते खडकांतुन ये निर्झर
जल वर्षत ते परी पयोधर ॥१९६॥
कुमुदा फुलवी गमे निशाकर
असे मूळचा उजाड तो तर
परावृत्त रविकिरणांनांची
लोक मनिती प्रभा शशीची ॥१९७॥
लहान मुलगा करितो स्वागत अस्फुट निजवाणीनें
शिष्टचारा जाणत ना तो वदे कथित जननीनें ॥१९८॥
जाणत नामी लेखनरीती
शास्त्र कळेना कशास खाती
अगदी थोडें कळतें संस्कृत
यश ते श्रीपांडुरंग - शिक्षित ॥१९९॥
तशीं दर्शनें मीमासादिक
पाहियलें मीं नच त्यांचें मुख
खोल नसे अभ्यास कशाचा
मधुर आर्जवी ना मम वाचा ॥२००॥
दारुण संकट अनाथतेचें
बालपणीं ये मजवर साचें
रू न ना गुण रोगट काया
तिरस्कारिती जन दीना या ॥२०१॥
मोहक नव्हता स्वरही माझा
स्वभाव हट्टी वज ना काजा
प्रेम कुणा येणार अशाचें
निरपेक्ष न कुणि जगतीं साचें ॥२०२॥
दया प्रेम वात्सल्य जिव्हाळा
खरी ग