अमेरिकेबरोबरच्या अणू कराराला तीव्र विरोध करणारे आणि सत्तेत आल्यानंतर हा करार रद्द करून तो पुन्हा नव्या अटींवर करू अशी घोषणा करणारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांनी आता आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे. हा करार आता रद्द करता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
हा करार करण्यासाठी आग्रही असलेले कॉंग्रेस व पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी देश विकायला काढला आहे, यापासून तर अनेक आरोप अडवानींनी या मुद्यावर मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी केले होते. या कराराला तीव्र विरोध करून आमचे सरकार सत्तेत आल्यास हा करार रद्द करून तो नव्या अटींनिशी करू असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, आज येथे पत्रकारांशी बोलताना हा करार असा रद्द करता येणार नाही, असे गुळमुळीत उत्तर त्यांनी दिले. यासंदर्भात अमेरिकेशी चर्चाही करता येणार नाही, असेही ते म्हणाले.