लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी आज प्रचाराची समाप्ती झाली असली तरी सत्ताकारणासाठी बहुमताच्या जादुई आकड्यासाठी जुळवाजुळवही सुरू झाली आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज लुधियानात डाव्यांना पुन्हा युपीए आघाडीत येण्याचे आवाहन करताना धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेपासून रोखले पाहिजे, असे आवाहनही केले.
सध्या नाराज असलेल्या युपीएच्या घटक पक्षांची नाराजी दूर करू असे सांगताना, डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील कुठल्याही सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता मात्र त्यांनी फेटाळली. कॉंग्रेसपेक्षा या पक्षांना जास्त जागा मिळणार नाहीत, हे कारणही त्यासाठी दिले.
सत्ता स्थापनेसाठी डाव्यांना पाठिंब्यासाठी आवाहन कराल काय असे विचारले असता,
देशाला एक स्थिर व धर्मनिरपेक्ष सरकार देण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यायला पाहिजे, असे मला नेहमी वाटते, असे उत्तर त्यांनी दिले.
डाव्यांचा पाठिंबा घेण्यात भारत- अमेरिका अणू करार अडचण ठरेल काय असे विचारले, असता, आता हा प्रश्न उरला नसल्याचे सांगून या कराराव स्वाक्षरी झाली असून तो अमलात यायलाही सुरवात झाली आहे. आता त्यावर चर्चेचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले.