निवडणूकीत आपण पराभूत झालो अथवा पंतप्रधान बनू शकलो नाहीत तर आपण राजकारण सोडून देऊ अशी घोषणा भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली होती. आज भाजप आणि एनडीएच्या पराभवानंतर त्यांनी पक्षाच्या बैठकीत आपली निवृत्तीची इच्छा व्यक्त केली.
यूपीए आणि कॉग्रेसला मिळालेल्या विजयानंतर अडवाणी यांनी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. यानंतर पराभवाची कारणं शोधण्यासाठी भाजपच्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली.
पक्षाने आता दुसऱ्या एखाद्या नेत्याला आपली जबाबदारी सोपवावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्याची माहिती भाजप नेते अरुण जेटली यांनी दिली आहे.
अडवाणी यांची ही इच्छा भाजप नेत्यांनी नाकारली असून, यावरील निर्णय पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह हेच घेतील असे मतही जेटली यांनी व्यक्त केले आहे.