आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहेच. आपल्याकडे पंतप्रधानपदासाठी एकच नाव आहे ना? पण विरोधकांकडे एकही नाव नाही. तुम्हीच सांगा विरोधकांचा पंतप्रधान कोण? शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव किंवा औवेसींना करायचं का पंतप्रधान? असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या महाआघाडीवर टीका केली. तसेच हिंमत असेल तर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करा? असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लातूर येथील महायुतीच्या सभेत बोलताना भाजपाच्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात, विरोधकांवर टीका करताना पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? असा प्रश्न विचारला आहे. जाहीरनाम्याचे समर्थन केले आहे. भाजापाने जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेसने हा जुनाच जाहीरनामा असल्याची टीका केली. त्यावर बोलताना, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा जाहीरनामा हा तर इंदिरा गांधीच्या काळातीलच असल्याचे म्हटले. तसेच भाजपाच्या जाहीरनाम्याबाबत मोदींना धन्यवाद दिले. जाहीरनाम्यातील वचनांमुळेच शिवसेनाआणि भाजपाची युती झाली असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले.