पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 26 एप्रिल रोजी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महायुतीची जाहीर सभा होणार असून, सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख भाषणे होणार आहेत. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेही सभेला उपस्थित राहणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ही सभा "भीमटोला" ठरेल असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. प्रदेश कार्यालयात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये ही माहिती दिली गेली आहे. शेलार पुढे म्हणाले की भाजपच्या तीन लोकसभा मतदारसंघात एकूण बावीस पदयात्रा झाल्या, असून प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात वेगवेगळ्या पदयात्रा करत असून आतापर्यंत सुमारे 47 पदयात्रा झाल्या आहेत. आजपर्यंत 140 ठिकाणी कार्यक्रम झाले. तर तीन लोकसभा मतदारसंघात 90 चौक सभा झाल्या. प्रत्यक्ष नागरिकांना भेटीगाठी व त्यांच्या सुमारे 550 ग्रुप मिटींग घेण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेचा अधिक फायदा कसा करता येईल असे प्रयत्न सध्या महायुती करत आहे.