काँग्रेस नेते, मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केला. सोबतच दिवंगत नेते ए.टी. पवार यांच्या सुनबाई राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनीही कमळ हाती घेत भाजपात प्रवेश केला आहे.
यावेळी भाजपाचे खासदार संजय काकडे उपस्थित होते. काकडे यांची नाराजी दूर झाल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे. प्रवीण छेडा यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून, भाजपाचे किरीट सोमय्या या मतदारसंघाचं लोकसभेत ईशान्य मुंबई येथून प्रतिनिधीत्व करतात. मात्र त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा प्रचंड विरोध दर्शवला आहे. त्यामुळे भाजपानं अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही.
या मतदारसंघातून सोमय्यांऐवजी छेडा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. आधी भाजपामध्ये असलेल्या छेडा यांनी प्रकाश मेहतांसोबत मतभेद झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार यांनी 2014 मध्ये दिंडोरीमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. सध्या विद्यमान खासदार हरीश्चंद्र चव्हाण दिंडोरी इच्छुक आहेत मात्र आता भारती पवार आल्याने भाजपा त्यांना तिकीट देणार असे चित्र आहे, त्यामुळे चव्हाण यांना मोठा धक्का मानला जातो आहे.