पॅरोलवर सुटका झाल्यानंतर आता भाजपचे वादग्रस्त नेते वरुण गांधी यांनी आपल्या प्रचाराला वेग दिला आहे. आपण गांधी नावाचा फायदा कधीही घेतला नाही आणि घेणार नाही असे सांगतानाच त्यांनी कॉग्रेस आणि गांधी कुटुंबीयांवर जोरदार प्रहार केला.
आपण नावाने जरी गांधी असलो तरी आपल्या नावाचा वापर करून घेण्याची आपल्याला सवय नसल्याचे ते म्हणाले. वरुण यांच्यावरील रासुका काढण्यास केंद्र सरकारनेही नकार दिल्यानंतर भाजपने त्यांच्या जोरदार प्रचार सुरू केला असून, तीन दिवसांमध्ये वरुण 18 सभांमध्ये भाषण ठोकणार आहेत.
आज वरुण यांनी फतेहपुर येथील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत कॉग्रेसवर जोरदार प्रहार केला.
आपल्याला तुरुंगात झालेल्या यातनांचे पाढेही वरुण आपल्या प्रत्येक सभेत वाचत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने आपल्याला या प्रकरणात जाणून-बुजून अडकवले असून, आपल्या पाठीशी जनतेचे आशीर्वाद असल्याने आपण देशासाठी आणि राष्ट्रभक्तांसाठी सतत लढत राहू असेही वरुण म्हणाले.