तरुणांना पुढे आणण्याच्या जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे, यासाठी जास्तीत जास्त तरुण उमेदवार देण्याचे काम राष्ट्रवादीने केले. नगर जिल्ह्यात संग्राम जगताप हे खणखणीत नाणं, एक वाजणारा बंदा रुपया, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रसे पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व खा. शरद पवार यांनी संग्राम जगताप यांचे कौतुक केले. या सरकारने राफेल विमानात घोटाळा केला याचे उत्तराची मागणी केली असता मोदींकडे यांचे उत्तर नाही ही लज्जास्पद गोष्ट आहे. बोफर्सप्रमाणे राफेलचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी आम्ही केली. पण हे सरकार तशी तयारी दर्शवीत नाही कारण ते स्वच्छच नाही. मोदी म्हणालेले ‘ना खाऊँगा ना खाने दुँगा’ मग राफेलच्या वेळेला नेमके काय झाले? असा टोला पवार यांनी सरकारला लगावला.
आपल्या देशात पाऊस पडला नाही, पिक आले नाही, कर्जाचा बोजा वाढला तर शेतकऱ्यांना थकबाकीदार म्हटले जाते. मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या समस्येवर मार्ग काढण्याचे काम केले. गुजरातमध्ये दुष्काळ पडला, तेव्हा महाराष्ट्राने गुजरातला हातभार लावला. मात्र मोदींची भूमिका आता बदलली आहे. शेतमालाला भाव मिळावा त्यासाठी मी संसदेत मागणी केली होती तेव्हा मोदी मला म्हणाले होती की तुम्ही खाणाऱ्यापेक्षा पिकवणाऱ्याचा विचार जास्त करता. मी त्यांना सांगू इच्छितो की पिकवणारा जगला तरच खाणारा जगेल. सरकारने शेतकऱ्यांचा विचार करायला हवा होता मात्र सरकार तसे करताना दिसत नाही ही खंत पवार यांनी व्यक्त केली. मोदी सरकार आधी गांधी घराण्याला शिव्या घालत होते, नंतर नेहरूंनाही त्यांनी शिव्या घातल्या. आता यांचा मोर्चा माझ्याकडे वळला आहे. पण मी महाराष्ट्राचा मर्द माणूस आहे आणि मी कोणा लुंग्यासुंग्यांना घाबरत नाही असे पवारांनी नगर येथील प्राचार सभेत मोदींवर निशाणा साधला.
पुढे बाळासाहेब थोरात यांनी जनतेशी संवाद साधला. युपीए सरकारच्या असताना पवार साहेबांच्या कारकीर्दीत शेतकऱ्यांना काहीच कमी नव्हती. पवार साहेबांनी देशासोबत राज्याचीही प्रगती कली. एकदा तर माशांच्या दुष्काळ पडला होता त्यालाही आम्ही मदत दिली होती, असे थोरात यांनी सांगितले. या सरकारकडे बोलायला शब्द नाहीत मोदी सरकारने जनतेला भोपळा दिला आहे, असे थोरात म्हणाले.
पुढे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संग्राम जगताप यांनी जनतेशी संवाद साधला. पाथर्डीची परिस्थिती बिकट आहे. या विभागाची ओळख सर्वात जास्त टँकरचे गाव म्हणून झाली आहे हे दुर्दैवी गोष्ट जगताप यांनी जनतेसमोर मांडली. भाजपचे उमेदवार म्हणतात मला मदत करा नाही तर बंदोबस्त करेन. तुम्ही कोणालाही घाबरून बसू नका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या पाठीशी असल्याचा दावा जगताप यांनी केला. या सरकारला जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणंघेणं नाही. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिलेदार सदैव खंबीर आहेत, असा विश्वास संग्राम जगताप यांनी जनतेला दिला.