12 राज्यांच्या 141 लोकसभा मतदार संघातील 265 जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. दुस-या टप्प्यातील 265 आणि पहिल्या टप्प्यातील 124 जागांचे मिळून एकूण 544 जागांवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून जवळपास अर्ध्या लोकसभेचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुस-या टप्प्यात मतदानाची आकडेवारी खालावली असून देशभरात एकूण 55 टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्रातही 55 टक्के मतदान झाले आहे.
देशभरातील बारा राज्यात एकूण 55 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान त्रिपुरा राज्यात 78.80 टक्के तर सर्वांत कमी 44 टक्के मतदान बिहार आणि उत्तर प्रदेशात झाले. राज्यात 55 टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये 46, गोवा 65, आंध्र प्रदेशात 68, त्रिपुरात 78.80, मध्य प्रदेश 45, उत्तर प्रदेश 44, ओरीसा 45, बिहार 44 तर झारखंडमध्ये 46 टक्के मतदान झाले.
दूस-या टप्प्यासाठी आंध्रप्रदेशातील 20, आसामच्या 11, बिहारच्या 13, गोव्यात दोन, जम्मू-कश्मीरमध्ये एक, कर्नाटकात 17, मध्यप्रदेश 13, महाराष्ट्रातील 25, ओरीसातील 11, त्रिपुराचे दोन, उत्तर प्रदेशच्या 17 आणि झारखंडच्या 8 जागांवर आज मतदान झाले.
काही किरकोळ घटना वगळता देशभर मतदान शांततेत झाले. पहिल्या टप्प्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर यावेळी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. दुस-या टप्प्यातही नक्षलवाद्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. झारखंडच्या जमशेदपूरमध्ये भू-सुरंगाचा स्फोट घडवून एक गाडी उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर गिरिडीहमध्ये झालेल्या स्फोटात तीन मतदान कर्मचारी जखमी झाले आहेत. चाईबासा येथे पोलीस गाडी आणि चार ईव्हीएम मशीनांना जाळून टाकण्यात आले. तर जमशेदपूरमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून कर्मचा-यांना मारहाण करून मतदान यंत्रे पळवून नेली आहेत.