Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकसभा सदस्यालाच पंतप्रधानपदासाठी पाठिंबा-करात

लोकसभा सदस्यालाच पंतप्रधानपदासाठी पाठिंबा-करात

भाषा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी डॉ.मनमोहनसिंगांना असलेला विरोध आज आणखी तीव्र केला. निवडणुकीनंतर आम्ही लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यालाच पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ असे सांगत करात यांनी अप्रत्यक्षपणे 'कॉंग्रेस चालेल, पण मनमोहन नको,' अशी भूमिका घेतल्याचे बोलले जातेय.

आपण स्वतः पंतप्रधानपदाचे उमेदवार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी २००४ मध्ये कॉंग्रेसला आम्ही पाठिंबा दिला होता, याची आठवण देत निवडणुकीनंतर तिसरी आघाडी सत्ता स्थापनेपर्यंत पोहोचल्यास, आम्हालाही कॉंग्रेसने पाठिंबा द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.

मनमोहनसिंग यांना असलेला विरोध तीव्र करत, करात म्हणाले, राज्यसभेत निवडून आलेल्या सदस्याला आम्ही यापूर्वी पाठिंबा दिलाय, यावेळी मात्र लोकसभेत निवडून आलेला सदस्य पंतप्रधान व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करू.

डाव्यांनी आत्ता तरी पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवलेला नाही. तिसर्‍या आघाडीनेही असे काही ठरवलेले नाही. मात्र, निवडणुकीनंतर आम्ही सहमतीने उमेदवार ठरवू असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहिर केलेल्या बहूजन समाज पक्षाच्या मायावती आणि या पदासाठी इच्छुक असेलल्या एआयडिएमकेच्या जयललिता यांच्यातील वादात पडण्याचे मात्र करातांनी सफाईने टाळले.

Share this Story:

Follow Webdunia marathi